अमृतसरी छोले

Submitted by अल्पना on 20 June, 2011 - 06:14
amritsari chhole
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

एक वाटी काबुली चणे, २ मध्यम आकाराचे कांदे, एक मोठा टॉमेटो, एक इंच आल्याचा तुकडा, २-३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला, १ चमचा जीरेपुड, २ चमचे छोले मसाला, एक चमचा आमचुर पावडर, हळद, मीठ

क्रमवार पाककृती: 

काबुली चणे रात्रभर भिजवत ठेवावेत. सकाळी साधारण: १५-२० मिनीट कुकरमध्ये मीठ घालून कमी पाण्यात शिजवून घ्यावेत.

एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो, हिरव्या मिरच्या आणि आलं काढावं. त्यात हे शिजलेले चणे अर्धवट मॅश करून घालावेत. आता बाकीचे सगळे मसाले कपभर पाण्यात मिक्स करून छोल्यांमध्ये घालावे. गरज असेल तर थोडं मीठ घालावं. गॅसवर ठेवून कमी आचेवर १५-२० मिनीट किंवा त्यापेक्षा जास्तही शिजू द्यावे.

मधून अधून हलवत रहावं. पाणी आटल्यास वरून अजून थोडं पाणी घालता येईल. याची कन्सिसटंसी पावभाजीच्या भाजीसारखी असते. जितका जास्तवेळ गॅसवर हे शिजेल तितकी छान चव येते. वरून कोथिंबीर घालायची. हवं असल्यास कच्चा कांदा उभा चिरून वर घालता येईल.

वाढणी/प्रमाण: 
४ जण
अधिक टिपा: 

हे असे छोले इथे कुलच्यांबरोबर खायला मिळतात. बॉन या कंपनीचे रेडीमेड कुलचे बेकरी सेक्शनमध्ये मिळतात. (मला औरंगाबादला पण मिळाले होते. ) तव्यावर बटर लावून हे कुलचे गरम करायचे आणि त्याबरोबर हे छोले खायचे. सोबत मिठी किंवा नमकीन लस्सी आणि किसलेल्या मुळ्याची कोशिंबीर.

हे छोले करताना तेल अजिबात घालायचे नाही. याची चव हे जसंजसे शिजत जातात तसतशी वाढत जाते. बाहेर हे चोले ज्या भांड्यात बनवतात ते पुर्णवेळ गॅसवर असते.

मसाल्याचं प्रमाण चव घेवून कमी जास्त करता येतं. Happy

मसाला मिक्स करून शिजवताना गॅसऐवजी मायक्रोवेव्हमध्ये शिजवले तर १०-१५ मिनीटं लागतात.

माहितीचा स्रोत: 
जाऊ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेवा आधीची कमेंट पण माझीच आहे Wink .ही रेसिपी जनहितार्थ वर काढत आहे. स्टे होम्/लॉक डाउनमध्ये अतिशय कामाची आहे. वर मी स्लो कुकर पर्याय दिला आहे त्या पद्धतीने एखाद्या महामिटिंगच्या दिवशी केली की लंच टाइमला फक्त (विकतच्या) पोळ्या शेकल्या आणि बाजुला काकडी इ. काही घेतलं की घरचं चविष्ट जेवण हजर. Happy

हो स्नेहा. चांगले होतात. हायवर ठेव सुरूवातीला सकाळीच मग दोन तीन तासांनी चेक कर. एकदा केलेस की वेळेचा हिशेब जमेल.

भिजवलेले छोले आणि इतर सगळं साहित्य इंस्टंट पॉट मधे घालून २०-२२ मिनिटे मॅन्युअल मोड मधे शिजवून पण मस्त होतात हे छोले. तूप + तेल एकत्र करून त्यात आल्याचे ज्युलियन्स आणि हिरव्या मिरच्यांची फोडणी घालायची वरून. आमच्याकडे चिल्लर पार्टी चव बघायला म्हणून वाटीभर तरी खातात Happy

Mi aaj kele amritsari chhole..mast zhale...shijtana..masalyacha mast sugandh pasrala hota gharbhar....

१ चमचा गरम मसाला, १ चमचा जीरेपुड, २ चमचे छोले मसाला, एक चमचा आमचुर पावडर,

यात काय फरक असतो? छोले मसाल्यात सर्वच असते ना?

यात काय फरक असतो? छोले मसाल्यात सर्वच असते ना?>>> थोडा स्वाद जास्त येतो... अगदी डोळे मिटून या पद्धतीने अ छो करा... हमखास पाकसिद्धीची हमी! सोबत भात केला होता आज आणि पिटा ब्रेड!

अगदी डोळे मिटून या पद्धतीने अ छो करा... हमखास पाकसिद्धीची हमी! >>> अगदी अगदी. मी केले तर या पद्धतीनेच करते छोले. मसालेदार ,छातीत जळजळवणारे छोले आता आवडत नाहीत.
हे subtle चवीचे मस्त लागतात.

किती मस्त फोटो. मी पुणेकर. मी पण परवाच्या शनिवारी केलेले. मस्त झाले. अमेरिकन स्टाइलने उरलेले दोन हेल्पिन्ग फ्रीझर मध्ये ठेवले आहे. वर्किंग डेला उपयोगी पडेल.

SAVE_20200616_142145.jpeg

वरून तूप घातले शेवटी, जीरा राईसबरोबर मस्त लागले.
अगदी टपरी स्टाईल चव येते,
आमचूर नव्हते म्हणून चाट मसाला घातला,
थोडे ओले खोबरेही मिक्सरमधून काढून घातले होते

आज केलेत या पद्धतीनं. फारच मस्त लागतात. छोले शिजवून ठेवले होते आधीच त्यामुळे सकाळीच कांदा-टोमॅटो चिरणे एवढंच करून स्वयंपाक आवरला. आता याच पद्धतीनं करत जाइन.

तो रंग लाइट , फलेश , ब्राइटनेस ई ई चा आहे

खरा रंग असा नसतो
निदान आमचा तरी ,
लिम्बु बघा किती पांढरा दिसतो

गेले 4-5 दिवस ही रेसिपी दिसली की त्या रात्री छोले भिजत घालायचे ठरवत होते, पण रात्री विसरून जात होते. आज ही रेसिपी दिसल्यावर पहिल्यांदा धावत जाऊन छोले भिजत घातले. मला फोटो अपलोड करायला जमला तर उद्या नक्की दाखवेन.

या सरळ सोप्या रेसिपी बद्दल धन्यवाद. आज केले होते.फक्त चहाची पुरचुंडी आणि तमालपत्र शिजवताना इतकाच बदल(उगीचच) केला होता.
ऑइललेस(फक्त मसाल्यातले इन बिल्ट तेल वापरून) झालेली आणि तरी ऑईललेस न लागणारी ही सर्वात उत्तम रेसिपी.
सुंदर झाले होते.(फोटो कढईत असताना(छोले, मी नाही) काढणार होते पण इतरांसारखा डेकोरेट करून काढू म्हटले. नंतर ताटावर सगळे आल्यावर हात तोंडाची लढाई चालू झाली आणि फोटो निघालेच नाहीत.

Pages