आज १९ सप्टेंबरपासून २६ सप्टेंबर २०११ पर्यंत नेहरू सेंटर, वरळी, मुंबई येथे पंधरावा नाट्यमहोत्सव सुरू होत असून भारतातील विविध भाषांतील रंगकर्मी तेथे आपल्या कलागुणांचा आविष्कार करतील. मराठी मनाला 'नाट्यवेड' ही संकल्पना नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही, पण अशा महोत्सवाच्या निमित्ताने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील विविध प्रांतातील नाट्यविषयी कलाजीवन कशारितीने फुलत गेले आहे याचा लेखाजोखा काढता येतो.
नवी दिल्लीच्या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' तर्फेही सन १९९९ पासून प्रतिवर्षी 'भारत रंग महोत्सव' आयोजित करण्यात येतो आणि अर्थात तिथेही देशातील जवळपास सर्वच भाषातील नाट्यकलाकृती त्या त्या राज्यातील कलाकार मोठ्या हिरीरीने, उत्साहाने सादर करतात. दिल्लीतील सफदर हाश्मी मार्गावर असलेल्या 'श्रीराम भारतीय कला केन्द्र' इथे [तसेच अन्यही छोटीमोठी नाट्यथिएटर्स असतातच] प्रामुख्याने सादर होत असलेल्या या नाट्याविष्कारांना रसिकांची लोटणारी गर्दी पाहिली की 'लोक टीव्हीपुढे २४ तास असतात' ही उक्ती खोटी वाटू लागते.
या लेखाचे प्रयोजन एवढ्यासाठी की, १९९९ साली प्रथमच भरविण्यात आलेल्या अशा देशव्यापी नाट्यचळवळीतील सादरीकरणाचे पहिले मानाचे पान देण्यात आले होते ते आपल्या सर्वांच्या परिचयाचे रंगकर्मी श्री.गिरीश कर्नाड यांच्या 'नागमंडल' या दोन अंकी नाटकाला. एका लोककथेवर आधारित आणि स्त्री-पुरुषाच्या [किंवा पती-पत्नीच्या] एकनिष्ठतेच्या प्रश्नावर विचार मांडणारे 'नागमंडल' हे केवळ कन्नड भाषेतीलच नव्हे तर भारतातील जवळपास सर्व मान्यताप्राप्त भाषेतून त्या त्या राज्यात सादर केले गेलेले नाटक म्हटले तरी अतिशयोक्तीचे ठरणार नाही. देशात कोणत्याही निमित्ताने भरल्या जात असलेल्या थिएटर मूव्हमेन्टमध्ये कर्नाडांच्या या नाटकाचा समावेश - सादरीकरण असो वा चर्चाविषय असो - असतो. भारतातीलच नव्हे तर इंग्लंड अमेरिकेतीलही कित्येक विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 'नागमंडल' चा सिलॅबसमध्ये समावेश करण्यात आला आहे.
कर्नाड यांचे "नागमंडल" हे नाटक दक्षिण भारतात प्रचलित असलेल्या काही सर्पविषयक लोककथांवर आधारित आहे. कर्नाटकातील दोन लोककथांचे हे एक सुंदर नाटकीकरण आहे. भारताच्या अनेक भागात नाग-पंथाचे अस्तित्व आपणास आढळून येते. 'नागमंडल' मध्ये कर्नाड यानी दोन लोककथांचे एकच गुंफण केले आहे. पहिली लोककथा सामान्यपणे दंतकथांच्या विरोधभासात्म दुहेरी स्वरूपावर प्रकाश टाकते : त्याना स्वतःचे म्हणून एक खास अस्तित्व आहे आणि ते कथन करण्यावर अवलंबून नसते. तथापि एका कलाकाराकडून दुसर्याकडे अशी ती सांगितली गेल्यानंतरच त्यांच्या असण्याला अर्थ प्राप्त होतो. ह्या कथेतच दुसरी एक लोककथा दडलेली आहे - ती आहे 'राणी' या नवविवाहितेची गोष्ट. "लग्नबाह्य संबंधातून गर्भवती राहिली आहे" अशा नवर्याच्या आरोपावर ग्रामपंचायतीसमोर जाब देताना [खरेतर आपल्या आयुष्यातील पोकळी भरुन काढण्यासाठी] ती काल्पनिक कथा रचते. कल्पित आणि अर्धसत्यावर जगण्याची मानवी गरज राणीची बिकट अवस्था टोकदारपणे व्यक्त करते.
वैवाहिक जीवनाच्या एका संवेदनशील प्रश्नाला नाटक स्पर्श करते. नाटकाची शैली लोककथेची आहे आणि त्याचे स्वरुपही तसेच आहे आणि नाटक एक प्रश्न स्पष्टपणे विचारते - 'खरा पती कोण ?' एका निष्पाप मुलीशी लग्न करणारी आणि स्वत:च्याच सुखात सदोदित रममाण होणारी व्यक्ती [तिचा बाहेरख्याली नवरा] की जी त्या विवाहित स्त्रीला जीवनाचा खराखुरा आणि परिपूर्ण आनुभव देणारी व्यक्ती [नाग]. नाटक प्रामुख्याने तीन व्यक्तीवर केन्द्रीत आहे ~ अप्पाण्णा, त्याची पत्नी राणी, आणि नागराज - जो मानवाचे रूप धारण करू शकतो [लोककथेत असे उल्लेख असतात].
कर्नाड यांच्या लेखनाचे एक प्रमुख वैशिष्ट असे आहे की ते भूतकाळाचा वापर करून वर्तमानकाळावर प्रकाश टाकतात. त्यासाठीच 'नागमंडल' ह्या नाटकात त्यानी प्राचीन आणि आधुनिक स्थिती यांचा संयोग घडवून आणला आहे. त्यानी मांडलेला प्रश्न [पतीपत्नी एकनिष्ठतेचा] आजही तितकाच प्रखर नि टवटवीत आहे आणि त्याची दाहकता आजही भारतीय स्त्री-जीवनाला पोळून काढते आहे. एका पारंपारिक लोककथेचा वापर करून ते वर्तमानावर प्रकाश टाकतात आणि अशाप्रकारे भूत आणि वर्तमान याना एकत्र गुंफतात. एका लोककथेमधून मानवी जीवनामधील व्यामिश्रतेचे ते दर्शन घडवतात. नाटकातून सामाजिक आणि वैयक्तिक नातेसंबंधातील गुंतागुंतीचे दर्शन घडते. समाजात प्रचलित असलेल्या सामाजिक लांछनास्पद रुढींना नाटक छेद देण्याचा प्रयत्न करते. उदा. एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यातील जवळचे नातेसंबंध, पती उघडपणे व्यभिचारी असतानाही त्याचे मन जिंकण्यासाठी चालणारी भारतीय स्त्रीची हतबलता, पती कितीही बाहेरख्याली असला तरा आपण एकनिष्ठ आहोत हे सिद्ध करण्याची विवाहित स्त्रीवरच लादलेली गरज; मात्र दुसरीकडे व्यभिचारी पतीला त्याच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल [समाजाकडून - नाटकात ग्रामपंचायतीकडून] साधा जाबही विचारला जात नाही हे प्रखर वास्तव आणि खेड्यातील न्यायव्यवस्थेचे एकनिष्ठता सिद्ध करण्यासाठी स्त्रीला 'नागाच्या वारूळात हात घाल' असा आदेश देणे- समाजाला मान खाली घालायला लावणार्या अशा काही महत्वाच्या समस्यांवर गिरीश कर्नाड यानी ह्या नाटकाद्वारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतात. लोककथांचे माध्यम नाटककाराने अत्यंत यशस्वीपणे आणि कलात्मकतेने वापरलेले दिसते.
[मुद्दाम पूर्ण कथानक देत नाही. आपल्या शहरात संधी मिळाली तर जरूर या नाटकाचे सादरीकरण पाहावे - विशेष म्हणजे हे नाटक आपल्याला समजेल अशाच भाषेतील असावे असाही आग्रह धरण्याचे कारण नाही. लोककथेच्या प्रभावामुळे ते समजायला सोपे जाते. मी स्वतः 'कन्नड' भाषेतीलच याचा प्रयोग पाहिला होता, कन्नड खोलवर समजत नसल्याने त्यावेळी माझ्या हातात ऑक्सफर्ड प्रेसने प्रसिद्ध केलेला या नाटकाचा इंग्रजी तर्जुमा हाती होता, तरीही पात्रे काय संवाद म्हणत आहेत हे पुस्तकात पाहाण्याची आवश्यकताही भासली नाही, इतके ते स्टेजवरील वातावरण घरगुती वाटते.].
या निमित्ताने श्री.गिरीश कर्नाड यांच्याविषयी दोन शब्द [जरी इथल्या सर्व सदस्यांना हे नाव आणि त्यांचे कार्य माहीत असले तरी] :
गिरीश कर्नाड यांची गणना भारतातल्या आघाडीच्या नाटककारांमध्ये व नटांमध्ये केली जाते. माथेरान येथे १९३८ मध्ये जन्मलेल्या कर्नाडांचे बालपण आणि शिक्षण कर्नाटकातल्या शिरसी या गावी घडले. १९९० च्या दशकात एक विख्यात नाटककार म्हणून ते नावारुपास आले. त्यानी आपली नाटके मुळात कानडी भाषेतून लिहिली आणि नंतर स्वत:च त्यानी त्या नाटकांचे इंग्रजी अनुवाद केले. ऑक्सफर्ड येथे र्होड्स स्कॉलर म्हणून शिकण्याची त्याना संधी लाभली. नंतर शिकागो विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम तर फुलब्राईट स्कॉलर म्हणून शिक्षण घेतले. लेखक या नात्याने कन्नड भाषेत लिहिणे ते अधिक पसंत करतात, तथापि नंतर शिकलेल्या इंग्रजी भाषेवर आणि त्यातून लिहिण्याचेही त्यांचे प्रभुत्व वाखाणण्यासारखे आहे. हिंदी आणि कन्नड चित्रपटसृष्टीशी ते संबंधित आहेत हे इथल्या सर्वच सदस्यांना माहीत असणे नवलाचे होणार नाही, इतकी त्यांची या क्षेत्रातील कामगिरी भरीव अशी मानली जाते. फिल्म इन्स्टिट्यूट आणि दूरदर्शन या दोन्ही संस्थांचे त्यानी डायरेक्टर म्हणूनही कार्य केले तसेच संगीत नाटक अकादमीचे ते अध्यक्षही होते. साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला गेलेला 'ज्ञानपीठ' सन्मान त्याना लाभला आहे तसेच राष्ट्रपतींकडून 'पद्मभूषण' पुरस्कारही.
स्वातंत्र्योत्तर भारतीय साहित्यातील एक अत्यंत महत्वाचे नाटककार म्हणून त्यांचा उदय झालेला आहे. 'ययाति' हे त्यांचे पहिले नाटक अर्थातच महाभारतातील त्या राजावर आधारित असून 'फायर अॅण्ड द रेन' हे त्यांचे अगदी अलिकडील नाटकही महाभारतातील कथेवर बेतलेले आहे. 'बळी' नाटक कन्नड महाकाव्यातील लोककथेवर आधारित असून 'फ्लॉवर्स' हे संस्कृत लोककथेवर आधारित आहे. 'हयवदन' हे त्यांचे खूप गाजलेले नाटक. संस्कृतमधील 'वेताळ पंचविमाशती' च्या थॉमस मॅनने केलेल्या भाषांतरावर रचलेले आहे. 'तुघलक' हे ऐतिहासिक नाटक मोहम्मद-बिन-तुघलक या सुलतानाच्या विक्षिप्तपणाच्या गोष्टीवर बेतले आहे. दक्षिणेकडील प्रचलित सर्पविषयक लोककथा आणि समजुतीवरून श्री.गिरीश कर्नाड याना स्त्री-पुरुष विवाहसंबंधातील एकनिष्ठ्ता या मुद्यावर आधारित 'नागमंडल' हे नाटक सुचले. या नाटकावरून निघालेल्या कन्नड चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार तसेच अन्य डझनभर पुरस्कार मिळाले आहेत. इतकेच नव्हे तर अमेरिकेत वेगवेगळ्या एकोणीस ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
[सदर लेखाच्या लिखाणासाठी इंग्लिश विषयाचा प्राध्यापक असलेल्या - जो पदवी अभ्यासक्रमासाठी हे नाटक शिकवितो - एका मित्रासोबत झालेल्या चर्चेचे आणि तत्संबंधी वाचनाचे साहाय्य झाले आहे.]
मी हे नाटक पाहिले आहे. मूळ नट
मी हे नाटक पाहिले आहे. मूळ नट नटी संचात. फारच परिणामकारक अनुभव आहे. .लोक कथेचा बाज अगदी उठून येतो. आणि ती नागाला केसात धारण करते इत्यादी फारच सुरेख आहे. नेपथ्य नेमके आहे. कधीही पाहायला मिळाल्यास चुकवू नये.
खूप वर्षांपुर्वी साहित्य
खूप वर्षांपुर्वी साहित्य संघात हे नाटक पाहिलं होतं. थोडं कळलं थोडं डोक्यावरुन गेलं होतं. आता पुन्हा प्रयोग सुरु झाले तर नक्की बघायला आवडेल कारण आता ते कळेलही. फक्त नवा संच तसाच दमदार हवा. नेहरु सेंटरला जाऊन बघणं जमणार नाहिये.
अश्विनीमामी ~ अश्विनी के ~ मी
अश्विनीमामी ~ अश्विनी के
~ मी बंगलोर येथील नाट्यगृहात हा प्रयोग पाहिला होता. त्यातील कलाकार हे मूळ होते की अन्य याचा मला तपास करता आला नव्हता. पण 'आप्पाण्णा' चे काम करणारा तो आडदांड अभिनेता नाट्यरसिकांना फारच पसंद होता अशी सोबतच्या मित्रांकडून माहिती मिळाली.
याच नाटकावर बेतलेले तसेच याच नावाचा कन्नड चित्रपटही आहे, ज्यात एल.विजयालक्ष्मी या [काही अन्य कारणासाठीही] गाजलेल्या अभिनेत्रीने राणीचे काम छान केले असे समजते. मात्र मला हा चित्रपट पाह्यला मिळालेला नाही.
छान लेख. पहायला मिळाल्यास
छान लेख.
पहायला मिळाल्यास नक्कि पाहीन हे नाटक.
मी पाहिले होते त्यात बहुतेक
मी पाहिले होते त्यात बहुतेक एक शेलाटी गोरी मराठी नटी होती जिने राणीचे काम केले होते. हे नाट्य स्वरूपात बघण्यात जास्त गंमत आहे. चित्रपटात तशी अनुभूती येणार नाही.
नीना कुलकर्णी होती का?
नीना कुलकर्णी होती का?
नाही नाही. गौरी कि काय होती
नाही नाही. गौरी कि काय होती १९९१ मध्ये बघितला आहे ग. आता लक्षात नाही पण बघताना अस्वस्थ झालेले अजून लक्षात आहे. मला साप नागांची फार भीती आहे. त्यामुळे गरीब नीट वागणारा नाग त्यात तो तिचा किती जवळचा ते बघून स्वत:च्या पूर्वग्रहांबद्दल राग आलेला.
अशोक, छान ओळख. हे नाटक माझ्या
अशोक, छान ओळख.
हे नाटक माझ्या आठवणीप्रमाणे मराठीत आणि हिंदितही येऊन गेलेय.
सुकन्या कुलकर्णी, चित्रा पालेकर, भक्ती बर्वे, नीना कुलकर्णी आदी कलाकार यात होत्या (पण कुठल्या भाषेत कुणी भुमिका केली होती ते आठवत नाही.)
या गाजलेल्या कलाकृतीची ओळख
या गाजलेल्या कलाकृतीची ओळख करुन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अशोक. हे नाटक पहाण्याची उत्कंठा खूप वाढली आहे. तुमची लेखनशैली सुंदरच आहे.
@ दिनेश ~ हिंदीत हे नाटक नीलम
@ दिनेश ~ हिंदीत हे नाटक नीलम मानसिंग चौधरी यानी दिग्दर्शित केले होते, जे दिल्ली कल्चरल सर्कलमध्ये तसेच उत्तर पट्ट्यात चर्चेचा विषय झाले होते. दिल्ली सर्कलबरोबर हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या प्रांतामध्ये आजही 'भगवान शंकर आणि त्याच्या गळ्यातील नाग' हे अनुक्रमे पूजेचे आणि इच्छापूर्तीचे प्रतिक मानले जाते. [फिरतीवर असताना मी स्वतः हा अनुभव घेतला आहे की ज्या लोककथांत नागमाहात्म्य वर्णिले आहे त्या कथा या भागातील जनांचा मोठ्या जिव्हाळ्यांचा विषय बनतात. देवाची करणी असल्याने नाग पुरुषाचे रूप घेऊन वस्तीचे रक्षण करतो असा सतलज आणि धौलधर भागातील शेतकरीच नव्हे तर सुशिक्षित गटात येणार्यांचाही विश्वास आहे. त्यामुळेच असेल कदाचित की मराठीपेक्षाही कन्नड नंतर 'नागमंडल' चे हिंदीत आणि पंजाबी भाषेत प्रयोग झाले आहेत. वर लेखात म्हटल्याप्रमाणे नॅशनल स्कूल ड्रामाने दिल्लीतील महोत्सवाची सुरुवात करताना त्या भागात असलेल्या "लोककथा' प्रभावाचाच विचार करूनच कर्नाडांचे 'नागमंडल' निवडले असावे.
आपल्या विजया मेहता यानी जर्मन भाषेत सादर झालेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. आजही बर्लिन महोत्सवात हे नाटक स्थानिक कलाकार प्रेक्षकांसमोर आणतात.
इतकेच नव्हे तर दीपा मेहता यानी कॅनेडियन सरकारच्या सहकार्याने निर्माण केलेला इंग्लिश आणि पंजाबी भाषेतील 'नागमंडल' चित्रपटात [जो Heaven on Earth या नावाने प्रदर्शीत झाला] तर हिंदीतील आघाडीची म्हटली जाणारी अभिनेत्री प्रीती झिंटा हिने या चित्रपटातील 'राणी' ची मध्यवर्ती भूमिका मोठ्या आनंदाने स्वीकारली.
@ मी चिऊ आणि शशांक पुरंदरे ~
@ मी चिऊ आणि शशांक पुरंदरे
~ लेख आवडल्याचे पाहून समाधान वाटले. धन्यवाद.
ऐकले आहे.. पाहिले नाही..
ऐकले आहे.. पाहिले नाही..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
नक्कीच पहायला आवडेल.
नक्कीच पहायला आवडेल. कुठल्याही स्वरुपात नाटक किंवा चित्रपट. गिरीश कर्नाड आवडत्या कलाकारांपैकी एक आहेत.
Ashok, Could you please share
Ashok, Could you please share the name of the Kannad Movie based on "Naagmandal"? Would greatly appreciate your help. Thanks!
Ami
@ Peacelily ~ Sure. The movie
@ Peacelily ~
Sure. The movie based on Karnad's well acclaimed play released in 1997 with the same title viz. "Nagamandala". [Prakash Rai and Vijayalaxmi acted in lead roles]. Unfortunately, I missed it, but it received well deserved attention from both public as well as from critic side. Movie has bagged innumerable awards at State and National level.
Well, later - or let me say - recently in 2008 Neelam Masingh produced it in English language with Canadian support. Preity Zinta played central role of 'Rani' in this movie.
Both Kannada [without English sub-titles] and English versions are available in market thru DVD formats.
>> इतकेच नव्हे तर दीपा मेहता
>> इतकेच नव्हे तर दीपा मेहता यानी कॅनेडियन सरकारच्या सहकार्याने निर्माण केलेला इंग्लिश आणि पंजाबी भाषेतील 'नागमंडल' चित्रपटात [जो Heaven on Earth या नावाने प्रदर्शीत झाला] तर हिंदीतील आघाडीची म्हटली जाणारी अभिनेत्री प्रीती झिंटा हिने या चित्रपटातील 'राणी' ची मध्यवर्ती भूमिका मोठ्या आनंदाने स्वीकारली.
<<< मी हा चित्रपट पाहिलाय.. छान होता.. >> कल्पित आणि अर्धसत्यावर जगण्याची मानवी गरज राणीची बिकट अवस्था टोकदारपणे व्यक्त करते.
<<<
ह्या चित्रपटात तर राणीला नागही आपल्या पतिच्याच रुपात दिसतो.. तिची आगतिकता.. आणि मग नागाच्या बिळात हात घातल्यानंतरचा अविर्भाव.. मस्तच!
लेख अतिशय आवडला. सध्याच्या
लेख अतिशय आवडला.
सध्याच्या शहरीकरणाच्या व संगणकाच्या युगात - जेथे ग्रामीण विभागांनाही प्रचंड एक्स्पोजर मिळत आहे - असे खेळ दाखवून उगाच वेदनादायक प्रथा / चालीरीती / घटना दाखवू नयेत असे वाटते.
<<<त्याची दाहकता आजही भारतीय स्त्री-जीवनाला पोळून काढते आहे. >>> हे विधान मला अमान्य करावेसे वाटत आहे. भारतीय स्त्री जीवन ही व्यापक संज्ञा म्हणावी लागेल. वरकरणी 'शहरी - ग्रामीण', 'विवाहीत - अविवाहीत', 'सुशिक्षित - अशिक्षित', 'तरुण - प्रौढ' इत्यादी प्रकार 'पडावेत'. व्यभिचार (येथे व्यभिचार हा केवळ समाजाच्या दृष्टीने अभिप्रेत आहे - व्यक्तीशः मला तो व्यभिचार वाटत नाही) समजून आल्यास पुरुष हिंसक होऊन स्त्रीवर जबाबदारी लादून मनासारखे घडवून आणतो या संकल्पनेला आजकालच्या युगात फार तर वीस ते पंचवीस टक्के जागा मिळावी.
वरील विधानात 'शहरीकरणाचा प्रभाव' हा घटक नाही असे मला काहीसे ठामपणे म्हणावेसे वाटते.
एवढे सगळे करून 'मानसिक पातळीवरचा व्यभिचार' (जो अदृष्य असतो किंवा फार तर दुर्मीळरीत्या दृष्यरुपात प्रकटतो) त्याबाबत काय लेखन झाले असावे हे माहीत नाही. स्त्री बरीचशी मुक्त झालेली असताना हे सिलॅबसमध्ये घेणे केव्हाही उत्तमच, प्रसिद्धी देत राहणे हे कितपत योग्य असावे असा विचार मनात आला.
-'बेफिकीर'!
नक्कीच पहायला आवडेल धन्यवाद.
नक्कीच पहायला आवडेल
धन्यवाद.
नाटक नाही पाहिलं पण Heaven on
नाटक नाही पाहिलं पण Heaven on Earth आवडला , प्रीती झिंटानी चक्क नॉन ग्लॅमरस रोल चांगला केलाय.
@ बेफिकीर ~ तुम्ही उपस्थित
@ बेफिकीर ~
तुम्ही उपस्थित केलेले आधुनिकतेचे तसेच अन्य मुद्दे विचारात घेऊनही मी म्हणेन की, संस्कृतीची वाढ कशी व कितीही झाली तरीही 'लोककथा' हा घटक जीवनातून हद्दपार करणे योग्य मानल्रे जाऊ नये; त्याचे सादरीकरण ज्या रितीने होत असते ते जसेच्या तसे व्यावहारिक दुनियेत लागू होते/करावे असेही काही नसते.
छान लेख आहे. नाटक बघता येणार
छान लेख आहे. नाटक बघता येणार नाही पण Heaven on Earth नक्की बघेन. माहितीबद्दल धन्यवाद
उत्कृष्टं लेख... हा चित्रपट
उत्कृष्टं लेख... हा चित्रपट आवर्जून बघेन आता.
सुरेख लेख हा चित्रपट आवर्जून
सुरेख लेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा चित्रपट आवर्जून बघेन आता.>>>>>अगदी अगदी
मलाही हा सिनेमा बघयला आवडेल.
मलाही हा सिनेमा बघयला आवडेल.
"नागमंडल" नाटक किंवा प्रिती
"नागमंडल" नाटक किंवा प्रिती झिन्टाचा चित्रपट जरुर पाहिन.
लेख आवड्ला.
स्नेहा.
मामा मी पण हे नाटक बघितल आहे.
मामा मी पण हे नाटक बघितल आहे. दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हे प्रसारीत झाल होत. मराठी कलाकारांना घेउन सह्याद्री वाहिनीने हे नाटक सादर केल होत.
मामा हे नाटक सह्याद्री
मामा हे नाटक सह्याद्री वाहिनीवर दाखवलं होतं पण मी पूर्ण बघितले नाही, ती नागाला केसात लपवते हा शॉट बघितला, सिरीयलमध्ये काम करणारे कलाकार होते, बहुतेक पुजा सामंत होती (वादळवाटमध्ये प्रसाद ओकच्या बायकोचे काम केलेली), आता परत दाखवलं तर नीट बघेन.
गिरीश कर्नाड यांचा परिचय छान करून दिलात मामा.
विजया मेह्ताच्या पुस्तकात
विजया मेह्ताच्या पुस्तकात खूप छान माहिती आहे नात्काबद्दल. ते वाचून हे नातक पहावेसे वाटते. नेपथ्य खूप छन असल्याच सन्दर्भ येतो पुस्तकत. कधी पहायचा योग आला नाही. नविएन सन्चात आले नातक तर नक्कि पहायाला आवदेल..
गिरीश कर्नाद यान्चा परीचय खूपच छन करून दिलात मामा. मस्त.
हे वाचलंच नव्हतं.
हे वाचलंच नव्हतं. नेहमीप्रमाणेच खुप छान परिचय. नाटक/चित्रपट काहीच पाहिलेलं नाही.
आता संधी मिळाल्यावर बघेन.
मुग्धा....अन्जू....धानी....सई
मुग्धा....अन्जू....धानी....सई....
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. आता या नाटकाचे प्रयोग थांबलेले आहेत, तरीही तुम्ही सार्याजणी प्रीति झिंटा अभिनित चित्रपट ["हेवन ऑन अर्थ"] मात्र जरूर पाहा.....मूळ नाटक आणि कन्नड चित्रपटाचे कथानक कर्नाटकातील एका खेड्यात घडते, तर प्रीति झिंटा चित्रपट ओन्टॅरिओ, कॅनडा, वातावरणात चित्रित केला आहे.
Pages