अंतिम सत्य!
नुकतेच श्री सत्य साई बाबा यांचे निधन झाले. देव त्यांना सद्गती देवो!
अनेक वाहिन्यांवरून त्याबद्दल आणि एकंदरीत त्यांच्या कारभार, आयुष्याबदल अनेक गोष्टी पुन्हा दाखवल्या गेल्या. त्यांचे अनेक भक्त आहेत देश, विदेशात, अनेक क्षेत्रातील अन अनेक सामाजिक स्तरात देखील. बाबांचे कार्य मोठे आहे, समाजाकरिता त्यांनी खूप काही केले आहे हे प्रत्त्यक्षात पुट्टपर्थीला जाऊन आलेले सांगतात /मानतात. लहानपणापासून बाबांच्या चमत्कार /जादू इ.च्या कथा ऐकून आहे. बु.प्रा. वाद आणि श्रद्धावाद या दोन गटांत यांवरून कायम वाद आहेच. प्रत्येकाची आपापाली कारणे, स्पष्टीकरणे. त्यापासून मी मुळातच दूर आहे- माझा वैयक्तिक स्वभाव म्हणा. पण चमत्कार, गंडे, दोरे, विभूती इ. सर्व मला वैयक्तिक कधीही अपिल झालेले नाही. "जो काही अनुभव आहे" तो वैयक्तिक असतो अन तो स्वतःला पटल्याशी मतलब, हे मी मान्य करतो. "तसा" काही अनुभव सत्यसाईबाबांच्या बाबतीत मला नसल्याने त्याबद्दल कुठलेच भाषण करणे योग्य नाही. एक आहे- लाखो लोकांच्या सेवा, शिक्षण, आरोग्य यासाठी सुविधा अन पैसा ऊपलब्ध करून देणार्या बाबांचे "देवपण" व्यावहारिक अर्थाने निश्चित मान्य केले तरी मग ते सिद्ध करायला कुठल्याही चमत्कार/जादू इ. ची गरज खुद्द बाबांनाही उरत नाही. तसे करण्यामागे त्यांचा हेतू काय होता या एका साशंकतेमुळेदेखील मी "त्या" वाटेला गेलो नाही असे मला वाटते. अर्थात यात "अनुभवाविण ज्ञान व्यर्थ आहे" याचा दोष माझा आहे.
पण क्रिकेटचा देव आणि आमचा सर्वांचा लाडका सचिनदेखील बाबांच्या अंतिम दर्शनाला उपस्थित राहिला आणि त्याने त्याचा वैयक्तिक शोक/दु:ख प्रकट केले ही एक बाब कायम स्मरणात राहील. सचिनदेखील शोकमग्न झाला हे पुरेसे आहे. (अर्थात तोही माणूस आहे, त्याला भावना आहेत). एरवी एखाद्या बाबा, बुवा, वा महाराजांनी दिलेली बॅट वापरली म्हणून मी आजवर यशस्वी होत आलो, असे म्हणणारा सचिन नाही. दगडाला लाथ मारून पाणी काढण्याची क्षमता अन प्रयत्न/जिद्द त्याच्याकडे आहे हे त्याने सिद्ध केले आहे. पण असा कर्म/ कर्तृत्व/ प्रयत्न यांवर विश्वास ठेवणारा आजच्या पिढीचा आदर्शदेखील जेव्हा अशा प्रकारे काही वैयक्तिक गोष्टी उघड करतो तेव्हा आयुष्यात "श्रद्धा" याचे स्थान मह्त्वाचे आहे हे मान्य करावे लागते. सचिन प्रमाणेच इतरही प्रथितयश, सुशिक्षीत वगैरे अनेक लोक सत्य साई बाबांचे आशीर्वाद घेत असत हेही ऐकून आहे. तेव्हा थोडक्यात हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे.
माझ्यापुरते बोलायचे तर श्री सत्यसाई बाबांनादेखील जीवन-मरणाच्या शेवटच्या संघर्षात, आय.सी.यू. मध्ये ठेवून तज्ञ डॉक्टरांचे ऊपचार घ्यावे लागले हे एक अंतिम सत्य आहे! जन्म घेतलेल्या प्रत्येक प्राणीमात्राला मृत्यू अटळ आहे, व्यावहारीक संघर्ष सर्वांना अटळ आहे, मग ही एक बाब स्वीकारून मनाने या व्यावहारीक चक्रातून मुक्त झालेला मनुष्य अधिक समाधानाचे, परीपूर्ण, आनंददायी असे आयुष्य जगत असेल काय? प्रयत्न, श्रद्धा, दैव, देव, वगैरे अनेक संकल्पनांचे चवितचर्वण केल्यावर शिल्लक काय रहाते- आयुष्य कसे जगलो, आणि मृत्यूनंतर मागे काय शिल्लक राहिले? कुठे जन्म घेऊ आणि कधी मरण येणार हे माहीत नाही- अंतिम सत्य जर इतके स्वच्छ आणि कटू असेल तर निदान एका आयुष्यात आपल्या बरोबर इतर चार जणांचे कल्याण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले तर ते आयुष्य "सार्थकी" लागले! त्या अर्थाने आपले चांगले कर्म हेच आपल्या हयातीत अन आपल्या पश्चात असलेली आपली लाईफ इंश्युरंस पॉलिसी आहे असे म्हणावे लागेल. सोन्याची तुला, सिंहासने, इत्यादी रत्नजडीत श्रद्धांचा सोन्याचा बाजार मांडणारे आपण "सोन्यासारखी" माणसे कधी होणार आणि मिळवणार? सत्य साई बाबांच्या जीवन आलेखातून हा संदेश प्रामुख्याने पुढे आला तरी समाधान होईल.
"जन पळभर म्हणतील हाय हाय.. मी जाता राहील कार्य काय..."
रच्याकने: श्री सत्त्य साई बाबा यांचे मूळ नाव काय आणि त्यांना ही उपाधी/पदवी कशी मिळाली यावर कुणी प्रकाश टाकू शकेल काय?
(शुध्दलेखन सहाय्यः शैलजा)
आर्च, बाबांचे फॅन फॉलॉईंग आणि
आर्च,
बाबांचे फॅन फॉलॉईंग आणि साई ट्रस्ट चा पसारा बघता १२ करोड काहीच नाही... नगण्य!
आणि बालाजीच्या मंदीरात यापेक्षा जास्ते सोने सापडेल. असो. ट्रस्ट च्या नावे जमा होणार आणखिन कुठे.
दोष या बाबतीत बाबांचा वाटत नाही त्यांना मालामाल करणार्यांचा आहे. आणि ईतक्या लोकांवर आपली "माया" पसरवणार्या बाबांना थोडे तरी क्रेडीट त्याबद्दल मिळायलाच हवे
मोजणी करताना कुणी काही माल
मोजणी करताना कुणी काही माल खिशात घातला नसेल का? किम्वा खिशात घालून उरलेला एव्हढा हा माल आहे??
बाबांना आपल्या खोलीला
बाबांना आपल्या खोलीला 'बायोमेट्रीक' कुलुप लावावे लागले ??
त्या सत्यजितचं काही खरं नाहिये असं वाटतंय. त्याला संपवण्यात येण्याची शक्यता वाटतेय.
सचिनच्या वैयक्तीक
सचिनच्या वैयक्तीक श्रद्धेबद्दल बोलणं बरोबर नाही; पण ज्याच्याबद्दल नितांत आदर आहे, त्या सचिनने असं कांही केलं [योग्य असो किंवा अयोग्य ] कीं त्याचा गवगवा होतोच व त्यामुळे सामान्य माणसाचा बुद्धीभेद होण्याची शक्यता खूपच असते, हेही नाकारता येत नाही. सडेतोड विचारांचे मुख्य निर्वाचन अधिकारी श्री. शेशन यांच्याही स.सा.बा.च्या जवळीकेमुळे असा बुद्धीभेद झालाच होता. त्यामुळे त्यावर चर्चा होण गैर नसावं. सचिनच्या किंवा इतर कोणाच्याही वैयक्तिक श्रद्धेला तें आव्हान नसून, केवळ सचिनची श्रद्धा आहे म्हणून ती स्विकारार्ह आहे असं मानूं नये, एवढाच संदेश त्या चर्चेतून दिला जातो , व दिला जावा.
Pages