रेल्वे स्टेशनावर, किंवा रस्त्यांवर गर्दीत बरेचदा फाटक्या, मळक्या कपड्यातला एखादा बारका हात आपल्या समोर येतो. आपण सवयीनं तिकडं दुर्लक्ष करतो. फारच मागे लागला, तर पोलिसांकडे द्यायची धमकी देतो. मग तो हात दुसर्या कोणासमोर पसरला जातो. हा पसरलेला हात कोणाचा याचा विचार क्षणभरसुद्धा आपण करत नाही, इतकं हे आपल्याला सवयीचं झालेलं असतं.
अंगावर धड कपडे नसलेली, जखमा वागवणारी, झिपर्या केसांची असंख्य मुलं आपण रोज बघत असतो. रेल्वे स्टेशनाच्या परिसरात, प्लॅटफॉर्मावर किंवा कुठेतरी वळचणीवर आपलं बेवारस आयुष्य जगणार्या मुलांचं जीवन रुळांवरून पुरतं घसरलेलं असतं. काही ना काही कारणांमुळे घर सोडून आलेली ही मुलं रेल्वे स्टेशनावरच्या गर्दीत आसरा शोधतात. आपलं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करतात. पण तिथल्या उघड्यावाघड्या जगण्यामुळे त्यांना आयुष्यभराच्या सर्व बर्यावाईट प्रसंगांना लहानपणीच सामोरं जावं लागतं. ही मुलं आपलं बालपण फार लवकर हरवून बसतात.
आजूबाजूचे मोठे या मुलांचा वापर करून घेतात. ओझी उचलायला, भीक मागायला, रेल्वेखाली कोणी आलं, तर तो छिन्नविछिन्न मृतदेह उचलायला, लैंगिक भूक भागवायला ही मुलं फारच सोयीची असतात. पोटासाठी सहन करावे लागणारे अत्याचार, आणि दु:ख विसरण्यासाठी फार लवकर जवळ केलेली व्यसनं यांमुळे या मुलांची परवड काही केल्या थांबत नाही, पण तरीही ही मुलं सन्मानानं जगण्याचा प्रयत्न करतच राहतात. 'स्पॅरोज' या संस्थेच्या सुदेष्णा घारे यांच्यासारखे काही स्टेशनावरच्या मुलांना एक सुरक्षित आयुष्य देण्यासाठी प्रयत्न करतातही. पण एवढ्या मोठ्या आपल्या देशात हे प्रयत्न असे कितीसे पुरे पडणार?
'प्लॅटफॉर्म नंबर झिरो' हे रेल्वे स्टेशनावरच्या मुलांचं जीवन समोर आणणारं पुस्तक समकालीन प्रकाशनानं नुकतंच प्रसिद्ध केलं आहे. या मुलांसाठी, मुलांमध्ये गेली अनेक वर्षं काम करणार्या अमिता नायडू यांनी ते लिहिलं आहे. किशोर, जग्गू, अॅन्थनी, बिल्लू, झहीर, मुन्ना अशा कितीतरी मुलांच्या अस्वस्थ करून सोडणार्या कहाण्या या पुस्तकातून आपल्या समोर येतात.
समाजानं पूर्णपणे पाठ फिरवलेल्या अशा लाखो मुलांचं आयुष्य किती दयनीय आहे, हे सांगणार्या 'प्लॅटफॉर्म नंबर झिरो' या पुस्तकाची अमिता नायडू यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Platform-Number-Zero.html
या पुस्तकात अगदी पहिल्या पानापासून तुम्हांला अॅन्थनी, बिल्लू, मुन्ना, झहीर, राणा अशा बिनओळखीच्या नावांना सामोरं जावं लागणार आहे. तुमच्या मनात येईल की कोण आहेत हे लोक? या अनोळखी माणसांबद्दल मी वाचायचं की नाही? वाचायचं असल्यास का वाचायचं? वाचून झाल्यावर त्यांचं काय करायचं?...
या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळावीत यासाठीच पुस्तक वाचण्याआधी इथे एक अर्धविराम टाकलाय आणि तुम्हांला थांबवून धरलंय. ही नावं आहेत काही छोट्या मुलांची. ही मुलं कोण आहेत, या प्रश्नाचं उत्तर तितकंसं सोपं नाहीये. 'स्टेशनवरची किंवा प्लॅटफॉर्मवरची मुलं' म्हणून आपण त्यांना ओळखतो. पण ती त्यांची खरी ओळख नाही. कारण एखाद्याचं राहण्याचं ठिकाण ही त्या माणसाची ओळख कशी असू शकते? त्यावरून फार तर त्यांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येईल, पण तीच त्यांची ओळख कशी असणार? तरीही आपण या मुलांबाबत तसं करतो. मग 'ही मुलं कोण आहेत' या प्रश्नाचं उत्तरं कसं द्यायचं?
एका वाक्यात सांगायचं, तर ही मुलं म्हणजे शहाण्यासुरत्या समजल्या जाणार्या आपल्यासारख्या लोकांनी नजरेसमोर दिसत असूनही मनाच्या आणि बुद्धीच्या आड केलेलं एक रखरखीत वास्तव आहे. या मुलांना मी पहिल्यांदा भेटले तेव्हाच हा साक्षात्कार मला झाला. या साक्षात्कारातून माझ्यापर्यंत आलेल्या सत्याने मला नुसतं अस्वस्थच केलं नाही, तर आपल्या समाजमनाचा आरसाच माझ्यापुढे ठेवला. तोच आरसा या पुस्तकाच्या निमित्ताने मी सर्वांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक तेवढ्यासाठीच आहे. सत्याला सामोरं जाण्याची ताकद बाळगून असणार्या प्रत्येकाने म्हणूनच हे पुस्तक वाचायला हवे.
स्टेशनवर राहणार्या या मुलांशी माझी भेट झाली २००४च्या सुमाराला, 'स्पॅरो' नावाच्या एका संस्थेच्या माध्यमातून. ही संस्था माझी मैत्रीण सुदेष्णा घारे हिची. तिने याआधी काही वर्षं या मुलांसाठी काम केलं होतं. मधल्या काळात लग्न आणि त्यामुळे आलेल्या जबाबदारीने काही काळ ती स्टेशनपासून आणि या मुलांपासून लांब होती. थोडं स्थिरस्थावर झाल्यावर जेव्हा पुन्हा काम करायचं ठरलं, तेव्हा तिने मलाही विचारलं. पत्रकारितेला 'बाय, बाय' करून २००२पासून सामाजिक क्षेत्रात काम करायचं मी ठरवलं होतं, ते 'प्रश्नांना आपणच उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायचा' या तळमळीतून. या तळमळीचा केंद्रबिंदू होती विकासापासून दूर असलेली, मुख्य प्रवाहात अनेक कारणांनी येऊ न शकणारी मुलं. अशा मुलांसाठी काम करण्याची माझी ओढ माहीत असल्याने सुदेष्णाने मला विचारलं होतं. ही संधी मी सोडली नाही.
ही संधी अक्षरशः सुवर्णसंधी होती हे पुढच्या काही वर्षांनी सिद्ध केलं ते माझ्यात घडलेल्या बदलांमुळे. या मुलांसाठी काम करताना मी या मुलांबरोबर कधी आणि कशी जोडले गेले हे मला कळलंच नाही. शिवाय 'मुलांसाठी काम' म्हणताना आपोआपच चिकटला जाणारा सूक्ष्म अहंकार कधी गळून पडला, तेही समजलं नाही. त्यांच्या बरोबरच्या कामातल्या या वर्षांनी शिकवलेलं एक शहाणपण म्हणजे 'या मुलांसाठी आपण काही करतो' हा आव आणणं पूर्णपणे चुकीचं आहे, हे समजणं. कारण ही मुलं आपली आपणच एवढी खंबीर बनलेली असतात आणि मित्रांच्या सोबतीने बनवलेल्या एका मोठ्या कुटुंबाचा हिस्सा बनलेली असतात. जेणेकरून रोजच्या जगण्यासाठी त्यांना आणखी कोणाची गरज नसते.
मात्र हेही तेवढंच खरं, की निखळ मैत्री आणि प्रेमाच्या भूमिकेतून तुमचं त्यांच्याबरोबर असणं त्यांना तेवढंच महत्त्वाचं वाटत असतं. कारण जगण्याच्या संघर्षात त्यांच्या वाट्याला येणार्या अनुभवांतली धार कमी करण्यासाठी कोणातरी संवेदनशील अशा मोठ्या माणसांचा खांदा त्यांना त्यांच्या जगण्याचं बळ वाढवण्यासाठी हवा असतो. माझ्या या छोट्या दोस्तांनी हे सगळं शहाणपण इतक्या सहजसुंदरपणे माझ्यापर्यंत पोहोचवलं की, मी कधी मोठी नि समजुतदार झाले ते मलाही कळलं नाही.
या महत्त्वाच्या शहाणपणाबरोबरच या मुलांकडून मला आणखीही खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. माझ्या सगळ्या पांढरपेशा समजुतींना, चौकटींना केवळ धक्का बसला असं नाही, तर त्यांची पार मोडतोड झाली. नको असलेली, वर्षानुवर्षं उगीचच सांभाळून ठेवली गेलेली जुनी वेडगळ अडगळ साफ होत गेली, आणि स्वच्छ प्रकाश म्हणजे काय चीज आहे हे मला समजायला लागलं. उदाहरणादाखल काही नावं घ्यायची झाली, तर तुमचं वय, शिक्षण, दिसणं, तुमची सामाजिक स्थिती इत्यादीप्रमाणे तुमचं वागणं कसं असायला हवं वगैरे घोळात ही मुलं तुम्हांला कधी अडकवत नाहीत. दोस्तीसाठी, प्रेमासाठी आणि जेव्हा जेव्हा त्यांना गरज वाटते त्या वेळेस होणार्या लैंगिक संबंधांसाठी वर उल्लेख केल्यापैकी कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नसते, फक्त दोघांनी एकमेकांची मनापासून निवड करणं गरजेचं असतं, हे मला या मुलांच्या आयुष्याने शिकवलं.
या कामानंतर माझ्यामध्ये एक विलक्षण मोकळेपणा आणि निर्भयपणा आला. पुढचा माणूस जसा आहे तसा स्वीकारणं आणि एकदा स्वीकारल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवण, जे मनात असेल ते बेधडक आणि मोकळेपणाने बोलणं, स्वच्छपणे आपल्या भावनांची अभिव्यक्ती करणं या त्यांच्यातील गुणांनी मला एवढी भुरळ घातली, की कळत-नकळत माझ्यामध्येही या गोष्टी आल्या. अर्थात मोठ्यांच्या जगात वावरताना त्यामुळे काही वेळा मी अडचणीतदेखील आले. पण नो इलाज! मोठ्यांच्या दुनियेत सरसकट जो सावध पवित्रा घेऊन वावरावं लागतं, तो विचार आता माझ्या डोक्यात येतच नाही. छोट्यांच्या जगात केवळ 'माणूस'पण महत्त्वाचं असतं. त्यामुळे 'माणूस' म्हणून असलेल्या त्याच्या आतल्या ओळखीचाच भाग समोर येत राहतो. माझे हे छोटे दोस्त त्यांच्या आयुष्यात ज्या प्रकारे संघर्ष करतात ते बघितल्यामुळेच मला माझ्या स्वतःच्या आजवरच्या आयुष्यात कधीही रिकामं, हताश, उदास वाटलं नाही.
या मुलांपैकी माझी सगळ्यांत आधी भेट झाली ती राणाशी. प्लॅटफॉर्मवर काम सुरू करण्याअगोदर आम्ही मुलांबद्दलची प्राथमिक माहिती गोळा करत होतो तेव्हा त्याने आम्हांला बघितलं होतं. पण तेव्हा तो बोलायला आला नव्हता. बहुधा तो लांबूनच आमचा अंदाज घेत असावा. भीड चेपल्यावर किंवा आमच्याबद्दल विश्वास वाटल्यानंतर त्याने मला प्रत्यक्ष भेटायचं ठरवलं असावं. एके दिवशी दुपारी मी स्टेशनच्या आवारात शिरून एक नंबर प्लॅटफॉर्मवर जाण्याच्या तयारीत असतानाच कानावर एकदम 'ओऽऽ दीदीऽऽऽ' अशी 'ई'ची मुंडी मुरगाळून तिला तारसप्तकात हाकलणारी खणखणीत हाक कानावर आली. अशा पद्धतीने बोलावण्याची सवय नसल्याने 'अशी हाक कोण मारतंय' म्हणून जरासं भेदरूनच मी इकडेतिकडे बघितलं, तर तिथल्या एका लाकडी कठड्यावर एक पाय वर आणि एक पाय खाली सोडून बसलेला एक मुलगा मला दिसला. माझं लक्ष त्याच्याकडे गेल्यावर हाताने मला जवळ येण्याची खूण करत तो म्हणाला, 'इधर आओ'. त्याची ती आज्ञावजा विनंती मी अगदी बिनबोभाट पाळली आणि त्याच्या जवळ गेले. तपकिरी रंगाची पँट आणि लाल रंगाचा अर्ध्या बाह्यांचा टी-शर्ट घातलेल्या आणि दातांत माचिसची काडी चावत बसलेल्या राणाचं मला झालेलं हे पहिलं दर्शन!
त्याच्या जवळ गेल्यावर मी त्याला विचारलं, "तू मुझे पहचानता है?" काडी चावता चावता तो मला म्हणाला, "हां, तुम सुदेश्नादीदी के सात आते हो ना? मैने पेचाना, पर तुम्हारा नाम-पता नई|" मग मी त्याला माझं नाव सांगितलं. 'अमितादीदी' असं चार-पाच वेळा स्वतःशी म्हणून बघितल्यावर खूप छान हसत तो म्हणाला, "तुमारा नाम भोत अच्छाए, अमितादीदी| अबी मे तुमकू नामसेई बुलायेगा|" तो खूष झालाय हे मला त्याच्या डोळ्यांवरूनच समजलं; पण तसं अजिबात न दाखवता त्याने बसल्या बसल्या उलटतपासणी वाटेल असा माझा इंटरव्ह्यू घेतला. त्यात आम्ही काय आणि कसं काम करणार आहोत हे विचारून घेतलं. मीही जमेल तेवढ्या प्रामाणिकपणे तिथेच ताटकळत उभं राहत त्याला उत्तरं दिली.
दहा-पंधरा मिनिटांच्या या संभाषणानंतर राणाचं बहुधा समाधान झालं असावं. कारण सरतेशेवटी तो उडी मारुन खाली उतरला आणि त्याने मला विचारलं, "अमितादीदी, तुमकू चाय पीनेकीए? मे लेके आता|" तेव्हा माझ्या इंटरव्ह्यूचा निकाल त्याने न सांगताही मला अंतःप्रेरणेने कळला. मग माझ्या 'पास' होण्याचा आनंद मीच त्याला कॅडबरीचा बार देऊन केला. तो घेऊन तो ज्या रीतीने उड्या मारत धंद्याला गेला ते पाहिल्यावर आमच्या दोघांत तिथेच एक कायमचं, घट्ट नातं तयार झालं. राणानंतर मुन्ना, बिल्लू, राजा, अॅन्थनी, शिद्या, म्हाद्या, शिवा, शाम्या, काश्या, जग्गू, दिलप्या, अब्दुल, केक्या, शाहरुख, कोयला, बोलबचन, बंगाली, नेपाली, किशा, कृष्णा, झहीर, किशोर अशी सगळी मुलं मला हळूहळू भेटली. (या मुलांतीलच काहींची व्यक्तिचित्रणं मी या पुस्तकात लिहिली आहेत. अर्थातच ती लिहिताना त्यांची खरी नावं त्यांची ओळख उघडकीला येऊ नये म्हणून बदलली आहेत.)
दिवसागणिक या सगळ्यांशी जसजसं नातं बळकट व्हायला लागलं, तसतसं समजत गेलं की यातलं प्रत्येक मूल वेगळं आहे. त्यातील प्रत्येकाच्या भावनिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक गरजा वेगवेगळ्या आहेत. त्यांच्या अभिव्यक्त होण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. या पद्धतींचा एक आकृतिबंध तयार करण्याचा प्रयत्न केला तर त्यात काही गोष्टी सामायिकही आहेत. एक म्हणजे या मुलांच्या तोंडात सरसकट असलेल्या व पांढरपेशा कानांना आणि मनाला न झेपणार्या शिव्या. या शिव्या सर्व प्रकारच्या भावनिक अभिव्यक्तींसाठी सगळीच मुलं नि:संकोच वापरतात आणि त्यात कोणालाही काहीही गैर वाटत नाही. दुसरं म्हणजे अभिव्यक्तीची भाषा. ही अत्यावश्यकपणे हिंदीच असते. मुलं कोणत्याही प्रांतातून आलेली असू दे, त्यांची मातृभाषा कोणतीही असू दे; मूल एकदा इथे प्लॅटफॉर्मवर आलं, की एखादा अलिखित नियम असल्याप्रमाणे त्याचे संवादाचे सर्व व्यवहार ते हिंदीतूनच करायला लागतं... हे बहुधा हिंदी सिनेमाच्या प्रभावातून होत असावं. कारण या मुलांना हिंदी चित्रपटांचं जबरदस्त आकर्षण असतं. हे चित्रपट मोठ्या प्रमाणावर बघितले जात असल्यामुळे आणि सगळ्यांनाच ती भाषा समजून बोलता येत असल्यामुळे हिंदीत व्यवहार करणं सोपं जात असावं. भाषिक किंवा प्रांतिक अस्मितेचा प्रश्न या मुलांच्या जगात तरी मला दिसला नाही. हिंदी भाषा बोलण्याची त्यांची ढबही जगावेगळी आहे. वाचकांना हे पुस्तक वाचताना ती कळेलच.
आणखी एक गोष्ट आवर्जून सांगायलाच हवी. या वयाच्या कोणत्याही सामान्य मुलांमध्ये असतं तसं आपल्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये घडणार्या बदलांबद्दल तसंच आजूबाजूला घडणार्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना जबरदस्त कुतूहल असल्याचं मला जाणवलं. पण हे कुतूहल योग्यरीत्या कसं शमवायचं याचे मार्ग त्यांना माहीत नसतात. विशेषतः शरीरामध्ये घडणार्या बदलांबाबत तर ही गोष्ट तीव्रतेने जाणवते. परंतु योग्य आणि समंजस मार्गदर्शनाअभावी ही मुलं आपापल्या प्रयोगशाळा चालवतात आणि आपापल्या मानसिक कुवतीप्रमाणे आपापसात लैंगिक प्रयोग सुरु करतात. त्यातून जे घोळ व्हायचे ते होतातही. या सार्या व्यवहारांना शोषण, पिळवणूक म्हणायचं की नाही ही या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी ठरवायची गोष्ट आहे. मला त्यात फार बोलता येणार नाही. या मुलांना वयाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर या संदर्भात योग्य ती मदत मिळायला हवी, एवढं मात्र मला वाटतं.
या मुलांमध्ये अजिबातच भागवली न जाणारी प्रेमाची जबरदस्त अशी भूक आहे, असंही मला जाणवलं. प्रेमाने जवळ गेलेल्या प्रत्येक माणसासाठी त्यांच्याजवळ वेळ आहे. पण त्याचबरोबर अशा माणसांना सतत निरीक्षणाखाली ठेवून त्यांना वारंवार पारखण्याची ताकदही त्यांच्यापाशी आहे. त्यांच्या अशा स्कॅनिंगला सामोरं जाण्याचे प्रसंग मी स्वतःही कितीदा तरी अनुभवले आहेत.
एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. स्टेशनवर काम करणार्या संस्थांपैकी आम्ही दोन संस्थांनी मिळून एकदा या मुलांची सहल एका फार्म हाऊसवर नेली होती. तिथे खाणंपिणं झाल्यावर मुलं यथेच्छ हुंदडायला लागली. फार्म हाऊसवर पाण्याचा एक मोठा हौद होता आणि त्यात कमरेपेक्षा थोडं कमी एवढं पाणी होतं. पोरं त्यात उड्या मारुन खेळायला लागली. बर्याच मुलांना पोहायला येत नसलं तरी पाणी जास्त नसल्याने त्यात बरीच मुलं उतरली होती. थोडा वेळ खेळून झाल्यावर झहीरला हौदाबाहेर येण्यासाठी कोणाचा तरी हात हवा होता, कारण हौदाची उंची थोडी जास्त होती. त्याने आधी दुसर्या दोन दीदींना हात मागितला. त्याचं बघून दुसर्या काही पोरांनीही हात मागायला सुरुवात केली. पोरांचा खोडसाळपणा माहीत असल्याने त्या दीदी त्याला हात देईनात. 'हात दिला आणि पोरांनी आपल्याला आत खेचलं तर काय?' असं त्यांना वाटत होतं आणि तसं त्यांनी झहीरला आणि इतर पोरांना स्पष्ट सुनावलंही. आपण असं काही करणार नाही, असं झहीर त्यांना सांगत होता; पण पिकनिकच्या माहोलमुळे त्यांचा काही त्यावर विश्वास बसेना. शेवटी झहीर माझ्याकडे वळला आणि त्याने मला हात मागितला. मी त्याला हात दिल्यावर त्याला धरुन तो वर आला आणि वर आल्या आल्या फटकळपणे त्या दोघींना म्हणाला, '' मेरी तो सिर्फ अमितादीदी है जिसने मुझपर भरोसा किया | तुम दोनों का तो कुछ भी फायदा नही है |"
हा प्रसंग इथे संपला, पण झहीरच्या डोक्यातून तो काही गेला नाही. त्यानंतर जेव्हा तरी स्टेशनवर भेट झाली तेव्हा त्याने मला विचारलं, " दीदी, क्या तुमको उन लोगों जैसा नही लगा कि मैं तुम्हारा हाथ लेके तुमकोही अंदर खींचूंगा?'' हा प्रश्न इतका अनपेक्षित होता, की एक क्षण त्यावर काय बोलावं ते मला सुचलं नाही. याचं उत्तर 'हो' किंवा 'नाही' असं सरळ नव्हतं. कारण कोणत्याही परिस्थितीत कोणाचीही रेघ छोटी करुन चालणार नव्हतं. कसं कोण जाणे पण मी एक्दम म्हणून गेले , "उस वक्त दिमाग में इतनाही था कि तुमको ऊपर आना है और मुझे तुमको बाहर खींचना है, बस्स |"
डोक्याने तल्लख असलेल्या झहीरला या उत्तरातलं मर्म नेमकेपणानं समजलं, तरीही आपला आग्रह न सोडता त्याने मला विचारलं, "और अगर मैं तुम्हे अंदर खींचता तो?" मी म्हटलं, "तो क्या? सब मिलके अंदर मस्ती करते और फिर अगले पाच - छह दिन मैं छींकते छींकते बच्चों से बात करती!" तो खदाखदा हसायला लागला. त्यानंतर आठवड्याभरात आलेल्या 'फ्रेंडशिप डे' ला त्याने एक लाकडी मण्यांचं सुंदर ब्रेसलेट खरेदी करुन स्वतःच्या हाताने माझ्या हातात घातलं. मला म्हणाला, " दीदी, ये उल्टी कमाईका नहीं है | राणा के साथ जाकर भंगार चुना है, उस कमाई का है | ये कभी अपने हाथ से नहीं उतारना |" ते ब्रेसलेट अर्थातच माझ्या हातात राहिलं. झहीरच्या सगळ्या चढउतारांत, सगळ्या मानसिक आंदोलनांत त्याला त्यातून बाहेर काढायला त्या ब्रेसलेटच्या अदृश्य धाग्याने मदत केली. पुढे झहीरच्या अकाली, अनपेक्षित मृत्यूनंतर ते ब्रेसलेट मी हातातून उतरवलं आणि पुलावरुन पुराच्या वाहत्या पाण्यात सोडून दिलं. कारण त्याचा मृत्यूही पुरातच झाला होता.
मी एकुणात पाच-सहा वर्षं या मुलांमध्ये रमले, वावरले. या काळात अशा कितीतरी गोष्टी मला दिसल्या ज्या इथे सांगण्यासारख्या आहेत. मात्र, वैयक्तिक अनुभवांतून थोडंसं बाजूला जाऊन एका व्यापक पातळीवर या मुलांविषयी बोलायचं झालं, तर आपल्या व्यवस्थेतल्या सर्व प्रकारच्या त्रुटींमधून निर्माण झालेला हा एक मोठा प्रश्न आहे, हे लक्षात येतं. या पुस्तकात जरी एकून नऊ मुलांविषयीच लिहिलेलं असलं, तरी स्टेशनवर आम्ही केलेल्या कामातल्या साधारणपणे दीडशे मुलांचं प्रतिनिधित्व तर करतातच, पण त्याही पलीकडे जाऊन ते भारतातल्या अशा परिस्थितीत सापडलेल्या सगळ्याच मुलांचं प्रतिनिधित्व करतात.
नुकत्याच केलेल्या एका पाहणीतल्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के संख्या लहान मुलांची आहे. भारताचं आशास्थान आणि 'तरुण भारत' म्हणून गौरवलं जात असलेल्या या लोकसंख्येला आपण कसं वागवत आहोत? त्यांच्याकडे, त्यांच्या गरजांकडे, त्यांच्या हक्कांकडे कसं बघितलं जात आहे? या प्रश्नाच्या नि:स्पृह उत्तरामध्ये मुलांची स्थिती उघड होणारी आहे. या बाबतीत 'युनिसेफ'ने राज्यातल्या ५ ते १४ वर्षं वयोगटातल्या बालकामगारांची ३० वर्षांतली म्हणजे १९७१ ते २००१ दरम्यानची जी आकडेवारी दिली आहे ती पुरेशी बोलकी आहे. १९७१ साली ९ लाख ८८ हजार, १९८१ साली १५ लाख ५७ हजार, १९९१ साली १० लाख ६८ हजार, २००१ साली ७ लाख ६४ हजार तर यंदा २०१० अखेर ९ लाख १२ हजार बालकामगार आहेत, असं मानलं आहे.
एका स्वयंसेवी संस्थेच्या पाहणीनुसार आज भाततातली सुमारे ५० कोटी मुलं जगण्याच्या संघर्षात आपलं बालपण हरवून जगताना दिसतात. यातली ५४ टक्के मुलं ग्रामीण भागात शेती वा शेतीजन्य उद्योगधंद्यांत राबत आहेत, १५.५ टक्के बांधकाम, १८ टक्के घरगुती कामात, ५ टक्के जॉब तयार करणे व उरलेले ८ टक्के इतर रोजगाराच्या ठिकाणी आहेत. तर एकूण बालमजूरांपैकी सुमारे ८५ टक्के मुलं असंघटित उद्योगांत अमानुष पिळवणुकीला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणाला तोंड देत आहेत.
थोडक्यात, याचा अर्थ असा होतो की, आपली व्यवस्था मुलांना त्यांच्या शिक्षणाचा, विकासाचा हक्क मिळवून देण्यात अंमलबजावणीच्या पातळीवर अपयशी ठरत आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या जगण्याच्या, संरक्षणाच्या, सुरक्षेच्या हक्कांचीही पायमल्ली होत आहे.
गेल्या पाचसहा वर्षांवर नुसती नजर टाकली तरी सुनामी, भूकंप, पूर, रोगराई, साथ, संसर्ग, बॉम्बस्फोट यांसारख्या घटनांतून हेच सिद्ध होईल. कोणत्याही प्रकारच्या निसर्गनिर्मित आपत्तींमध्ये सर्वात जास्त झळ प्रामुख्याने लहान मुलांनाच सोसावी लागते. या सार्या आपत्तींमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणावर बळी पडतात ती लहान मुलंच. दुसरीकडे विविध वासनाकांडं, खंडणी प्रकरणं, दहशतवाद, गुप्तधनासाठी दिले जाणारे बळी, सामूहिक लैंगिक शोषण, पोर्नोग्राफीसाठी किंवा अमली पदार्थांच्या तस्करीपासून अनेक प्रकारच्या वाहतुकीसाठी केला जाणारा लहान मुलांचा वापर, यांसारख्या लालसी, पिपासू क्रूरतेला सगळ्यात आधी बळी पडतात ती लहान मुलंच. त्यामुळेच मुलं किती असुरक्षित आयुष्य जगत आहेत याचा विचार आपण सर्वांनीच करण्याची गरज निर्माण झाली आहे.
याहीपलीकडे मुलांच्या आयुष्याला उलथून टाकणारी एक प्रक्रिया आपल्याकडे चालू आहे. आपल्या देशात वर्षानुवर्षे काही जिल्हे विकासापासून वंचित राहिले आहेत आणि त्यामुळे त्या भागातून गोरगरिबांना सतत स्थलांतरं करत राहावी लागतात. त्याचा सर्वाधिक परिणाम होतो तो मुलांवर. आपल्या पालकांबरोबर रोजगारासाठी गावोगाव भटकत असताना या मुलांची स्थिती अशी होते की शिक्षण नाही, व्यावसायिक वा जगण्यासाठी आवश्यक ते कौशल्य नाही, रोजगाराच्या संधी नाहीत. त्यामुळे जगणं त्यांना सतत कोणत्या ना कोणत्या शोषणाच्या टोकापाशी नेऊनच ठेवतं. या विषारी चक्राच्या आर्यांवर अजूनही काही गोष्टी अशा आहेत ज्याचे थेट परिणाम मुलांच्या आयुष्यावर होतात. एक म्हणजे वेगाने बदलत चाललेली वैयक्तिक व सामाजिक मूल्यं, हे अंतर भरताना याच्याशी परंपरेने चालत आलेल्या मूल्यांचा ताळमेळ घालता येत नसल्याने ढासळत चाललेली कुटुंबव्यवस्था, वेगाने वाढणारे शहरीकरण यांनी निर्माण करून ठेवलेले मोहाचे विविध भूलभुलैय्ये.. कधी या सगळ्याच्या तावडीत सापडून मुलांची आयुष्यं भिरकावली जातात, तर कधी सर्व प्रकारच्या अस्थिरतेला तोंड देणारी मुलं चांगल्या भविष्याच्या आशेने किंवा कधी आहे त्या परिस्थितीतून स्वतःची सुटका करून घेण्याच्या हेतूने मार्ग निवडतात, घरातून पळून दुसर्या गावी जाण्याचा.
पळून आल्यावर रेल्वे स्टेशनसारख्या माणसांची नि रेल्वे गाड्यांची सतत ये-जा असणार्या जागी आश्रय घेणार्या या मुलांचं रोजचं जगणं किती प्रकारच्या ताणांमधून, दबावांतून जात असतं याची कल्पना आपण आपल्या चार भिंतींच्या आड राहून करूही शकणार नाही. त्यांच्या जगण्याची थोडीशी ओळख जरी या पुस्तकातून झाली तरी या लेखनाचा हेतू साध्य झाला, असं मी म्हणेन.
स्टेशनवर राहणार्या या मुलांचं जगणं आणि त्यांचा संघर्ष समजावून घेऊन त्यांना चांगलं जगायला मदत करणार्या किती तरी संस्था, माणसं आज देशभर तळमळीने काम करत आहेत. या मुलांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांना स्थिर व दर्जात्मक जगण्याची संधी देणं हे काम अतिशय अवघड, वेळखाऊ आणि चिवट सहनशीलतेने करण्याचं आहे. पण त्यात अडथळे निर्माण होतात, जेव्हा या मुलांकडे ते 'भावी गुन्हेगार' आहेत या नजरेने बघितलं जातं. परंतु 'ही मुलं भावी गुन्हेगार आहेत,' ही धारणा फार घट्टपणे निर्माण झाली आहे आणि त्यामुळे त्यांना पुन्हा समाजात सामावून घेण्याची प्रक्रिया अवघड बनली आहे.
एका प्रथितयश इंग्रजी दैनिकाने छापलेल्या एका बातमीमध्ये या मुलांबद्दलचे पूर्वग्रह शिकल्यासवरलेल्या व स्वतःला शहाणे समजत असलेल्या वर्गातही कसे आहेत हे दिसतं. या दैनिकाने बातमीमध्ये म्हटलं होतं, 'पुणे स्टेशनवर असणारी संघर्षग्रस्त मुलं (स्ट्रीट चिल्ड्रेन) ही सुरक्षेला धोका आहेत.' या बातमीमध्ये काही संबंधित सरकारी अधिकारी व एका स्वयंसेवी संस्थेचे प्रकल्प अधिकारी आदींशी बोलून त्यांचं म्हणणं या मताच्या पुष्ट्यर्थ मांडलं होतं. या बातमीतून ध्वनित होणारा अर्थ असा होता की, घर सोडून पळून आलेली व रेल्वे प्लॅटफॉर्मवर आसरा घेणारी मुलं ही गुन्हेगारी प्रवृत्तीची, व्यसनी असतात. त्यामुळे विघातक कृती करणार्यांकडून ती मुलं सहजासहजी वापरली जाऊ शकतात, विकली जाऊ शकतात.
दुर्दैवाने या मुलांकडे बघण्याची बहुतेक सरकारी अधिकार्यांची वृत्ती हीच आहे. एखादी छोटीमोठी घटना घडली, की पहिल्यांदा या मुलांवर संशय घेऊन त्यांना मारहाण करण्यात कायद्याची अंमलबजावणी करणार्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांचा समावेश असतो. दुसरीकडे या मुलांकडून आपल्या घरची कामं करून घेण्यापासून, बागकाम ते सामान शिफ्टिंग करण्यापर्यंतची कामं एक वेळच्या जेवणाच्या मोबदल्यात वा अत्यंत कमी पैशांत आसपासचे अनेक लोक, अधिकारी करून घेतात, तेव्हा याला काय म्हणायचं? ही मुलं म्हणजे एकगठ्ठा शोषण करण्यासाठी मिळालेली व्यवस्था आहे, असंच जणू काही मानलेलं असतं.
घराबाहेर पडलेली ही मुलं म्हणजे जणू काही सार्वजनिक मालमत्ता असल्यासारखंच त्यांच्याकडे बघितलं जातं. कोणीही येतं, त्यांना कसंही वागवतं, कधी वाट्टेल त्या कामासाठी वापरलं जातं. तर कधी 'आपण त्यांच्यासाठी काही करतोय' असा स्वतःचा अहंकार सुखावण्यासाठी त्यांचा वापर होतो. या सगळ्यांत त्यांना काय हवंय याचा मात्र कोणी विचार करत नाही. प्रत्येकजण स्वतःच्या इच्छेसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करून घेतो. 'अस्तित्वाची प्रेरणा' प्रखर असलेल्या या मुलांना ही गोष्ट अगदी लगेच समजते, आणि म्हणून ती चलाखपणे वागून तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर देतात. असं झालं की लगेच या मुलांवर वेगवेगळे शिक्के बसायला सुरुवात होते.
सतत कोणत्या ना कोणत्या शोषणाला सामोरं जाणार्या या मुलांना बातमीत ध्वनित केल्याप्रमाणे खरोखरच जर विघातक वृत्ती विकत घेऊ शकल्या, तर त्याला जबाबदार कोण आहे? मुलांना आपण जबाबदारी व विघातकता यांमधला फरक समजावून घेण्याची संधी दिली आहे का? मुलांना विकलं जाण्याची सवय कोणी लावली आहे? या प्रश्नाचं उत्तर आपण नि:पक्षपातीपणे स्वीकारणार आहोत की नाही, हा त्यामुळे माझ्या मते खरा मुद्दा आहे.
स्टेशनवर आयुष्य काढू बघणार्या या मुलांचं आयुष्य मी त्यांच्यासोबत काम करत असताना जवळून बघितल्यामुळे त्यांच्या विस्कटलेल्या जगण्याचा पोत मला जवळून पाहता आला. ते जगण्याकडे कसे पाहतात, त्यांच्या सुखदु:खाच्या कल्पना काय असतात, ते ज्या दुष्टचक्रात सापडले आहेत त्याची त्यांना कितपत जाणीव असते, त्यातून बाहेर पडण्याची त्यांची धडपड कशी चाललेली असते आणि त्या धडपडीचं पुढे काय होतं हेही मी जवळून बघू शकले. या मुलांमध्ये मी काम करत असल्याचे माझे मित्र, युनिक फीचर्स-समकालीन प्रकाशनाचे सुहास कुलकर्णी यांना माहीत होते. त्यांनी हे सारं लिहून काढण्याबद्दल मला सुचवलं आणि त्यानुसार या मुलांचं जगणं एकेका व्यक्तिरेखेतून सांगावं असं आम्ही ठरवलं. शंभर-दीडशे मुलांच्या आयुष्याचे कंगोरे आठ-दहा मुलांच्या व्यक्तिरेखांतून लिहिता येतील का, असा विचार करून हे पुस्तक मी लिहिलं आहे.
स्टेशनवरील ज्या मुलांबद्दल मी इथे लिहिलं आहे त्यांच्या आयुष्याची वेदना व्यक्त करणारं शीर्षक या पुस्तकाला लाभलं आहे. हे शीर्षक सुचवल्याबद्दलही मी माझ्या प्रकाशक मित्राचे आभार मानते. हे शीर्षक मला मनापासून आवडलं, कारण मी पुस्तकात जे जे सांगू इच्छित होते ते ते या शीर्षकातून व्यक्त होत आहे. जिवंत माणसांची वाहतूक करणारी रेल्वेसारखी यंत्रं ज्या निर्जीव फलाटांना लागतात त्या यंत्रांना आणि फलाटांनासुद्धा आपण गिनतीत पकडतो, पण हाडामासाच्या या जित्याजागत्या मुलांना आणि त्यांच्या जगण्याला मात्र कुणीही खिसगणतीत पकडत नाही. जगण्याच्या संघर्षाचे नियम लावायचे झाले तर ही मुलं खरं तर हीरो आहेत, पण आपल्या व्यवस्थेत मात्र त्यांचं मूल्य 'झिरो' आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 'एक'पासून सुरू होतात. तिथे 'झिरो' नंबरचा प्लॅटफॉर्म अस्तित्वातच नसतो. परंतु या मुलांचं आयुष्य इथे शून्यातूनच सुरू होतं नि बहुतेकदा शून्यातच भिरकावलं जातं. म्हणूनही या पुस्तकाचं नाव आहे 'प्लॅटफॉर्म नंबर झिरो'. या मुलांच्या बाबतीत उद्याचा आशाभरला विचार करता ही मुलं देशातल्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर अशा स्थितीत कधीही दिसू नयेत, अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची तळमळीची इच्छा आहे. या मुलांच्या जगण्याला तुमच्या-आमच्यासारखा सन्मानाचा प्लॅटफॉर्म लाभावा असं आजही मनापासून वाटतं.
***
प्लॅटफॉर्म नंबर झिरो
अमिता नायडू
समकालीन प्रकाशन
पृष्ठसंख्या - १५८
किंमत - रु. १५०/-
***
टंकलेखन साहाय्य - अश्विनी के, अनीशा, साजिरा, श्रद्धा
***
झहिरची गोष्ट चटका लाऊन गेली!
झहिरची गोष्ट चटका लाऊन गेली!
चिनूक्स, साजिरा, अनीशा, अश्विनी के, श्रद्धा ह्या पुस्तकाची माहिती करून दिल्याबद्दल खूप खूप आभार.
बापरे
बापरे
खूप छान.. या पुस्तकाची
खूप छान.. या पुस्तकाची माहिती करून दिल्याबद्दल खूप खूप आभार,तुम्हा सर्वांचे.
गेल्या महिन्याच्या
गेल्या महिन्याच्या '(महा)अनुभव' अंकात या पुस्तकातलं एक प्रकरण आलं होतं. (बहुतेक या झहीरबद्दलचंच...) वाचल्यावर मी खूप अस्वस्थ झाले होते.
मी पहिलं काय केलं तर आदित्यला ते वाचायला लावलं. 'जग असंही असतं' हा धडा मी त्याला द्यायला गेले असते तर त्यानं नेहमीच्या सवयीनं दुर्लक्ष केलं असतं. पण ते प्रकरण वाचून त्याच्या मनातली एक तार तरी हलली असेलच नक्की. आणि (भारतासारख्या देशात रहायचं तर) तरूण वयातच ती हललेली बरी असते.
चिनूक्स अतिशय प्रभावी वाटलं
चिनूक्स अतिशय प्रभावी वाटलं लिखाण. मी विकत घेतेय हे पुस्तक..
पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल अनेक आभार..
याच विषयावरचं 'झिपर्या'
याच विषयावरचं 'झिपर्या' बर्याच वर्षांपुर्वी वाचलं होतं.. वय लहान होतं तरी मनात ठसलं होतं ते पुस्तक.
हे पुस्तक वाचणार नक्की.
वाचणार!!! विकत घेउन वाचणार
वाचणार!!! विकत घेउन वाचणार
धन्यवाद टीम. वाचणार.
धन्यवाद टीम.
वाचणार.
नुकतच वाचून झालं हे पुस्तक.
नुकतच वाचून झालं हे पुस्तक. रसग्रहण स्पर्धेसाठी हेच पुस्तक निवडलं होतं. एका एनजीओ कार्याच्या माध्यमातून लेखिकेनं प्लॅटफॉर्मवर राहणार्या मुलांच आयुष्य छान मांडलं आहे ह्या पुस्तकात.
लले अनुमोदन. पुस्तकात मांडलेली ऐकेक व्यक्तिरेखा ( अगदी जाधव साहेब, बडा साब, कमली , सर आणि अंकल ) काही ना काहीतरी नक्कीच सांगुन जातात.आता रसग्रहणासाठी दुसरं पुस्तक निवडावं लागणार.
'समकालिन प्रकाशन'च्या आणखी एका चांगल्या पुस्तकाबद्दल ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद चिनुक्स.
ह्याच पुस्तकाच्या प्रस्तावनेमधे एक शेवटचा उतारा आहे तो जरा जास्त थेट पोहचवतो या पुस्तकातल्या व्यक्तिरेखापर्यंत.
नक्की वाचणार !!!
नक्की वाचणार !!!
एकटे पालक सिच्युएशन बद्दल
एकटे पालक सिच्युएशन बद्दल रिसर्च करताना असेच वाचनात आले होते कि भारतात कितीतरी मुले दरवर्षी पालकत्वाला मुकतात. आणि त्यांना स्वतःवरच अवलंबून राहावे लागते. अगदी चरचरीत वास्तव मांडले आहे.
अभ्यास म्हणून वाचले पाहिजे.
हलवुन टाकले या लेखाने.
हलवुन टाकले या लेखाने.
mala majha ek anubhav ithe
mala majha ek anubhav ithe share karayla avadel.. karan to asha mulanbaddalach ahe.
mi sadharan 8 chya sumaras cst kade jaat astana don mul kahi vikayla train madhe ali.. sadharan 7-8 varshachi shirt ani half pant ghatleli mula pahun dabyatalya bayakana tyanchi vicharpus karaycha moh aavrena.. ekine hatkalch.. nav kay tujh? shalet jato ki nahi vaigyere vaigyre.. tyatlya ekachya uttarani mi matra purn acharychakit jhale.. to chakk mulaga nasun mulagi hoti.. ekine tila vicharal shalet nahi jat vatat. tar tine sangital "dopahar ko school jate hai, baad mein train me kamate hai" ..amhi vicharal mag ase kapde ka ghaltes tar tine sangital ki "hum logo ko bahot bachake rehna padta hai" mi khupach asvastha jhale tiche he uttar aikun. .. majhya shejarchya baai ne tila bisuit cha puda dila..
kharach aapan char bhintit rahato mhanun surakshit ani ya mulanch tar..
aaplya karyat aapanas khup yash milo hi sadichha..
हं.....वाचलं पाहिजे हे
हं.....वाचलं पाहिजे हे पुस्तक. सुदेष्णा घारेविषयी वाचलं होतं!
उत्तम ओळख. धन्यवाद चिनूक्स व
उत्तम ओळख. धन्यवाद चिनूक्स व टीम. ह्या पुस्तकाने अनेकांचा रस्त्यावर, प्लॅटफॉर्मवर राहून कमाई करणार्या मुलांविषयीचा दृष्टीकोन बदलेल ही आशा.
विचार करण्यास भाग पडणारी ही
विचार करण्यास भाग पडणारी ही सत्य वस्तुस्थिति आहे.
जुलैच्या भारतभेटीत
जुलैच्या भारतभेटीत मॅजेस्टिकमध्ये हे पुस्तक दिसलं.
मुखपृष्ठ आवडून मी चाळायला घेतलं. २ प्रकरण वाचून फारच अंगावर आलं. खरच कशी जगत असतील ही छोटी छोटी पिल्लं? आई वडिलांशिवाय? कोणावर विश्वास टाकतील? कोणी फसवलं तर आयुष्यात परत कधी कोणावर विश्वास टाकतील? ह्यातलीच एकादी मुलगी/मुलगा विकला जात असेल तेंव्हा तो दोष कोणाचा?
खरच विचार करायला लावणारं पुस्तक!
पुस्तकाची ओळख अतिशय छान करुन
पुस्तकाची ओळख अतिशय छान करुन दिलीत. अनेक आभार!
मी हे पूस्तक विकत घेणार.
खरच या मुलांकडे आपण दुर्लक्ष
खरच या मुलांकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यांना टाळतो आणि ती गुन्हेगारच बनणार हा आपला ग्रह हा पुस्तक परिचय वाचेपर्यंत पक्का असतो.
अमिता नायडु - एका वेगळ्याच विश्वाच आरेखन आपण केलय.
जसा महाराष्ट्रात काही जातींवर गुन्हेगारीचा शिक्का बसला होता जो पुढे मा गोपीनाथ मुंढे गृहमंत्री असताना पुसला गेला अशी प्रेरणा कुणाला मिळाल्यास काही साध्य होईल.
चांगलं पुस्तक वाटतंय. विकत
चांगलं पुस्तक वाटतंय. विकत घ्यायचा विचार करेन. धन्यवाद चिनूक्स.
धन्यवाद चिनूक्स - खूप छान ओळख
धन्यवाद चिनूक्स - खूप छान ओळख करुन दिलीत.
अमिता नायडू - एवढे मोठे काम करुनही त्याचा किंचितही अभिमान तुमच्याठिकाणी नाही ही फार म्हणजे फारच विशेष गोष्ट आहे.
या अशा मुलांबद्दल काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही.
चतुरन्ग लोक्सत्ता मधे यबद्दल
चतुरन्ग लोक्सत्ता मधे यबद्दल लेख वाचून आम्हि काहि मुम्बैकरान्नि email thru भेटायचे थरवले ek meeting jhali aahe मुम्बैत असे काम करणारे अस्तिल तर क्रुपया सम्पर्क करा काहितरि चान्गले करु या त्यन्च्यसाथि. purnimagk@gmail.com
चतुरन्ग लोक्सत्ता मधे यबद्दल
चतुरन्ग लोक्सत्ता मधे यबद्दल लेख वाचून आम्हि काहि मुम्बैकरान्नि email thru भेटायचे थरवले ek meeting jhali aahe मुम्बैत असे काम करणारे अस्तिल तर क्रुपया सम्पर्क करा काहितरि चान्गले करु या त्यन्च्यसाथि. purnimagk@gmail.com
चतुरन्ग लोक्सत्ता मधे यबद्दल
चतुरन्ग लोक्सत्ता मधे यबद्दल लेख वाचून आम्हि काहि मुम्बैकरान्नि email thru भेटायचे थरवले ek meeting jhali aahe मुम्बैत असे काम करणारे अस्तिल तर क्रुपया सम्पर्क करा काहितरि चान्गले करु या त्यन्च्यसाथि. purnimagk@gmail.com