झीं झीं झीं झिच्यकं झिच्यक्

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

घरी जुन्या संगणकाच्या पडद्याचे सुरक्षाकवच पडून होते. तेव्हा म्हटले ही गंमत करून बघूया.

एक पाऊण फुटाची पी.व्ही.सी. नळी आणि रिकामी हिंगाची डबी घेतली.

त्या काचेची बाजूची चौकट काढून टाकली.

तिला काच-खाटकाकडे नेले आणि तिचे साधारण अडीच सेंटीमीटर रूंद आणि वीस सेंटीमीटर लांबीच्या तीन पट्ट्या कापून काढल्या.

त्याबरोबरच त्याच्याकडून या पीव्हीसी नळीच्या तोंडावर बसेल अशी एका साध्या पारदर्शक काचेची वर्तुळाकार चकतीही कापून घेतली.

त्या तीन पट्ट्यांचा समभूज त्रिकोण तयार होईल अशा तर्‍हेने जुडी करून तिच्या दोन्ही टोकांना चिकटपट्टी लावून टाकली.

डबीच्या गळ्याखाली कापून तिचे तोंड वेगळे केले.

पीव्हीसी नळीच्या एका टोकाला साधारण पाव सेंटीमीटर अंतरावर एक खाच पाडली.

या खाचेत पुढच्या चित्रात तर्जनीने दाखवलेली डबीच्या तोंडाची आतल्या बाजूची कडा अडकेल असे डबीचे तोंड सरकवून बसवले.

आता खालील चित्रात लाल ठिपक्यांनी दाखवलेय तेथे एक अरुंदशी गोल पन्हाळी तयार होईल.

ती पन्हाळी फेव्हीकॉलने काळजीपूर्वक नळीच्या कडांपर्यंत भरून काढली आणि काचेची वर्तुळाकार चकती त्यात बसवली.

ते एक लेखणीदाणीत वाळायला ठेऊन दिले.

कपड्यांवर सजावटीसाठी वापरतात ते रंगीत खडे/मणी, तुटलेल्या काचेच्या रंगीबेरंगी बांगड्या, त्यांचे तुकडे करण्यासाठी एक पक्कड, कात्री, धागा, दुमडल्यावर१५x१५ सेंमी होईल असा प्लास्टीकचा पारदर्शक कागद, जाडी आणि दोन्ही बाजूंना चिकटपणा असणारी चिकटपट्टी इ. साहित्य घेतले. ( बायकोला मस्का मारला. Wink )

बांगड्यांचे बारीक बारीक तुकडे केले. ते रंगीत खड्यांत मिसळले.

फेव्हीकॉल वाळल्यानंतर पीव्हीसी नळीला बाहेरून रंगीबेरंगी आवरण लावून टाकले.

आता नळकांड्याच्या टोकाशी लावलेल्या डबीच्या भागाच्या आत बसेल असे एक कंकणाकृती कडे तयार करण्यासाठी उरलेल्या डबीपासून एक पट्टी कापून काढली आणि खाली दाखवल्याप्रमाणे तिला टाचणी टोचून घेतली. बाहेरून त्याला थोड्या अंतरांवर जाड चिकटपट्टीचे तीन तुकडे चिकटवले.

हे कंकणाकृती कडे आधी बसवलेल्या डबीच्या भागात बसवले. रंगीबेरंगी ऐवज डबीच्या तोंडात टाकला आणि तोंड प्लास्टीकच्या कागदाने बंद करून धाग्याने बांधून टाकले.

काचेची जुडी नळकांड्यात थोडीशी सैल बसत होती. म्हणून तिच्याभोवती दोन्ही टोकांना जाड, दोन्हीबाजूंना चिकटपणा असलेल्या चिकटपट्टीचा एकेक वेढा दिला. ( त्या चिकटपट्टीवरचे आवरण काढले नाही - पिवळे दिसतेय ते. म्हणजे दोन चिकट बाजूंपैकी एकीचाच उपयोग केला आहे.) काचेच्या पट्ट्यांची त्रिकोणाकृती जुडी दुसर्‍या बाजूने नळकांड्यात हळूच सोडली आणि झाले शोभायंत्र तयार!

नळीच्या उघड्या बाजूने आत बघायचे आणि नळी हळूहळू गोल फिरवायची. मग तुम्हाला दिसतील क्षणाक्षणाला बदलणार्‍या एकापेक्षा एक सरस सुंदर अशा आकृत्या. एकापेक्षा दुसरी निराळी! कंटाळा आल्यावर चांगला विरंगुळा.

विषय: 
प्रकार: 

सही... ! Happy
शाळेतल्या स्मृति जाग्या झाल्या. कित्ती दिवसापासुनची माझी इच्छा होती कॅलिडोस्कोप बनवण्याची!
आता घेतेच करायला!!

सह्हीच बनलय कॅलिडोस्कोप Happy
लहानपणी तर आवडायचच पण आताही आवडतं... लेकीपेक्षा मिच जास्त खेळते त्याबरोबर.
टातुटि चा एक उत्तम नमुना Happy

गजानन, मस्तच. तुम्ही step by step सांगितलंत ते ही प्रचिसकट हे खुप छान केलंत. आता मुलांना दिवाळीच्या सुट्टीत एक project cum toy आपले आपण बनवता येईल. थँक्स !

फारच भारी आहे हे! पायरी पायरीची छायाचित्रं टाकल्याने, मस्त मज्जा आली.. आपणही त्या कार्यात सहभागी आहोत असे वाटले Happy शेवटची छायाचित्रे फारच सुरेख, खड्यांचा वापर सुरेख झालाय!

जबरदस्तच......
काहीतरी वेगळ पहायला मिळाले.....
(फक्त त्या संगणकाच्या सुरक्षाकवचाला काही पर्याय असेल तर सुचवा )

मस्त! Happy

गजाभाऊ माका लय आवाडला Happy
ल्हानपणच्या आठवणी जाग्या झाल्यासत.
आम्ही कठिण पुठ्ठ्याच्या उदबत्तीच्या पुड्यांपासून हे कॅलिडोस्कोप बनवायचो.. Happy फार सुरेख झालेय बरं..

माझ्या आवडत्या लेखात. Happy

मंडळी, प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. Happy

(फक्त त्या संगणकाच्या सुरक्षाकवचाला काही पर्याय असेल तर सुचवा ) << manas, साधी काचही किंवा किंवा आरश्याची चालेल. साधी काच असेल तर पट्ट्या कापून काढल्यानंतर त्यांना एका बाजूने काळा रंग लावायचा. आणि ही रंगवलेली बाजू बाहेर ठेवायची.

अश्या आपोआपच रचना तयार होतात? <<< भावना, हो. या आभासी प्रतिमा आहेत गं. त्रिकोणी भोकासमोर जे जे खडे, काचा येतील त्यांचे प्रतिबिंब काचेच्या त्रिकोणाच्या आतल्या पृष्टभागावरून एकातून दुसर्‍यात दुसर्‍यातून तिसर्‍यात असे प्रतिबिंबित होत जाते. आरशासमोर आरसा ठेवल्यावर कसे याचे त्यात आणि त्याचे यात दिसते, तसे.

वा काय मस्त आठवण करून दिलीत कॅलिडोस्कोप ची. मी शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही सगळे मित्र मैत्रिणी मिळून हे बनवायचो. कुठे कुठे फिरून काचा शोधायचो, आई आणि आजी च्या मागे लागून उगाच त्यांच्या बांगड्या सुधा तोडायला सांगयचे मी तेव्हा खूप ओरडा सुधा ऐकून घ्यावा लागायचा मला. खूप आनंद वाटत आहे तुमचा प्रोजेक्ट बघून. सगळ्या बालपणीच्या आठवणी फेर धरायला लागल्या एक एक करून. खरच असं वाटत की मुंबई ला जाव आणि पुन्हा त्या सगळ्या मित्र मैत्रिणीना एकत्र बोलावून परत एकदा हे उन्हाळ्याच्या सुटीतील उद्योग सुरु करावेत. काय भारी वाटेल नाही....

वाह.. मस्तच !!

(फक्त त्या संगणकाच्या सुरक्षाकवचाला काही पर्याय असेल तर सुचवा ) >> इथे पहा http://www.maayboli.com/node/19844 अगदि बेसिक आहे ... फारसे फोटो नाहीयेत ... तरिहि Happy

Pages