ऐतिहासिक भटकंती ...

Submitted by सेनापती... on 26 May, 2011 - 12:47

छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२२ व्या पुण्यतिथीनिमित्त यंदाच्या फाल्गुन अमावास्येला वढू - तुळापुर येथे जाणे झाले. शिवाय तिथूनच जवळच असलेल्या इंदोरी येथील खंडेराव दाभाडे यांनी बांधलेल्या किल्ल्याची आणि वडगाव येथील दुसऱ्या मराठा - इंग्रज युद्धाचे स्मारक असलेल्या ठिकाणी घेतलेली काही क्षणचित्रे...

तुळापुरचा इतिहास - तुळापुरचे मूळनाव नागरगाव असे होते. १६३३ मध्ये शहाजी राजांनी या ठिकाणी हत्तीचा वापर करून तुळा केल्यानंतर ह्या जागेचे नाव तुळापुर करण्यात आले. ह्या प्रसंगी रुद्रनाथ महाराजांच्या आदेशावरून मुरार जगदेव आणि शहाजी महाराज यांनी येथील संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. नदीकाठी सुंदर घाट बांधला ज्याचे उद्घाटन राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या हस्ते झाले. ह्यावेळी शिवाजी राजे अवघ्या ३ वर्षांचे होते.

पुढे १६८९ मध्ये ह्याच ठिकाणी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची निघृण हत्या करून, त्यांच्या देहाची विटंबना करून, शरीराचे तुकडे नदीपलीकडे फेकून दिले. नदीच्या पलीकडे वढू नावाचे गाव आहे तेथील काही लोकांनी त्यांच्या शरीराचे उरले-सुरलेले अवयव एकत्र शिवून त्यांना भडाग्नी दिला. ज्या लोकांनी हे काम केले त्यांचे आडनाव आता 'शिवले' असे आहे. आजही गावात मोठ्या प्रामाणावर शिवले आडनावाच्या लोकांची वस्ती आहे. तुळापुर बरोबर वढू येथे देखील संभाजी राजांचे एक स्मारक उभारलेले आहे.

१. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा - तुळापुर.

२. कवी कलश यांची समाधी - तुळापुर.

३. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी - तुळापुर.

४. समाधी समोरील संगमेश्वर मंदिर.

५. भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांचा त्रिवेणी संगम.

६. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी - वढू

७. वढू येथे काढलेली रांगोळी -

आम्ही मग तिथून निघालो आणि देहू मार्गे इंदोरी येथे गेलो.

८. देहू येथील तुकाराम महाराज गाथा मंदीर -

९. इंदोरी किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार.. दरवाज्यासमोरच आता अतिक्रमण झाले आहे. हा किला अजूनही दाभाडे यांच्या मालकीचा आहे.

१०. किल्ल्यामागून वाहणारी इंद्रायणी नदी -

११. किल्ल्याच्या दरवाजा २ माजली असून आतील बांधकाम विटांचे आहे.

इंदोरी वरून २० एक मिनिटात जुन्या मुंबई-पुणे हायवेवर बाहेर पडता येते. तिथून वडगाव येथे रस्त्याच्या बाजूलाच हे छोटेसे पण सुंदर स्मारक बांधलेले आहे.

१२. वडगाव येथील मराठा - इंग्रज युद्धाचे स्मारक. ब्रिटीश अधिकारी नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करताना.

१३. युद्धाचा संक्षिप्त इतिहास - मराठीत.

१४. युद्धाचा संक्षिप्त इतिहास - इंग्रजीत.

१५. महादजी शिंदे यांचा विरासानातील पुतळा -

१६. पुतळा आणि विजयस्तंभ

१७. महादजी शिंदे यांचा विरासानातील पुतळा - सूर्यास्त होता होता.

भटकंती आणि इतिहास प्रकाश चित्रांमधून गुंफायचा हा एक छोटासा प्रयत्न कसा वाटला ते नक्की कळवा. Happy

समाप्त...

गुलमोहर: 

.

अवांतर : याच युध्दावर आधारीत अजय झणकरांचं पुस्तक वाचलय मी, ध्यासपर्व....वाचनीय आहे.
एक Hollywood movie देखिल बनत आहे या युध्दावर..
http://en.wikipedia.org/wiki/Singularity_(film)

रोहन अरे हायवेवर वडगावात शिरायच्या आधी उजव्या बाजुला एक पोलीस चौकी आहे बघ. तिथून थोडं आत गेलं की शिंदे टेकडी लागते. इंग्रज आणि महादजी शिंदे यांच्यातली लढाई या टेकडीच्या पायथ्याशीच झाली.

विश्वास पाटलांचे संभाजी तर केवळ अफलातून आहे...संभाजी राजांचे कितीतरी पैलू जाणवले या पुस्तकातून..आणि शेवट वाचून तर इतका त्रास झाला ना. असे कसे वागू शकतात आपलेच लोक...
Sad

कुठली कविता? शाहीर योगेश यांनी लिहिलेली???>>>प्रची.३.छत्रपती संभाजी महाराजांची समाधी - तुळापुर.बाहेर आल्यावर डाव्या हाताला, नदीच्या बाजूला एका फलकावर कविता लिहिलेली आहे.

विशाल... हायवेवर वडगावात आपण जिथे शिरतो तिथेच डाव्या हाताला आहे हे स्मारक... चौकी कुठे आहे ते नेमके लक्ष्यात नाही... थांब Google map वर शोधतो... Happy

भटक्या,

सही आले आहेत सगळे प्रचि! रांगोळी छान आहे! पण सगळ्यात आवडला तो म्हणजे शेवटचा! महादजींच्या तलवारीची धार वाटतोय तो सुर्य!
पण वर्णनात एक छोटीसी चुक! देहुचे ते मंदिर तुकोबांचे नाहीये, ते तुकोबांच्या गाथेचे मंदिर आहे!

आणि सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट म्हणजे युध्द इतिहासाच्या लादीवर लिहिलेली नावे! ह्या लोकांना लाज नाही का वाटत हे असले प्रकार करताना? सगळ्या ठिकाणी हेच!

रच्याकने,
वढु हे सासुरवाडीचे ठिकाण आणि ’तिकडचे’ आडनावही ’शिवले’! त्यामुळे राजांची समाधीला जाण्याचा योग बऱ्याच वेळा आला आहे! घरी गेलो की झब्बु देईन

संत्या... वा. ऐकून बरे वाटले. आणि हो रे हा सार्वत्रिक त्रास आहे नावे लिहिण्याचा.. Sad

ओझरकर लिंक साठी धन्यवाद..

विशाल... शिंदे टेकडीसाठी जरा युद्धाचा नकाशा बघतो... Happy

इतके छान फोटो आहेत... वेगळा धागाच टाकायचा की... Happy अरे एकदा मध्येच कधीतरी जायला हवे कोणीच नसताना... शांतता अनुभवता येईल... Happy

अतिशय सुंदर माहितीपर छायाचित्रे. इष्टूर फाकड्याची ... Happy ती वडगांवचीच लढाई ना? फाकड्याच्या यात्रेवरही लिही. त्यासाठी तुझ्या लेखाची वाट पहातोय..
शिवमुद्रेच्या रांगोळीचा फोटो - बाकी वढूला शंभूराजांचं दहन झालं, तिथे त्याबरोबर शंभूराजांचीही मुद्रा कोरायला हवी. ' श्रीशंभो शिवजातस्य यदं कसे विनो लेखावर्तते कस्यनोपरि'. म्हणजे शिवपुत्र श्रीशंभूराजांची मुद्रा सूर्यप्रभेप्रमाणे शोभते, ज्या मुद्रेचा आश्रय करणारी लेखासुद्धा कोणावरही सत्ता चालवते.

हेम... कल्पना सुंदर आहे... मी गिरीशकाकांना (गिरीश जाधव) तसे कळवीन... Happy तिथे त्यांचे शस्त्रास्त्र प्रदर्शन लागलेले होते तिथे काढली होती ही रांगोळी... Happy

पक्क्या भटक्या, फोटो माहिती फारच सुंदर.
आशुचॅम्प<<<<<विश्वास पाटलांचे संभाजी तर केवळ अफलातून आहे...संभाजी राजांचे कितीतरी पैलू जाणवले या पुस्तकातून..आणि शेवट वाचून तर इतका त्रास झाला ना. असे कसे वागू शकतात >>>>
अगदी खरंच आहे तुमच म्हणण! गेल्या महिन्यातच मी ते पुस्तक वाचलं, त्यातल शेवटच प्रकरण वाचून खूप त्रास झाला!

प.भ., संत्या नी इथे दिलेली >>शाहीर योगेश ह्यांची कविता...>>>हीच ती कविता जी मी म्हणत होते.
संत्या, मला हीच कविता पाहिजे होती. धन्यवाद.

संभाजी महाराजांची समाधी: आतमधे
Img00082

त्या अर्धपुतळ्याखाली राजांचा अस्थिकलश शाहु महाराजांनी ठेवला आहे याचा लेखः
Img00080

नदीकाठची कमानः

Img00133

कमानीवरचा लेखः

Img00099

हे बाबा कायम इथे दिसतात.
Img00129

अरे एकदा मध्येच कधीतरी जायला हवे कोणीच नसताना... शांतता अनुभवता येईल.<< पक्क्या मी गेलो होतो गतवर्षी पण तिथे जाण्याचे कारण वेगळे होते. तुळापूर हे संगमाचे ठिकाण अस्थी विसर्जन, नारायण नागबली या प्रकारचे विधी या घाटावर केले जातात.

मी गेलो होतो तेव्हा एकदम भयाण शांतता होती एक फोटोग्राफर तिथे होता कॅमेरा आणि सोबत प्रिंटर घेऊन. काहि गावकरी मंडळी घाटावर बसली होती गप्पा मारत. सप्टेंबर महिना होता तरी नदिमधे फारसे पाणि नव्हते. काही बायका नदिच्या काठावर धूणि धुवत होत्या. समाधी पासून नदी कडे जाणार्‍या उतारावर दोन विक्रेते संभाजी राजांचे फोटो, गळ्यातले गंडे-दोरे असे आणि तिथला इतिहास सांगणारी काही पुस्तके विकत होती. नदिपात्रातून वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात असावा असे दृश्य होते.
घाटावर पोहोचलो तेव्हा नावाडी पलिकडच्या तिरावर थांबला होता. त्याला आवज दिल्यावर त्याने थांबायला सांगितले. पाहिले तर एका जोडप्याला तो पलिकडून घेऊन आला. त्यानेच सांगितले की आजून काहि पोरं-पोरी मागे एकांतात बसली आहेत.
घाटावरून परतलो तेव्हा आजुन तिन जोडपी तिथे आली होती. त्या फोटोग्राफर कडून पुतळ्या समोर उभे राहून फोटो काढुन घेतले आणि नदी किनार्‍यावर गेली. मग पुन्हा एकदा भयाण शांतता. त्या हॉटेलमधे चहा पिऊन आम्ही परतलो.

आर्या... अजून फोटोसाठी आभार... Happy

सचिन... तिथे नारायण नागबळी होतात ते मी पाहिले.. पण तिथे का होतात ते कळले नाही... माझ्या मते हे विधी ज्योतिर्लिंग जेथे असते तिथेच करावे लागतात. कुठे ही करून चालत नाहीत. उदा. त्रंबकेश्वर..

रोहन, हा त्या भागाचा गुगल अर्थवरून घेतलेला स्नॅप !

माझ्याकडचे गुगल अर्थचे वर्जन अपडेटेड नसल्याने कदाचित थोडाफार फरक असु शकेल. पण अंदाज येण्यापुरता आहे. यावरून काही लक्षात येतेय का?

आज फाल्गुन अमावास्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस...

३३३ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा..

Pages