मागील भाग ... मराठा इतिहास दिनविशेष ... मे महिना.. भाग १..
१६ मे १६४९ - विजापुरच्या आदिलशहाकडून शहाजीराजांची सुटका झाली. शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि मुघलांचा दख्खनेचा सुभेदार शहजादा मुराद यास १४ मार्च १६४९ रोजी पत्र लिहिले होते. शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर १६ मे १६४९ रोजी शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.
१९ मे १६७४ - शिवाजी महाराजांनी राजाभिषेकाच्या आधी प्रतापगडावरील भवानी मातेसमोर मंगलकलश प्रस्थापित केला.
२० मे १६६५ - राजगडाहून शिवाजी महाराजांनी आपले वकिल रघुनाथपंत 'पंडितराव' यांस मिर्झाराजा जयसिंह यांच्याकडे पुरंदर तहासंदर्भात बोलणी करण्याकरिता रवाना केले.
२१ मे १६७४ - शिवाजी महाराज प्रतापगडाहून रायगडास निघाले. प्रतापगड येथे ते ३ दिवस राहिले आणि त्या दरम्यान त्यांनी तेथील विराजमान झालेल्या आदिशक्ति तुळजा भवानीस १.२५ मण वजनाचे छत्रचामर अर्पण केले आणि मातेसमोर मंगलकलश प्रस्थापित करून राजाभिषेकाआधी देवीचा आशीर्वाद घेतला.
२३ मे १७२९ - पेशवे थोरले बाजीराव यांनी अलाहाबादचा सुभेदार महम्मदखान बंगश याचा दारूण पराभव केला. महम्मदखान बंगश मोठे सैन्य घेउन बुंदेलखंडावर चाल करून आला तेंव्हा राजा छत्रसाल याने पेशवे थोरले बाजीराव यांच्याकड़े मदत मागितली. पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात,
"जो गति ग्राह गजेन्द्र की सो गत भई है आज ... बाजी जात बुंदेलकी राखो बाजी लाज"
आपल्या २५ हजार घोड़दळासकट बाजीराव त्याच्या मदतीस धावून गेला. त्यानी आधी बंगशची पूर्ण रसद तोडली आणि त्याला मुघल बादशाह कडून कुठलीच मदत मिळू दिली नाही. जयपुरकडून बंगशचा मुलगा कैमखान बापाच्या मदतीस धावला पण बाजीरावने त्याचा जयपुरजवळ पूर्ण पराभव केला. आता बंगशने पूर्ण शरणागती पत्करली आणि 'राजा छत्रसाल' वर पुन्हा हल्ला करणार नाही असे कबूल करून आपली सुटका करून घेतली. राजा छत्रसालने बाजीरावला केलेल्या मदतीबद्दल त्याचा काल्पी, झांसी, सागर, सिरोंज, हरदेनगर हा वार्षिक महसूल ३३ लाख उत्पन्नाचा भाग बाजीरावास बहाल केला.
२३ मे १७३७ - पोर्तुगीझांकडून जिंकल्यानंतर पेशवे थोरले बाजीराव यांनी अर्नाळा किल्ला पुनश्च बांधून घेतला.
२५ मे १६६६ - शिवाजी राजांची आग्रायेथील नजर कैद सुरु. आग्र्याच्या किल्ल्यात कोणाची मर्दुमकी प्रकट झाली असेल तर ती श्री शिवछत्रपति महाराजांची. धन्य त्यांची की मोगल साम्राज्य वैभवाच्या कळसावर व सामर्थ्याच्या शिखरावर असताना आणि स्वतः एकाकी असताना त्यांनी शहेनशहाचा जाहीर निषेध केला. १२ मे १६६६ रोजी शिवाजीराजे हिंदुस्तानचा बादशहा औरंगजेब यांस त्याच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त भेटले होते.
२६ मे १७३३ - पेशवे थोरले बाजीराव यांनी आबाजीपंत पुरंदरे यांना सिद्दी संदर्भात पत्र लिहिले. पत्रात ते म्हणतात,"सिद्दीचे २ हात जबरदस्त आहेत. एक अंजन वेल आणि दूसरा उंदेरी. प्रतिनिधी अंजनवेलीस जातील तर उत्तम आहे. सरखेल उंदेरिस खटपट करतील. ते दोन्ही स्थळे हातात आलीयावर याची किंमत कमी होइल आणि आसराही तूटेल."
२७ मे १७०२ - दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने अखेर तह करून विशाळगड ताब्यात घेतला. पन्हाळगड - पावनखिंड जिंकून विशाळगड ताब्यात घ्यायला त्याला बरोबर १ वर्ष लागले.
२७ मे १८२५ - डॉ. बरनाडी पेरेस डिसिल्वा या गोमंतकाला पोर्तुगीझांनी गवर्नर बनवले. याने तेरेखोलच्या किल्ल्यामधून पोर्तुगीज सत्तेविरुद्धच उठाव केला. पण हा उठाव टिकला नाही. २७ मे रोजी प्रचंड हत्याकांड करून तो पोर्तुगीझांनी दाबला.
२८ मे १६७४ - शिवाजी महाराज यांची राजाभिषेकाच्या १० दिवस आधी मुंज करण्यात आली.
२८ मे १७०१ - दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने पन्हाळगड - पावनखिंड जिंकला. आता तो निघाला विशाळगड जिंकायला.
***औरंगजेबाने अखेर तह करून विशाळगड २७ मे १७०२ रोजी ताब्यात घेतला. पन्हाळगड - पावनखिंड जिंकून विशाळगड ताब्यात घ्यायला त्याला बरोबर १ वर्ष लागले.***
२८ मे १६६४ - सिंहगडावरील निकामी हल्ल्यानंतर हताश होउन जसवंतसिंह वेढा उठवून औरंगाबादला परतला. नोव्हेंबर १६६३ पासून तो सिंहगड किल्ल्यास वेढा घालून बसला होता.
***५ एप्रिल १६६३ रोजी सुमारे २ वर्षे लालमहालात ठाण मांडून बसलेल्या शास्ताखान उर्फ़ शाहिस्तेखानावर शिवरायांचा आकस्मिक छापा घातला. 'चैत्र शुद्ध अष्टमी' म्हणजेच रामनवमीच्या आदल्या दिवशी आणि मुस्लिम लोकांच्या रोज्याच्या ६ व्या दिवशी धक्कादायक असा छापा. खान कसाबसा पसार मात्र खानाची ३ बोटे कापली. जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट औरंगाबादला जाउन थांबला. मात्र त्याने जसवंतसिंह यांस सिंहगड किल्ल्या जिंकायची आज्ञा केली होती.***
२९ मे १६७४ - शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ९ दिवस आधी 'तूळापुरुषदान विधी' आणि 'तूळादान विधी' संपन्न.
३० मे १६७४ - शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ८ दिवस आधी 'विनायक शांती विधी' संपन्न.
३१ मे १६७४ - शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ७ दिवस आधी प्रित्यर्थ संस्काराचा एक भाग म्हणून सोयराबाई, सकवारबाई, पुतळाबाई यांच्याशी प्रतिकात्मक पुनर्विवाह करण्यात आला.
३१ मे १७२५ - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मदिवस.
तळटीप: सदर तारखा, प्रसंग मी विविध संदर्भ पुस्तकांमधून मिळवलेले आहेत...
मस्त माहिती रोहन ..
मस्त माहिती रोहन ..
वाह !! मस्त माहीती मित्रा
वाह !!
मस्त माहीती मित्रा !!
२३ मे १७२९ - पेशवे थोरले बाजीराव यांनी अलाहाबादचा सुभेदार महम्मदखान बंगश याचा दारूण पराभव केला. महम्मदखान बंगश मोठे सैन्य घेउन बुंदेलखंडावर चाल करून आला तेंव्हा राजा छत्रसाल याने पेशवे थोरले बाजीराव यांच्याकड़े मदत मागितली. पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात,
"जो गति ग्राह गजेन्द्र की सो गत भई है आज ... बाजी जात बुंदेलकी राखो बाजी लाज"
पुढे याहुनही सुंदर ओळ आहे
"जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥"
थांकु रे रोहन
थांकु रे रोहन
छान माहिती
छान माहिती
उत्तम संकलन
उत्तम संकलन