ही अशी माणसे
चेहरा नव्हता तयांना अन् नव्हते नावही
ना कोणता धर्म होता,पंथ, नव्हते गावही
माणसांची जात त्याच माणसांनी होती राखली
दुर्बलांची पापे सारी त्यानीच होती झाकली
जी माझ्याइतकीच जवळची वाटली होती मला
ही अशी माणसे वाटेवर भेटली होती मला
गर्दीत होते मिसळले पण त्याहुनी ते वेगळे
का होते वेगळे ते त्यांचेच त्यांना ना कळे
विलसणारे हास्य होते, गीतात होती वेदना
अंतरांचे प्रांत जिंकू हीच होती कामना
जन त्यांच्या प्राक्तनाची कोठली होती मला
ही अशी माणसे वाटेवर भेटली होती मला
ते न होते वीर कोणी, वा न होते षंढही
सांप्रताच्या या युगाशी त्यांनी न केले बंडही
फक्त होते जागले ते जग जेव्हा झोपले
कड्यावरील दोर सारे त्यानीच होते कापले
धार त्यांच्या जगण्याची एकदा चाटली होती मला
ही अशी माणसे वाटेवर भेटली होती मला
या भूतलाचे नियम सारे त्यानीही होते पाळले
पण आतल्या हाकेस त्यांनी कधी न होते जाळले
टाळले न त्यांनी कधीही मोह्मायाजाळ हे
त्यातूनीच निर्मिले त्यांनी आजचे भूतकाळ हे
तेव्हा 'मी' च संपण्याची भीती वाटली होती मला
ही अशी माणसे वाटेवर भेटली होती मला
गजानन मुळे
mulegajanan57@gmail.com
दुर्बलांची पापे सारी त्यानीच
दुर्बलांची पापे सारी त्यानीच होती झाकली
छान कविता परंतु वरील ओळींचा अर्थ कळला नाही.पापे फक्त दुर्बलच करतात का?त्यानि ती झाकली का?
सुंदर कविता सुंदर माणसे
सुंदर कविता
सुंदर माणसे भेटलीत तुम्हाला.
(तशी ती सर्वांनाच भेटतात पण ओळखण्याची दृष्ठी कुठे असते?)