क्षण क्षण!

Submitted by नीधप on 17 April, 2011 - 07:54

जुनीच कविता. २००६ मधे 'आतल्यासहित माणूस' हा कवितांचा नाट्याविष्कार असा प्रयोग मी दिग्दर्शित केला होता. मायबोलीवर मला भेटलेल्या काही कवींच्या(बेटी, हेम्स, परागकण, पेशवा, शुमा, क्षिप्रा, गिरीराज, दिपक) आणि माझ्याही काही कवितांचा समावेश या प्रयोगात होता. २००५ मधे लिहिलेली ही खालची माझी कविता या प्रयोगात वापरली होती.
---------------------------------------------------------------------------------
क्षण क्षण ठिबकतो घड्याळातून
मातीत मिळतो.
शोधू पहाता सापडत नाही.

खरंतर प्रत्येक क्षणाचीच मागणी असते
सोन्याच्या अक्षरांची.
एखादाच ते भाग्य घेऊन येतो.
बाकीचे लिहितात
तुमच्या आमच्या करंटेपणाचे
वांझोटे आलेख.

लागत असतील का
त्या दुर्दैवी क्षणांचे शाप
तुमच्या आमच्या कर्तृत्वाला?

उत्तर हो च धरूया,
शाप, दैव या भोवर्‍यातच
तुमचा आमचा नाकर्तेपणा
जन्म घेत असतो.

- नी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुंदर !!!

ज्याला काळाचं महत्व समजलं नाही, किंमत समजली नाही, ज्याने काळ नासवला, त्याने आयुष्यात बरंच काही गमावलं.

अप्रतिम लिहिलंय.

मात्र ह्या ओळी ज......रा विसंगत वाटल्या.. किंवा मला समजल्या नसाव्यात.

उत्तर हो च धरूया,
शाप, दैव या भोवर्‍यातच
तुमचा आमचा नाकर्तेपणा
जन्म घेत असतो.

मात्र तरीही कविता छानच. Happy

विसंगती कशी वाटतेय ते जरा विषद करणार का?

माझा जो काय विचारप्रवाह होता तो असा
>>>लागत असतील का? ------ तुमच्या आमच्या कर्तृत्वाला?<<<<
अश्या क्षणांचे शाप लागून आपलं कर्तृत्व उणं राहतंय का? असा एक विचार

>>>उत्तर हो च धरूया, -------------- नाकर्तेपणा जन्म घेत असतो. <<<<
आणि पुढे आपणच आपल्याला दिलेलं उत्तर की हो शापच लागत असणार नाहीतर मी केवढं काय काय केलं असतं... नुसत्याच गमज्या... आणि वर आपल्याच नाकर्तेपणाचं खापर त्या क्षणांनी दिलेल्या शापावर, दैवावर फोडायचं इत्यादी.... Happy

असं काय काय वाटून लिहिलं होतं ते.

अर्थात वाचणार्‍याला विसंगत वाटू शकतंच. पण ती विसंगती कळली तर कदाचित नवीन अर्थाची शक्यताही दिसेल.

कवितेचा शेवट फारच सुंदर.. वेळ कसा पटपट संपतो, असाच काहीसा विचार इतक्यात करत होते..त्यावर अशी झकास कविता वाचली आणि पटली.

ही कविता कम लेख आहे का? माझी साधारण कल्पना अशी आहे की कवितेला चाल लावता येते / यमक असतात..
चागल लिहिल आहे ..

ही एकदम फॅक्च्युअल कविता बाकी. आवडली. ते तस्ले क्षणांचे शाप लागू नयेत म्हणून प्रयत्न करायला हवेत.

स्वतःच्या हातूनही हेच घडत असलं तरी असं ते कुणी नेमकं सांगितलं की फार अंगावर येतं नि जाणवतं की आपण बरंच गमावतोय! पण कविता आवडली. Happy

खरंतर प्रत्येक क्षणाचीच मागणी असते
सोन्याच्या अक्षरांची.
एखादाच ते भाग्य घेऊन येतो.
बाकीचे लिहितात
तुमच्या आमच्या करंटेपणाचे
वांझोटे आलेख.

>>>>
आवडल