पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी

Submitted by पाषाणभेद on 31 August, 2011 - 16:10

पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी

चल ग राणी जोडीला ये ग
गावूया गावरान गाणी
पाटापाटानं ग
पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||धृ||

विहिर दगडी रहाट लाकडी
विजमोटरीनं भरतूया पाणी
पाटापाटानं ग
पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||धृ||

कोरस (फक्त मुलींचा आवाज) :
पाटापाटानं ग
पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||धृ||

पानकळा ह्यो आला, सारं शिवार फुलवून गेला
वाटाणा चवळी भुईमुंग गाजर, रताळी अन मुळा
पिकं पोटरीला आली आता किटनाशक चला फवारा
हातपंप देवून दांडा हातात घे ग, जवळ नाही कुणी
पाटापाटानं ग
पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||१||

दुभती म्हैस गाभण गाय, शेरडू हाय गोठ्यात
घास खात्याती पेंढींसंग, हिरवागार लुसलुशीत
कालवड ती सोड, दुध जरा काढ
आता कशाला करतीस वेणी न फणी
पाटापाटानं ग
पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||२||

सण दसर्‍याचा आता जवळ की ग आला
जत्रंला जावू, खणनारळ वाहू देवी आईला
फुगं ते फोडू पाळण्यात चढू, गुडीशेव खावू यंदाच्याला
फोटू जवा काढू तवा जवळ रहा आक्षी राजाच्या राणीवानी
पाटापाटानं ग
पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||३||

न्याहारी करून वावराला निघतो मी सकाळच्याला
झुणका भाकर अन चटणी आन तू दुपारच्याला
भेंडी गवार कारली तोंडली तू खुड, लागंल रातच्याला
फळभाज्या केल्याय घरच्याला, नाही काही विकायला
काळजी नको ग पैका मिळलं पिकं विकूनी मार्केटाला
पाटल्या न ठुशी घेईन मी तुला ग दोन्हीच्या दोन्ही ||४||
पाटापाटानं ग
पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी

कोरस (फक्त मुलींचा आवाज) :
पाटापाटानं ग
पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३१/०८/२०११

ढिसक्लेमरः 'पाटानं वाहतंय झुळझुळ पाणी' अशाच अर्थाचे एक लोकगीत आहे. मला ते आठवत नाही. कुणाकडे असेल तर त्याने ते द्यावे.

(तसेच हे गीत त्यावर बेतलेले नाही हे सांगण्याचे प्रयोजनही आहेच. जिवनाभुव/ घटनाक्रम कित्येकांच्या बाबतीत सारखाच असल्याने कल्पनांची एकरूपता होवू शकते. )

- पाभे

गुलमोहर: 
शब्दखुणा: