रसग्रहण स्पर्धा- 'प्रवास' : लेखिका - सानिया

Submitted by आयडू on 25 August, 2011 - 06:58

पुस्तकाचे नाव : 'प्रवास'
लेखिका : सानिया
प्रकाशकाचं नाव : दिलीप माजगावकर
प्रकाशन संस्था : राजहंस
प्रथम आवृत्ती : जुलै २००९
किंमत : ९० रूपये

प्रवास

आपल्याला प्रवासाला जाताना काय लागतं? नक्की? चार - एक कपडे, गरजेचं सामान अन् पुरेसे पैसे बस्स! ह्यातलं सगळंच मस्ट हॅव असं! खरतर असं काहीही नसावं. आपली ओळखीची, भाषा जाणणारी माणसं शोधण्याचा आपला ठाम प्रयत्न असणार कायम. एकटे पडू नये म्हणूनही असेल कदाचित पण आपण प्रवासात आपल्या ओळखीच्या खुणा, माणसं शोधण्याचा जोरदार प्रयत्न करत असतो हे नक्की. आता नेटच्या जमान्यात गूगल करून आपण रस्ते, वळणं डोळ्याखालून घालू पहातो, यूज्ड होऊ पहातो.
आपल्या प्रत्येक प्रवासाला काही ना काही निमित्त असतंच. नीट आखून, ट्रॅव्हल बूक मधून माहिती मिळवून प्लान्ड असा प्रवास आपण फारतर वर्षाकाठी एकदा / दोनदा करत असू. असं प्लान न करता, काहीही बरोबर न घेता प्रवास करणं आपल्याला जमेल का?

सानियाचं हे पुस्तक म्हणजे तिच्या आत्तापर्यंतच्या केलेल्या स्थळ तसेच लेखन प्रवासाचा आलेख आहे. पण हे नुसते प्रवास वर्णन नव्हे! ह्या प्रवासात ठिकठिकाणचे संदर्भ येतात तसे तिच्या लेखनाचेही. फार उत्सुकतेनं म्हणून पुस्तक चाळलं ते ह्याचसाठी की कुठली गोष्ट कुठे, कशी सुचल्ये, गावांचे, शहरांचे असे काही वेगळे संदर्भ आहेत का ? आणि ते तसं संदर्भासकट लिहिलं गेलंय का? पण तसं काही अगदी डिटेलमध्ये नाहीये. अन् 'आवर्तन' बद्दल कुठं काही मिळतंय का ते पाहिलं पण अफसोस काही नाही.

लेखिकेच्या (वडिलांच्या बदलीच्या सरकारी नोकरीमुळे) लहानपणापासूनच सततचा वास्तव्य बदलत राहण्याचा प्रवास सुरू झाला तो पुस्तकाच्या सुरूवातीलाच आलेला आहे. त्याबरोबरच वर्षा - दोन वर्षात बदलणारी शाळा, नव्या बाई अन् नव्या मैत्रिणी ह्यांची अपार उत्कंठा दिसते. ह्या सुरूवातीच्या काही पानांत लेखिकेनं लेखनाच्या प्रवासाची स्वीकारलेली वाट ही तिच्या कधी एकटीने, स्वतंत्र तर कधी कुणासोबत रस्ता चालण्यात आहे. लांब लांब चालायला जाणं हा एक छंद! मुंबईच्या नोकरीच्या काळात, अन् ह्या चालण्यातून रस्त्यांवरून आलेला अनुभव 'त्यानंतर' मधल्या राधिकेचा ही होतो. ह्यानंतर मुंबई - महाराष्ट्रापासून दूर हुबळी - बंगलोरला असताना, सुचलेलं स्थलांतरचं कथानक.

पहिला परदेशातला प्रवास होतो तो ऑस्ट्रेलियाचा. इथं विशेष उल्लेख करावासा वाटतो तो दोन गोष्टींचा एक म्हणजे स्ययंपाकाचा अन् पर्यायाने स्वैपाक्याचा! लग्नसंस्थेत ते बायकोचं काम झालं खरं पण इतकं की जणू काही ते निसर्गदत्त तिचंच काम असलं पाहिजे. कुणीतरी (म्हणजे ९९ % बाई) आपल्यासाठी आयतं जेवण तयार करून ठेवतं ह्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते की आपण जेवण बाईनेच करायचे काम हे गृहीत धरतो. आत्ताच्या समानतेच्या काळात, पुरुष एखादा स्वयंपाकाचा पदार्थ, अथवा \चहा, कॉफी इ. करतो आणि ते त्याची बायको अभिमानाने सांगणारी, मिरवणारी आपल्या आजूबाजूला दिसते.

दुसरा उल्लेख हा की - जेवणघराची, स्वयंपाकाची खोली - ऑस्ट्रेलियातल्या वास्तव्यात, टिमथीच्या आईच्या येप्पूनच्या, समुद्रकिना र्‍यावरच्या घरातल्या स्वयंपाकघराचं मस्त वर्णन. हे घर बांधताना सर्वप्रथम बांधली गेली ती म्हणजे सर्वात महत्वाची अशी जेवणघराची, स्वयंपाकाची प्रशस्त खोली. ओटा असा बांधलेला की समोर अथांग पाणी दिसावं. अर्थात आपल्याला जरी अश्या खोल्या ही लक्झरी वाटत असेल तरी क्षणभर हेवा वाटतोच.

ह्या ब्रिस्बेनच्या वास्तव्यात आलेला एक वेगळा अनुभव लेखिका सांगते की, रस्त्यावरून जाताना किंवा बागकाम करणा र्‍या कुणी बाई माणसानं पाहिलं, नजरानजर झाली की एकमेकांकडे पाहून हसायचं. असं हे अगदी सहज घडू शकतं हा पहिला अनुभव! आपण फार क्वचित अनोळखी माणसाकडं पाहून हसतो. मग हाय हॅलो तर दूरच राहिलं. विश्वास ही एक गोष्ट आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच अनुभवात असते. खुपदा हा विश्वास हा आपल्या गृहितकांवर अवलंबून असतो. पान क्रमांक १९ आणि २० वरचं विश्लेषण हा ह्या पुस्तकाचा गाभा आहे! असं मला वाटतं.

ह्या पुढचा प्रवास पुस्तकात आपल्याला होतो तो सिंगापूर, उगवत्या सुर्याचा देश म्हणजे जपान आणि युरोप - फ्रान्स, स्वित्झर्लंड वगैरे. जपानी भाषा, संस्कृती, दुस र्‍या महायुद्धानंतरचा पूर्णतः नवा जपान, ऋतू - कोयो, साकुरा, ओफुरो, ओनसेन आणि मुख्य म्हणजे 'तोयले' - 'टॉयलेट' हे जपानचं राष्ट्रीय अंग आहे! आपल्याला जर का सर्वात प्रथम काही आत्मसात करावयाचं असेल तर त्यात 'टॉयलेट' नक्कीच आहे! ह्या सगळ्यासाठी तरी हे पुस्तक एकदा वाचायला हरकत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहेस डू आय.
मी स्थलांतर वाचलंय , पण ते काही भावलं नाही, त्यामुळे या लेखीकेची इतर पुस्तके वाचली नसती . पण आता हे निदान बॉरो करुन तरी वाचेन .

रैना हे वाचच. अन् मग आवर्तनही नक्की आवडेल Happy

सावली, हो गं मी लिहीन आणखी. Happy

मेधा तै, मलाही स्थलांतर फारसं भावलं नाही तेच ओमियागे बाबत. आता नक्की का ते माहित नाही पण हे खरं की, आवर्तन नंतर प्रत्येक पुस्तकात मी आवर्तनची छाप शोधत राहिलो. तेच पेंढारकरांच्या रारंग ढांग बाबत झालं अन् तेच शिरवळकरांच्या दुनियादारी बाबत झालं. हे असं करणं, एक पॅटर्न शोधत राहणं खरं तर चुकीचं आहे, कारण प्रत्येक पुस्तकाचं बीज वेगवेगळं असतं! पण आपण ( बहुदा) असं ब र्‍याचदा करत जातो. ही सवय सोडायला हवी हे उमजते आहे आता.

हे वाचा अन् वाटलंच तर आवर्तनही वाचा नक्की आवडेल.