मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी घालवायचो ....

Submitted by मामी on 14 April, 2011 - 10:23

उन्हाळ्याच्या सुट्टीशी आपल्या कितीतरी छान आठवणी निगडीत असतात ना? मे महिन्याची सुट्टी म्हणजे आंबे, पत्ते, पापड-कुरडया, पाहुणे, गाव असे छानसे समिकरण असते. यातले काही घटक बदललेही असतील. तर मग, आपापल्या अनुभवातील, मनातील मे महिना इथे मांडूयात का?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी लहानपणी मे महिना म्हणजे दिवसभर हुंदडणे. भातुकलीचे खास बेत करणे आणि पार पाडणे. ठिक्कर, काचापाणी, पत्ते दिवसभर खेळायचे. भरपेट आंबे खायचे. लगोरी, डब्बाऐसपैस, लपाछपी अशा खेळांना मे महिन्यात वेळेचं बंधन नसे. त्यामुळे आणखी बहर आला असायचा.

जरा मोठं झाल्यावर पत्त्यांचे काही ठराविक खेळ असायचे. ते खेळायला दुपारी हातावर पाणी पडलं की गच्चीवर सावलीची जागा पकडून सुरुवात व्हायची. झब्बु, बदाम सत्ती, चायलेंज, नॉठ्याठोम असे भारी प्रकार असायचे. बरोबरीला स्वत:च्या घरचे किंवा शेजारपाजारच्या काकूंनी वाळत घातलेले पापड असायचे. बोलणार कोण? त्यांची मुलंसुध्दा त्यातच सामील. Happy

शिवाय घरचे पापड करायला आईला मदत करणे, बटाट्याचा कीस खालणे, कुरडया घालणे, वालांना उन्हं दाखवणे, लाल मिर्च्या निवडणे - असंख्य उन्हाळी कामांत असा सक्रीय सहभाग असायचा. अशावेळी पोटं पापडयांच्या लाट्यांनी भरलेली असायची. घरी रहायला आलेली मामेभावंडेही पोळपाट लाटणे नाहीतर पराती उलट्या टाकून बनवलेला तात्पुरता पोळपाट घेऊन बसायची. हसतखेळत पापड लाटायचे. चटके बसत असले तरी हायहुय करत गच्चीभर पळत ते वाळत घालायचे.

भेळ, रसना, फालुदा बनवून मनसोक्त खायचा. रसनाच्या (यात कालाखट्टा एकदम फेमस) पेल्यात चमचे घालून केलेल्या घरगुती आईसकँडी किती मस्त लागायच्या. संध्याकाळी चमेली, मोगर्‍याची फुले, अबोली आणि मरवा यांचे गजरे करायचे. खास मैत्रिणींना द्यायचे आणि आपणही माळायचे.

रात्री केवळ बॅडमिंटन करता असायच्या. त्यात कितीतरी भांडणे, मुलं विरुध्द मुली, मोठी विरुध्द लहान अशी गटबाजी असायची.

हे मी मुलांचे संगोपन मध्ये घातलय कारण इतर कुठे घालावे हे कळेना. विरंगुळामध्ये गप्पांचे पानच फक्त उघडता येते.

आहे आहे मामी. सगळ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. लिहिते थोड्यावेळाने. Happy

मस्त ..एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे...मी जवल जवळ सातवीत जाइपर्यन्त वार्षिक परीक्षा सम्पली कि अक्षरशः दुसर्या-तिसर्या दिवशी गावाला पळायचे..कोकणात्..अम्हि सगळि चुलत भावंड मिळुन १५-१६ जणांची फटावळ असायची. सकाळि उठल्यावर मस्त दुधाळ चहा..घरच्या दुधाचा...मग बाहेर दोणीवर आन्घोळी...मग मस्त ताट्भर पसरलेला मउ भात, वर तुपाची धार, मेतकुट, ताज आम्ब्याच लोणच्, दही असा फर्मास नाश्ता. मग खेळायला सुरुवात्...लगोरि, लन्गडि, पकडा पकडि, डबा ऐस्पैस, . मग दुपरच जेवण झाल की...सगळे झोपल्याचा अन्दाज घेउन चिन्चा पाडायच्या, अन्गणात पडलेल्या अथवा पाडुन बिटक्या रायवळ आम्ब्याच झाडाचे एकदम गोड आम्बा चोखुन खायचा. मग आमराईत जायच,. बोर करवन्दची जाळि होती तिकडे जायचा..भर उन्हात... एकदा बैल मागे लागला होता आमच्या...पळता भुई थोडि झालि होती. मग घरी आल्यावर सन्ध्याकाळचा चहा झाला कि देवळात जायच. मस्त दगडि बान्धकामच देउळ आहे शन्कराच. बाहेर बकुळिच मोठ झाड. सडा पडलेला असायह्चा. ती फुल गोळा करायची. गजरे बनवायचे. परत मधुमालतिच्या फुलान्चे गजरे -वेणि बनवायचि. बिट्टीची पिवळि धम्मक फुल असायची त्यच्या बियन्मधुन सागरगोटे गोळा करायचे. मग मळ्यात जाउन राताम्बे गोळा करायचे. चवळिच्या शेन्गा, असा मेवा..मग दीवेलागणी झाली कि हात पाय धुवुन झोपाळ्यावर बसुन सगळि स्तोत्र, रामरक्षा, अथर्वशीर्ष , पाढे म्हणायचे. मग परत अन्गणात (तिकडच्या भाषेत खळ्यात) खाम्ब खाम्ब खाम्बोळि , लगोरी, खो-खो खेळायच. मग रत्रिच जेवण ८.३० च्या ठोक्याला असायच. मग खळ्यामधेच मान्ड्या ठोकुन बसायच..गाण्याच्या भेन्ड्या, भुताच्या गोष्टि, न।हीतर पत्त्यान्चे न सम्प्णारे डाव.. रत्रिच्या चन्द्र-चांदण्यांच्या साक्षीने अलगद झोपि जायच...अन्गणातच पथार्या पसरुन...... रम्य होते ते दिवस... खरच...

आम्ही सुट्टीत आजीकडे (सांगलीला)जायचो.ह्या सगळ्या उन्न्हाळ्याच्या सुट्या माझ्यासाठी आठवणीचा ठेवा आहेत...

आजीचे घर गावभागात होते त्यामुळे सगळे घाट या घरापासुन जवळ होते.
तेव्हा घरी आम्ही सगळी मामभावन्डे,मावशी,त्यांची मुले मुली असे जमायचो.एकुण २०-२५ माणसानी घर भरलेले असायचे.त्यातुन शेजारी पाजारीही (गल्लीत) बरीच मुले होती.

तर पहाटे पहाटे गल्लीतील खाडीलकर काका सगळ्या मुलांना घेऊन घाटावर पोहायला शिकवायला घेऊन जायचे.
आल्यावर दुध-पोहे/दही-पोहे/उपीट्/फोड्णीची पोळी/थालीपीठ्/मुगाचा लाडु असा नाष्टा असायचा.कधीतरी इडली.
(आजीचे जावई आले तर)..
मग काय आम्ही सगळे खेळायला मोकळे.सरळ नदीवर भट्कायला जायचो.मग कधी क्रिकेट खेळायचे/कधी
नुसतेच काठावर शंख -शिपले गोळा करायचे.(माझ्याकडे) जवळ जवळ पोतेभरुन साठविलेले असायचे.(बन्द शिंपल्याना पेट्या म्हणायचे.त्यात कधीतरी मोती सापडेल अशी आशा होती.)कधीतरी कोळी मासे कसे पकड्तात ते बघत बसायचे सगळ्यानी मिळुन..कधीतरी दादा सायकल शिकवायचा.
दुपारी आजीला वाढायला मदत करायची कीवा आमरस असेल तर आम्बे पिळायला मदत(!!!) करायची.(यात कोयी साठी हे चाणाक्ष लोकानी ओळखलेच असेल),जेवायचे आणि मग झोपायचे मस्त.कीवा मग सगळ्यानी मग पत्ते खेळायचे.(बहुधा ३०४/लेडीज्/मेन्ढिकोट).
दुपारी दुध प्यायचे आणी सगळ्यानी (छोटे)मिळुन बागेत जायचे.कधीतरी आजीबरोबर मुरलीधराला किवा शंकराला जायचे.कधी कधी या दिवसात शेवया /करडई/सालपापड्या या साठी दिवस dedicated असायचे.

संध्याकाळी ठीपरी पाणी /विशाम्रुत हे खेळ खेळायचे.पुढे पुढे मग VCR आल्यावर पिक्चर पहायचो.
यात मग एखादा दिवस आइस्क्रीम व्हायचे.(तेच ते लाकडी मशीन फिरवायचे.)

एखादा दिवस चैत्रा गौरिचे हळदीकुंकु असायचे.मग त्याची आरास्,पन्हे,ईत्यादी

एक महीना कसा सरायचा कळायचे नाही.........जाताना खुप रडु यायचे.....आई ,आजी यांचेही डोळे भरुन यायचे...
बाळपणीचा काळ सुखाचा आठवतो घडी घडी!!!

अगदी जिव्हाळ्याचा विषय.....ते दिवस परत कध्धीच येणार नाहीत, याची खूपच हळहळ वाटते.
सुट्टीतला अगदी आवडीचा कार्यक्रम म्हणजे नदीच्या काठी उंडारायचं. रंगीबेरंगी चतुर पकडायचे ( क्वचित कधीतरी त्यांच्या पायांना दोरा बांधायचो,आणि खांद्यावर ठेवून मिरवायचो.)
गॅस असतानाही चुलीवर शिजवलेल्या शेवया, भरलं वांगं आणि भाकरी......आठवूनच तोंडाला पाणी सुटलं !
सुईवरच्या पापड्या, बटाट्याचा कीस अर्धाकच्चा असतानाच गट्टम् !
नदीच्या पात्रातील नागरमोथा ( शिकेकाईत घालायला ) गोळा करून आई-मावशीला आणून दिला की त्या खुष ( आमचे माकडचाळे सहन करायला तेवढीच त्यांना एनर्जी Wink )
सुट्टी संपवून घरी परत येताना आज्जीच्या गळ्यात पडून रडणंसुद्धा हमखास...

उन्हाळ्याच्या सुट्टीला बर्‍याचदा आईबाबा मला व बहिणीला घेऊन कोठेतरी लांबच्या प्रवासाला तरी जायचे किंवा मावशीच्या सासरच्या गावी, म्हणजे कोल्हापुरात आमचा मुक्काम असायचा. लांबच्या ट्रीपला / पुण्याबाहेर जाण्याचे एक कारण म्हणजे त्याच दरम्यान आमच्या भाडेपट्टीच्या घराच्या मालकीणबाईंची परगावी राहणारी मुले, लेकी, सुना, नातवंडे इत्यादी त्या वेळी वाड्यात सुट्टीसाठी आलेली असायची, आणि त्यांच्या नातवंडांची व वाड्याच्या स्थायी सदस्यांची म्हणजेच मी व वाड्यातील इतर मुलामुलींची जाम भांडणे व्हायची!! Proud आमचा आवडता उद्योग होता तो. Lol घरमालकांच्या (माझ्याच वयाच्या) नातवाची मी कुरापत काढायचे, मग तो मला मारायचा, मी त्याला चावायचे, तो रडायचा, आई मला धपाटा घालायची, मग मी रडायचे.... Lol तेव्हा हे सर्व गोंधळ टाळण्यासाठी आईबाबा आम्हाला घेऊन प्रवासाला जाऊ लागले. दक्षिण भारतात अनेक ठिकाणी भटकंती, कोल्हापुरात किमान दहा-बारा दिवस मुक्काम असा कार्यक्रम असायचा.

पण सगळी सुट्टी काही भटकता यायचे नाही. उरलेल्या दिवसांत सकाळी लवकर उठून वाड्याच्या अंगणातील बकुळीची फुले वेचायची (मी कितीही लवकर उठले तरी माझ्याही आधी उठून वाड्यातील बाकीच्या पाहुण्या मुलांमुलींनी बहुतेक सगळी फुले वेचलेली असायची!! :-(), जर फुले उरली नसतील तर पलीकडच्या गल्लीत असलेल्या बकुळीची फुले वेचायची, त्यांचे गजरे करायचे, बॉयकट असलेल्या केसांच्या लांबीपेक्षा लांबच लांब असे ते गजरे हौसेने डोक्यात माळायचे. कधी बुचाची फुले वेचून त्यांच्या वेण्या करायच्या, त्या डोक्याला हेअरबॅन्डसारख्या गुंडाळायच्या. त्या फुलांत बारीक काळे किडे असतात अनेकदा.... मग त्या किड्यांनी खाज सुटायची.... की पुन्हा ती वेणी काढून ठेवायची. रात्री ती वेणी सुकताना बघून फार वाईट वाटायचे. अनेकदा बकुळीची हौस अंगणात पुरी झाली नाही तर संभाजी पार्कमध्ये, बालगंधर्वच्या आवारातील बकुळीची फुले वेचायला जायचो आम्ही. गुलमोहराच्या लाल पाकळ्यांचेही मोठेच्या मोठे हार करायचो. नाटक-नाटक खेळताना ती आमची ड्रेपरी असायची. गळ्यात, हातात, डोक्याला गुलमोहराचे हार गुंडाळायचे. बोटांमध्ये कळ्यांच्या अंगठ्या. शेले म्हणून ओढण्या नाहीतर आईच्या जुन्या साड्या किंवा शाली. (खोट्या) अशोकाच्या बिया धुंडाळायच्या, निलगिरीची सुकलेली पाने वासासाठी धुंडाळायची, पिंपळाचे जास्तीत जास्त सुकलेले पान वहीत ठेवून जाळी पाडण्यासाठी शोधायचे. एस. पी. कॉलेजात तेव्हा आमराई होती... त्या आमराईत शिरून ठेकेदाराची नजर चुकवून खाली पडलेल्या कैर्‍या शोधायच्या... त्या फ्रॉकच्या ओच्यात लपवून आणायच्या, वाड्याच्या अंगणाच्या मागच्या दाराने आत शिरायचे, बाहेरच त्या कैर्‍या धुवून त्यांचा समाचार घ्यायचा.

आमच्या वाड्यात आंब्याचे एक डेरेदार झाड होते. त्या झाडाची बरीचशी बाजू शेजारच्या प्रसिध्द बोर्डिंग हाऊसच्या बाजूला झुकलेली होती. त्याच्या कैर्‍या घरमालक ठेकेदाराला विकायचे, तोच येऊन कैर्‍या पाडायचा. पण आम्हा बालचमूला ते आवडायचे नाही. त्यात घरमालकांची नातवंडेही होती. दुपारी आमरसाच्या जेवणानंतर घरमालकांचे सारे कुटुंब वामकुक्षीसाठी आडवे झाले की आम्ही मुलं चोरपावलांनी आंब्याच्या झाडाशेजारच्या पत्र्यावर दबकत उड्या मारायचो, आमच्यासाठी ती बरीच मोठी उडी असायची.... मग काठ्यांनी कैर्‍या पाडायच्या, पुन्हा दबकत चोरपावलांनी येऊन वाड्याच्या जिन्यात बसून त्या कैर्‍या धुवून, पुसून, कापून, तिखट-मीठ लावून चेहरे वेडेवाकडे करत खायच्या. संध्याकाळी घसे बसले की घरच्यांना कळायचेच!!

अजून बरेच उद्योग केलेत.... लिहिते सावकाश!! Happy

त्यावेळी लिटिल थिएटरची उत्तमोत्तम बालनाट्यं मे महिन्यात आमच्याकरता सज्ज असायची. हिमगौरी आणि सात बुटके, अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा, बजरबट्टू, झुकझुकभाऊ इंजिनवाले अशी कितीतरी. मामाकडे रहायला गेलो असताना हिमगौरी नाटक बघून तर आम्ही त्या नाटकाच्या इतक्या प्रेमात होतो की घरी आल्यावर त्याचे घाण्यावर घाणे काढले होते. संच ५-६ मुलींचा. मग आलटून पालटून प्रत्येकाने वेगवेगळ्या भुमिका रंगवायच्या. मूळ नाटकाच्या एक-त्रितियांश केलेली संहिता. केवळ ठळक प्रसंग आणि डायलॉक. त्यातले ते "अदभुताच्या आरश्या ..." आणि "... या राज्यात सर्वांत सुंदर हिमगौरी गोजिरवाणी" ही वाक्य जास्तीत जास्त इमोशन भरून कोण म्हणतय यात अहमहिका असायची. त्याकरता मामीचा मेकप-बॉक्स धारातिर्थी पडायचा. मामीनेही बिचारीने कधी तक्रार केली नाही. मात्र मेकपमधली सर्वात व्हर्सटाईल गोष्ट असायची सात रंगांच्या कुंकवांची डबी. सुटीत निदान दोन डब्या संपवून दाखवायचो आम्ही. Happy

मामी, नाटकांबद्दल अगदी अगदी. हिगौसाबु, टमटमपुरचा टिल्लू टॉम आणि अजून बरीच चित्रविचित्र नावं असलेली नाटकं... त्या नाटकांना जाण्याअगोदर पंचक्रोशीत आम्ही नाटकाऽऽला जाणारोऽऽत करत त्याबद्दल हवा निर्माण करणे, सोबत खाऊचा डब्बा, वॉटरबॅग आठवणीने नेणे, नियमानुसार मध्यंतरातच्च तो खाऊ खाणे, आपल्या वॉटर बॅगेतील पाणी इतर कुण्णाला न देणे, घरी येताना चिंचा - कैर्‍या शोधत येणे, आल्यावर अनेक दिवस त्या नाटकाची ष्टोरी थीम घेऊन घरच्या घरी नाटक नाटक खेळणे असे अनेक उद्योग असायचे...

टिळक स्मारक मंदिर व भरत नाट्य घराच्या अगदी जवळ असल्यामुळे सकाळी जरी ठरले तरी दुपारच्या नाटकाच्या शोला हजेरी असायची.

खेळातले आमचे आवडते स्किट/ नाटक होते डॉ पोटफोडे यांचे. आणि वैतागलेला मालक आणि त्याचा सर्व कामांमध्ये घोळ घालणारा नोकर रामू यांचे. तासन् तास, दिवसेंदिवस आम्ही न कंटाळता ते नाटक करायचो! Lol

आवडीचा विषय Happy

सुट्टीत हे उद्योग करायचो..

* निकाल लागण्या अगोदरच सर्व वह्यांची भरलेली पानं फाडून टाकायची.. आणि पुठ्यांचे बंगले करायचे..
* पत्ते, सागरगोटे, चिंचोके, सिगरेटची पाकिटं, विटीदांडू खेळणे.
* मांजा दोरा, शेंगाचा बॉल, वर्तमानपत्राचे कागद फाडून होड्या, मासे बनवणे.
* मांजा करताना हात कापून घेणे.
* पतंग उडवणे... मुलांशी भांडणे.
* रोज दुपारी बाबांकडून हट्टाने २५ पैसे घेऊन गारेगार खाणे. ते पण 'शेरू' चे.. शेरू हे कुल्फी च्या गाडीचे नाव होते.
* आजुबाजुची पोरंपोरी गोळा करून कोल्हापूरातली एखादी बाग रोज धुंडाळणे. तिथे जाताना डबे घेऊन जाणे.. तिथली भांडणं सोडवणे, येताना पावसात भिजणे... घरी आल्यावर बाबांचा ओरडा खाणे.
* आमचं घर चौथ्या मजल्यावर... तिथे ऊन वारा खूप.... शेजार्‍यांनी आमच्या पत्र्यावर टाकलेले सांडगे, पापड पळवणे.
*दुपारी वरून जोरजोरात हाका मारणे (मित्र-मैत्रिणींना) मोठ्यांची झोप मोडली म्हणून शिव्या खाणे.
* अंबाबाईच्या देवळात जाऊन कच्च्या कैर्‍या, आवळे घेऊन तिथल्या कट्ट्यावर फस्त करून येणे.
* अंबाबाईच्या देवळात असलेला कारंजा तासनतास पाहणे.

मामी,
छान विषय आणि आठवणी !
Happy

घरमालकांच्या (माझ्याच वयाच्या) नातवाची मी कुरापत काढायचे, मग तो मला मारायचा, मी त्याला चावायचे, तो रडायचा, आई मला धपाटा घालायची, मग मी रडायचे.... तेव्हा हे सर्व गोंधळ टाळण्यासाठी आईबाबा आम्हाला घेऊन प्रवासाला जाऊ लागले
अरुंधती,
लई भारी !
प्रवासाला जायच म्हणुन मुद्दाम तर करत नसाल हे सगळं !
Lol

मी मात्र वर्षभर मामाच्या गावीच असायचो त्यामुळे मेच्या सुट्टीत (आजोबांच्या सायकलीवर बसुन) आपल्या गावी यायचो ....
तिकडच तळपतं ऊन, त्यातही काम करणारी घरातली माणसं पाहुन तिथुन पळ काढावा अस वाटायचं, उन्हाळा कसा असतो, खेळापेक्षा काम कशी करायची असतात ते जास्त कळायचं, शिकवल जायचं...

रोज विहिरीत डुंबायच, पाण्याच्या तळाशी टाकलेले कपबशीचे तुकडे शोधुन वरती आणायचे..
ऊन्हाळ्यात देखील ओढाच्या जवळ असणार्‍या करंजाच्या,चिंचेच्या गर्द झाडीत असलेल्या झाडांवर सुरपारंब्याचा खेळ रंगायचा ..
गोट्यांचा, करंजाच्या बियांचा खेळदेखील खुप रंगायचा ...
आईकडुन वेगवेगळे पदार्थ, रानमेवा खायला मिळायचा, वर्षभराचं प्रेम त्या सुट्टीच्या महिन्यात मिळायचं
Happy

>>>>>तेव्हा हे सर्व गोंधळ टाळण्यासाठी आईबाबा आम्हाला घेऊन प्रवासाला जाऊ लागले. >>>> अरे देवा, किती पिडत असणार तुम्ही! Rofl

>>>>निकाल लागण्या अगोदरच सर्व वह्यांची भरलेली पानं फाडून टाकायची.. आणि पुठ्यांचे बंगले करायचे.. >>> दक्षे, खरंच की, मस्तच आठवण करून दिलीस.

<< प्रवासाला जायच म्हणुन मुद्दाम तर करत नसाल हे सगळं ! >> एवढं डोकं नव्हतं हो तेव्हा! फक्त खाऊ/ खेळातील राज्य कोणावर/ कॅरम/ पत्त्यांवरून खच्चून भांडायचं तेवढं कळायचं.... Lol

एरवीच्या उन्हाळा सुट्टीतले हमखास उद्योग :

* एकदा तरी आइसक्रीम पॉट घरी आणून घरच्या घरी आइसक्रीम बनविणे. हात दुखेपर्यंत ते हँडल फिरविणे.

* सारसबागेत भेळ (शक्यतो घरून डब्यातून नेलेली) व हुंदडण्याचा कार्यक्रम, पेशवे पार्कात फुलराणी व प्राणी बघणे, उंट / हत्तीवरून फेरी, पर्वती दर्शन (बहुधा रोजच सकाळी - मॉर्निंग वॉक म्हणून!) शिवाय बाहेरच्या मेरी गो राऊंड, चक्रांमध्ये बसून आपण त्यांना घाबरत न्हाय हे इतर भावंडांना सिध्द करून दाखविणे.

* सर्कस बघणे. एका सुट्टीत टिळक रोडवरच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सर्कशीचे तंबू ठोकले होते. मग आमचा दिवसभर तिथेच मुक्काम असायचा. हत्तीच्या पिल्लाच्या करामती बघ, माकडांना वेडावून दाखव, सर्कशीतले जोकर प्रत्यक्षात कसे दिसतात - कसे राहतात ते बघ, वाघ - सिंहाच्या पिंजर्‍याजवळ जाऊन त्यांना निरख असे उद्योग. दुपारच्या शो ला कमी गर्दी असायची... तेव्हा आम्हाला दारवान आत सोडायचा. न कंटाळता रोज असे शोज पाहिलेत.

* संभाजी पार्कातले मत्स्यालय, झोपाळे घसरगुंड्या, नेहरू स्टेडियम शेजारच्या सर्क्युरामातील घसरगुंड्या यांना व्हिजिट मस्ट! कँपात एम जी रोडला जाऊन मार्जोरीनला भेट देणेही अत्यावश्यक. Proud

* लक्ष्मीनारायण टॉकीजला तेव्हा दर रविवारी सकाळी डिस्ने फिल्म्स दाखवायचे. किंवा बालचित्रपट महोत्सव असायचेच. ते बघणे.

* वह्यांमधील कोरे कागद फाडून ती एकत्र दोर्‍याने शिवून वह्या बनविणे. पुठ्ठे, कागद इत्यादी रद्दी विकून त्या पैशातून भेळ + आइसक्रीम खाणे.

* दुपारची आमरसयुक्त जेवणे झाली की पत्ते / कॅरमचे डाव टाकणे. संध्याकाळी मोठ्यांनी ''अरे आता बाहेर खेळा' म्हणून ढोसले की बाहेर जाऊन खेळणे. रात्री जेवणानंतर पुन्हा पत्ते, कॅरम, भेंड्या.

* वेगवेगळ्या बिया/ पिसे/ चांद्या/ सोंगट्या इ. इ. कलासाहित्य जमवून त्यापासून उच्च अभिरूचीच्या अगम्य कलाकृती बनविणे.

* सामूहिक पापड लाटायचे किंवा लोणचे घालणे, साबुदाण्याच्या पापड्या घालणे असे बेत ठरले की आपण होऊन मदत करायला पुढे जाणे व पापडाच्या लाट्या/ कैर्‍यांच्या फोडी/ ओल्या पापड्या मटकाविणे.

* फॅनखाली लोळत पडून भरपूर भरपूर पुस्तकांचा फन्ना उडविणे.

* टिळक स्मारक च्या तेव्हाच्या मोकळ्या जागेत किंवा एस पी च्या मैदानात/ आमराईत पडीक असणे. तिथेच वाचायला एखादे गो पु घेऊन जाणे.

* रात्री उशीरा मोकळ्या रस्त्यांवरून सायकली पिटाळणे. चालत चांदण्याचा व गार वार्‍याचा आनंद घेत लांबच लांब फिरायला जाणे. किंवा बाहेर दुकानांच्या रिकाम्या कट्ट्यांवर / पायर्‍यांवर बसून गप्पा ठोकणे.

* संध्याकाळी अंगणात/ घरासमोरच्या रस्त्यावर गार पाण्याचा सडा टाकणे. तो मातीचा वास भरभरून घेणे.

* पाण्यात डुंबणे. एकमेकांना भिजवणे. साबणाचे फुगे करून सोडणे.

* वॉल क्लायंबिंग किंवा भिंत चढण्याचे उद्योग करणे. आठवड्यातून दोन-तीनदा तरी जिन्यावरून गडगडणे.

* आईला मदत करते म्हणून आणखी पसारा करून ठेवणे. स्वयंपाकघरात लुडबूड करून सांडलवंड करून ठेवणे. मग सूंबाल्या करणे.

* घरातल्या जुन्या व बाबांच्या लाडक्या लाँगवुड / रेमिंग्टन टाइपरायटर च्या काळ्या रिबिनींनी हात काळे करून घेणे. टाइप करायचा प्रयत्न करणे.

* एका सुट्टीत जगन्नाथपुरीच्या रथाची मिरवणूक एस पी कॉलेज मैदानात उतरली होती. मग रोज तिथेच. तिथे इस्कॉनची संन्यासी मंडळी स्टेजवर ''हरे रामा हरे कृष्णा'' करत हवेत उंचच उंच उड्या मारत गात असायची.... ते बघायला जाम मजा यायची. तिथे बसून लिलीचे, तुळशीचे मोठमोठे हार करायचे. जाताना तिथल्या कापूर, तुळस मिश्रित तीर्थाचे सेवन करायचे. त्या रंगीबेरंगी, सुगंधी गर्दीत छान वाटायचे.

अरुंधती,
अजुन काही राहील नाही ना ? Lol
तुम्ही हे सगळं ...हे उन्हाळा सुट्टीतले उद्योग करायला/आनंद घ्यायला इतरांना चार-चार जन्मात मिळुन जमलं नसेल ते तुम्ही एकाच (?) जन्मात केलयं हे विशेष !
मला वाटतं, खरोखर नशीब लागतं हे तुमच्यासारखं हा सगळा आनंद मिळायला !
(हलकं घ्याल ही अपेक्षा)
Happy

सारखे पाडत १दाचे पत्त्यांचे बंगले बांधणे. कोणाचा मोठा यावरुन भांडण.
भातुकली करताना खोटे झोपले असता, नेमके कोणीतरि, दाणे / चुरमुरे लंपास करी मग परत कोणाच्यातरी आईला मस्का मारुन स्वयंपाक करणे.
झाडावर चढणे.
पहाटे लवकर उठुन सगळ्या कैर्‍या गोळा करुन परत घरात सुंबाल्या करुन झोपणे. व मग आज कैर्‍या कोणी बरे नेल्या असतील अशा चर्चेत सहभागी होणे.
चक्क पाटा - वरवंटा घेउन मेंदी वाटणे, मग लावायची वेळच न येणे (हात आधीच लाल झालेले असत). अशात आईचा बॉम्ब यायचा, एवढे करण्यापेक्षा मिक्सर का नाही घेतला? मग आश्चर्यमिश्रीत होउन आईचा कोण अभिमान वाटायचा.
आता प्रयत्न करुनही आठवत नाहीत अशा कारणांवरुन मार्‍यामार्‍या करणे, मग आई आधी हाताने व नंतर तिच्या बांगड्या वाढवल्या जाउ लागल्यावर झाडुने प्रसाद द्यायची तो खाणे.
लायब्ररीयन १च पुस्तक रोज देई, मग मैत्रिणी बरोबर सन्ध्याकाळी ते अदलाबदल करणे.

अरे हो आणि सुट्टी सुरु होताच बॅन्डेडचा व पेप्सीकोला चा साठा करणे. Proud
व दोहोंचा वापर करुन पुरावे नष्ट करणे म्हणजे कोणाला कळायला नको.

अनिल Lol

भातुकली कधी फारशी खेळले नाही, पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आमचे ''शाळा शाळा'' चे खेळ भर्पूर रंगत. आधीच्या वर्षी अभ्यासात असलेल्या सर्व कविता, पाढ्यांची झाडून उजळणी होई. भातुकलीतील भाजके शेंगदाणे व गुळाच्या व चुरमुर्‍याच्या खाऊला मात्र कधीही नाही म्हटले नाही! Wink
माझ्या सर्व बाहुल्या एकजात टकल्या असत. कारण मी त्यांचे केस खर्‍याखुर्‍या कंगव्याने विंचरायचे. मग ते केस निघून यायचे. ह्यावरही उपाय शोधला होता मी. सगळ्या टकल्या बाहुल्यांची टकले काळ्या स्केचपेनने किंवा पेनाने रंगवायची. फार्फार हॉरिबल दिसायचे ते. पण मला अशा बाहुल्याही आवडायच्या. केसाच्या जागी केस सदृश काही असल्याशी कारण. मग त्याच पेनाने त्या बाहुलीचा मेकप, तिला वेगवेगळे दागिनेही रंगवून व्हायचे. अंतिमतः ती बाहुली भी षॉ न शाँ दो र दिसायची! Biggrin

उन्हाळ्यातील आणखी एक आवडता उद्योग म्हणजे मातीचा चिखल बनवून त्यात खेळायचे. मातीची खोटी खोटी भांडीकुंडी, पुतळ्या वगैरे बनवायचे. ते उन्हात वाळवायचे. त्या पुतळ्या/ भांड्यांना बिया, काटक्यांनी नक्षीकाम करून सजवायचे. ती वाळली की त्यांना तडे जात. मग पुन्हा ही मातीकला ओली करायची आणि पुनश्च कलाकुसरीला लागायचे. मातीत हात पाय भरपूर बरबटवून घ्यायचे. झालेच तर कपड्यांना, केसांनाही चिखलाचा प्रसाद द्यायचा.

मातीत हात पाय भरपूर बरबटवून घ्यायचे. झालेच तर कपड्यांना, केसांनाही चिखलाचा प्रसाद द्यायचा.>>> यालाच आता मड थेरपी म्हणतात बहुतेक.