एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता. दुपारच्या उन्हात तो एका निबांच्या झाडाखाली सावलीत येऊ बसला, तिथुनच आपल्या मेंढ्यावर लक्ष देऊ लागला. काही वेळानंतर एक शहरी माणुस अवजड सामानाच्या दोन मोठाल्या बँगा घेऊन येतांना त्याला दिसला. दोन्ही हातातल्या ओझ्याने तो थकला होता म्हणुन धनगराला पाहुन तो त्या झाडाखाली थोडा आराम करायला आला.
त्या माणसाच्या कपड्याकडे पाहत धनगर बोलला, "तुम्ही शहरातुन आलेले दिसता, चांगले शिकलेले दिसता, इकडे या उजाड वाळवंटात काय काम काढलं?"
"मी संशोधक आहे!"
"काय म्हणाला?"
"मी हवामान खात्याचा संशोधक आहे."
"इथं काय शोधण्यासारखं आहे, मला तर काहीच दिसत नाही?"
"संशोधक त्यालाच म्हणातात, जो नेहमी कुठेना-कुठे, काहीना-काही शोधत असतो."
"ते झालं, पण आता इकडे कशाचा शोध लावणार!"
धनगर आपुलकीनं विचारायला लागला.
"या जागी एवढ्यात पाऊस का कमी पडायला लागला आहे याचं!'
संशोधक आपल्या तोर्यात बोलला.
"ते कसं करणार?"
"या बॅगेतल्या महागड्या मशिनच्या साह्याने."
त्या संशोधकाच्या बोलण्यावर धनगर हसत म्हणाला, "यात संशोधन करण्यासारखं काय आहे? आधी या ठिकाणी दाट जंगल होतं, त्यामुळे हवेत गारवा राहायचा, वरुन ढगं गेली की पाऊस बदाबदा खाली कोसळायचा!"
यावर संशोधकाने प्रश्न केला, "तसा पाऊस आता का कोसळत नाही, हे तुला माहीती आहे?"
"हो नक्कीच, ते अगदी सरळ आहे, माणसांनी हे जंगल तोडलं म्हणुन पहील्यासारखा पाऊस पडत नाही!"
"मला तसं वाटत नाही, कारण मी या विषयाचा खुप खोलवर अभ्यास केला आहे, माझ्याकडे त्याची डिग्री आहे."
"एवढ्या साध्या गोष्टीसाठी, एवढ्या ज्ञानाची गरज काय?"
"मला वाटतं तु आजवर समुद्र पाहीला नसेल?"
"...बरोबर आहे तुमचं"
"मग मला सांग, समुद्रावर किती पाऊस पडतो, तिथं कुठे जंगलं असतात?"
"तुम्ही समुद्रात पाऊस पडतांना पाहीला?" धनगराने प्रश्न केला.
"अ... नाही, पण मी पुस्तकात ते वाचलेलं आहे, अशा बर्याच पुस्तकांचा अभ्यास केला आहे. त्या अभ्यासावरुनच मी सांगतो की, जंगलाचा आणि पावसाचा कडीचाही संबध नाही, समुद्रात दरवर्षी भरपुर पाऊस पडतो, तिथं कुठं झाडं असतात!'
"म्हणजे तुमचं ज्ञान पुस्तकी आहे, मी माझ्या अनुभवावरुन बोलत आहे."
"तुला नक्की काय म्हणायचं आहे?"
"अर्रर्र... हुर्रर्र....!"
धनगरानं आपल्या तोंडातुन आवाज काढला, हातातली काठी हलवत त्या झाडाखालुन चालता झाला, कारण त्याच्या मेंढ्या लांब चरत गेल्या होत्या.
*****
मस्तच...
मस्तच...
मार्मिक
मार्मिक
मस्त
मस्त
विनोद म्हणुन छान, कथा म्हणुन
विनोद म्हणुन छान, कथा म्हणुन जरा एकांगी.
वरच्या सगळ्यांच्या
वरच्या सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल आभारी!