अ‍ॅनिमल फार्म (मला कळलेले)

Submitted by खालिद on 22 September, 2011 - 02:07

पाच वर्षांपूर्वी कॉलेजला असताना आमच्या ग्रूप ने एक टी शर्ट डिझाइन केला होता. त्यावरचे वाक्य होते (COEP-All Men are Equal but Some are more equal). त्यावेळी माझी इंग्लिश साहित्याची वाचन कुवत फार नसल्याने त्या वाक्याबद्दल फार जास्त काही कळत नव्हते. फक्त ते वाक्य बोलताना फार भारी वाटायचे. नंतर पुढे कधीतरी मित्रांशी झालेल्या चर्चेत हे वाक्य जॉर्ज ऑर्वेल या लेखकाच्या "अ‍ॅनिमल फार्म " या पुस्तकातील "All animals are equal but some are more equal than others" या वाक्यावर बेतलेले आहे असे कळले. त्यावेळी हे पुस्तक कधीतरी वाचेन असे ठरवले होते आणि ते, आपण बरेच संकल्प करुन सोडून देतो, तसे अर्धवट राहिले.

काल लायब्ररी मधे एक पुस्तक शोधताना Relevant Search मधे अ‍ॅनिमल फार्म दिसले. लगेच बैठक मारली आणि ३-४ तासात इनमिन १५० पानांचे पुस्तक संपवून टाकले. पुस्तक संपवले खरे, पण ऑर्वेल ने मनात जी बैठक मारली ती मारलीच वर लिहायलाही उद्युक्त केलय. बर्‍याच जणानी हे पुस्तक वाचले असेल, तरीही माझे हे दिन पैसे या पुस्तकाबद्दल.

जॉर्ज ऑर्वेल ने १९३७ साली लिहायला घेतलेले, पण १९४३ पर्यंत प्रकाशित न झालेले १५० पानांचे हे "अ‍ॅनिमल फार्म - अ फेअरी स्टोरी " नावाचे पुस्तक. सरळपणे बघायला गेल्यास, एखादी इसापनीती, हितोपदेश सारखी गोष्ट. पण एका छोट्या शेतावर राहणार्‍या प्राण्यांच्या जीवनात घडणारी ही गोष्ट वाचून संपल्यावर इतिहास, समाजजीवन, संस्कृती, मानव स्वभाव या इतर अनेक पैलूंवर प्रकाश टाकून आपल्याला स्वतःबद्दल आणि परिस्थितीबद्दल विचार करायला भाग पाडते.

मूळ कथा अगदी साधीसरळ. जोन्स नावाच्या एका शेतकर्‍याच्या शेतावर बैल, गायी, घोडे, डुकरे, कुत्रे, गाढव, कोंबड्या, मेंढ्या असे बरेच प्राणी राहत असतात. आपापले काम प्रामाणिक पणे करत असतात. पण मेजर म्हणून एक सर्वात वयस्कर डुक्कर ज्याला सर्व प्राणी फार मान देत असतात, त्याला सारखे वाटत असते की 'अरे, आपल्याला यातून काय मिळते? जेमतेम जगण्यापुरते खायला आणि राहायला. बाकी सर्व फायदा या मनुष्यांना. तर नाही, आपण यांची गुलामी आता नाही करायची.' तो सर्व प्राण्याना एकत्र करुन त्यांच्या मनात या पारतंत्र्या विरुद्ध लढायची प्रेरणा निर्माण करतो. तो मेल्यावर त्या कळपातील दोन हुशार डुकरे, नेपोलिअन आणि स्नोबॉल, त्याचा वारसा पुढे चालवताना जोडीने सर्व प्राण्याना लिहावाचायला शिकवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरुन सुशिक्षित झालेले प्राणी नीट विचार करुन जागरुक होतील. काही प्राणी , जे चलाख असतात ते शिकतात , काहीजण नाहीत. पुढे एकदा जोन्स च्या चुकीने उपाशी राहायला लागते आणि तिथेच क्रांतीची ठिणगी पडते. सर्व प्राणी माणसांवर हल्ला करून त्यांना हाकलून लावतात आणि शेताचा ताबा घेतात. सर्व जणाना गुण्यागोविंदाने राहता यावे म्हणून कामे वाटून घेतली जातात. स्नोबॉल आणि नेपोलिअन सर्वात जास्त ज्ञानी असल्याने सर्व मॅनेजमेंट चे काम बघतात. घोडे शेतीकाम आणि ओझी वाहणे तर बाकी सर्व प्राणी आपापल्यानुसार ताकदीची कामे वाटून धेतात. सर्वांचे चांगले व्हावे, शांततेत सर्व कामे पार पडावी म्हणून सात नियमांची घटना लिहीली जाते.ती अशी

१. जे कोणी दोन पायांवर चालतील ते शत्रू
२. जे कोणी चार पायांवर चालतील किंवा ज्याना पंख आहेत ते मित्र.
३. कोणताही प्राणी माणसासारखे कपडे घालणार नाही.
४. कोणताही प्राणी माणसासारखा बिछान्यात झोपणार नाही.
५. कोणताही प्राणी दारु पिणार नाही.
६. कोणताही प्राणी दुसर्‍या प्राण्याची हत्या करणार नाही.
७. सर्व प्राणी समान आहेत. (All animals are equal.)

अशाप्रकारे काही दिवस आनंदात जातात. पण जसा जसा काळ जायला लागतो तसतशी प्राण्यांमधे धुसफुशी सुरु होतात. आपणच शेताचे सर्वेसर्वा व्हावे असे काही प्राण्यांना वाटू लागते. राजकारण खेळले जाउ लागते. एकाएका जातीला हाताशी धरून दुसर्‍याचा काटा काढणे, इतर प्राण्यांची मने कलुषित करुन भांडणे लावून आपला स्वार्थ साधणे, सर्वांचे हित साधण्याचा देखावा करुन फक्त आपले आणि आपल्या बगल्बच्चांचे हित साधणे असे प्रकार होउ लागतात. आपल्या अकलेच्या जोरावर आणि फोडा आणि झोडा या तत्वाने डुकरे स्वतःला श्रेष्ठ घोषित करतात. त्यानंतर ते जपण्यासाठी नियमांमधे सोयीस्कर बदल करणे, इतराना तुच्छतेने वागवणे, सत्ता टिकवायला शेवटी माणसांबरोबरही हातमिळवणी करणे, विरोध करणार्‍याचा काटा काढणे अशा सर्व थरांना गोष्टी नेल्या जातात. मात्र एवढे करुनही सामान्य प्राण्याना 'तुमच्या भल्यासाठीच आम्ही हे करतोय' अशी भ्रामक समजूत करुन दिली जाते. सर्व आपल्या मनासारखे करण्यासाठी हे मूठ्भर प्राणी सर्व नियमांवर बोळा फिरवून शेवटी एकच नियम बनवतात की "all animal ara equal but some are more equal than others" . आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने आणि भाषणांनी सर्व सामान्य प्राण्यांच्या मनावर हा नियम कोरला जातो. मग त्यांच्या कष्टावर हे मोजके प्राणी गब्बर होतात आणि बाहेरच्या जगाला 'आम्ही किती प्रगती केलीय' याचा देखावा निर्माण करतात. हा सर्व सुखाचा देखावा तयार झाला म्हणजे "ऑल इज वेल अ‍ॅण्ड वी लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर" याचाच अर्थ परीकथा संपली.

दुसर्‍या महायुद्धाच्या कालखंडात बेतलेली आणि मुख्यत्वे साम्यवाद (मार्क्सवाद) आणि त्याच्या तत्वावर टीका करुन त्यातला फोलपणा दाखवणारी ही कथा काल, आज आणि उद्याच्या देखील परिस्थितीवर प्रभावीपणे भाष्य करते. कारण ऑर्वेल ची माणसाचा स्वभाब अचूक टिपण्याची हातोटी. आतापर्यंतच्या माझ्या वाचनात आलेले सर्वात प्रभावी असे हे व्यक्तिचित्रण. साम्यवाद, कॅपिटॅलिझम, क्रांतीवाद, गांधीवाद, कोणताही वाद घ्या, किंवा कोणतेही तत्वज्ञान्/संस्कृती घ्या, तिच्या उदयाची, भरभराटीची कारणे आणि त्याछ बरोबर अस्ताचीही कारणे या छोट्याश्या गोष्टीच्या आधारे स्पष्ट करता येतात कारण सर्वांच्या मागे असलेली एकच मानवी स्वभावाची जडणघडण. सत्ता , अधिकार गाजवण्याची उर्मी ही या सर्वांची मूलभूत प्रेरणा. मानवसमूहावर संकट आले की, ते कोणतेही असो, धर्माचा र्‍हास, परकीय आक्रमण असो, सर्व समूह आपल्या रक्षणासाठी एकत्र येतो. एखादा महान आत्मा त्या समाजाला नेतृत्व देतो, चांगल्या जगण्यासाठी तयार करतो. पण एकदा समाजात शांतता नांदू लागली की पुन्हा ती सत्ता , अधिकार गाजवण्याची उर्मी डोके वर काढते. महात्म्यांच्या विचारांच पराभव त्यांचेच अनुयायी म्हणून घेणार्‍यांकडूनच केला जातो. पुन्हा संघर्ष, नवी संस्कृती, नवे विचार. प्रवृत्ती तीच.

आजचे जगातले कोणतेही प्रश्न उदाहरणार्थ जातीवाद, वंशवाद, भूभागावरील संघर्ष हे सर्व आपण या कथेशी सहज जोडू शकतो. ते आपल्यावर आहे की कोणता प्रश्न आपल्या जीवनाशी जास्त निगडीत आहे. मग तो भ्रष्टाचार असेल, दैनंदिन गरजांची उणीव असेल अथवा देशभक्ती असेल. पूर्ण कथा वाचताना क्षणभर असे जाणवेल की अरे याचे कारण हेच आहे आणि उत्तर हे असेल. पुढच्याच क्षणी असे वाटेल की ते निसटून गेले. पुस्तक संपले की ते अस्वस्थ करतेच पण आपल्याला कारणे कळून पण बर्‍याच वेळा आपण काही करू शकत नाही याची चुटपूट ही लावते.

हे माझे दोन पैसे. ही सर्व माझी मते कुणालाही मूर्खपणाची , विचारजंती वाटू शकतात पण त्याला इलाज नाही. तो कथेचा दोष. कारण शेवटी "All men are equal, but nobdy is same" हेच खरे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम आवडले लेखन! मी हे पुस्तक "ऐकले" आहे ऑडिओ टेप्स मधून. तो मधला पॅरा सुंदर लिहीला आहे. दुर्दैवाने एखाद्या सत्तेविरूद्ध असलेल्या लढ्यातील "प्याद्यां"ना हा पॅटर्न कळत नाही. एकदा जे कोणी "ते" आहेत त्यांना हटवले की "आमचे" लोक चांगली सत्ता देतील हा भ्रम यातील बहुतेकांना असतो. त्यातही आमचे नेते तसे नाहीत असाही समज असतो. कदाचित १९७७ चा जनता पक्षाचा लढा, १९९५ मधला महाराष्ट्रातील कॉन्ग्रेस सरकारविरूद्धचा लढा, काही दलित चळवळी याच पॅटर्न मधून गेल्या असतील. संभाजी ब्रिगेड वाल्यांचे लेख वाचले की तेच जाणवते. ज्यांना हाकलून द्यायचे ते लोक, त्यांना हाकलल्यावर ज्यांनी राज्य करायचे ते लोक आणि जनता हे बदलते. पॅटर्न तोच.

त्यामुळेच कधीकधी काही समाजसुधारकांचे (आगरकर?) "समाजसुधारणेला स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षाही प्राधान्य" किंवा महात्मा गांधींची साधनशुचिता हे योग्य वाटते. ठरवणे अवघड आहे.

चांगला धागा काढला आहे. आता बिग ब्रदर (१९८४) ची ओळख सुद्धा आवडेल वाचायला.

संबंधितांनी दिवे घ्यावेत, पण माबोवरच्या काही बाफवरतीही हा पॅटर्न दिसलेला आहे Happy

छान.....

मला पुस्तक खुप आवडले. बरेचदा वाचलेय. पुस्तकाचे परिक्षणही छान लिहिलेय.

१९८४ वाचायचा प्रयत्न केला खुप वेळा. पण खुप क्लिष्ट वाटते. माझी गाडी पुढे सरकतच नाही Sad विकत घेऊन ठेवलेय पण अजुन पुर्ण वाचले नाही.

इथे परिक्षण लिहा १९८४ चे ही Happy

शप्पथ्थ ! कित्ती वर्षांनी आठवण करून दिलित Happy वा फारच छान पुस्तक ! कॉलेजमध्ये कित्ती गप्पा मारल्या होत्या यावर ! धन्स खलिद !
छान लिहिलयत ! शेवटचा पॅरा - अगदी, अगदी ! सेमपिंच !

हम्म.. मस्त लिहिलयं.

मी दहावीच्या सुट्टीत वाचलं, रद्दीवाल्याच्या दुकानात हे आणि "ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी" २ रु प्रत्येकीला मिळाली होती.

छान पुस्तके आहेत ही.

१९८४ हे सुरूवातीला क्लिष्ट वाटत असले तर मध्यातून अचानक बेस्ट वाटायला सुरू होते ते शेवटपर्यंत. त्यामुळे पहिले ५० पाने पचवा. Happy

अ‍ॅनिमल फार्मवर काय लिहावे. मायबोली आणि हे संपूर्ण जगच अ‍ॅनिमल फार्म आहे!

अ‍ॅनिमल फार्म हे जगातील काही सर्वोत्कृष्ट 'रुपक' कादंबर्‍यांपैकी एक आहे. निर्विवादपणे. वर केदारने लिहिल्याप्रमाणे "मायबोली आणि हे संपूर्ण जगच अ‍ॅनिमल फार्म आहे!". अर्थात १९८४ ही सर्वच अंगाने अ‍ॅनिमल फार्मपेक्षा सरस कादंबरी आहे.

ह्या वर्षी ऑरवेलच्या निबंधांचे एक छोटेखानी पुस्तक हाती आले. The Lion and the Unicorn नावाचे. तीस (बहुतेक) बर्नार्ड क्रिकची प्रस्तावना आहे. ती प्रस्तावना वाचून १९८४ (आणि त्यामुळे अ‍ॅनिमल फार्म) बद्दल एक वेगळा नजरीया मिळाला. हे पुस्तक आणि प्रस्तावना नक्कीच वाचावी.

माझे चुकत नसेल तर अ‍ॅनिमल फार्मच्या नविन आवृत्तीत ती प्रस्तावना (ऑर्वेलने ते पुस्तक का लिहिले - तो काळ आणि राजकिय उलाढाली आणि त्याचा जनतेवर प्रभाव ) हे सर्व आहे.

>>ह्या वर्षी ऑरवेलच्या निबंधांचे एक छोटेखानी पुस्तक हाती आले. The Lion and the Unicorn नावाचे. तीस (बहुतेक) बर्नार्ड क्रिकची प्रस्तावना आहे. ती प्रस्तावना वाचून १९८४ (आणि त्यामुळे अ‍ॅनिमल फार्म) बद्दल एक वेगळा नजरीया मिळाला. हे पुस्तक आणि प्रस्तावना नक्कीच वाचावी.>><< मला ही प्रस्तावना म्हणायची होती.. ती आहे का नविन आवृत्तीत?

ऑरवेल म्हटले की बहुतेकांना १९८४ आणि अ‍ॅनिमल फार्मच आठवते. ज्यांनी १९८९ नंतरचा काळ पाहिलाय वा बहुतकरून तोच अनुभवलाय त्यांना ऑरवेल द्रष्टा वाटू लागतो. १९८४ ची तुलना मग स्टालिनच्या रशियाशी वा माओच्या चीनशी होते आणि आपण 'वा वा' असे उद्गार काढतो.

पण ह्याच ऑरवेलने लिहिलेली होमेज टू कॅटोलोनिआ, कमिंग अप फॉर एअर, डाउन अँड आउट इन पॅरिस अँड लंडन, बर्मिज डेज ही पुस्तके व असंख्य निबंध (जे साहित्याचा आणि समाजशास्त्राचा एक उत्तम नमुना आहेत) वाचल्यावर डाव्या विचारसरणीकडे झुकणार्‍या हा मनुष्याने १९८४ आणि अ‍ॅनिमल फार्म ही पुस्तके 'साम्यवादा'ला झोडपण्यासाठी लिहिली आहेत का खरेच हा प्रश्न पडू लागतो.

लायन अँड युनिकॉर्नच्या प्रस्तावनेने हे पडलेले प्रश्न सोडवण्यास थोडीफार मदत केली. ऑरवेल मरेपर्यंत समाजवादी/साम्यवादीच राहिला. तो पोथीवादी साम्यवादी नव्हता हे नक्की. आणि त्याची सर्वात विखारी टिका ही 'totalitarianism' वर होती. अर्थात संपूर्ण ऑरवेल समजणे ह्यासाठी विद्यार्थी असणे ही 'मूलभूत' पायरी आहे. फक्त त्या दशेतच इतका वेळ मिळू शकतो Proud

लेख आवडला.
>>अ‍ॅनिमल फार्म हे जगातील काही सर्वोत्कृष्ट 'रुपक' कादंबर्‍यांपैकी एक आहे.
सहमत.

एकूण मनुष्य स्वभाव असा आहे की " ... सम आर मोर इक्वल" अशी परिस्थिती निर्माण होतेच. ती भांडवलशाहीत उघडपणे असते पण साम्यवादातही छुपेपणे येतेच असे अ‍ॅनिमल फार्मचे सार आहे असे मला वाटते.

१९८४ आणि अ‍ॅनिमल फार्म ही पुस्तके 'साम्यवादा'ला झोडपण्यासाठी लिहिली आहेत का खरेच हा प्रश्न पडू लागतो.
>> नाही ती समुहाचे मानसशास्त्र यावर जास्त टीका करतात.
तुम्हाला वेळ मिळाला तर "लॉर्ड ओफ द फ्लाइज" पण वाचुन काढा.
अशीच छान कादंबरी.

बाफचे विषयांतर होईल कदाचित,
पण समूहा शिवाय व्यक्तिचा अभ्युदय शक्य आहे काय? अन समूह व्यक्तीच्या प्रगतीच्या मार्गातील धोंड का अन कशी ठरतो? शेवटी व्यक्तीच समूह्/समाज बनवितात ना? मग मनुष्य व्यक्ती म्हणून वेगळा अन समूहात वेगळा का वागतो?,,

खालिदजी, ही पोस्ट नको असल्यास सांगणे, उडवतो.

हाच लेख ऑगस्ट २०१० मधे उपक्रमावर 'लॉजिकल' या आयडीने प्रकाशित केलेला आहे. खालिद हेच लॉजिकल असावेत, अशी आशा आहे. Happy

पुस्तक परिचय आवडला, हे सांगणे नकोच.
नितिन थत्तेंनीही उपक्रमावर या पुस्तकाबद्दल सुंदर विवेचन केले होते. लिंक मिळाली की देतो.

टण्या, मृदुला, इब्लिस: +१
इब्लिस- प्रश्न उत्तम आहे. उत्तर शोधायला जिंदगी लागेल मात्र. Happy

खलिद- वाचत रहा, लिहीत रहा. Happy

खालिद, रैनाने लिहिलेले मनापासून ऐक. वाचत रहा. अ‍ॅनिमल फार्म वगैरे एका अत्यंत अद्भुत वैयक्तिक प्रवासाची सुरुवात असू शकते (तो प्रवास सुंदरच असेल वा शीतल-रम्य असेल असे मुळीच नाही, किंबहुना तो तसा नसेलच. कारण दलदलीसारखे प्रश्नात अधिकच गुंतत जाण्याची शक्यता जास्त).

>>>>>>>>>>>>>>
१९८४ आणि अ‍ॅनिमल फार्म ही पुस्तके 'साम्यवादा'ला झोडपण्यासाठी लिहिली आहेत का खरेच हा प्रश्न पडू लागतो.
>> नाही ती समुहाचे मानसशास्त्र यावर जास्त टीका करतात.
>>>>>
मला नाही वाटत असे. विशेषतः १९८४ हे totalitarian समाज/राजकीय व्यवस्था व तीमधील 'व्यक्ति'चे स्थान/हक्क ह्यावर अधिक भाष्य करते. अर्थात १९८४ हे त्याहूनही बरेच काही अधिक आहे (त्यातले newspeakचे प्रयोग, भाषा-विचार ह्यांच्या परस्परसंबंध वगैरे वेगळ्याच पातळीवरचे आहेत). ह्याच पातळीवरचे व विषयावरचे अजून एक नितांतसुंदर पुस्तक म्हणजे आर्थर कोएस्लरचे Darkness at noon.

Lord of the flies समुहाच्या मानसशास्त्रावर नक्कीच बोलते. पण ते टिका (प्रतिकूल-अनुकूल) नाही करत असे माझे मत आहे. Lord of the flies हे व्यक्तिसमुच्चयाचे रुपक आहे. एक प्रकारे It states fact, bare facts, without sugar coating.

रुपक कथा-कादंबर्‍यांचा विषयच आला आहे म्हणुन: सेरेपी-इस्किलार-एली, प्रवासी, The old man and the sea, One hundred years of solitude, Tortilla Flat, Lord of the flies ही माझी काही अशी 'रुपकात्मक' प्रकारातली आवडती पुस्तके. ह्यातल्या बर्‍याच पुस्तकांवर इथे माबोवर चर्चा झालेली आहे आधी.
अर्थात ह्यापलिकडे जाउन अनेक इतर पुस्तके आहेतच व त्यांवर प्रचंड लिहिलेले आहेच.

खालिद,
लेख आवडला Happy

टण्या, खालिद वाचत नाहीत, किंवा त्यांनी वाचन बंद केलं असं का वाटतं तुला? Proud

टण्या, खालिद वाचत नाहीत, किंवा त्यांनी वाचन बंद केलं असं का वाटतं तुला?
>>>
मला नाय तसं वाटलं. किंबहुना अ‍ॅनिमल फार्म आणि लायब्री ह्या दोन उल्लेखांमुळे ते वाचत असतील ह्याबद्दल शंकाच नाही. मी फक्त रैनाचे वाक्य आवडले म्हणुन पुन्हा अधोरेखीत केले.

Both Animal Farm and 1984 are beautiful books..

रुपक कथा-कादंबर्‍यांचा विषयच आला आहे म्हणुन: सेरेपी-इस्किलार-एली, प्रवासी, The old man and the sea, One hundred years of solitude, Tortilla Flat, Lord of the flies ही माझी काही अशी 'रुपकात्मक' प्रकारातली आवडती पुस्तके.

>>
!!

Pages