मार्च पर्यंतच सगळे महत्वाचे ट्रेक सुखरुप पार पडले होते... उन्हाळ्याच्या दिवसात सह्याद्रीतील ट्रेक म्हणजे फारच खडतर काम असते... तोरणा-राजगड करून महिना उलटला होता... संधन व्हॅली, उल्हास व्हॅली हे सोप्या कॅटेगीरी मोडणारा ट्रेक करायचा कट शिजला होता... पण शिजलेला कट उधळण्यास वेळ लागत नाही.
झाले ही तसेच... दिनदर्शिका चाळताना सोमवार १८ एप्रिलला चैत्र पौर्णिमा येत असल्याचे निर्दशनास आले... लगेचच मी शनिवार १६ अप्रिलच्या moonlight trekचे सुतोवाच भटकंती कट्ट्यावर केले... तरी जायचे कुठे या वर मात्र प्रश्णचिन्हच होते...
"गोरखगड!" तो प्रश्ण Yo Rocks ने सोडवला.
Yo ने मेलामेली करून कल्याण-मुरबाड-देहरी-गोरखगड असा कार्यक्रम आधीच जाहिर केला होता... ठाण्यातील अॅडमिन गटग आटोपून कल्याणला पोहचायला मला साडे दहा झाले... Yo ने एकरा ट्रेकर्सची जुळवाजुळव केल्यावर कल्याण वरून सव्वा अकराची मुरबाडला जाणारी शेवटची येस्टी पकडली... येस्टीत बसल्यावर ट्रेकचा 'खजिनदार' कोण? यावर बरीच टोलवा-टोलवी झाल्यावर गिरिविहारने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला... :p पुढे मुरबाड वरून देहरीला जाणारी येस्टी दोन मिनिटातच सुटते अशी आगाऊ सुचना Yo ने देऊन ठेवली होती... मुरबाडला पोहचताच ठरल्या प्रमाणे सगळा लवाजमा देहरीच्या येस्टीत घुसला... तिथे तर आधीच Yo चे Trekmates स्थिरस्थावर झालेले दिसले... मग काय एकच जल्लोष झाला.
खच्चुन भरलेल्या बस मधे मला ड्रायव्हरच्या मागे उभं रहाण्याची शिक्षा मिळाली... त्यातच एक गावकरी तर चक्क ड्रायव्हरच्या सिट मागेच बसला होता... साधारण एका तासात देहरी गाठले... गाव सामसुम होतं... ट्रेकमेट्सची मंडळी चहानाष्टा करून ट्रेकला सुरवात करणार होते... तीच संधी साधुन आम्ही गुहेवर ताबा मिळविण्याचा मनसुबा मनाशी ठरवून पुढे निघायचे ठरविले... निघण्या पुर्वी ठाणे गटगचे भेट-वडे आणि मैत्री-पेढ्यांची आहुती देण्यात आली... हवेत अजिबात गारवा जाणवत नव्हता... त्रयोदशीचा चंद्र आपलं काम चोख बजावत होता... इथे उणिव होती ती फक्त एका कवि मनाची
टॉर्च, कॅमेरे आदींनी सशस्त्र झालेल्या मावळ्यांनी गोरखगडाकडे कुच केली तेव्हा मध्यरात्रीचे दिड वाजून गेले होते... मुख्य रस्त्यावरील विहिर मागे टाकून डाविकडिल देवळाकडे वळलो आणि देवाळा मागिल रस्त्याने मार्गक्रमण सुरू केले...
पंधराव्या मिनिटाला हाशऽऽहुश्शऽऽ करत पहिला पडाव पडला... थोडीफार उंची गाठल्याने चांदण्यात सुखं झालेल गावं दिसलं... तेथुन थोडं पुढ गेल्यावर चढाईचा पहिला टप्पा लागला... तो टप्पा पार करता करता सगळे मावळे घामाने चिंब झाले...
रात्री ही परिस्थीती तर उद्या उतरताना काय हाल होणार याची जाणिव झाली... पहिल्या टप्प्या नंतर पठार लागले तसे प्रत्येकाचे कॅमेरे बाहेर येऊ लागले. जल्ला या कोळाखातही फोटो काढण्याची खुमखुमी काही स्वस्थ बसू देईना... म्हंटले फोटो कसला काढता तर, म्हणे "गोस्ट ट्री"चा... हो... बरोबर ऐकलात तुम्ही... 'गोस्ट ट्री'!... खोडांपासून फांद्यांपर्यंत पार सफेद रंगाची झाडे... त्यात तो चंद्रप्रकाश तर त्यांच्या रुपात अधिकच भर घालित होता... एकदम गुढरम्य! पहिल्यांदा पाहिले तेव्हा भारीच वाटलं... पण जसं जसं पुढे जाऊ लागलो तस तसे त्या गोस्ट ट्री च्या फांद्यांच्या आकारांनी अमानविय बाफच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या...
पठार संपल्यावर मुख्य चढाईला लागलो तसे आमच्या मधिल अंतर वाढत चालले... मानसिक आधारासाठी मग त्या जंगलात एऽओऽ सुरांची जुगलबंदी सुरू झाली... काही वेळाने पुढे गेलेले ट्रेकर्स साद देईनासे झाले... तेव्हा नक्की कोण चुकले याचा अंदाज येईनासा झाला... रोमाने जरा आजू बाजूचा कानोसा घेऊन योग्य वाट असल्याची खात्री केली आणि वाटचाल पुन्हा सुरू झाली... डाविकडे गोरखचा उभा कडा आणि उजविकडे धमधम्याचा उंचच उंच डोंगर दिसत होते... त्यावर बिनधास्त बागडणारे धुके पाहुन पुन्हा एकदा कवि मनाची उणिव प्रखर्षाने जाणवली...
उजविकडे दूर सिद्धगडावर तांबडी माळ दिसत होती... कुणाला तो वणवा वाटतं होता तर कुणाला सिद्धगड माची वरिल वस्तीचा शोध लागतं होता... रातकिड्यांच वाद्यवृंद, धुक्यात हरवलेले डोंगर, चांदणं शिंपडलेल्या डोंगरवाटा आणि काय हवं दुर्गभ्रमंती साठी... मस्तच... आपसूकच अंगावर शहारा येऊन गेला...
काही वेळाने एका पडक्या देवळापाशी पुढे गेलेले आमचे खट्ट्याळ लोक्स भेटले... देवळा समोरच पाण्याची टाकी आहे... नळा खाली कोरडा घसा ओला करून रिकाम्या बाटल्या भरून घेतल्या... ताजेतवाने झाल्यावर ट्रेक मधिल अंतिम चढ चढायला सुरवात केली... चढ सोप्पा होता पण अंधारात वाट सापडत नव्हती... शे-दिडशे फूट वर चढून गेल्यावर गोरखगडाचा दरवाजा दिसला... महाराजांच्या इतर गडांप्रमाणेच हा दरवाजाही आत शिरताच उजविकडे वळणारा होता... दरवाजात मिट्ट अंधार...
दरवाजात नारेबाजी करून पुढे सरकलो... पुढं एका पायरीवर शिलालेख दिसला... दरवाजातून उजविकडे गेल्यावर मश्चिंद्रगडाचे दर्शन झाले...
तेथून दहा पावलांवर गुहा सापडली... पुढे गेलेले टवाळखोर कोणत्या रस्त्याने गेले याचा अंदाज घेण्यासाठी पुन्हा एऽओऽ ची आळवणी झाली... पण व्यर्थ तिन वाजून गेले होते... मी, गिरि आणि Yo ने गुहेत जाऊन आधी पाठिवरील वजन कमी करू नी मग शोध मोहिम हाती घेऊ असे ठरविले... गिरीने गुहेत प्रवेश करताच दुसर्या क्षणाला गुहेत दबा धरून बसलेल्या टवाळखोरांनी जंगली चित्कारांनी गुहा दणाणून सोडली... #@$%@#$^
गुहेचा विस्तार मोठा होता... ५० एक जणांची आरामात रहाण्याची सोय होऊ शकते एव्हढा प्रशस्त मंडप होता... गुहेच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर दत्तगुरू आणि साईबाबांचे चित्र रेखाटलेलं होतं... जेवणासाठी चूलीची सोय होती... दिवा, मेणबत्तीची सोय देखिल होती... गुहे शेजारील टाक्यात पाणी होतं पण ते फार खाली गेल्या मुळे काढणे शक्य नव्हते... चढाई करून थकलेल्या प्रत्येक जिवाने आपली आवडती जागा बळकवून पथारी पसरली...
साधारण साडे पाचच्या सुमारास जाग आली तेव्हा गुहेतील अंधाराला बाहेरील संधी प्रकाशाचे आव्हान देणे सुरू होते... एक दिड तासाच्या झोपेने चढाईचा थकवा निघून गेला होता... उनं डोक्यावर यायच्या आधी बाकी राहिलेला गुहेच्या वरिल कडा सर करून खाली उतरायचे होते... लगेच आवराआवर करून पहाटेच्या प्रकाशात गुहेच्या डाविकडील वाट पकडली... विस एक पावलांवर कड्यावर जाणार्या पायर्या दिसू लागल्या... सुरवातीचा १० फुटाचा बिनपायरीचा टप्पा चढून गेल्यावर पुढील गुढगाभर उंचीच्या पायर्या जातीने चौकशी करत होत्या... ("कसे उतरता तेच बघते" असा काहिसा रांगडा भाव त्यांतून प्रतीत होत होता.)
पाचच मिनिटांत सुळक्याच्या माथ्यावर पोहचलो... तेव्हा नारायण सुर्वे परिटघडीचा गणवेष परिधान करून कामावर निघाले होते... माथ्यावरील अरुंद जागेत महादेवाचे मंदिर आहे... त्याला नमस्कार करून टेहळणीचा कार्यक्रम सुरू झाला...
पुर्वेला सह्याद्रीच्या रांगेत नानाचा अंगठा, जिवधनचा परिसर दिसत होता... तर समोर धमधम्या आणि दक्षिणेला सिद्धगड ताठ मानेने उभा होता...
<
पश्विमे पासून उत्तरे पर्यंत मुरबाड ते देहरी पर्यंतचा परिसर नजरेत येत होता... दिशा ज्ञान अवगत होई पर्यंत सुर्व्या लालबुंद झाला होता... Yo ने लगेच उडी उडीचा कार्यक्रम सुरू केला, पण जागेच्या कमतरतेमुळे सगळ्यांच्या उड्या फसत होत्या... उडीबाबा उडीबाबा !!
पोटभर उड्या मारून झाल्यावर खाली उतरताना प्रगोची भंबेरी उडाली होती...
गुहे जवळ आलो तेव्हा मर्कटलीला सुरू होत्या... पाण्या अभावी तिथे नाष्टा करणे सोईस्कर नव्हते... म्हणून Yo आणि Jo(शी) ने खाली पडक्या देवळापाशी असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ चूल पेटवण्याची सुचना केली... Jo सोबत मी खाली उतरलो... मागोमाग नविन, शाम, संदिप, Yo खाली उतरले... देवळापाशी आयती चूल मिळालाच नविन आणि संदिपने काड्या टाकणे सुरू केले. :p
नविनने आठवणीने मॅगी आणि चहासाठी दोन टोप आणले होते... सोबत मॅगी खाण्यासाठी ८ चमचे सुद्धा... व्वा!!! सगळेच खुष... आता कमी होती ती फक्त ताट आणि वाट्यांची... मग काय 'भुक के आगे तुट पडो'... त्याच टोपात सामुहीक मॅगी ओरपण्याचा कार्यक्रम पार पडला... चहापानाला नको म्हणणारे इतर लोक्स चहाची टेस्ट कळल्यावर रोमाच्या थालीतच सामुहिक चायपानाला हजर झाले... मॅगी, केक, चकली, चहा असा भरपेट नाष्टा झाल्यावर मंडळी जड अंत:करणाने जागची हलली... सुर्व्याने कॉलर टाईट करायच्या आत गाव गाठावे म्हणून झपाझप पावले टाकीत उतरू लागली... वाटेत करवंदीची जाळी दिसताच गिलबिले बंधू त्यावर तुटून पडत होते... "काकडीवर पाणी नसते पियायचे" Yo ने मला राग दिला... "खरयं... पण मला चालते", म्हणून त्याची समजूत काढल्यावर Yo ने तोच कित्ता गिरविला.. :p
साडे दहाच्या सुमारास गावा जवळील देवाळात उतरलो... तिथे Yoने आणलेले जाम खाऊन श्रमपरिहार केला... देहरी फाट्यावर जाऊन येस्टीची चौकशी केली असता "एक वडा दोन पाव" टाईप उत्तरे मिळाली... जिप वाल्याशी बोलणी फिस्कटल्यावर नविन ने "वाट पाहिन पण येस्टीने जाईन" असा पवित्रा घेतला... एक तास उलटला तरी आमच्या तपश्चर्येला फळ येत नव्हते... तेव्हढ्यात समोरील दुकानावर आलेल्या 'जीपदूता'ला आमचा पुळका आला आणि त्याने वाहन मालकाशी संधान साधून जीप बोलवण्याचे कबूल केले... या वेळी Joने बोलणी करून एकरा जणांचे १०००>>>> ८००>>> ४००>> करता करता ३०० रुपयांचा 'शब्द' जीप वाल्याला दिला... जाताना तो 'जीपदूत' बजावून गेला, दुसरा कोणा सोबत जाऊ नका... आमचा माणूस येईल पंधरा मिनिटांत.
भगवान पे भरोसा ठेवून येईल त्या वहानाकडे सगळे आशाळभूत चेहर्याने बघत होतो... खुर्चिवाहू ट्रक, कोंबड्यांचा टेम्पो, बैलगाडी... आमची अधोगती सुरू होती... पण यशाची गाडी का काय ती येईना... मधेच गिरि ने Joला विचारले, "जिप वाल्याचा मोबाईल नं. तरी घेतला का?"... नकार ऐकताच शिणलेल्या कपाळांवरील आठ्या अजूनच जाड झाल्या...
आली!!!! आली!!!! आली!!!! सरते शेवटी ती नविनच्या हाकेला धावून आली... आणि आम्ही सगळे Jo ने पाचच मिनिटा पूर्वी दिलेला 'शब्द' मोडून येस्टीत घुसलो... :p
-----------------------------
प्रचि Yo Rockच्या कॅमेर्यातून साभार
मस्तच राव... लय भारि... माझा
मस्तच राव... लय भारि...
माझा पहिलाच night trek, आणि कसला भन्नाट अनुभव... एकदम जबरदस्त..
इंद्रा, वर्णन छानच....
निघण्या पुर्वी ठाणे गटगचे भेट-वडे आणि मैत्री-पेढ्यांची आहुती देण्यात आली...>>>वड्यांची आहुती... या आहुती चे परिणाम म्हणजे आमचे मावळे वाटेत डरकाळ्या फोडत चालत होते
आणि पहाटे ठिक ३:४५ मि.नी (!!!) या मावळ्यांनी गडावर पोहचल्यावर (न आलेल्यांना) मोबाईलमधुन तोफांची सलामी दिली.>>>
मस्त वृत्तांत !! १) खरच यार
मस्त वृत्तांत !!
१) खरच यार त्या रॉक पॅच वरुन उतरताना माझी खरच फाटलेली ......च्यायला कुलुंग( केवळ *ल्ह्यांनीच लंघता येतो तो ) वरही इतकी भीती वाटली नव्हती ...
अर्थात तो रॉक पॅच घाबरुन केला नसता तर ट्रेकला अर्थच राहीला नसता
२)त्या शिलालेखाचा अर्थ लावायचा प्रयत्न करीत आहे ...त्यातला एक शब्द "पाटील" , अन तारीख काहीतरी १९२० (अंदाजे )असे काहीसे आहे
३) वेगळ्या ष्टाईलचा वृत्तांत लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे
लै भारी राव..........
लै भारी राव..........
इंद्रा , मस्तच रे ! सह्ही
इंद्रा , मस्तच रे !
सह्ही ट्रेक झाला .... छान वर्णन !
लय भारी वर्णन !!! थेट
लय भारी वर्णन !!!
थेट किल्ल्यावराच
मस्त वर्णन आणि जबरद्सत ट्रेक
मस्त वर्णन आणि जबरद्सत ट्रेक ' लइ भारी '
Pages