पे रु च्या झा डा मागेऽऽएऽऽ..
'बालपणीचा काळ सुखाचा', 'लहानपण दे गा देवा' वगैरे आपण नेहेमीच ऐकतो. आता सगळंच काही रम्य नसतं,
नव्हतंच... घडणं/घडवणं नेहेमीच आपल्या हातात नसतं, म्हणून मला तरी वाटतं 'रम्य ते आठवणं' तरी आपल्या हातात असतं ना?
-------------------------------------------------------------------------------------------
वेळेचं नियोजन आम्हाला शिकवलं ते उन्हाळ्याच्या सुट्टीनं!
म्हणजे सुट्टीच्या दिवसातला एकही क्षण वाया न जाऊ देता आणि 'मॅक्झिमम युटीलायझेशन ऑफ अॅव्हेलेबल रिसोर्सेस' या तत्वाचा वापर करून सुट्टी आनंदात कशी घालवावी हे त्या दिवसांना आठवल्यावरच ध्यानात येतं.
एप्रिलच्या दुसर्या तिसर्या आठवड्यात परीक्षा संपायला आल्या की माझं मन उड्या मारायला लागे. म्हणजे नेहेमीपेक्षा जरा जास्तच जोरात. आता कसं, 'रिझल्ट लागेपर्यंत का होईना, आराऽम नुसता!'
त्या कल्पनेनंच कधी कधी चुकुन जास्ती अभ्यास केला जात असे. चुकुनच.
२१एप्रिलचा दिवस, शेवटचा पेपर.
इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र.
'आयुष्यात इतका कंटाळू-झोपाळू विषय दुसरा कुठलाच नसेल!', तेव्हा मनापासून वाटे. पण तेव्ह्या त्यात जरा बरे गुण मिळत असल्याने नावडता नक्कीच नव्हता.
तर हा पेपर संपला की डोक्यावर असलेला तो मोठ्ठा दगड, ती टांगती तलवार, आणि ते परी़क्षेचं भूत, सगळं क्षणार्धात निघून जात असे. आणि दुपारी बरोब्बर ४ला रव्या, उन्म्या, रुश्या, गिर्या, ओंक्या, सुज्या, सुरज्या, सन्म्या, सच्या, संज्या, केत्या, ऋषा,... असे (१५-२०जण!) आमच्या 'प्रियदर्शिनी सोसायटीच्या ग्राऊंड जवळ' जमत आणि मनसोक्त क्रिकेटचा डाव जमे. सात वाजले की नाईलाजानं खेळ थांबवावा लागे, कारण सात नंतर पडणारा अंधार.
खेळून खेळून (तात्पुरती) दमलेली सगळी पोरं, ३४ नंबर बिल्डींगच्या टाकीवर बसून दम खात. कोणी बोरींगच्या पाण्यावर ताजंतवानं होई. कोणी टाकीचं पाणी पिऊन. एखादा वात्रट हिरो, बोरींगवर बसून तोंडात भरपेट पाणी घेऊन 'आपण किती लांब पिचकारी टाकू शकतो!' हे दाखवण्यात धन्यता माने.
थोडी टंगळमंगळ आणि मग अजून पाच-एक मिनिटात परत सगळे ताजेतवाने.
* * * * * * * * * * * *
"जास्तीची मेजॉऽऽऽर्टी!" असं काहीसं ओरडून राज्य कोणावर ते ठरवायचं.
*तसं कधीकधी ते 'ऋषा' वर किंवा 'उन्म्या'वर टाकायचंय असं ठरलेलं असल्यानं बरोब्बर पांढरं/काळं अॅड्जेस्ट केलं जायचं. आधी वेगवेगळे ७-७ चे गट करुन, मग पाच मग तीन असं इतर लोकं सुटत सुटत, शेवटी बरोब्बर 'बकर्यावर' राज्य टाकलं जायचं. बकरा होण्याचं कारण ठरलेलं होतं.
- 'सगळ्यांनाच, त्यांना चिडवायला फार आवडायचं म्हणून! '
मग बकर्याचं वाकडं झालेलं तोंड बघून खुष होत, तो डालड्याचा पिवळा प्लास्टिकचा उंच 'डबा' शोधला जायचा.
तो डबा आदल्या दिवशी कोणी कुठे टाकलाय ते आठवुन शोधुन आणायचा. सहसा तो 'रोहन्या-त्यांच्या लॉफ्टवर' टाकत असू. पण, खरंच! आठवतच नाहीये आता, की दर वर्षी कुठला डबा आणायचो ते. आम्ही अशी वर्षभर एखादी गोष्ट टिकवणं म्हणजे...
तर उन्म्यावर डाव आणला. मग आमच्यातलाच कोणीतरी बिल्डर जोरजोरानं हसत, उन्म्याला चिडवत तो डबा लांबवर फेकून टाकायचा. उन्म्या बिचारा घाम पुसत, दातओठ खात डब्यामागे!!
- त्याचा रडवेला चेहेरा बघून सगळे खुष होऊन जायचो आणि दिसेल त्या बाजुला - अजस्त्र पसरलेल्या त्या पिंपळाच्या झाडामागे, लठ्ठे काकांच्या बाल्कनीखाली, त्यांच्या गाडीमागे, आमच्या ३४ नं बिल्डींगच्या टाकीमागे, जास्वंदीच्या झाडात, ३५नं बिल्डींगमधे नाहीतर थेट टेरेस! सगळे गायब. आणि सगळीकडे चिडीचुप शांतता...
उन्म्या कितीही घाई करुन परत आला, तरी तो येईपर्यंत सगळं सुनसान...
बोरींगशेजारच्या त्या रिकाम्या जागेवर मातीमधे गोल केलेला असे. त्यावर डबा खाली ठेवता ठेवता, त्यानं नेहेमीच्या सगळ्या ठिकाणी बघितलेलं असायचंच. पण प्रॉब्लेम असा होता, की तिथे कोणीतरी आहे, पण 'कोण?' ते कळत नसे..
तिथुन मग उगाचच हसण्याचे आवाज. फिदीफिदी-खदाखदा. एखाद्याला उगाचच बाहेर ढकलायचं. त्यानं सावरून आत जात बदला घेत दुसर्याला ढकलायचं. अशा प्रकारे मग कधी कधी अंतर्गत कलहामुळे बाहेरचा शत्रु बाजी मारुन जात असे. पण हे कधीकधीच.
एरवी मग कोणीतरी उगाचच हात बाहेर काढून शर्टाची बाही बाहेर काढून दाखवत 'ओळख!' काढून डिवचायचं..
एवढं केल्यावर मग कोणीही असो, वैतागून मोहाला बळी पडणारच!
'सुरज्या डबा एक्स्प्रेस!!' करून उन्म्या ओरडला, की पिंपळाच्या झाडामागुन सुरज्याचा शर्ट घातलेला 'सुज्या' बाहेर.
त्याच्या बरोब्बर विरुद्ध बाजूने ३४ नंबर बिल्डींगच्या टाकीमागून सुज्याचा शर्ट घातलेला 'सुरज्या' बाहेर!
लाथेनं डबा उडवुन 'धनाड तताड तताड तताड! 'धनाड तताड तताड तताड!
पुन्हा उन्म्याचं तोंड वाकडं. पुन्हा कोणीतरी बिल्डर डबा फेकणार आणि पुन्हा सगळे दाहीदिशांना....
* * * * * * * * * * * *
खेळणारी लोकसंख्या वाढली की डबाएक्सप्रेसला फार मजा येत असे, जोपर्यंत स्वतःवर राज्य येत नाही तोपर्यंतच. जवळच्या जागेतले लोक 'डबा-एक्सप्रेस' झाले, की मग थोडं लांबवर जावंच लागे, जसं म्हैस्कर काका, निकम काकांच्या घराच्या बाजुला. पण तिथे सहसा कोणी नसे. मोक्याच्या जागा संपल्या की सगळे कुठे असतीलचं ते ठरलेलं असायचं..
अशाच कोणी सुज्या वगैरेवर राज्य आलेलं असताना बाकी सगळ्या जागा त्यानं नीट साफ केल्या असता उरलेल्या जागी शोध चालू होत असे. तेव्हा आऊट झालेले वीर, ३४ नं बिल्डींगच्या टाकीवर बसून एका सुरात ओरडत, "पे रु च्या झा डा मागेऽऽएऽऽ.."
'बिल्डींग नं. ३३ आणि ३५'च्या मधे असलेल्या जागेत, आमच्या बिल्डींगच्या कंपाऊंडबाहेरचं हे पेरूचं झाड.
ट्युब होती, पण तरीही एकूण ती बाजू अंधारीच. शेजारीच पाटाचं पाणि. तिथे रंकाळ्यातून कधीमधी येणारे साप किंवा खेकडे. पण खेळापुढे ह्या सर्वांची पर्वा न करता हे 'वीर' खेळत असत. कंपाऊंडबाहेर त्या- बाहेरच्या बाजुला लपलेले वीर आणि आऊट झालेले -टाकीवरचे वीर. दोन्ही एकाच बाजुला. दुष्मन एकच, 'राज्य' असलेल राजा!
कधी सगळे पेटले तर मुद्दाम सगळे एकदम जवळ-जवळ लपायचो. म्हणजे बोरींगच्या एकदम जवळ. दुष्मन आला रे आला की सगळे 'ओऽऽअओऽ' करून पळत जाऊन एकदम डबा उडवायचो.
कधी बिकट परिस्थिती आली आणि एखाद-दुसराच आऊट व्हायचा राहिला, तर आऊट झालेल्या लोकांना पुढे करुन त्यांच्या मागे लपून डब्यापर्यंत जायचं. मग 'राजा' प्रयत्नांची पराकाष्ठा करून किंवा आऊट झालेल्यांना ढकलून चोरांना पकडण्याचा प्रयत्न करत असे. पण चोर्या दोन-दोन , तीन-तीन बाजुंनी होऊ लागल्यावर तो तरी काय करणार?? रडवेला होऊन परत राजा / दुष्मन निघाला डबा आणायला! बरेचदा राजाला रडवूनच डाव संपत असे.
मनसोक्त खेळल्यावर मग कधीतरी मुद्दामच आम्ही 'डबा एक्स्प्रेस' होऊन जात असू. (दिवसातला साधारण शेवटचा डाव आला की) आणि मग टाकीवरूनचा आमचाही आवाज सुरु, 'पे रु च्या झा डा मागेऽऽएऽऽ..'
तो डाव खूप रंगे. कधीकधी आर्धा आर्धा तासही!
खेळताना भुक लागली की त्याच झाडाचा पेरू. कधीकधी आतून लाल असलेला. तो मग वाटून खायचा. बाकी, आमचं हे "पे रु च्या झा डा मागेऽऽएऽऽ.." सुरु झालं, की आई लोकांनाही त्याचा अंदाज येऊन जात असे, "महाराज लवकरंच घरी येणार!', इतकं ते फेमस होतं.
आता तसं म्हटलं तर एवढंसंच ते झाड: - पेरूचं.. कधी तरी त्याला थोडेफार पेरू येणार. तेही रोहन्या-त्यांनी काढून घेतले नाहीत तर आम्हाला चान्स. वर पोपटांनी चोची मारून त्याच चोथा केला नसला तर.
पण छान होतं ते.
आमच्या लहानपणीच्या खेळात आवर्जून सहभाग घेतलेलं हे पेरुचं झाड, कसलासा रोग पडला आणि मरुनच गेलं शेवटी... आधी फक्त पानांवर पांढरट भुगा किंवा पुड पडल्यासारखी दिसे. त्याचे पेरू काढून खाणं तेव्हाच बंद पडलं होतं.
हल्ली जेव्हा कधी तिथं जातो तेव्हा, आमच्या लहानपणापासून तिथंच असलेली निलगिरीची झाडं, शेतात जाणारा पाट वगैरे बघितलं की हे लपंडाव / डबा एक्स्प्रेसही सगळं आठवतं. आमच्या या आठवणी काही भारी-बिरी नसतीलही पण 'आपलं' म्हणून हे सारं नक्कीच आवडतं. .
आता ह्यातलं घडणं/घडवणं थोडीच आपल्या हातात आहे? घडून गेलं सगळं.
म्हणूनच मग कधीतरी 'रम्य ते आठवावं...' असं वाटतं, 'आपलं ते साठवावं असं वाटतं... '
पुन्हा येईल वेळ तेव्हा, आजचं नवं /तेव्हासाठी जुनं म्हणून आठवावं अस वाटतं...'
चांगलय(चांगलं लिहिलय चा
चांगलय(चांगलं लिहिलय चा शॉर्टफॉर्म)
पहिल्यांच नाचताय(लिहिताय) वाटले नाही). गंमत हो.
(No subject)
ऋयाम, माझ्यापेक्षा वयाने बराच
ऋयाम, माझ्यापेक्षा वयाने बराच लहान असणार तू.... पण माझेही बालपण असेच, अगदी असेच गेले.
पहिल्यांच नाचताय(लिहिताय)
पहिल्यांच नाचताय(लिहिताय) वाटले नाही>>> पहिल्यांदा नाहीच मुळी. आधीही नाचलेत खूप पण स्वतःच्या पानावर नाही.
ऋयाम, आता वाचते सावकाशीने.
छान लिहिलं आहे. पण ते
छान लिहिलं आहे.
पण ते 'डबा-एक्सप्रेस' नाही काही. ते " डबा ऐसपैस" असं आहे ( आम्ही असं म्हणायचो)
सही रे.... सगळ्यांची लहानपणं
सही रे....
सगळ्यांची लहानपणं थोड्या फार फरकाने सारखीच असतात नाही.
आमची पण अशीच १५-२० जणांची गँग होती. लपंडाव खेळतांना ज्याच्यावर राज्य त्याचा पार जीव जायचा सगळ्यांना हुडकेस्तोवर. पोरं पण कसल्या-कसल्या विचित्र ठिकाणी जाऊन बसायची.
हा खेळ संध्याकाळ झाली की मगच सुरू होत असे. त्यातल्या त्यात आमच्या सारख्या वात्रटांच्या डोक्यात अभिनव कल्पना येत.
अर्ध्या जणानी लपायचे आणि अर्ध्या जणांनी एकमेकांच्या अंगावरच दहीहंडी चा मनोरा कोसळल्यासारखे असे पडायचे की राज्य असलेल्याला एकाचाही चेहरा नीट दिसू नये. मग चेहरे बघण्यासाठी तो जवळ आला की धप्पा देण्यासाठी एकदम तुटून पडायचं.
आमच्या वात्रट पोरांच्या ग्रूपपैकी कुणावर राज्य आलं की आम्हीच कुठे तरी आडजागी लपून बसत असू किंवा सरळ लपत छपत आपापल्या घरात जाऊन एक दोन लाडू हाणून पोट फुगेस्तोवर पाणी पिऊन जमल्यास बहिणीच्या खोड्या काढून येत असू मग तोवर लपलेले वैतागून जात आणि आपसूकच बाहेर येत.
नाहीतर 'ए साप आहे बघा इथे' असलं बोंबलत सुटायचं किंवा 'ए अम्या हौदात पडला रे' , 'ए च्यायला मला इथे भूत दिसलं रे!' अस्लं काहीतरी मग पोरं राज्य बिज्य विसरून साप सापडायला बघायची नाही तर भुताखेतांच्या गोष्टी करत बसायची.
नाही तर मग सरळ शेकोटी पेटवायची आणि आपणच त्याच्या समोर बसायचं पोरं वैतागून बाहेर आली की 'जाऊदे बे फार बोअर होतंय लपंडाव' असे म्हणेस्तोवर सगळी शेकोटी भोवती.
पण असे नाटकं दुसर्या कोणी केले की त्याला आजिबात दाद न देता तो रडकुंडीला येईपर्यंत पण तंगडवयाचं.
सॉलीड मज्जा!
ऋयाम, काय मस्त आठवणी आहेत
ऋयाम, काय मस्त आठवणी आहेत ह्या!! छान लिहीलयस!
डबा ऐसपैस (अगदी अस्संच वर्णन केलेलं), काठी-पाणी, लगोरी आणि क्रिकेट (त्यात सुध्दा 'कट रन' ) भरपूर खेळले लहानपणी! आणि जSSरा मोठं झाल्यावर मग सगळं पब्लिक गच्चीवर पडीक
(No subject)
माझ्या पण लहानपणीच्या आठवणी
माझ्या पण लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
आम्ही डबा-ऐसपैस मधे, कोणी नवीन मेंबर असेल तर मुद्दाम छळायला म्हणून चक्क माडावर चढायचो. म्हणजे अगदी पार शेंड्यापर्यंत नाही, अर्ध्या माडापर्यंत. पण माडावर चढू असं कोणाला वाटायचंच नाही त्यामुळे मजा यायची. दुसरी जागा म्हणजे छप्पर!
असल्य अघोरी जागा बघून आजीने "बाबांना नाव सांगेन हां" असं रागावल्यावर "बाबांनीच शिकवलंय माडावर आणि कौलावर चढायला." असं सांगून तिला गार केलं होतं!
छान लिहलय..
छान लिहलय..
(No subject)
मस्त रे! साधं आणि
मस्त रे! साधं आणि मनापासूनचे.
लहानपणी गावाकडे 'बटशेल' नामक महान खेळ असे. ज्याच्यावर राज्य आलेय त्याचा दगड बाकिच्यांनी दगडाच्या कापर्यानी लांब ठोकरत नेणे एवढच त्याचा नियम. पण त्यासाठी उत्तम दगड गोळा करणे ते दुसर्याला मिळू नये म्हणून लपवणे अशा अनेक 'स्ट्रॅटेजी' असत. बकरा गाठून त्याचा दगड लांबपरेंत पळवणे हे तर नेहमीचेच.
मस्त लिहिलं आहेस.
मस्त लिहिलं आहेस. रंगेबीरंगीची हि सुरुवात खासच.
मस्त लिहिलं आहे. एकदम
मस्त लिहिलं आहे. एकदम लहानपणीचे दिवस आठवले
आमच्या सोसायटीत खेळायला येणार्या सगळ्या मुलीच. मुलगा फक्त एकच होता. त्याला मन्या म्हणायचे. पेरुचं झाड इथेही होतंच. एकदा लपाछपी खेळताना बाकीचे सगळे आऊट झाले तरी मन्या काही सापडेना. शेवटी राज्य आलेल्या मुलीसकट सगळेच त्याला शोधायला लागले. अंधार झाला होता. कंटाळून सगळ्याजणी घोळका करुन त्या पेरुच्या झाडाखाली बोलत उभ्या राहिलो की मन्याला शोधायचं तरी कुठे आता ? तो पेरुच्या झाडावरच लपला होता. एका क्षणी त्याने 'भूऽऽत' असं ओरडत धप्प उडी मारली वरुन. सगळ्या किंचाळत पळत सुटल्या
डब्बा ऐसपैसचा उच्चार आम्ही 'डबाआईसपाईस' असा करायचो.
रच्याकने, तो कुठला खेळ ज्यात सगळ्यांनी स्टॅच्यू व्हायचं असतं. राज्य घेतलेला एकेकाला हसवायचा प्रयत्न करतो. मध्येच त्याला कुणी हात लावून पळालं तर बाकीच्यांनीही पळायचं. त्याने कुणाला स्पर्श केला तर तो दुसरा राज्य घेणार नाहीतर पहिल्यावरच राज्य रिपीट. जाम आठवत नाहीये ह्या खेळाचं नाव. लपाछपी, डबाऐसपैस, चोर-पोलीस, विषामॄत असे सगळे खेळ खेळून दमलो की मग शेवटी कानगोष्टीही असायच्या
डबा ऐसपैस
डबा ऐसपैस
छान आहे रे. मुळात लहानपणचे
छान आहे रे. मुळात लहानपणचे खेळ हा विषयच असा आहे की कुणीही लिहीले की आपण त्यात स्वतःला व मित्रांना पहातो.
माझ्या लहानपणी आमच्या वाड्याच्या बरोब्बर मागे धर्मचैतन्य (कैलास जीवन ची फॅक्टरी) होती. तिथे कलमी पेरुचे जबरी झाड होते. आमचा खेळ थांबला की आम्ही भिंतीवरुन पत्रावर अशा माकडऊड्या मारत त्या पेरुच्या झाडावर जात असु. आम्ही म्हणजे एकच जण. कारण सगळे पकडले जाण्यापेक्षा एक जण बरा. मग तो ते पेरु तोडुन १०-१५ फुट लांब उभे असलेल्या लोकांकडे पेरु फेकत असे. (कॅचची प्रॅक्टीस) स्वतःच्या बनियनमधेही पेरु भरुन गरोदर होत असे. त्यावेळी जर खाली मालकांना पत्त्ता लागला व त्या लब्बाडाला पकडण्यात यश मिळालेच तर हे पेरु जप्त होत असत. म्हणुनच सेफर साईड म्हणुन आधी पेरु फेकले जात. पकडलेल्या भिडुला अर्थातच शिक्षा (अंगठे धरुन १० मि उभे रहाणे) होत असे. नंतर सुटका झाली की तो फेकलेल्या पेरुतला हिस्सा मागायला तयार. पकडला गेला नाही तर मात्र चंगळ.
ऋयाम.. गोड रे.. लहानपण च्या
ऋयाम.. गोड रे.. लहानपण च्या (इस्पेशली उन्हाळ्याच्या सुट्टी च्या) आठवणी कित्तीद्दा चघळल्या तरी त्यांतील गोडी कधीच कमी होत नाही नै??
{ तू ही लिहिला असशील ,दरवर्षी शाळा उघडल्यावर,' मी उन्हाळ्याची सुट्टी कशी घालवली' हा निबंध.. वर्षानुवर्षे.. )
कांदापोहे-
मस्त लिहिलय...
मस्त लिहिलय...
<< "जास्तीची मेजॉऽऽऽर्टी!"
<< "जास्तीची मेजॉऽऽऽर्टी!" असं काहीसं ओरडून राज्य कोणावर ते ठरवायचं. >>
नुसतं वाचूनच ती आरोळी कानात घुमली !
लगोरी, विषामृत, लपाछपी, लंगडी.....
...आणि ते " टिपिटिपि टिपटॉप, व्हॉट कलर यु वॉन्ट " असं म्हणून एक खेळ खेळायचो, त्याचं नाव आठवेना.
मस्त लेख. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.:)
वरच्या प्रतिसादात पेरुच्या
वरच्या प्रतिसादात पेरुच्या झाडाची आठवण राहिलीच.
आमच्या घराच्या अंगणातले पेरुच्या झाडावर चढून आम्ही त्याच्या फांद्या तोडल्यामुळे बराच मार खायचो मोठ्यांचा. कच्चे पेरुच मस्त वाटतात ते पिवळे लगदा झालेले पेरु खाण्यापेक्षा त्यामुळे झाडावर चढून ते तोडून खाण्यात काय मजा व जो ज्यास्त मिळवेल पेरु चढून तो जिंकेल.
मऽऽऽऽऽऽस्त झालाय लेख!! सगळंं
मऽऽऽऽऽऽस्त झालाय लेख!! सगळंं लहान पण आठवले... !!
डब्बा ऐसपैस वर मी लिहीलेला ब्लॉग आठवला.
डब्बा ऐसपैसचा उगम वाचून खूपच आश्चर्यचकित झाले होते मी..
झक्कास.... केप्या.. कोल्हटकर
झक्कास....
केप्या.. कोल्हटकर पकडतच असतील बहुतेक वेळा तुम्हाला...
भारी.. अरे आम्ही पण डब्बा
भारी.. अरे आम्ही पण डब्बा एक्स्प्रेस खेळताना नेहमी टी-शर्ट बदलायचो... धमाल असायची एकदम.. एक पोस्ट लिहावे म्हणतोय...
खुप छान.. :)
खुप छान..
टिपिटिपि टिपटॉप, व्हॉट कलर यु
टिपिटिपि टिपटॉप, व्हॉट कलर यु वॉन्ट
>>> लाल बटाटा रंग कोणता.. असे काहीतरी आठवतंय..
मस्त लिहिलं आहे बस्के... उगम
मस्त लिहिलं आहे
बस्के... उगम मस्त आहे डब्बा ऐसपैसचा
डबे पायाला लागतील म्हणून
डबे पायाला लागतील म्हणून आम्हाला डबे दिले जात नसत. आम्ही करवंटी ऐसपेस खेळायचो !
मस्त लिहिलं आहे. एकदम
मस्त लिहिलं आहे. एकदम लहानपणीचे दिवस आठवले!!!
बस्के. भारी उगम आहे डबा
बस्के. भारी उगम आहे डबा ऐसपैसचा.
धन्यवाद! सर्वांचे अनुभव
धन्यवाद!
सर्वांचे अनुभव मस्तच आहेत ऐसपैसचा उगम लै भारी!
आम्ही मात्र एक्स्प्रेस म्हणायचो...
@आभार्स!
-ऋयाम.
Pages