दशकपूर्तीच्या निमित्ताने - ४ (लष्कराच्या भाकर्‍या)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

लष्कराच्या भाकर्‍या

"मदत समिती झोपली आहे काय?"

असा प्रश्न मला एकदा "मदत हवी" सारखा एक धागा होता तिथे विचारावा लागला. खंड पडल्यावर परत आल्यानंतर मी Mkarnik यांच्या "मुकुंदगान" हा कवितेचा फोल्डर शोधत होते. मध्यंतरी असे एखाद्या युजरच्या नावे असलेले फोल्डर काढून टाकले होते बहुतेक. shuma चा 'जलती है शमा' की 'शमा के परवाने' पण दिसत नव्हता. चौकशी करुनही उत्तर मिळालं नव्हतं म्हणून वरचा प्रश्न.

मग कोणीतरी उत्तर दिलं. तेव्हा मदत समिती सदस्य कोण होते माहीत नाही. त्यांच्यापैकीच कोणी उत्तर दिलं का तेही माहीत नाही. तसं ते माहीत असलेल्या कोणीही दिलं तरी चालतं. आत्ताही 'मदतपुस्तिका' वर जे प्रश्न येतात त्यांना उत्तर फक्त मदत समिती सदस्यांनीच द्यायला हवं असं काही नाही. योग्य उत्तर माहीत असलेल्या कोणीही दिले तरी चालते. तसे ते काही वेळा दिले जातेही. स्वयंसेवक हे आपल्या कामातून वेळ काढून इथली कामे करतात, वेळ लागू शकतो हे नेहमी लक्षात ठेवायला हवं.

पूर्वीही प्रश्न बरेचसे आता येतात तसेच यायचे. 'फोटो कसे टाकायचे', 'धागा सापडत नाही', 'देवनागरीत कसे लिहायचे', 'नवीन आहे, काय करु?' गंमत म्हणून उदाहरण द्यायचे तर या धाग्यावर Crp या नवीन मेंबरचे Mrinmayee ने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे आणि तिच्यासह बाकी अनेकांनी मदत/सल्ले दिले आहेत. Happy

तर या समित्यांसाठी नवीन स्वयंसेवक हवेत म्हणून एकदा घोषणा झाली. तेव्हा मी मदत समितीत काम करायला आवडेल असं सांगितलं. त्याप्रमाणं मला मदत समितीत घेतलं गेलं आणि मायबोलीच्या स्वयंसेवक चमूत माझा प्रवेश झाला. मला वाटतं ही २००४ ची गोष्ट असावी.

त्यावेळी वाह्यात आयडींना समज देणे, आक्षेपार्ह पोस्ट्स डिलीट करणे अशी कामे मॉडरेटर करत. त्यांना नंबर होते. Moderator_1 वगैरे. मी एकदा विचारलं होतं की Moderator_अमूक म्हणजे कोण, तर "हम सब एक है" असं उत्तर आलं. पण लिहिण्याच्या नंतर स्टाईलवरुन अंदाज यायचा. मॉडरेटरच कधीकधी मदतीची कामेही करत. सूचना देण्याचीही. 'हे करा, ते करु नका' इ. तसं नंतर कुठे काय लिहायचं असतं, नाही साधारण लिखित अलिखित नियम मला कळू लागल्यावर मीसुद्धा असं सांगायला(दटावायला) सुरुवात केली. त्यामुळे काहीजणांचा मी मॉडरेटर आहे असा समज झाला होता. पण मॉडरेटर चमूत मी कधीच नव्हते.

त्यावेळी मायबोलीचे दोन मुख्य उपक्रम म्हणजे 'गणेशोत्सव' आणि 'दिवाळी अंक' हेच होते. २००४ की ०५ मध्ये कधीतरी मी दिवाळी अंक संपादकांना 'देवनागरीकरण' की शुद्धलेखन तपासायला मदत होती. सुरुवातीपासूनच इथल्या गणेशोत्सवाचं वातावरण मला फार आवडतं. दिवाळी अंक यायच्या दिवशी तर मी सारखी वाट बघत बसायचे आणि 'कधी येणार' अशी माझ्यासह अनेक लोक विचारणा करायचे. कारण तेव्हा तो सांगितल्या दिवशी येईल याची गॅरंटी नसायची. किंवा तारीख ठरलेलीच नसायची. इथे दोन पाने आहेत 'एक' आणि 'दोन' त्यावर वाट बघता बघता लोकांनी टाईमपास केला आहे. राफाची प्री-दिवाळी अंक 'मोना डार्लिन्ग' ट्रीटपण आहे. एवढं झाल्यावर अंक आला आणि मी तो लग्गेच वाचून काढल्यावर "आम्हाला इतके कष्ट पडले काढायला, तर जरा चवीने तरी वाचायचा!" असे शेरेही आहेत. Happy

२००४ च्या गणेशोत्सवात मी पहिल्यांदा संयोजक मंडळात गेले. असामी, प्रसाद्_शिर, yogibear या अनुभवींबरोबर मी, अरुण, सायो(Sayonara) आणि ट्युलिप होतो. तेव्हा स्वरचिर आरत्या, STY य नेहमीच्या गोष्टींबरोबर स्पर्धाही होत्या. त्यातल्या 'घोषवाक्य' आणि 'चित्रकाव्य' स्पर्धेचं संयोजन मी केलं होतं. सर्वांबरोबर काम करायला खूप मजा आली. या गणेशोत्सवातली एक आठवण म्हणजे 'स्वरचित' आरत्यांमध्ये पेशव्यांनी (Peshwa) रोज एक वेगळी आरती(कविता) लिहिली होती. रोज वेगवेगळे प्रकार. त्यातली "हे द्येवा सोन्डवाल्या" माझी आवडती. त्या सर्व इथे वाचायला मिळतील.

याच्या पुढच्या वर्षी म्हणजे २००५ च्या गणेशोत्सवात मी पहिल्यांदा थोडं 'व्यवस्थापन' प्रकारचं काम केलं. त्या टीममध्ये असामी सोडल्यास सगळा 'महिला वर्ग' होता. Happy मी, चिन्नू, Ninawi (स्वाती_आंबोळे), seema_0618(सीमा), पमा, Eliza आणि ट्युलिप. असामीला बहुतेक सल्ला विचारण्यासाठी घेतलं असावं.

त्यावेळी मंडळ तयार करताना लक्षात आलं की काम काय करायचं असतं, किती वेळ द्यावा लागतो इ. गोष्टी लोकांना माहीत नसतात. तेव्हा हे सगळं लिहून ठेवावं असं वाटलं आणि गणेशोत्सवाच्या स्पर्धा निकाल धाग्यावरच लिहायला सुरुवात केली. "भविष्यात याची बखर होईल" हे तिथले लिंबूटिंबूचे भविष्य खरे झाले. त्याप्रमाणे अजून तो इथे आहे. पण ते बरेचसे जुन्या मायबोलीत लागू होत असल्याने नंतरच्या एका संयोजक मंडळाने नवीन लेखही लिहिला.(लिंक उपलब्ध असल्यास देईन.)

२००६ हे वर्ष मायबोलीचे 'दशकपूर्ती' वर्ष!. तेव्हा त्या वर्षीचा दिवाळी अंक हा 'दशकपूर्ती विशेषांक' काढावा असे मायबोली प्रशासकांना वाटले. त्यांनी त्यावेळी मुख्य संपादकाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि मी 'मुसंबा' झाले. मी, क्षिप्रा, गिरिराज, मैत्रेयी, गजानन देसाई(गजानन), महागुरु, प्रिया आणि चाफा हे संपादक मंडळ होते. हा 'कंपू' अजिबातच नव्हता. काही लोक माझ्या ओळखीचे असले तरी सगळे एकमेकांच्या ओळखीचे नव्हते. क्षिप्रा, गजाननशी माझीही फारशी ओळख नव्हती. पण सगळे टीम प्लेयर होते. मॉडरेटरची मदत लागायची ती आणि इतर मदत मिलिंदाने केली. मैत्रेयीही तेव्हा बहुतेक मॉडरेटर होती. महागुरु हा माझ्या सासरकडचा पाहुणा आहे. "सासरच्या लोकांकडून काम करुन घेतले म्हणता यावे म्हणून मला मंडळात घेतले" असं तेव्हा तो गंमतीने म्हणायचा. Happy

२००६ च्या दिवाळी अंकाच्याआधी मायबोलीवर युनिकोड देवनागरी फाँट आला होता. त्या फाँटमधला हा पहिलाच अंक. दशकपूर्ती निमित्त या अंकात "मी आणि मायबोली" ही स्पर्धा घेण्यात आली होती. रुपेशने केलेलं मुखपृष्ठ देखणं झालं होतं. प्रतिक्रियांमध्ये आवर्जून त्याचा उल्लेख होता.

अंक वेळेवर काढण्याचे सर्वांनीच मनावर घेतलं होतं. Happy नरक चतुर्दशीला सकाळी भारतातल्या मंडळींसह सगळे संपादक मंडळ ऑनलाईन! अजयने स्पर्धा निकालाच्या पानावरचे स्फुट लिहायचे होते ते लिहिले आणि अंक वेळेवर प्रकाशित झाल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. Wink

या अंकासाठी काम करताना आलेला अनुभव आणि मिळालेला आनंद शब्दांत सांगता येणार नाही. यावेळी मी बहुतेक करुन व्यवस्थापनच केले. कामे वाटून देणे, वेळापत्रकाकडे लक्ष ठेवणे, काही निर्णय घेणे इ. प्रत्यक्ष अंकासाठीचे काम हे वरच्या मंडळींनी, शुद्धलेखनात मदत करणार्‍यांनी आणि प्रमोद (टेम्प्लेट), रेखाटनकार फ(संकल्प द्रविड), रचना, नीलू यांनी केलं. त्यामुळं या प्रकारच्या कामानंतर "मला श्रेय मिळते - भल्याचे, बुर्‍याचे. स्मरेना खरे मी कधी काय केले" असंच म्हणायची वेळ येते..

या अनुभवानंतर 'दिवाळी अंक व्यवस्थापन' लेख लिहिणं ओघानं आलंच. पण ते काम बरंच नंतर केलं. २००७ मध्ये चाफा मुख्य संपादक असताना मी सल्लागार होते. नंतर २००८ मध्ये मेधा (शोनू) मुसंबा असताना मी आणि चाफ्याने मिळून मंडळाला सल्ले देत देत तो लेख लिहिला.

या अंकाशी निगडीत एक वाद 'संपादन आणि बरेच काही' मध्ये वाचायला मिळेल. बी ने त्याची एक कविता मंडळाने का नाकारली याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते, मंडळाने मेलला उत्तर का नाही दिले ही एक तक्रार होती. हे आत्ता आठवायचं कारण असं की हल्ली याच बी च्या नेतृत्वाखाली मला 'विश्वचषक' अंकाच्या मंडळात काम करायची संधी मिळाली. ('वेळ आली'. यालाच 'काळाचा महिमा' असे म्हणतात. Light 1 ) 'बी' पुढाकार घेऊन काही करतोय म्हणून शुद्धलेखन तपासायला मी मदत करण्याची तयारी दाखवली. तर याने मला संपादक मंडळातच टाकलं. पण 'तेवढे जमणार असेल तर तेवढेच केलेस तरी चालेल' म्हणाला. संपादक/संयोजकानी मेल्सना वेळेत उत्तर देण्याबद्दल तो फारच काटेकोर आहे. घोषणेच्या धाग्यावरही त्याने 'काही तासातच पोच देऊ' असे लिहिले होते. (जे मी मुद्रितशोधन करताना हळून काढले. Happy ) पण मला खात्री आहे त्याने तत्परतेने पोच दिली असणार. सगळे नवीन लोक चांगले काम करत आहेत. लवकरच अंक पहायला मिळेल.

गणेशोत्सव आणि दिवाळी अंक हे वर्षानुवर्षे ठरलेल्या उपक्रमांशिवाय एक नवीन उपक्रम २००६ मध्ये सुरु झाला, 'संवाद'. हा उपक्रम सुरु झाला तेव्हा काम करणारा एक छोटा ग्रूप होता. यातली पहिली, आयोवाच्या state representative स्वाती दांडेकर यांची मुलाखत मी घेतली होती. नंतर अनेक उत्तम मुलाखती आल्या. ज्यांना शक्य होईल त्या मायबोलीकरांनी मायबोलीसाठी विविध क्षेत्रातल्या मराठी लोकांच्या मुलाखती घेतल्या. हा उपक्रम तसा लगेचच स्वावलंबी झाला. मुलाखत घेणारे, इतर मदत करणारे स्वयंसेवक उपलब्ध झाले. 'संवाद' मध्येच storvi ने घेतलेली प्रकाश भालेरावांची मुलाखत माझी फार आवडती आहे. भाषांतर करण्याच्या निमित्ताने माझा त्याला हातभार लागला याचा आनंद वाटला. पण पहिल्या स्वाती दांडेकरांच्या मुलाखतीनंतर आजतागायत मला पुन्हा कोणाशी संवाद साधणे जमले नाही. (हिलरीला विचारावे का? Happy )

२००९ मध्ये "संयुक्ता" ची सुरुवात झाली.या ग्रूपची प्रशासक म्हणून मी सुरुवातीचे वर्ष मी एकटीने आणि मग 'प्रशासक टीम' बनवून काम पाहिले. 'मराठी भाषा दिवस', 'महिला दिन' अश्या संयुक्ताच्या उपक्रमांत गरज पडेल तशी व्यवस्थापन आणि इतर कामे केली. संयुक्तामुळे माझे बरेचसे लक्ष त्यातल्या उपक्रमांकडे वळले. त्यामुळे बाकी उपक्रमांत सहभागापुरती उरले. अलिकडेच मी संयुक्ता प्रशासनातून बाहेर पडले आहे. तिथे काही सदस्यांनी मिळून प्रशासनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

एखादा उपक्रम सतत चालू रहाण्यासाठी नवीन लोकांनी पुढाकार घेणं, त्यांचा सहभाग हे फार महत्त्वाचं असतं. असे उपक्रम कोणा एकाची मक्तेदारी/जबाबदारी झाले की त्या व्यक्तीने काम थांबवले की ते थांबतात. मायबोलीवरच्या कुठल्याच उपक्रमावर अशी वेळ कधी येणार नाही. खूप नवीन, उत्साही लोक आहेत. आणि लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यात किती आनंद मिळतो आणि किती शिकायला मिळते हे 'मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने' या मायबोली प्रशासनाने लिहिलेल्या लेखापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने मला सांगता येणार नाही.

मायबोलीच्या काही उपक्रमांच्या सुरुवातीला माझा हातभार लागला याचे मला समाधान आहेच पण ते अनेक वर्षे असेच चालू राहिले तर जास्त आनंद होईल. (कल्लोळाची परंपरा चालू राहिली तर त्याची सुरुवात मी केली असे सांगता येईल. Wink )

आजही मायबोलीसाठी गणेशोत्सव, दिवाळी अंक, मराठी भाषा दिवस, महिला दिन, गजल कार्यशाळा, अक्षरवार्ता, मदत समिती, चाचणी समिती इ अनेक ठिकाणी अनेक स्वयंसेवक आपापली व्यवधाने सांभाळून काम करतात. त्या सर्वांचे आभार आणि हा लेख त्यांना अर्पण...

मी अजून चाचणी समितीत आहेच! तरी एवढं सगळं केल्यानंतर आता काय करावसं वाटतं असं विचारलं तर एक उत्तर आहे. मध्यंतरी गावांचे ग्रूप व्यवस्थापक नेमले. जसे बंगळुरुची शैलजा, कनेक्टिकट - अमृता, अॅटलांटा-Adm, जपान- ऋयाम इ. पार्ल्याला अजून कोणी नेमले नाही. ते अॅडमिनकडेच आहे. मला 'पार्ले' ग्रूपची व्यवस्थापक व्हायचे आहे. हे म्हणजे सुशीलकुमार शिंदेना केंद्रीय मंत्री झाल्यावर कोण होण्याची महत्त्वाकांक्षा आहे विचारावे आणि त्यांनी सांगावं 'महाराष्ट्राचा मुख्यमंत्री', तसं झालं. घरची ओढ. पण आहे हे असं आहे. Happy

तर हे पार्ले आहे तरी काय? ते माझे 'घर' कसे झाले, त्याचा इतिहास, पार्लेकर आणि 'पार्लेइझम' याबद्दल आपण या पुढच्या लेखात वाचू- "फॉरबिडन सिटी" Happy

दशकपूर्ती १
दशकपूर्ती २
दशकपूर्ती ३

विषय: 
प्रकार: 

मस्त जमलाय हा भाग. अंकावर काम करतानाची एक्साईटमेंट , कधी न पाहिलेल्या लोकांबरोबर फोन, इमेल अन चॅटवरून एकत्र काम करणे, वेगवेगळे टाईम झोन, लोड शेडिंग , सुट्ट्यांचे गणित जमवणे यातली मजा काही औरच. वैयक्तीक कमिट्मेंटमुळे अशा कामांमधे हवा तितका सहभाग घेता येत नाही ही रुखरुख असते मला कायम.

लालू.. तुला कुठल्यातरी जुन्या गोष्टी आठवतात आणि नजिकच्या भुतकाळातल्या संदर्भांच्या अनुल्लेख करतेस.. !!! Happy तू आमच्या म्हणजे २००८ सालच्या गणेशोत्सव मंडळासाठीही सल्लागार होतीस.. तेव्हा मु.सं. सकट सगळे जण पहिल्यांदाच काम करत होते आणि तुझ्या अनुभवाचा आणि लागतील तिथल्या आणि लागतील तेव्हड्याच दिलेल्या सल्ल्यांचा आम्हांला खूप उपयोग झाला होता.. (मला खात्री आहे की त्या मंडळातले सगळ्यांचं ह्याला अनुमोदन असेल... ) मला आठवतय तेव्हा अमेरिकेतल्या निवडणूका होत्या आणि त्यामुळे तू फारच बिझी (;)) होतीस.. आणि तरी मी आणि रूनी तुला रात्री वीक डे ला ११ च्या सुमारास फोन करून "लवकर मुर्ती सजावट रिव्हू कर आणि हे असं चालेल ना ते सांग" असं विचारल्याचं आठवतय.. Happy

रैना वर म्हणाली तसं २०१० च्या दिवाळी अंक मंडळालाही तुझ्या लेखाचा खूप उपयोग झाला होता..

अजून एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते.. कुठल्याही मंडळातलं "सल्लागार" हे पद फार महत्त्वाचं असतं ! योग्य ठिकाणी सल्ले दिले नाहीत तर चूका राहून जाऊ शकतात, उगीच सल्ले देत राहिलं तर मंडळातली लोकं वैतागू शकतात.. मी आत्तापर्यंत तीन मंडळांत काम केलं... त्यापैकी सर्वोत्तम मु.सं. कोण हे ठरवणं जवळजवळ अशक्य असलं तरी सर्वोत्तम सल्लागार मात्र नक्कीच लालू !!
लालू, तू सध्या इतर कुठल्या व्यवस्थापनात नसलीस तर सल्लागारांची कार्यशाळा घ्यायचं मनावर घे.. Happy

बायदवे,
नंतरच्या एका संयोजक मंडळाने नवीन लेखही लिहिला. >>>> मला माहित नाही तू नक्की कुठल्या लेखाबद्दल बोलत्येस पण मी मागच्या वर्षी तुझ्या लेखाला झब्बू दिला होता.. (सशल.. रिक्षा.. प्लीज नोट.. Proud )

फॉरबिडन सिटी !!! ह्म्म्म्म्म्म Proud

पगुआ, ती मुद्दाम अनुल्लेख करत नाही (नसावी). तुझी स्मरणशक्ती किती चांगली आहे याची चाचपणी करत आहे Proud
लालवाक्का, हा भागपण छान जमला आहे. पण 'फोर्बिडन सिटी' सगळ्यात पॉप्युलर होणार बघ Wink

सल्लागाराचा थेट सहभाग नसतो म्हणून उल्लेख केला नाही. फक्त दिवाळी अंक व्यवस्थापन लेखासंदर्भात तो उल्लेख आला. ते काम तर नेहमीच चालू असते. Wink

>>उगीच सल्ले देत राहिलं तर मंडळातली लोकं वैतागू शकतात
हे कदाचित सल्ला कोण देतंय यावर अवलंबून असावं. Lol

विनोदाचा भाग वगळता, मीसुद्धा मला वाटेल तेव्हा सल्ला देईनच. विचारला जाण्याची वाट पहाणार नाही. विचारल्यावरही देईन.जे सांगितले पाहिजे असे वाटते ते सल्लागार सांगणारच. ते त्यांच्या अनुभवावरुन त्या परिस्थितीत काय योग्य वाटते, त्यांनी काय केले होते/करतील याबद्दल सांगतात. ते मानायचे की नाही हा अर्थातच संयोजकांचा/संपादकांचा निर्णय आहे. त्यात वैतागायचे काय हे मला कळले नाही.

हे कदाचित सल्ला कोण देतंय यावर अवलंबून असावं. >>>> खरंय Proud

लालू, लष्कराच्या भाकर्‍या एकदम ग्रेट लेख! खरंच. आता पार - ले येऊदे लवकर Happy

आधी या उपक्रमांतर्गत होणार्‍या चर्चा याहू ग्रूपांवर व्हायच्या. नव्या मायबोलीत खाजगी ग्रूप उघडायची सोय झाली मग हे सगळे मायबोलीवरच करता येऊ लागले. Happy

चांगला झालाय हा भाग. बर्‍याच लष्कराच्या भाकरी भाजलेल्या असल्याने हा भाग अगदी हृद्य वाटला. Happy
बाकी मदत समिती झोपलीय का हा प्रश्न अजूनही लोक विचारतातच Lol

Happy ह्यातली जवळ जवळ प्रत्येक गोष्ट बघायला मिळाल्याने तर खुपच आवडला हा भाग.
पण खर सांगु का "पार्ले बाफ" वर लिहिणार या कल्पनेने मला आता काही लिहिताच येईना झालय. त्यामुळे थोड्यावेळाने परत लिहिन. Proud

छान आढावा.
फर्बिडन सिटि: विशिष्ठ शहरापेक्षा मुंबईतल्या एका अतिसामान्य गावाचे प्रस्त माबोवर कसे वाढले? उत्सुकता ताणली जातेय... Happy

मस्तच!..
२००९ चा गणेशोत्सव आठवला. लष्कराच्या भाकर्‍या मस्त असतात हे कळले!
अजुन अंकात काम नाही केले. त्याची मजा अजुन सही असणार !

सल्लागार म्हणजे सल्ला देऊन गार करायचं काम का ? Lol
पण विविध उपक्रम /अंकासाठी तुम्हा सगळ्यांच डेडीकेशन जाणवतं.

Lol ये पार्ले पार्ले क्या है?? (ये इलु इलु क्या है च्या चालीवर Wink
पार्ले द फॉर्बिडन सिटी Proud )
लौकर लिही.. उत्सुकता शिगेला पोचलीये

सहि लिहिलेय हेपण! Happy

२००६ च्य दिवाळी अंकाचा अनुभव मस्तच होता. एकदा भाकरी भाजल्या तरी नाकी नऊ येतात तुम्ही लोक्स जे नेह्मी भाकरी भाजतात त्यांची कमालच आहे म्हणायची!

आणि अत्याधिक कमाल आडमिन यांची! Happy

मजा आली वाचताना ... २००५ अ‍ॅडवाईजर ने जाम जेरीस आणले होते. गणपतीला मस्का मारण्याशीवाय गत्यंतर नव्हते Happy

बापरे! केवढे मोठे डॉक्यूमेंटेशन घेतले आहेस लालू!!!! मज्जा येते आहे. अजून अजून लिहि.

Pages