कुहू
लेखिका- कविता महाजन
प्रकाशक- कविता महाजन, दिशा क्रिएटिव्हज
मूल्य- रु.१५००/-
प्रथम आवृत्त्ती- जानेवारी-२०११
'कुहू'ही कविता महाजनांची मल्टिमिडिया कादंबरी.
मल्टीमीडिया कादंबरी आहे म्हणजे नेमकं काय? अगदी थोडक्यात सांगायचं तर कुहू हे एक टीव्ही अथवा संगणकावर बघत ऐकण्याचे पुस्तक आहे. ही कादंबरी तुम्ही वाचूही शकता आणि पाहूही शकता. अनेक कलांचा संगम असलेलं आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कलात्मक वापर करुन बनलेलं हे मिश्रमाध्यमातील हे ‘पुस्तक. भारतीय साहित्यातला हा पहिलाच प्रयोग..
कविता महाजनांनी आणि त्यांच्या तंत्रज्ञ टीमने अतिशय मेहेनत घेऊन हा प्रयोग दर्जेदारपणे आणि देखणेपणाने निभावला आहे हे कादंबरी बघताना आणि वाचताना क्षणोक्षणी जाणवते.
पुस्तक हातात घेतल्यावर त्याचं देखणं त्रिमिती मुखपृष्ठ बघताच "वा! सुंदर!!' असे शब्द तोंडून लगेचच निघतात. हिरव्यागार, घनगर्द जंगलाचा आत आत घेऊन जाणारा दाटपणा, वृक्षाच्या फांदीवर झोके घेण्यात रमलेले रंगिबेरंगी पक्षी, फांदीच्या मागून हळूच शेपटी उंचावत डोकावणारा सरडा आणि उडणारं पिवळंधम्मक फुलपाखरु या सार्याचा अपेक्षित परिणाम मुखपृष्ठाच्या त्रिमितीपणामुळे आपल्यापर्यंत पुरेपूर पोचतो. कुहूच्या शीर्षकाची कॅलिग्राफीही फार देखणी आणि अर्थपूर्ण आहे. कुहूतला मूड, स्वभाव, कुहूची सारी कथाच जणू या शीर्षकातून डोळ्यापुढे उमटते. एक गाणारा पक्षी आणि त्याच्याकडे पाठ फिरवून बसलेली एक मुलगी, निळ्या हिरव्या, काळ्या रंगछटांचे मोहक मिश्रण केलेले वॉटरकलर. कुहूच्या मल्टीमीडीया स्वरुपातून अपेक्षित असणार्या दृश्यानुभवाची एक झलक कुहूच्या लोगोमधून मिळते.
'कुहू'च्या कथानकाबाबत बोलायचे तर कविता महाजनांची जी एक विशिष्ट लेखनप्रतिमा त्यांच्या आधीच्या 'ब्र', 'भिन्न' या गाजलेल्या कादंबर्यांमुळे मनात बनलेली होती त्याला 'कुहू' चं कथानक आणि लेखनशैली विलक्षण छेद देऊन जातं हे निश्चित.
जंगलातल्या एका गाणार्या पक्ष्याची ही रुपककथा आणि ती मांडण्याचा बाज लोककथा शैलीच्या जवळ जाणारा साधा, सरळ आणि ओघवता. पण यातून जंगलातलं जे एक नाट्य उलगडत जातं ते केवळ विलक्षण. पुस्तक संपेपर्यंत आपण त्या जंगलाचा एक भाग आहोत असा भास होत रहातो.
एकदा एका घनगर्द जंगलात मानवाच्या वसाहतीतून पर्यावरणाचा अभ्यास करायला काही मुलं आणि मुली येतात. त्यातल्या एका मुलीला कुहूचं गाण खूप आवडतं आणि तिला कुहू आवडायला लागतो. कुहू सुद्धा तिच्या प्रेमात पडतो. आणि मग प्रेमात पडल्यावर जे काही करावसं वाटतं ते सारं तो करायला जातो.. माणसाची भाषा त्याला शिकायची आहे, माणसांचा स्वभाव जाणून घ्यायचाय.. मानुषीच्या प्रेमात पडलेल्या कुहूमुळे पक्ष्यांची आणि माणसांची भिन्न जग डहुळून जातात. कुहूची दुनिया बदलूनच जाते.
कविता महाजनांनी ताकदीने हे चिमुकलं कथानक फुलवत नेलय. भाषेला यात एक विलक्षण लय आहे. पर्यावरण, जंगल आणि माणसांचं नातं, पक्षी-प्राण्यांच्या उपजत स्वभाववैशिष्ट्यांचा, कौशल्यांचा कथानकात केलेला कल्पक वापर, गोष्टीच्या ओघात मिळत जाणारं निसर्गज्ञान ज्यात अगदी पक्ष्याच्या उत्क्रांतीची कथाही आहे, जंगलातलं जीवननाट्य, माणसांनी स्वार्थीपणाने जंगलसंपत्तीचा चालवलेला र्हास हे सगळं कथानकाच्या ओघात नैसर्गिकपणे येतं.
केमकुकडी, चांदी, शिंपी, शिंजर, डोंगरमैना, सुतार, खंड्या, सूर्यपक्षी अशा वेगवेगळ्या पक्ष्यांची घरटी बांधण्याची पद्धत, झाडउंदीर, सरडा, साप, घुबड अशांची जन्मजात वैशिष्ट्य, कुहूचा सृष्टी देवतेला शोधत तिच्यापर्यंत पोचण्याचा प्रवास, माणूस बनण्यासाठी कुहू पक्ष्याची चाललेली धडपड, माणूस बनल्यावर आपला आवाजच गेल्याचं कळल्यावर त्याला आणि त्याच्या सोबत्यांना झालेलं दु:ख, माणसाच्या रुपात असताना त्याच्या वाट्याला आलेली अवहेलना, भ्रमनिरास आणि त्यानंतर पुन्हा कुहूच्या रुपात जाण्यासाठी त्याने केलेले करुण, वेदनादायी प्रयत्न हा सारा भाग अत्यंत वाचनीय आहे.
आपण रुपककथा वाचत आहोत हे भान ठेवलं तरं भाषेचा साधेपणा, कथानकातील भाबडेपणा स्वीकारणं सोपं जातं.
कुहू कादंबरीची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यात सर्वात प्रभावी आहे पुस्तकाचा लेआऊट.
पानांच्या सजावटीवर खूप मेहेनत घेतलेली आहे. कथानकाची ती मागणीच आहे हे निश्चित. कविता महाजनांनी स्वतः चितारलेली ४३ तैलचित्रे, पानांची झळझळीत रंगसंगती, कॅलिग्राफी या सर्वांच्या एकत्रित परिणामाने पुस्तक अंतर्बाह्य देखणं सजलय. मराठी पुस्तकात जेमतेम काही रेखाचित्रे बघायची सवय झालेल्या नजरेला 'कुहू'चं आर्टपेपरवर सजलेलं रुपडं दीपवून टाकतं.
आजकाल लोकप्रिय झालेल्या 'ग्राफिक नॉव्हेल्स'पेक्षा हे पुस्तक कितीतरी जास्त पटीने अभिजात अनुभव देतं.
कादंबरीचं स्वरुप मल्टिमिडिया असल्याने पुस्तकासोबत एक डिव्हिडीही येते. यात मजकूर ऐकताना वाचकाला समोर अनेकविध गोष्टी म्हणजे चित्रं,छायाचित्रं,कॅलिग्राफी,व्हीडीओ आणि अॅनिमेशन तंत्रज्ञानाचा अनुभव घेता येतो. ऐकताना कथानकाला गाणी, वाद्यसंगीत, पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज यांची जोड आहे. कादंबरीचा फार अनोखा दृष्यानुभव ठरतो हा.
दाट, गर्द जंगलांतील हिरव्यागार वृक्षांमधून खोल, खोल आत आपल्याला घेऊन जाणारा कॅमेरा, पार्श्वभूमीवर शास्त्रोक्त रागदारीवरील सुरेल स्वर, मग फांद्यांच्या दुबेळक्यात आपले कृष्णनिळे पंख घेउन विसावलेल्या एका सुंदर पक्षाचे तैलचित्र.. त्याच्या तोंडून बाहेर पडणार्या लकेरी घेताहेत लयबद्ध शब्दरुप.. खालच्या गवतावर नृत्यमग्न सारस युगुलाची जोडी स्वतःतच मग्न आहे..
डिव्हिडीची ही सुरुवातच मन मोहून घेते आणि बघता बघता आपण कुहूच्या घनगर्द दुनियेत कधी रमून जातो कळतही नाही. प्रचंड मोठ्या, खोल दर्या, त्यात कोसळणारे धबधबे आणि त्यांच्यामधल्या तुषारांवर उमटलेली इंद्रधनुष्य अशी दृश्य अक्षरशः नजरेचं पारणं फिटवतात.
कुहूमधले पक्ष्यांचे आवाज हे नुसते आवाज म्हणून येत नाहीत. कथानकातील वेगवेगळ्या प्रसंगी पक्षी आपल्या त्या वेळच्या भावनांना अनुसरुन लकेरी मारतात, गातात किंवा चित्कारतात. कधी वेदनेने किंचाळतातही. पिलांना भरवतानाचा पक्षांचा चिवचिवाट वेगळा असतो आणि काही धोका जाणवला किंवा वेदना झाली तर, किंवा पक्षी प्रणयाराधन करतात तेव्हा असा त्यांचा आवाज वेगवेगळ्या भावनांसहीत वेगवेगळा उमटतो. पिलू होताना कावळीचा एरवी कर्कश असणारा आवाजही नाजूक झालेला असतो. त्यासाठी पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज तर वापरले आहेतच पण किरण पुरंदरेंच्या पक्ष्यांचे हुबेहुब आवाज काढण्याच्या कौशल्याचाही वापर करुन घेतला गेला आहे.
पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज, त्यांच्या हालचालींचे व्हिडिओज, गाणी, अॅनिमेशन्स आणि निवेदन ऐकताना कुहूचं आधी पुस्तकात वाचलेलं कथानक जास्त परिणामकारकतेनं पोचतय याची जाणीव होते आणि डिव्हिडीच आधी का पाहिली नाही असं वाटून जातं. पण पुस्तक हे 'वाचायचं' ही पारंपारिक सवय आपल्याला तसं करु देत नाही हे मात्र खरं. कदाचित मल्टिमिडिया तंत्रज्ञानाच्या नित्य वापराला सरावलेली बच्चेकंपनी आणि वाचनाची सवय मोडलेली तरुण पिढी आधी कुहूची डिव्हिडीच बघतील.
मुलं तर पानापानांमधे रमून जातील याची गॅरंटी.
डिव्हिडीमधे आरती अंकलीकरांनी स्वरबद्ध केलेली शास्त्रोक्त रागदारीवर आधारीत सुरेल गाणी आहेत, सारस पक्ष्यांचे आनंदी नृत्य, तांबट पक्षीण आपल्या पिलांना भरवताना किंवा सुतार पक्षी घरटं करत असतानाचा, गव्यांच्या टकरीचा अशी दुर्मिळ आणि सुंदर, वैशिष्ट्यपूर्ण दृष्य बघणं ही नजरेला अक्षरशः ट्रीट आहे. विशेष म्हणजे या दृष्यांचे व्हिडिओज नैसर्गिकरित्या जंगलातच शूट केलेले कविता महाजनांनी त्यांच्या मित्रपरिवाराकडून जमवले आहेत आणि यात वापरले आहेत. याशिवाय डिव्हिडीमधे अर्थाला लपेटून असलेल्या लयबद्ध कॅलिग्राफीचाही चपखल वापर केला आहे. रिमा लागूंच्या आवाजातले परिणामकारक निवेदन आहे.
या इतक्या सार्या दृश्यकला असणार्या प्रोजेक्टला 'पुस्तक' कां म्हणायचं?
पुस्तक म्हणायचे कारण यात 'शब्द' सर्वाधिक महत्वाचे, पायाभूत आहेत. शब्दांना जास्त तीव्र बनवण्याचं काम इथे इतर कला करतात. शब्द येताना आपले रुप, रंग, नाद, लयाची अंगभुत संवेदना सोबत घेऊनच या कथानकात येतात. विविध दृश्य माध्यमं आपोआप एकमेकांमधे गुंतत रहातात.. त्यांचं एकत्रित एक माध्यम बनतं.
मल्टीमीडीया हे आजच्या युगाचे तंत्रज्ञान आहे. आजच्या तरुण पिढीच्या सवयीचे, रोजच्या वापरातले आहे. इंग्रजी माध्यमात शिकलेली आजची पिढी मराठी वाचत नाही अशी आरडाओरड सतत होत असते. ती खरीही आहे. भाषा बोलता-ऐकता येते, समजू शकते; मात्र लिपी वाचण्याची सवय मोडलेली आहे; अशा वाचकांसाठी हे पुस्तक म्हणजे खजिना आहे. तरुण आणि टेक्नोसॅव्ही वाचकांना कुहूची प्रेमकथा निश्चितच अद्भूत अनुभवाच्या जगात घेऊन जाईल. तीन भागातली ही कादंबरी तीन दिवस तैलरंगातील चित्रांसह बघणे आणि शास्त्रीय संगीतासह ऐकणे हा अनुभव कोणत्याही वयाच्या अभिजात वाचकाला वेगळा आनंद देणारा ठरेल. कुहूची वेगळी बाल-आवृत्तीही आहे. तसेच ती मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधे उपलब्ध आहे.
मनोरंजनातून ज्ञानरंजन हा एक हेतू कुहूच्या निर्मितीमधे सतत मनाशी बाळगला आहे जे जाणवते. उदा.कोतवाल पक्षी हा जातीवंत नकलाकार. इतर पक्षांचे हुबेहूब आवाज तो काढतोच पण तो इतर पक्ष्यांना धोक्यापासून सावध रहाण्याची सूचनाही आपल्या या कलेद्वारे देत असतो हे ज्ञान ज्यावेळी त्यावर आधारीत व्हीडीओ समोर दिसतो तेव्हा फार पटकन पोचतं. विशेषतः मुलांपर्यंत.
लहानांना जंगल म्हणजे काय नक्की, जंगलातील पक्षी,प्राणी, वनसृष्टीशी आपण कसं वागायला हवं याचं आणि मोठ्यांना आपण जंगलापासून, नैसर्गिकतेपासून किती दूर निघून आलो आहोत याचं एक संपूर्ण भान हे पुस्तक देतं.
पुन्हा एकदा निसर्गाच्या जवळ जायचं असेल, प्राणी, पक्ष्यांच्या खर्याखुर्या अद्भूत दुनियेचा शोध घ्यायचा असेल तर कुहूच्या विश्वात रमायला हरकत नाही.
हॅरी पॉटर पहिल्यांदा वाचत असताना (आणि सिनेमा आलेला नसताना) माझ्या नजरेसमोर सतत एक विलक्षण इमेजरी साकार व्हायची. त्या पुस्तकातल्या शब्दमाध्यमाची ती ताकद आहे. उदा. त्यात द डेली प्रॉफेट नावाच्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांमधली माणसं हलत, बोलत, चालत असतात. ते बातम्यांना अनुरुप एक्स्प्रेशन्स देतात. किंवा त्यातले पालक विझली हाऊसच्या होस्टेलवर रहाणार्या आपल्या मुलांना जेव्हा पत्राद्वारे ओरडायचं असतं तेव्हा त्यांना पत्रांमधून हॉवलर्स पाठवतात. विझली हाऊसमधल्या घड्याळाचे काटे त्या त्या वेळी घरातली प्रत्येक व्यक्ती कुठे आहे, काय करतेय हे दाखवत असतात. फोटो किंवा पोस्टर्समधली दुनियाही हलती, बोलती असते. हॅरी पॉटर पुस्तक वाचताना हे सारं नजरेसमोर उभं करुन बघताना असं नेहमी वाटायचं की हॅरीच्या जादुई दुनियेतले पेपर, पुस्तकं जशी त्यांना वाचता वाचता प्रत्यक्ष दृश्यानुभव देतात तसे आपल्यालाही पुस्तक वाचताना मिळायला हवे.
जेव्हा कुहूचा हा मल्टिमिडिया अनुभव घेतला तेव्हा शब्दमाध्यमाची दृष्यपूर्ती झाल्याचा एक आनंद नक्कीच मिळाला.
'कुहू'चा हा प्रोजेक्ट कल्पनेत आणणे आणि प्रत्यक्षात निभावून नेणे किती प्रचंड कठीण, कल्पनेची-सर्जकतेची कसोटी पहाणारा आणि खर्चिकही याचा विचार नंतर मनात येणं साहजिक होतं. कविता महाजनांनी हा प्रोजेक्ट कसा पूर्णत्वाला नेला त्याची कथा तर अजूनच सुरस आणि थरारक आहे. ह्या प्रोजेक्टशी संबंधित असणारे तज्ञ सांगतात की आंतरराष्ट्रीय पातळीवर असा प्रोजेक्ट कमीतकमी दोनशे कोटी फंडिंग, १०० प्रशिक्षित तंत्रज्ञांची टीम आणि तीन ते चार वर्षांच्या अवधीशिवाय पूर्ण होणेच शक्य नाही. पण आपल्या एका मराठी लेखिकेने सर्वस्वी एकटीच्या प्रयत्नांवर भरवसा ठेवून, झपाटल्यासारखे रात्रंदिवस काम करुन, जोडलेल्या स्नेहसोबत्यांच्या मदतीने, त्यांच्यातल्या कलाकौशल्यावर पूर्ण विश्वासाने विसंबून केवळ दोनेक वर्षांमधे... मराठीतली नव्हे सार्या भारतीय भाषांमधली पहिली 'मल्टीमीडीया नॉव्हेल' लिहिण्याचा आपला प्रोजेक्ट पूर्णत्वाला नेला ही अभिमानास्पद गोष्ट निश्चित.
अद्भूतरम्य कल्पना वास्तवात आणणार्या पडद्यावरच्या निखळ मनोरंजनाचा बादशहा वॉल्ट डिस्नेचे एक वाक्य कुहू वाचल्यानंतर कुणालाही आठवेल-"All Our Dreams Can Come True, If We Have The Courage To Pursue Them"
शर्मिला, 'कुहू'विषयी
शर्मिला,
मस्त लिहिलं आहेस.
'कुहू'विषयी लिहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार
माझं अतिशय आवडतं पुस्तक आहे हे..
इंटरेस्टिंग वाटतोय हा प्रकार
इंटरेस्टिंग वाटतोय हा प्रकार !
वा !! जागूने केलेले पदार्थ
वा !! जागूने केलेले पदार्थ बघून जसं आत्ताच्या आत्ता खाल्ले पाहिजेत वाटतं तसं तुझं रसग्रहण वाचून हे पुस्तक आत्ताच्या आता वाचले/बघितले/अनुभवले पाहिजे असं वाटतय. ह्या पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद शर्मिला
छान लिहीलंय रसग्रहण ..
छान लिहीलंय रसग्रहण .. वाचताना सारखं 'Disney' हेच नाव आठवत होतं ..
मी 'ब्र' वाचलं होतं .. त्याच लेखिकेने असा प्रयोग केलाय ह्यावर विश्वास बसत नाही .. नक्कीच बघायला, वाचायला हवा हा प्रयोग ..
हा माझा व्यक्तिगत setback असू शकतो पण कुठल्याही गोष्टीची (अतिरीक्त) जाहिरातबाजी मला आवडत नाही .. शेवटून दुसरा परिच्छेद पुस्तकाच्या बाबतीत थोडा off-putting वाटला ..
मस्त लिहिलय ! इंटरेस्टींग
मस्त लिहिलय !
इंटरेस्टींग प्रकार वाटतोय. नक्की वाचणार / पाहणार.
या इतक्या सार्या दृश्यकला
या इतक्या सार्या दृश्यकला असणार्या प्रोजेक्टला 'पुस्तक' कां म्हणायचं?
पुस्तक म्हणायचे कारण यात 'शब्द' सर्वाधिक महत्वाचे, पायाभूत आहेत. शब्दांना जास्त तीव्र बनवण्याचं काम इथे इतर कला करतात. >>
वा!
शर्मिला,
तू पुर्णवेळ रसग्रहण करावेस आणि करत रहावेस असेच वाटते वाचल्यावर. (जिभल्या चाटणारी बाव्हली)
मी 'ब्र' वाचलं होतं .. त्याच
मी 'ब्र' वाचलं होतं .. त्याच लेखिकेने असा प्रयोग केलाय ह्यावर विश्वास बसत नाही .. नक्कीच बघायला, वाचायला हवा हा प्रयोग .. >> +१.
भिन्न वाचून बरेच दिवस अस्वस्थता होती. त्याच लेखिकेचा हा प्रयोग नक्की वाचणार, बघणार.
ओह wowww!!
ओह wowww!!

मलाही वरचं वाचल्यावर हे
मलाही वरचं वाचल्यावर हे पुस्तक बघायची उत्सुकता लागून राहिलीये.
इथे कुहूची झलक बघता येईल.
इथे कुहूची झलक बघता येईल.
वा शर्मिला मस्त पुस्तक
वा शर्मिला मस्त पुस्तक निवडलेस.
या पुस्तका बद्दल आधीही वाचले होते तेव्हा फार उत्सुकता निर्माण झाली होती. तुझ्या रसग्रहणाने ती अधिकच वाढली. सुंदर लिहिले आहेस. आता कधी एकदा पुस्तक घेऊन वाचेन असे झालेय.
फक्त एकच वाटतय कि किंमत जास्त असल्याने किती लोक हे पुस्तक विकत घेऊन वाचु शकतील. पण अर्थातच अशा प्रयोगासाठी आणि अशा पुस्तकासाठी ती योग्य किंमत आहे.
वा. मस्त ओळख व रसग्रहण.
वा. मस्त ओळख व रसग्रहण. कवितांची धाकटी बहिण इथे हैद्राबादेत सासुरवाशीण आहे. तिने ह्या प्रयोगाबद्दल सांगितले आहे. एक वेगळा क्रिएटिव प्रयोग. शेवटचे वाक्य अतिशय आवड्ते आहे.
दिवसाची सुरुवात इतक्या
दिवसाची सुरुवात इतक्या प्रसन्न वाचनाने होईल असे मला वाटले नव्हते. फार आनंद झाला आहे मला 'कुहू' विषयी वाचताना. शर्मिला फडके यानी लिहिलेही आहे अगदी आनंदविभोरतेने.
मी ज्यावेळी 'कुहू' [पुस्तक + डीव्हीडी] खरेदी केले त्यावेळी का कोण जाणे त्या सेल्सगर्लने 'बालआवृत्ती - किं. रु.१०००/-' दिली - कदाचित माझ्यासमवेत दोन छोट्या भाच्या होत्या - अर्थात त्यावेळी मला कुहूची 'अॅडल्ट' आवृत्तीही स्वतंत्रपणे रिलीज झाली आहे याची माहिती नव्हती. पण असो, बालआवृत्तीही मोठ्यांना भावेल असे किमान मला वाटते आणि आता शर्मिला फडके यानी केलेल्या रसग्रहणाने तर त्या विश्वासात भरच पडली आहे. कथानकाचे स्वरूप आणि सादरीकरणाची अनोखी पद्धत इतकी भावते की 'ब्र' आणि 'ग्राफिटी वॉल' मुळे साहित्यक्षेत्रात सर्वतोमुखी नाव झालेल्या कविता महाजन 'कुहू' मुळे आता नेट जनरेशनसोबतही राहतील.
शर्मिला फडके लिहितात : "कविता महाजनांनी आणि त्यांच्या तंत्रज्ञ टीमने अतिशय मेहेनत घेऊन हा प्रयोग दर्जेदारपणे आणि देखणेपणाने निभावला आहे हे कादंबरी बघताना आणि वाचताना क्षणोक्षणी जाणवते."
~ हे तर आहेच पण माझ्या माहितीप्रमाणे 'कुहू' चा हा प्रयोग कविताताईंच्या दृष्टीने फार खर्चिकही होता. जवळपास ३० [तीस] लाखापर्यंत तो गेला आहे आणि आनंदाची तसेच अभिमानाची बाब म्हणजे हा सारा खर्च त्यानी स्वबळावर केला आहे...काही हितचिंतकांनीही थोडाफार आर्थिक बोजा उचलला असेल यात शंका नाही. पण हे सारे त्यानी केले ते मराठी साहित्यविश्वातील अनोख्या प्रयोगासाठी. ज्याचे आपण स्वागत करणे मराठी मल्टीमिडियाच्या वृद्धीसाठी सहाय्यभूत ठरेल.
वरील (शर्मिला फडके यानी केलेले) रसग्रहण्/परिक्षण वाचून किमान आपल्या मुला/मुलीसाठी हे पुस्तक्+डिव्हीडी खरेदी करण्याची भावना इथल्या सदस्य वाचकाच्या मनी निर्माण झाली तर कविताताईंचा हा प्रयोग सफल झाला असे म्हणावे लागेल.
अशोक पाटील
अरे वा!! शर्मिला, या
अरे वा!!
शर्मिला, या प्रयोगाची माहिती करून दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद. मी नक्कीच विकत घेणार.
वा!! फारच सुरेख रसग्रहण.
वा!! फारच सुरेख रसग्रहण. वाचल्यानंतर कादंबरी वाचायला/बघायलाच हवी असे वाटू लागते.
मराठीत असा नाविन्यपूर्ण प्रयोग होतो आहे याचे अप्रूप वाटते.
कुठे विकत मिळेल ही कादंबरी
कुठे विकत मिळेल ही कादंबरी आणि सीडी पुण्यात सांगू शकता का लवकरात लवकर?
खरंच वेगळा प्रयोग आहे हा. छान
खरंच वेगळा प्रयोग आहे हा. छान ओळख करुन दिलीय.
वॉव! अतिशय इन्टरेस्टिंग आहे
वॉव! अतिशय इन्टरेस्टिंग आहे हे! मस्त ओळख करून दिलीस शर्मिला! धन्यवाद!
बी, बाजीराव रस्त्यावरच्या
बी,
बाजीराव रस्त्यावरच्या 'अक्षरधारा' या दुकानात हे पुस्तक आहे.
कसला अफाट प्रोजेक्ट आहे हा!
कसला अफाट प्रोजेक्ट आहे हा! माहिती नव्हते या पुस्तकाबद्दल.
शर्मिला, मस्त रसग्रहण! खूप आवडले.
मला ह्या पुस्तकाबद्दल माहिती
मला ह्या पुस्तकाबद्दल माहिती नव्हते. आता जाऊन बघतो. रसग्रहण आवडले.
मस्त लिहिलं आहेस.
मस्त लिहिलं आहेस.
लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत 'शब्दाला शब्द' या सदरात या कादंबरीबद्दल कविता महाजनांनी लिहिलं होतं. ते वाचून मी याच्या वेबसाईटवर बालआवृत्तीची झलक पाहिली होती. (माझ्या मते तेव्हा बालआवृत्तीची झलकच उपलब्ध होती.) प्रामाणिकपणे सांगते - तेव्हा मला ते सगळं फार बाळबोध वाटलं होतं. कदाचित रूपककथांमध्ये न रमण्याची माझी प्रवृत्ती त्याला कारणीभूत असावी.
नव्या पिढीला हे नक्की आकर्षित करेल यात वाद नाही. ही पिढी आधी डीव्हीडीच पाहील हे ही अगदी पटलं.
सुरेख रसग्रहण ! पुस्तकाने
सुरेख रसग्रहण !
पुस्तकाने नक्कीच उत्सुकता चाळवली आहे.
आभार आणि अभिनंदन, शर्मिलाताई.
"वेगवेगळे आणि 'जगावेगळे आणि
"वेगवेगळे आणि 'जगावेगळे आणि निर्धास्त' प्रयोग" याचेच दुसरे नाव म्हणजे कविता महाजन असावे, असे वाटते.
एकदा मेलवर लिंक आली होती. थोडंफार वाचल्याच आणि पाहिल्याचं आठवते.
सुंदर रसग्रहण. आवडेश.