आज पुन्हा एकदा..

Submitted by निवडुंग on 4 September, 2011 - 07:00

आज पुन्हा एकदा,
तुझी खूप आठवण आली.

आशेचा एक छोटासा किरण,
आज पुन्हा एकदा,
क्षितिजावर उजळत राहिला.

क्षणार्धात झरझर सरकत गेलं,
डोळ्यांपुढे आयुष्य,
पांढरपेशा सरधोपट जगण्याला,
तुझी अदृश्य जांभळी किनार,
कायमच सोबत करत होती.

तुझ्या काळ्याभोर डोळ्यांतला चंद्र,
अजूनही घालत होता साकडं,
ग्रहणापासून सुटण्याचं.
अन माझे निस्तेज डोळे,
त्याला तेजवायचं त्राण नसल्याची,
असहाय्य कबुली देत.

खरंच, नाही का?
तुझा चंद्रच वेगळा,
त्याचं तेजही वेगळंच.

पण तरीही,
आज पुन्हा एकदा,
तुझी खूप भरभरून आठवण आली.

आशेचा एक छोटासा किरण,
आज पुन्हा एकदा,
क्षितिजावर उजळायच्या प्रयत्नात,
काळ्या ढगांआड विरून गेला.

पाऊस भरून बरसणार आज रात्री.

गुलमोहर: