ज्येष्ठ नागरिक अत्याचार : जागृती, कायदा, मदत व उपाय

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 16 June, 2011 - 09:58

सत्तर वर्षाच्या डॉ. सिंग यांना दोन वर्षांपूर्वी पत्नीशोक झाला. पण आपला मुलगा, सून व नातू यांच्या सहवासात आपले दु:ख कमी होईल असे त्यांना वाटले. पण खरे दु:ख तर पुढेच होते. आपल्याच मालकीच्या घरात डॉ. सिंगांना हळूहळू जगणे असह्य झाले. मधुमेहाचे रोगी असलेल्या डॉक्टरांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, घरातील वावरणे, घरातील व्यवहारांत सहभाग याविषयी त्यांच्याच घरच्यांनी उदासीनता दाखवायला सुरुवात केली. नियमित वेळेला खाणे, पथ्य वगैरे तर राहूच दे, पण त्यांनी काही सांगितलेलेही घरच्यांना पटेना. गोष्टी एवढ्या थराला गेल्या की डॉ. सिंगांनी मुलगा व सुनेला आपले घर खाली करायला सांगितले तरी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून ते तिथेच राहत आहेत व डॉ. सिंगांचे हालही अजून चालूच आहेत.

१२९८ ह्या मुंबईतील हेल्पलाईन क्रमांकावर बांद्र्यातील एका निनावी व्यक्तीचा फोन आला. तिने सांगितले की एक वृद्ध महिला गेले ४ दिवस रस्त्यावर बेवारशी वावरत आहे व पावसाची गेले अनेक दिवस संततधार चालू आहे. त्या महिलेचे आरोग्य धोक्यात होते. हेल्पलाईनने १०९० ह्या पोलिस क्रमांकावर कॉल ट्रान्स्फर केला. कॉलनंतर १५ मिनिटांत पोलिसांची व्हॅन तिथे आली व त्या महिलेस हॉस्पिटलामध्ये दाखल करून तिचा जीव वाचविता आला.

ह्या दोन्ही केसेस इथे देण्याचे कारण म्हणजे नुकताच १५ जून रोजी 'जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार विषयक जागृती दिन' पार पडला.

भारतात दिवसेंदिवस वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती व आयुर्वर्धमान तंत्रांमुळे म्हातार्‍या माणसांची संख्या वाढत आहे. सध्या भारतात ९० दशलक्ष वृद्ध व्यक्ती असून पुढील दशकात त्यांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यातील ३३% वृध्द हे दारिद्र्य रेषेखाली आहेत, तर ७३% अशिक्षित आहेत किंवा शारीरिक श्रमांतून मिळणार्‍या उत्पन्नावर अवलंबून आहेत. ह्या पार्श्वभूमीवर वृद्ध व्यक्तींचे हक्क, त्यांच्या समस्या व त्यांच्यावरील अत्याचाराविषयी जागृती निर्माण होणे व त्यांना निरोगी, सुदृढ व आनंददायी आयुष्य जगण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करणे हे येत्या काळातील मोठे आव्हान ठरणार आहे.

कुटुंबसंस्थेच्या पारंपरिक साच्यात आधुनिक काळात झालेले बदल लक्षात घेता कुटुंबातील वृद्धाचे स्थान व त्यांची देखभाल हे आता अडचणीचे ठरू लागले आहे ह्याचा पुरावा आपल्याला सध्याची परिस्थिती देते. घरात पूर्वी त्यांचे हवे-नको बघण्यासाठी जे मनुष्यबळ होते ते आता सर्व प्रौढ गृहसदस्य उपजीविकेच्या कामात गुंतल्यामुळे शक्य होत नाही. शहरांमध्ये राहण्याच्या अपुर्‍या जागा, महागाई, मनुष्यबळाची कमतरता व घरी कोणी नसणे यामुळे घरात वृद्ध व्यक्ती असणे हे सध्याच्या पिढीत लोकांना अडचणीचे वाटते हे वास्तव आहे. त्यातच आपापसांत न पटणे, इस्टेट - पैसा - जमीन जुमला इत्यादी संदर्भात भांडणे, गैरसमज वगैरेंची भर पडली की त्या घरातील वृद्ध व्यक्तीला तिथे राहणे म्हणजे एक ओझे वाटू लागते. बरं, शहरांतील वृद्धाश्रमाची किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या निवासांची व्यवस्था सर्वांनाच परवडते किंवा रुचते असे नाही. शिवाय वृद्धाश्रमांमध्येही सध्या प्रतीक्षा यादी असते.

अशा परिस्थितीत वृद्ध व्यक्ती अनेकदा अत्याचाराच्या बळी पडू शकतात.

जिथे विश्वासाचे नाते / अपेक्षा असते त्याला तडा जाणारी व वारंवार घडणारी कृती, ज्यामुळे वृद्ध व्यक्तीस शारीरिक/ मानसिक / भावनिक / आर्थिक इजा अथवा दु:ख होते त्याला वृद्ध व्यक्तीवर होणारा अत्याचार असे म्हणता येईल.

हे अत्याचार गरीब/ मध्यम वर्गीय/ श्रीमंत / सुशिक्षित / अशिक्षित/ कोणत्याही धर्म - जातींत घडू शकतात व घडत असतात. अनेकदा तीर्थक्षेत्री, मोठ्या शहरांमध्ये अगर वृद्धाश्रमांमध्ये वृद्धांना सरळ सोडून दिले जाते. किंवा त्यांच्याशी असलेला सर्व संपर्क तोडण्यात येतो. त्यांना घराबाहेर हाकलले जाते, किंवा अडगळीच्या जागेत डांबले जाते. शहरांत - खेड्यांत सर्रास आढळणारे हे प्रकार आहेत. वृद्धांवर कोणकोणत्या प्रकारे अत्याचार केले जातात हे सर्वप्रथम जाणून घेऊ.

हे अत्याचार म्हणजे :

१. शारीरिक छळ
२. मानसिक / भावनिक छळ (ह्यात शिवीगाळ होण्याचाही अंतर्भाव)
३. आर्थिक स्वरूपाचे / वस्तूंशी निगडित शोषण
४. दुर्लक्ष
५. लैंगिक छळ
६. वृद्ध व्यक्तीचा त्याग करणे
७. स्वतःकडे दुर्लक्ष करणे

वृद्ध व्यक्तींवर होणार्‍या अत्याचारांविषयी भारतातील काही बोलकी आकडेवारी :

# जवळपास ५० % वृद्ध हे आर्थिक दृष्ट्या परावलंबी आहेत.

# ३५% वृद्धांनी अत्याचाराचा कोणता ना कोणता प्रकार सोसला आहे. (अनादर, दुर्लक्ष, आर्थिक शोषण, शिवीगाळ)

# जवळपास ३० % वृद्ध भावनिक आधार व मूलभूत सोयींच्या अभावापायी अत्याचाराचे बळी ठरतात. (अनुक्रमे ३०% व २९%)

# ४०% वृद्धानं आपण दुर्लक्षित आहोत असे वाटते. आपले कुटुंबिय कामात किंवा त्यांच्या व्यापांत व्यस्त आहेत व त्यांना आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे त्यांना वाटते.

# ५०% पेक्षा जास्त वृद्ध त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांविरुद्ध काही अ‍ॅक्शन घेण्यास राजी नाहीत, कारण त्यांना आपल्यावर अत्याचार होत आहेत ह्याचीच जाणीव नाही, आणि त्यांनी काही अ‍ॅक्शन घेतली तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही ही भीती वाटते. तसेच समाज काय म्हणेल ह्याची भीती व भविष्यात आणखी अत्याचार सहन करावे लागतील ह्याची भीती. ह्या सर्वांमुळेही अत्याचार ग्रस्त व्यक्ती त्याविरोधात काही करण्यासाठी नाखूष असतात.

# शहरांमधील वृद्धांचे सर्वसाधारण वय हे ६८ आहे. तर कोलकाता येथील ५४ % वृद्धांचे सर्वसाधारण वय ७०+ वर्षे आहे.

# तीन पंचमांश वृद्धांचे मासिक उत्पन्न १०,००० रुपयांपेक्षा कमी आहे.

# ५७% पेक्षा जास्त वृद्ध आपल्या मुलावर आर्थिक दृष्ट्या अवलंबून आहेत. तर एक चतुर्थांश वृद्ध आपल्या जोडीदारावर आर्थिक दृष्ट्या अवलंबून आहेत.

# अत्याचार करणारे लोक घरातीलच असतात. (मुलगा, सून, मुलगी, जावई इत्यादी). काही ठिकाणी नोकरांकडून अत्याचार होतात. बर्‍याचदा अत्याचार होण्याचे कारण प्रॉपर्टी विषयक वाद, मतभेद इत्यादी असते. (३५% वृद्ध)

# अत्याचाराविरुद्ध तक्रार केलेल्यांपैकी ३३% वृद्धांनी तक्रारीनंतर काहीच झाले नाही असे सांगितले, तर २७ % वृद्धांनी पोलिसांनी घरी भेट दिल्याचे सांगितले.

# वृद्धांविषयीचे कायदे, योजना, कल्याण कार्यक्रम तसेच मदत करणार्‍या संघटना, त्यांची भूमिका - कार्य ह्यांविषयी वृद्धांमध्ये जागरूकतेचे प्रमाण तुलनेने खूप कमी आढळले. (जेमतेम ३३%)

# वृद्धांनी मदत संघटनांकडून ह्या प्रकारची मदत मिळावी असे सुचविले : १. घरी येऊन भेट देणे. २. सुरक्षा पुरविणे. ३. पोलिसांनी मुलांकडून मेन्टेनन्स मिळण्यासाठी ( The Maintenance and Welfare of Parents and Senior Citizen’s Act) मदत करावी.

वृद्ध व्यक्तींना सहन करावा लागणारा अत्याचार रोखण्यासाठी वृद्धांनीच सुचविलेले उपाय :

१. वृद्धांना नियमित व पुरेसे उत्पन्न असणे आवश्यक.
२. कुटुंबियांशी तडजोड / मतभेद मिटविणे.
३. आर्थिक परावलंबित्व टाळण्यासाठी स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी बाळगणे.
४. मानसिक आधार, मदत ह्यासाठी आवश्यकतेनुसार वृद्धांचे व कुटुंबियांचे समुपदेशन

मदत संस्था / संघटना कशा प्रकारे वृद्धांना साहाय्य करू शकतात?

# वृद्धाश्रमांची माहिती देणे. तसेच परवडणार्‍या वृद्धाश्रमात प्रवेशासाठी मदत.

# वृद्धांना कायदेशीर बाबींमध्ये मदत.

# अत्याचार रोखण्यासाठी घरी भेट देणे, मदत करणे.

# वैद्यकीय देखभाल करणारी व्यक्ती / केअर टेकर मिळविण्यासाठी मदत.

# वृद्धांचे हक्क, त्यांच्याविषयीच्या सरकारी योजना, कार्यक्रम, मदत सुविधा, मदत संस्था इत्यादींविषयी जागृतीसाठी मदत.

वृद्धांना मदत करणार्‍या संस्थांची ही काही संस्थळे :

हेल्प एज इंडिया : http://www.helpageindia.org/

http://www.helpageindia.org/contact-us.php

हार्मनी इंडिया : http://www.harmonyindia.org/

सिल्व्हर इनिंग्ज : http://www.silverinnings.com/

मेन्टेनन्स वेल्फेअर ऑफ पेरन्ट्स अ‍ॅन्ड सिनियर सिटिझन्स अ‍ॅक्ट, इंडिया (हिंदी) :
(माता - पिता और वरिष्ठ नागरिकोंका भरणपोषण तथा कल्याण अधिनियम, २००७.)

http://www.voice4india.org/wp-content/uploads/2009/03/maintenance-and-we...

* ह्या कायद्यानुसार ''बालक'' म्हणजे मुलगा, मुलगी, नातू, नात हे आहेत.

* भरणपोषण ह्याचा अर्थ अन्न, वस्त्र, निवारा तसेच वैद्यकीय मदत व उपचार असा आहे.

* माता-पिता म्हणजे परिस्थितीनुसार जैविक, दत्तक, सावत्र माता-पिता. ते वरिष्ठ (ज्येष्ठ) नागरिक नसले तरी.

* ह्या कायद्यानुसार वरिष्ठ नागरिक म्हणजे भारताचे वय वर्षे साठ पूर्ण केलेले नागरिक.

* जे माता-पिता आपल्या वृध्दापकाळात आपल्या उत्पन्नातून अथवा संपत्तीतून स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ आहेत त्यांना आपल्या सज्ञ अशा मुलगा/ मुलगी/ नातू/ नात यांकडून योग्य भरणपोषणाचा हक्क हा कायदा देतो, जेणे करून त्यांना सर्वसामान्य जीवन जगता येईल. नि:संतान ज्येष्ठ नागरिकांना विशिष्ट स्थितीत आपल्या नातेवाईकांकडूनही भरणपोषणाचा हक्क हा कायदा देतो.

मदतीसाठीचे काही दूरध्वनी क्रमांक :

पुणे

पुणे पोलिस ज्येष्ठ नागरिक मदत दूरध्वनी क्रमांक : 1091

डिग्निटी हेल्पलाईन : 020 - 30439100

मुंबई

मुंबई पोलिस ज्येष्ठ नागरिकांसाठी : 1090, 103

डिग्निटी हेल्पलाईन : 022 - 61381100

हेल्प एज इंडिया : 26370740, 26370754

ज्येष्ठ नागरिकांना मदतीसाठी हेल्पलाईन : 23898078, 23898079

जसे वृध्दांनी येणार्‍या काळात उभ्या ठाकणार्‍या आव्हानांना तोंड देण्यासाठी समर्थ होणे गरजेचे आहे तसेच नव्या पिढीनेही वृध्द व्यक्तींची कौटुंबिक व सामाजिक जीवनात असलेली उपयुक्तता, त्यांचा समृध्द जीवन-अनुभव हे ध्यानात घेऊन त्यांचे एकटेपण दूर करणे, त्यांना आवश्यक आधार देणे ह्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.
तंत्रज्ञानाच्या झपाट्याने पसरलेल्या जाळ्यामुळे कुटुंबातील माणसांनी एकमेकांपासून दूर न जाता त्याचा आपले संबंध सशक्त करण्यासाठी वापर करणेही तितकेच आवश्यक आहे. तरुणाई ह्या कामी विशेष प्रयत्न करु शकते व करत आहे. मोठ्या शहरांमधून अनेक युवा गट आणि ज्येष्ठ नागरिक मदत गट संयुक्त विद्यमाने वृध्दांना दिलासा देण्याचे काम करत आहेत. परंतु मुळातच घरातील विसंवाद टाळले, एकमेकांना सामावून घेत थोडी तडजोड केली व म्हातारपणाच्या दृष्टीने योग्य आर्थिक तरतूद केली तर बाहेरून मदत घेण्याची वेळ येणार नाही. वृध्दत्वात येणारे नैराश्य, एकटेपण, शारीरिक किंवा मानसिक दौर्बल्य यांसाठी वेळीच वैद्यकीय उपचार केले, समुपदेशन घेतले तर त्यामुळेही पुढील समस्या टळू शकतील.

~ लेखन व संकलन~

अरुंधती

------------------------------------------------------------------------------------------------

लेखासाठी वापरलेले संदर्भ :

* ELDER ABUSE IN INDIA Country Report for World Health Organization, Shubha Soneja.

* REPORT ON ELDER ABUSE IN INDIA, HelpAge India.

* http://silverinnings.blogspot.com/

----------------------------------------------------------------------------------

** ह्या विषयी संबंधित आपल्याकडील माहितीही ह्या धाग्यावर अवश्य लिहावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय जटील प्रश्न अभ्यासपूर्वक मांडल्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद.
मला वाटतं या प्रश्नाला अनेक कांगोरे असले तरीही वृद्धाना शारिरीक व मानसिक दुबळेपण अधिक तीव्रतेने जाणवतं तें
<< ५७% पेक्षा जास्त वृद्ध आपल्या मुलावर आर्थिक दृष्ट्या अवलंबून आहेत >> यामुळें.

धन्यवाद दिनेशदा, स्वाती, भाऊ. भरत, कायदा हा वृध्दांच्या कल्याणाविषयी व भरणपोषणाविषयीचा आहे. त्यातील प्रोव्हिजननुसार जर मुलगा/ मुलगी/ नातू/ नात वा अन्य नातेवाईक कुटुंबातील आर्थिक दृष्ट्या परावलंबी ज्येष्ठ माता पित्यांचे योग्य प्रकारे भरणपोषण करत नसतील तर तो त्यांच्यावर केला जाणारा अत्याचारच धरण्यात येतो. वरील लेखात ते व अन्य कोणकोणत्या प्रकारचे अत्याचार होतात ते नमूद केलेले आहे. ह्या कायद्यान्वये कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना एका प्रकारे दिलासा मिळाला आहे.

जगाचा वेग वाढतो आहे, पैशाची गरज आणि हाव वाढते आहे.
माणसांचा 'मी' पणा मोठा होतो आहे. कुटूंब लहान होताहेत.
वॄध्दांची गरज असण्यापेक्षा अडगळ होतेय..

(हे मी सर्वसाधारणपणे म्हणून लिहीतोय.. कृपया 'मी असे करत नाही, माझे शेजारी असे करत नाहीत' अशी उदाहरणं देऊ नयेत...) Happy

धन्यवाद स्वाती२, रुनी, परदेसाई व उदय.

परदेसाई, मला वाटतं माणसांची सहनशक्ती क्षीण होत चालली आहे. किमान इतर माणसांबद्दल तरी. हव्यास, लोभ, 'मी'पणा तर आहेच.... पण छोट्या छोट्या घटना-प्रसंगांनी क्षुब्ध होऊन गैरसमज, भांडणे, मनस्ताप हेही आहेतच!

चांगली माहिती अकु.
नुकतीच आमच्या इथे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. ७४ वर्षे वयाच्या वृद्धेवर एका १९ वर्षे वयाच्या मुलाने बलात्कार केला. ती वृद्धा अतिरक्तस्त्रावामुळे शॉकमध्ये गेली. भूल देऊन रक्तस्त्राव थांबवला आणि तिचा जीव वाचला.....पण तिच्यावर कायमचा मानसिक आघात झाला आहे, त्यातनं बाहेर येणं अवघडच.
असल्या अमानुष घटना प्रचंड अस्वस्थ करतात. Sad

रुणू Sad

तरी ह्या लेखात ह्या विषयातील आणखी बरेच कंगोरे दिले नाहीएत, उदा : अल्झायमर्स आजारग्रस्त किंवा अन्य कोणत्याही तीव्र स्वरूपाच्या शारीरिक / मानसिक व्याधी असलेल्या वृध्दांची परवड, स्त्री वृध्दांची पुरुष वृध्दांपेक्षा तुलनेने बिकट स्थिती, मानसिक रुग्णालयातून बरे होऊन आलेल्या वृध्दांचे होऊ न शकलेले पुनर्वसन.... असे बरेच कंगोरे / पैलू आहेत. परंतु ह्यातील प्रत्येकावर स्वतंत्र लेखच होऊ शकेल अशी परिस्थिती आज आपल्या देशात दुर्दैवाने आहे.

धन्यवाद भरत, चांगल्या आहेत त्यांच्या योजना व सुविधा. वर लेखातही त्यांचे काही मदत दूरध्वनी क्रमांक दिले आहेतच. ज्यांना मदत हवी असेल त्यांनी खरेच त्या साईटला भेट द्या.

जेरियॅट्रिक केअर (म्हातारपणीची देखभाल) या विषयीचे स्वतंत्र अभ्यासक्रम आहेत. आता शहरांमधील अनेक डॉक्टर्स त्यात रस दाखवू लागले आहेत. वृध्दांना घरीच भेट देऊन त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करणे, त्यांना व घरच्यांना वृध्दांच्या तब्येतीविषयी मार्गदर्शन करणे, आवश्यकतेनुसार हॉस्पिटलायझेशन इत्यादी प्रकार त्यात आहेत. (पूर्वी फॅमिली डॉक्टर्स ही भूमिका निभावायचे) ह्या विषयीची टाईम्स ऑफ इंडिया मधील बातमी.

अश्विनी, थँक्स.

छोट्या छोट्या घटना-प्रसंगांनी क्षुब्ध होऊन गैरसमज, भांडणे, मनस्ताप हेही आहेतच! <<< खरं हे पूर्वीही होतं.. मनुष्यस्वभावाचा हा भाग आहे.. पण पूर्वी एकत्र कुटुंब होतं (तेच बरोबर असं मी म्हणत नाहीय). एकाच घरात बरीच माणसं असायची. आजीआजोबांना स्वतःची ५/७ मुलं असायची. वयस्कर माणसाची जबाबदारी सगळे मिळून किंवा काही मिळून घ्यायचे. आता कुटूंबच बदललं. जोडप्याला एक मुल. पुढे जावई/सुन आली की त्यांचा संसार वेगळा. त्यांना त्यांची मुलं, नोकर्‍या. त्यांना वेळ नाही. मग वॄध्दांना कोण बघतो ? त्यात नवरा बायको दोघे असले तर एकामेकांना संभाळतील. त्यातलं एक गेलं की दुसर्‍याचे हाल.
(गेल्या काही वर्षात ऐकलेल्या/वाचलेल्या घटना.. प्रातिनिधीक नाहीत पण बोलक्या आहेत).

. एकुलत्या एक मुलाचं लग्न झालं, सून घरात आली. घरी सासूसासरे असणं आवडलं नाही. मग ती माहेरी रहायला लागली. मग मुलगाही तिच्याबरोबर. शेवटी आईवडिलांनी घर मुलाच्या ताब्यात देऊन मुंबई सोडली. वडिल हार्टअटॅकने गेले. आई भाड्याने रहातेय कुठेतरी.
. arrage marriage च्या बोलण्यात मुलीने मुलाला विचारलं, 'घरी गार्बेजकॅन (सासूसासरे) असणार की स्वतंत्र संसार'.
. अमेरिकेत रहाणार्‍या एका जोडप्याने, 'तुम्हाला अमेरिकेला नेतो, इथलं सगळं (घरदार) विका.' असं सांगून सगळं विकून मुंबई विमानतळावर आले. आईवडिलांना एका ठिकाणी बसवलं, (चेक ईन करून येतो). तीन तासानंतर कळलं विमान, आणि मुलगा सून पैसे घेऊन अमेरिकेला. स्वतःच्या आईबापाला फसवलं.
. छोट्या शहरात रहाणारे डॉ. जोडपे. आईवडिलांन सांगितलं 'दुबईला नोकरी लागलीय. आम्ही चाललो, तुम्हाला हे घर जपणं जमणार नाही.' तेव्हा आईवडिलांना भाड्याच्या घरात हलवलं. दोन/तीन महिन्यानी त्यांना कळलं की मुलगा/सून त्याच घरात आहेत, फक्त आईवडिल नको होते म्हणुन...
. फ्लॅट्मधे राहणारा मोठा ऑफिसर. बापाला घरा बाहेर काढलं. बाप जवळच असलेल्या प्रभादेवी सिध्दीविनायकाच्या देवळासमोर भीक मागतोय.

यातल्या बहुतेक घटना 'लोभ' आणि 'अडचण नको' म्हणुन झालेल्या आहेत.

यापुढे आपल्या तिशीचाळीशीतच, आपल्या म्हातारपणाची सोय आपणच बघायची आहे हे लक्षात ठेऊनच जगायला हवं.

खरंय परदेसाई तुमचं म्हणणं. परिस्थिती आणि माणसे कशी बदलतील हे सांगता येत नाही. लोभ, मोह अगदी सख्ख्यांनाही आंधळे करतो. त्यामुळे आपल्या म्हातारपणीची सोय आपणच बघायला हवी. आर्थिक परावलंबित्व टाळणे, आपली प्रॉपर्टी/ राहते घर आपल्याच नावे ठेवणे, त्यावर कर्ज न काढणे/ काढू देणे अथवा मुलांच्या वा इतर कोणाच्यासाठी आपली प्रॉपर्टी तारण न ठेवणे, पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी टाळणे, मृत्यूपत्र करून ठेवणे, आपल्या पश्चात आपल्या जोडीदाराला तसदी पडणार नाही ह्याची काळजी घेणे, त्यासाठी जोडीदारालाही आवश्यक बाबींचे ज्ञान करून देणे / जोडीदाराने तसे ज्ञान करून घेणे, सर्व ठिकाणी नॉमिनेशन करून ठेवणे, आपल्या व्यवहारांची पध्दतशीर नोंद ठेवणे अशा अनेक व्यावहारिक बाबतींमध्ये आता वृध्दांनी सतर्कच राहण्याची गरज आहे.

परदेसाई, खरेच समस्या खूप गंभिर होत चाललेय. NRI मुलांच्या बाबतीत पालकांच्या सुखसोयींसाठी पाठवलेले पैसे भावंडानी परभारे हडपण्याचे प्रकारही होतात. माझ्या ओळखीत आईला मुलाने घेऊन दिलेला फ्लॅट दुसर्‍या मुलाने आईला सह्या करायला लावून हडपल्याचाही प्रकार झाला.

बरेचदा वृद्धांना इतरांनी चांगला सल्ला दिला तरी तो पटत नाही. मुले इमोशनल ब्लॅकमेल करतात. नातवंडांच्या मायेचे पाश असतात. जेव्हा आपण फसलो हे कळते तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.

अरुंधती, माझ्या जावेने मध्यंतरी जेरीयाट्रिक केअरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. माझी भाचीही एका वृद्धाश्रमासाठी काम करते. माझ्या जावेच्या मते उपलब्ध असलेले मदतीचे स्त्रोत खूप अपूरे आहेत.

NRI मुलांच्या बाबतीत पालकांच्या सुखसोयींसाठी पाठवलेले पैसे भावंडानी परभारे हडपण्याचे प्रकारही होतात. माझ्या ओळखीत आईला मुलाने घेऊन दिलेला फ्लॅट दुसर्‍या मुलाने आईला सह्या करायला लावून हडपल्याचाही प्रकार झाला.

एन आर आय च कशाला भारतातही असे अनुभव कमी नसतात. वृद्ध व्यक्तीना समोर करुन इतर भावंडाना त्रास देणे असेही प्रकार घडतात..

हे एक कात्रण.. ( युयुत्सु यांच्या मिपावरील लेखातून साभार..)

MaTa.jpg

वामनराव पै यानी सांगितलेली एक गोष्ट मला आमच्या सरानी सांगितली होती..

एक म्हातारा सकाळच्या वेळी उन्हात आरामात बसलेला असतो.. अचानक समोरच्या घरातून दुसर्‍या एका म्हातार्‍याचा आक्रोश ऐकू येतो. तो त्याला विचारतो काय झाले रडायला.. तो म्हातारा रडत रडत सांगतो. मुलगा आणि सून यानी सगळी एस्टेट काढून घेतली आता त्यालाच घारातून जायला साम्गत आहेत..

हा म्हातारा हे ऐकून मनोमन सुखावतो.. आपला मुलगा, सून खूप चांगले आहेत.. !

आणखी काही दिवस जातात.. आणखी एका घारातून एका म्हातारीचा आक्रोश ऐकू येतो.. कारण असतं.. मुलगी आणि सून यानी पी एफ हडप केल्याचं..

हा म्हातारा आणखी सुखावतो.. आपला मुलगा , सून खूप चांगले आहेत.. !

आणखी दोन महिन्यानी आणखी एक आक्रोश ऐकू येतो...

म्हातारा आणखीनच सुखावतो.. आपला मुलगा, सून खूप चांगले आहेत.. ! त्याच दिवशी त्याचा मुलगा आणि सून व्यवसायासाठी म्हनून मोठी रक्कम मागतात.... म्हातारा आपली एफ डी, पी एफ, सगळं मोडून त्याना आनंदाने रक्कम देतो... आणि... त्याच्यावरही आक्रोश करायची पाळे येते..

तो रडत्रडत देवाकडे जातो आणि देवाला म्हणतो, देवा मला वाचव.. देव म्हणतो, गाढवा, आधी ३ घरात जे काही झाले ते मीच तर तुला दाखवले होते ना? ते ऐकून, बघून शहाणा का नाही झालास?

एकूण काय, वृध्दांनी आपली संपत्ती आपल्या हयातीत मुलानातवंडांना द्यायची की नाही ह्याबद्दल सावधानता बाळगायला हवी.
हेल्पेज इंडिया च्या अहवालांमध्ये हेही वाचले की अनेक मुलगे आपल्या आईवडिलांची विभागणी करून घेतात. (आठवा, 'तू तिथं मी', बागबान चित्रपट!) आईवडिलांनी विभक्तपणे आळीपाळीने मुलांकडे राहायचे. त्यामुळे अशा परिस्थितीतील वृध्द व्यक्तींनी त्यातून कशा प्रकारे मानसिक त्रास होतो हेही सांगितले.

स्वाती, तुझ्या जावेने सांगितलेले वास्तव अगदी कटू असले तरी सत्य आहे. भारतात वृध्द व्यक्तींना सन्मानाने जगता येईल असे मदत स्रोत फारच अपुर्‍या प्रमाणात आहेत. जे स्रोत आहेत ते सर्वांना परवडतील/ मिळू शकतील असेही नाही. त्यात ज्या वृध्द व्यक्तीचे मासिक उत्पन्न १०,००० रुपयांपेक्षा कमी आहे व त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर जर जोडीदारही अवलंबून असेल तर मासिक खर्चाची रक्कम उत्पन्नापेक्षा जास्त होते. (घरखर्च, किराणा, वीज, विविध कर, वाहतूक खर्च इ.इ.) औषधपाणी, हॉस्पिटल, डॉक्टरची बिले इत्यादी खर्च तर ह्या उत्पन्नात परवडतच नाहीत. मग मुलांनी आधार दिला तरच कसेबसे निभावू शकते.
भाऊंनी वर म्हटल्याप्रमाणे अपुरे मासिक उत्पन्न हे वृध्दांच्या शारीरिक व मानसिक दौर्बल्यात भरच घालते.

जामोप्या, कात्रणातील आकडेवारी .....:(

आजच आईशी बोलताना तिने त्यांच्या सोसायटीतल्या घटनेचा उल्लेख केला. त्यांच्या सोसायटीतल्या एका वृद्ध व्यक्तीला त्यांच्या मुलाने दमदाटी केली. अगदी अंगावर हात देखील उगारला. सोसायटीतील लोकांनी बघ्याची भुमिका घ्यायचे नाकारले. सोसायटीच्या सेक्रेटरींनी या वृद्धाच्या घरी जावून मुलाला आधी समजावले. तो ऐकत नाही म्हटल्यावर मस्त खरडपट्टी काढली आणि वर दम दिला की परत वडिलांना काही त्रास दिलास तर तुला पोलिस बोलावून इथून बेड्या अडकवून मिरवत नेइन. सध्या तरी तो मुलगा नीट वागतोय. सोसायटी मधले सर्वजण या वृद्ध व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून सजग आहेत. ज्याने त्याने आपापल्या सोसायटी पुरती जरी अशी सजग नागरीकाची भूमिका निभावली तर बर्‍याच अन्याय पिडितांना दिलासा मिळू शकतो.

<< मुले इमोशनल ब्लॅकमेल करतात. नातवंडांच्या मायेचे पाश असतात. >> यावर "ताट द्यावं पण पाट देवूं नये " [ नाटक "नटसम्राट"], हा मंत्र जपावा !
आपल्या मुला/सुनांचे एकंदरीत विचार व वागणं हेरून वृद्धापकाळ सहजवारी न घेतां त्याबद्दल आपण विचारपूर्वक योजना आंखण्याचे दिवस आलेत हे खरं ! मात्र, वरीलसारखी बरीच उदाहरणं दिसत असूनही
आपल्याबाबतीत असंच घडेल हा घोर लावून घेऊन उर्वरीत आयुष्य काळोखी करण्यात हंशील नाही, हेही
लक्षात घेणं महत्वाचं. शिवाय, बदलत्या परिस्थितीत मुलांच्याही कांही खरोखरीच्या अडचणी असतील तर त्याही समजावून घेणं आवश्यक आहे. आपल्या शारिरीक, आर्थिक व मानसिक मर्यादा मुलाना वेळीच स्पष्टपणे सांगणं हाही एक उत्तम उपाय आहेच.

एक शंका आहे.
या कायद्यानुसार सर्व ज्येष्ठ नागरीक आपल्या मुलांकडुन मेँटेनन्स मागु शकतात?
की फक्त ते ज्येष्ठ ज्यांची स्वतःची प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी ज्यांना मिळणार आहे त्यांच्याकडुन मेँटेनन्स मागु शकतात?

पार्कीन्सन्सचे निदान व नुकत्याच बेडरिडन झालेल्या माझ्या मैत्रीणीच्या आईला तिच्या सद्ध्याच्या वृद्धाश्रमाने घरी पाठवले आहे. मैत्रिण कमवत नाही. तिच्या २० वर्षाचा मुलाचे शिक्षण चालू आहे अजून. त्याचा खर्च चालू आहे. घरात एकटा नवरा कमवणारा. त्याचे उत्पन्न नाही म्हटले तरी ह्या सर्व खर्चाला पुरून उरणारे नाही. मैत्रीणीला ३ बहिणी आहेत पण त्या पण काहीही कमवत नाहीत. बेताचीच परिस्थिती आहे तिघींचीही. मैत्रीणीला महीना ६ हजार खर्च येतो आहे सध्याच्या वृद्धाश्रमाचा. त्याहून जास्त पैसे देणे तिला परवडणारे नाहीये. तर आता ह्या परिस्थितीत म्हातार्‍या बेडरिडन आईची सोय करण्यासाठी पुण्यापासून जवळचे स्वस्तातले शुश्रुशा केंद्र कोणाला माहीत आहे का?

Sad

Pages