"नागमंडल"

Submitted by अशोक. on 19 September, 2011 - 01:34

आज १९ सप्टेंबरपासून २६ सप्टेंबर २०११ पर्यंत नेहरू सेंटर, वरळी, मुंबई येथे पंधरावा नाट्यमहोत्सव सुरू होत असून भारतातील विविध भाषांतील रंगकर्मी तेथे आपल्या कलागुणांचा आविष्कार करतील. मराठी मनाला 'नाट्यवेड' ही संकल्पना नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही, पण अशा महोत्सवाच्या निमित्ताने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील विविध प्रांतातील नाट्यविषयी कलाजीवन कशारितीने फुलत गेले आहे याचा लेखाजोखा काढता येतो.

नवी दिल्लीच्या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' तर्फेही सन १९९९ पासून प्रतिवर्षी 'भारत रंग महोत्सव' आयोजित करण्यात येतो आणि अर्थात तिथेही देशातील जवळपास सर्वच भाषातील नाट्यकलाकृती त्या त्या राज्यातील कलाकार मोठ्या हिरीरीने, उत्साहाने सादर करतात. दिल्लीतील सफदर हाश्मी मार्गावर असलेल्या 'श्रीराम भारतीय कला केन्द्र' इथे [तसेच अन्यही छोटीमोठी नाट्यथिएटर्स असतातच] प्रामुख्याने सादर होत असलेल्या या नाट्याविष्कारांना रसिकांची लोटणारी गर्दी पाहिली की 'लोक टीव्हीपुढे २४ तास असतात' ही उक्ती खोटी वाटू लागते.

या लेखाचे प्रयोजन एवढ्यासाठी की, १९९९ साली प्रथमच भरविण्यात आलेल्या अशा देशव्यापी नाट्यचळवळीतील सादरीकरणाचे पहिले मानाचे पान देण्यात आले होते ते आपल्या सर्वांच्या परिचयाचे रंगकर्मी श्री.गिरीश कर्नाड यांच्या 'नागमंडल' या दोन अंकी नाटकाला. एका लोककथेवर आधारित आणि स्त्री-पुरुषाच्या [किंवा पती-पत्नीच्या] एकनिष्ठतेच्या प्रश्नावर विचार मांडणारे 'नागमंडल' हे केवळ कन्नड भाषेतीलच नव्हे तर भारतातील जवळपास सर्व मान्यताप्राप्त भाषेतून त्या त्या राज्यात सादर केले गेलेले नाटक म्हटले तरी अतिशयोक्तीचे ठरणार नाही. देशात कोणत्याही निमित्ताने भरल्या जात असलेल्या थिएटर मूव्हमेन्टमध्ये कर्नाडांच्या या नाटकाचा समावेश - सादरीकरण असो वा चर्चाविषय असो - असतो. भारतातीलच नव्हे तर इंग्लंड अमेरिकेतीलही कित्येक विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 'नागमंडल' चा सिलॅबसमध्ये समावेश करण्यात आला आहे.

कर्नाड यांचे "नागमंडल" हे नाटक दक्षिण भारतात प्रचलित असलेल्या काही सर्पविषयक लोककथांवर आधारित आहे. कर्नाटकातील दोन लोककथांचे हे एक सुंदर नाटकीकरण आहे. भारताच्या अनेक भागात नाग-पंथाचे अस्तित्व आपणास आढळून येते. 'नागमंडल' मध्ये कर्नाड यानी दोन लोककथांचे एकच गुंफण केले आहे. पहिली लोककथा सामान्यपणे दंतकथांच्या विरोधभासात्म दुहेरी स्वरूपावर प्रकाश टाकते : त्याना स्वतःचे म्हणून एक खास अस्तित्व आहे आणि ते कथन करण्यावर अवलंबून नसते. तथापि एका कलाकाराकडून दुसर्‍याकडे अशी ती सांगितली गेल्यानंतरच त्यांच्या असण्याला अर्थ प्राप्त होतो. ह्या कथेतच दुसरी एक लोककथा दडलेली आहे - ती आहे 'राणी' या नवविवाहितेची गोष्ट. "लग्नबाह्य संबंधातून गर्भवती राहिली आहे" अशा नवर्‍याच्या आरोपावर ग्रामपंचायतीसमोर जाब देताना [खरेतर आपल्या आयुष्यातील पोकळी भरुन काढण्यासाठी] ती काल्पनिक कथा रचते. कल्पित आणि अर्धसत्यावर जगण्याची मानवी गरज राणीची बिकट अवस्था टोकदारपणे व्यक्त करते.

वैवाहिक जीवनाच्या एका संवेदनशील प्रश्नाला नाटक स्पर्श करते. नाटकाची शैली लोककथेची आहे आणि त्याचे स्वरुपही तसेच आहे आणि नाटक एक प्रश्न स्पष्टपणे विचारते - 'खरा पती कोण ?' एका निष्पाप मुलीशी लग्न करणारी आणि स्वत:च्याच सुखात सदोदित रममाण होणारी व्यक्ती [तिचा बाहेरख्याली नवरा] की जी त्या विवाहित स्त्रीला जीवनाचा खराखुरा आणि परिपूर्ण आनुभव देणारी व्यक्ती [नाग]. नाटक प्रामुख्याने तीन व्यक्तीवर केन्द्रीत आहे ~ अप्पाण्णा, त्याची पत्नी राणी, आणि नागराज - जो मानवाचे रूप धारण करू शकतो [लोककथेत असे उल्लेख असतात].

कर्नाड यांच्या लेखनाचे एक प्रमुख वैशिष्ट असे आहे की ते भूतकाळाचा वापर करून वर्तमानकाळावर प्रकाश टाकतात. त्यासाठीच 'नागमंडल' ह्या नाटकात त्यानी प्राचीन आणि आधुनिक स्थिती यांचा संयोग घडवून आणला आहे. त्यानी मांडलेला प्रश्न [पतीपत्नी एकनिष्ठतेचा] आजही तितकाच प्रखर नि टवटवीत आहे आणि त्याची दाहकता आजही भारतीय स्त्री-जीवनाला पोळून काढते आहे. एका पारंपारिक लोककथेचा वापर करून ते वर्तमानावर प्रकाश टाकतात आणि अशाप्रकारे भूत आणि वर्तमान याना एकत्र गुंफतात. एका लोककथेमधून मानवी जीवनामधील व्यामिश्रतेचे ते दर्शन घडवतात. नाटकातून सामाजिक आणि वैयक्तिक नातेसंबंधातील गुंतागुंतीचे दर्शन घडते. समाजात प्रचलित असलेल्या सामाजिक लांछनास्पद रुढींना नाटक छेद देण्याचा प्रयत्न करते. उदा. एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यातील जवळचे नातेसंबंध, पती उघडपणे व्यभिचारी असतानाही त्याचे मन जिंकण्यासाठी चालणारी भारतीय स्त्रीची हतबलता, पती कितीही बाहेरख्याली असला तरा आपण एकनिष्ठ आहोत हे सिद्ध करण्याची विवाहित स्त्रीवरच लादलेली गरज; मात्र दुसरीकडे व्यभिचारी पतीला त्याच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल [समाजाकडून - नाटकात ग्रामपंचायतीकडून] साधा जाबही विचारला जात नाही हे प्रखर वास्तव आणि खेड्यातील न्यायव्यवस्थेचे एकनिष्ठता सिद्ध करण्यासाठी स्त्रीला 'नागाच्या वारूळात हात घाल' असा आदेश देणे- समाजाला मान खाली घालायला लावणार्‍या अशा काही महत्वाच्या समस्यांवर गिरीश कर्नाड यानी ह्या नाटकाद्वारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतात. लोककथांचे माध्यम नाटककाराने अत्यंत यशस्वीपणे आणि कलात्मकतेने वापरलेले दिसते.

[मुद्दाम पूर्ण कथानक देत नाही. आपल्या शहरात संधी मिळाली तर जरूर या नाटकाचे सादरीकरण पाहावे - विशेष म्हणजे हे नाटक आपल्याला समजेल अशाच भाषेतील असावे असाही आग्रह धरण्याचे कारण नाही. लोककथेच्या प्रभावामुळे ते समजायला सोपे जाते. मी स्वतः 'कन्नड' भाषेतीलच याचा प्रयोग पाहिला होता, कन्नड खोलवर समजत नसल्याने त्यावेळी माझ्या हातात ऑक्सफर्ड प्रेसने प्रसिद्ध केलेला या नाटकाचा इंग्रजी तर्जुमा हाती होता, तरीही पात्रे काय संवाद म्हणत आहेत हे पुस्तकात पाहाण्याची आवश्यकताही भासली नाही, इतके ते स्टेजवरील वातावरण घरगुती वाटते.].

या निमित्ताने श्री.गिरीश कर्नाड यांच्याविषयी दोन शब्द [जरी इथल्या सर्व सदस्यांना हे नाव आणि त्यांचे कार्य माहीत असले तरी] :

गिरीश कर्नाड यांची गणना भारतातल्या आघाडीच्या नाटककारांमध्ये व नटांमध्ये केली जाते. माथेरान येथे १९३८ मध्ये जन्मलेल्या कर्नाडांचे बालपण आणि शिक्षण कर्नाटकातल्या शिरसी या गावी घडले. १९९० च्या दशकात एक विख्यात नाटककार म्हणून ते नावारुपास आले. त्यानी आपली नाटके मुळात कानडी भाषेतून लिहिली आणि नंतर स्वत:च त्यानी त्या नाटकांचे इंग्रजी अनुवाद केले. ऑक्सफर्ड येथे र्‍होड्स स्कॉलर म्हणून शिकण्याची त्याना संधी लाभली. नंतर शिकागो विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम तर फुलब्राईट स्कॉलर म्हणून शिक्षण घेतले. लेखक या नात्याने कन्नड भाषेत लिहिणे ते अधिक पसंत करतात, तथापि नंतर शिकलेल्या इंग्रजी भाषेवर आणि त्यातून लिहिण्याचेही त्यांचे प्रभुत्व वाखाणण्यासारखे आहे. हिंदी आणि कन्नड चित्रपटसृष्टीशी ते संबंधित आहेत हे इथल्या सर्वच सदस्यांना माहीत असणे नवलाचे होणार नाही, इतकी त्यांची या क्षेत्रातील कामगिरी भरीव अशी मानली जाते. फिल्म इन्स्टिट्यूट आणि दूरदर्शन या दोन्ही संस्थांचे त्यानी डायरेक्टर म्हणूनही कार्य केले तसेच संगीत नाटक अकादमीचे ते अध्यक्षही होते. साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला गेलेला 'ज्ञानपीठ' सन्मान त्याना लाभला आहे तसेच राष्ट्रपतींकडून 'पद्मभूषण' पुरस्कारही.

स्वातंत्र्योत्तर भारतीय साहित्यातील एक अत्यंत महत्वाचे नाटककार म्हणून त्यांचा उदय झालेला आहे. 'ययाति' हे त्यांचे पहिले नाटक अर्थातच महाभारतातील त्या राजावर आधारित असून 'फायर अ‍ॅण्ड द रेन' हे त्यांचे अगदी अलिकडील नाटकही महाभारतातील कथेवर बेतलेले आहे. 'बळी' नाटक कन्नड महाकाव्यातील लोककथेवर आधारित असून 'फ्लॉवर्स' हे संस्कृत लोककथेवर आधारित आहे. 'हयवदन' हे त्यांचे खूप गाजलेले नाटक. संस्कृतमधील 'वेताळ पंचविमाशती' च्या थॉमस मॅनने केलेल्या भाषांतरावर रचलेले आहे. 'तुघलक' हे ऐतिहासिक नाटक मोहम्मद-बिन-तुघलक या सुलतानाच्या विक्षिप्तपणाच्या गोष्टीवर बेतले आहे. दक्षिणेकडील प्रचलित सर्पविषयक लोककथा आणि समजुतीवरून श्री.गिरीश कर्नाड याना स्त्री-पुरुष विवाहसंबंधातील एकनिष्ठ्ता या मुद्यावर आधारित 'नागमंडल' हे नाटक सुचले. या नाटकावरून निघालेल्या कन्नड चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार तसेच अन्य डझनभर पुरस्कार मिळाले आहेत. इतकेच नव्हे तर अमेरिकेत वेगवेगळ्या एकोणीस ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

[सदर लेखाच्या लिखाणासाठी इंग्लिश विषयाचा प्राध्यापक असलेल्या - जो पदवी अभ्यासक्रमासाठी हे नाटक शिकवितो - एका मित्रासोबत झालेल्या चर्चेचे आणि तत्संबंधी वाचनाचे साहाय्य झाले आहे.]

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मी कन्नड चित्रपट दोन्-तिन वर्षांपुर्वी दुरदर्शन्वर रात्री पाहिला. सबटायटल्स इंग्रजी होते त्यामुळे कळायला अडचण आली नाही.

नागमंडलबद्दल ऐकलेले खुप काही पण कथेविषयी काहीच माहिती नव्हती. त्यामुळे अगदी कोरी पाटी घेऊन चित्रपट पाहिला.

वर लिहिलेल्या गोष्टींव्यतिरिक्त अजुन एक बाब मला हा चित्रपट पाहताना जाणवली. लग्नाआधी एकमेकांना अपरिचित असलेल्या वरवधुंनी लग्नानंतर एकमेकांना कसे समजुन घ्यावे याबद्दल काहीतरी भाष्य करतोय असे वाटले. अपण्णाला त्याच्या मैत्रिणिबरोबर एका वेगळ्या प्रकारच्या वागण्याची सवय असते. तिच्यासोबत तो जसे धसमुसळे वागतो तसेच तो राणीबरोबरही वागु पहातो. राणीला ते वागणे खुपच आक्रमक वाटते. त्यामुळे ती त्याला घाबरायला लागते, त्याला जवळ येऊ देत नाही. त्याच वेळी पतीच्या रुपात तिच्याशी गोड वागणा-या, तिच्या कलाने गोष्टी घेणा-या नागाला मात्र ती जवळ करते. (अर्थात हा पती नाही हे तिला तेव्हा माहित नसते).

अपण्णा आणि नाग यांच्यातला शेवटचा संवादही याच प्रकारचे भाष्य करतो असे मला वाटले.

मी कदाचित हा चित्रपट पुर्णपणे वेगळ्या अँगलने पाहिला असेन. Happy

Pages