नॉर्वे भ्रमंती - ३ (हार्तिग्रुतेन)

Submitted by स्वानंद on 11 May, 2011 - 01:46

नॉर्वे भ्रमंती - १ (ट्रोन्डॅम)

नॉर्वे भ्रमंती - २ (हार्तिग्रुतेन)

रात्री झोपायला उशीर झाला. (केला!) परिणामी तिस-या दिवशी सकाळी उशीरा उठलो. खिडकीतून हलणा-या पाण्याच्या ऐवजी एक भिंत दिसत होती. बोट कोणत्यातरी बंदरावर लागली होती. पटकन अवरले आणि डेक वर आलो. बोट तोवर समुद्रात घुसली होती. आजचा समुद्र थोडा अवखळ होता. एखाद्या बागडणा-या मुलासारखा. आज लाटा दिसत होत्या. एका बाजूला दूरवर जमीन आणि दुस-या बाजूला क्षितीजापर्यंत पसरलेले पाणी.

वारासुद्धा भरात आला होता. बोटीच्या समोरच्या भागात इतका वारा होता की उभेही राहता येत नव्हते. खूप थंडी होती. वातावरणही ढगाळ होते. कालपर्यंत सूर्याकडे तोंडकरुन बसलेले गोरे आजी आजोबा आज मस्त शाल लपेटून, गुरफटून आत बसले होते. डेकवर तुरळक माणसे दिसत होती.

आता पोटात कावळे ओरडत होते. आम्ही बोटीवरल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथे आमच्या न्याहरीची उत्तम सोय केलेली होती.

फ्लेक्सचे ४७ प्रकार, योगर्टचे १३ फ्लेवर, २३ प्रकारचे चीज, ३८ प्रकारचे ब्रेड, ५७ प्रकारचे ज्युस आणि जॅम. शिवाय मांसाहारी पदार्थ वेगळे (ते मोजले नाहीत, नाहीतर वेळ संपल्याने न्याहरी ऐवजी दुपारचे जेवण झाले असते.) काय घेऊ आणि काय नको असे झाले होते. शेवटी सगळेच एकत्र केले. आणि उदराग्नी शांत केला.

आम्हाला १० वाजता खोली खाली करायची होती. आम्ही सामान आवरले आणि लॉकर रुम मध्ये टाकले. पुन्हा डेकवर जाऊन सोसाट्याच्या वा-याला झोंबू लागलो. डाव्या बाजूला मधूनमधून छोटी छोटी गावे येत जात होती.

बोटीवरचा आता थोडावेळच राहिला होता. परत एकदा सगळीकडे फिरलो. वाचनालय, चित्रपटगृह, रेस्टॉरंट. वाचनालयात ’क्रिपेज’ नावाचा पत्त्याचा डाव एका टेबलावर रंगला होता, माणसे ब्रिटिश होती. दुसरीकडे डच लोक ’पोकर’ खेळत होते. आम्ही पत्त्यात दाखवलेल्या जिज्ञासेमुळे मग खरा “गेम” कोणता यावर ब्रिटश-डच “संवाद” झाला, त्याचे महाचर्चेत रुपांतर होण्यापूर्वीच आम्ही तिथून सटकलो. Happy

(वाचनालय)

(हॉटेल)

बोट हळूहळू एका मोठ्या बंदरात येउ लागली होती, एकदम लहान-मोठ्या नौकांची गर्दी होऊ लागली होती. हळू हळू बंदराचा तट दिसू लागला. बोट धक्क्याला लागली. विमानातून जसे आपण वरच्यावर एअर पोर्ट्वर उतरतो. तसे आम्ही बोटीच्या चौथ्या मजल्यावरुन बाहेर पडलो. दारावर उभ्या रिसेप्शनिस्टने हसून सांगितले, “’बर्गन’मध्ये तुमचे स्वागत आहे!!”

(क्रमशः)

नॉर्वे भ्रमंती - ४ (बर्गन)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users