पाणीपुरी , भेळपुरी, रगडा पॅटीस , वडापाव इत्यादीच्या चटण्या

Submitted by मेधा on 7 April, 2011 - 20:51

पाणीपुरी, भेळेच्या चटण्या, दाबेलीचा मसाला , वडापावची चटणी यांच्या कृतींसाठी हा धागा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं झालं काढलास. मी काढायला जातंच होते.

भेळेच्या चटण्या:

गोड चटणी:

चिंच, खजूर (चिंचेपेक्षा जास्त), गूळ इ. कुकरला लावून ३ शिट्ट्या कराव्यात. बाहेर काढून गाळण्याने गाळून बारीक गॅसवर उकळत ठेवावं म्हणजे बाहेरच्या चटणीसारखा घट्टपणा, दाटपणा येईल. हवा तसा दाटपणा वाटला की गॅस बंद करुन गार करावं. गार झाल्यावर पाणीपुरी मसाला, मीठ हवं असल्यास किंचित लाल तिखट घालावं.

ह्या चटणीकरता थोडं प्लॅनिंग हवं आधीपासून.

तिखट /हिरवी चटणी:

पुदिना, कोथिंबीर (दोन्हींचं प्रमाण एकसारखं चालेल), हिरव्या मिरच्या-चवीप्रमाणे, सालं काढून कैरीच्या फोडी-साधारण अंदाजे ६,७, आल्याचा तुकडा, मीठ.

सगळं एकत्र करुन मिक्सरला फिरवावं. वाटताना फार पाणी घालू नये. चटणी झाल्यावर वाटल्यास पाणी घालून पातळ करता येईल.

प्रतिभा कोठावळे यांच्या पर्फेक्ट रेसिपी या पुस्तकातून

रगडा पॅटीस ची चटणी
७-८ खजूर बिया
लिंबा एवढी चिंच ( हा भारतातल्या लिंबाचा आकार , इथे साधारण की लाइम्स त्या आकाराचे असतील )
लाडू एवढा गूळ ( अमेरिकेतल्या लाइम एवढा घालते मी )
१/२ टी स्पून मिरची पावडर
१/४ टी स्पून मीठ
१ टी स्पून धणे जिरे पूड

खजूर, चिंच , गूळ,तिखट वाटीभर पाण्यात उकळून, मिक्सरमधे वाटून गाळून घ्यावे ( मी हँड ब्लेंडर / इमर्शन ब्लेंडरने करते ). त्यात मीठ व धणे जिरे पावडर घालून बेताची पातळ चटणी करावी. मीठ १/४ टी स्पून पेक्षा जास्त लागतं.


भेळेची तिखट चटणी

१५-२० हिरव्या मिरच्या
१५-१६ काड्या पुदिना
७-८ काड्या कोथिंबीर
१/२ टी स्पून मीठ
सर्व एकत्र बारीक वाटावे व एक वाटी पाणी घालून चटणी करावी.

भेळेची गोड चटणी
१/४ किलो खजूर,
१ मूठ चिंच
सव्वा वाटी गूळ
१ टी स्पून तिखट
१ टी स्पून धणे जिरे पूड
१ टी स्पून मीठ

खजूर ,चिंच गूळ , तिखट दोन वाट्या पाण्यात उकळून घ्यावे. गार झाल्यावर वाटून , गाळून त्यात धणे जिरे पूड, मीठ व २ वाट्या पाणी घालून सारखे करावे.

मी जास्तीचं पाणी न घालता भरपूर गोड चटणी करून फ्रीज मधे ठेवते. बरेच दिवस टिकते तशी. लागेल तेंव्हा थोडं पाणी + मीठ घालून घेते.

मारवाडी पध्दतीच्या, मैत्रिणीच्या आईच्या रेसिपीने चटण्या :

पाणीपुरीच्या पाण्यासाठी:
बचकाभर ताजा पुदिना (पानं)
त्यापेक्षा जरा कमी कोथिंबीर
तिखटपणानुसार हिरव्या मिरच्या
१ पेर आल्याचा तुकडा
मोठा चमचा चिंचेचा कोळ. (चिंच भिजवून, बिया काढून वाटली तर उत्तम. शक्यतोवर चिंचेचं बदगं नको.)
हे सगळं मिक्सरमधे बारिक वाटून घ्यायचं. मोठ्या छिद्रांच्या गाळणीतून गाळून घ्यायचं.
यात काळां मीठ, नेहमीचं मीठ आणि भाजलेल्या जिर्‍याची पूड घालायची.
(लालूची अ‍ॅडिशन : भाजलेली बडिशेपपूड आणि मिरपूड)

याबरोबर गोड चटणी :
चिंच
त्याच्या दुप्पट खजूर (२ तास गरम पाण्यात भिजवून.)
चमचाभर तिखट
पाव चमचा चाट मसाला (ऑप्शनल)
मीठ
चमचाभर जिरपूड (भाजलेली)
सगळं आधी किंचित तेलावर परतून घेऊन मग किंचित पाणी घालून मिक्सरमधून बारिक वाटायचं. त्यात खजुराएवढा गूळ आणि चमचाभर साखर. घालायची. हे काँसन्ट्रेट झालं. यात वाटीभर पाणी घालून साधारण चटणीच्या कन्सिस्टंसीला आणायचं.

हिरवी चटणी:
हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
आल्याचा तुकडा
मीठ
भरपूर लिंबाचा रस.
पाणी न घालता लिंबू रसात बारिक वाटायचं. (ही मारवाडी पध्दत आहे म्हणे.) त्यामुळे चटणी घोटीव होते. पाणी एकीकडे आणि हिरवे कण दुसरीकडे असं होत नाही.

एक लसूण चटणी पण लागते शेव बटाटा पुरी, रगडा पॅटिस करता.

लाल मिर्च्या पाण्यात २ तास भिजवून, लसूण (भरपूर / तुम्हाला हवा तेवढा), मीठ. एकत्र करून मिक्सर मधून वाटणे. छोट्या चमच्याने थेंब पडेल इतपत जाड.

ठाण्याच्या गावदेवी मार्केटमध्ये एक भेळपुरीवाला आहे त्याच्याकडे ह्या सगळ्या चटण्या एकदम भारी मिळतात.. तसेच तो चाट च्या काही टिप्स पण देतो..

भेळेच्या चटण्या

भेळेसाठी नुकतीच समजलेली एक चटणी : हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि डाळं समप्रमाणात घेऊन मिक्सरमधे कमीत कमी पाण्यात पूर्ण एकजीव होईपर्यंत चवी प्रमाणे मीठ घालून बारीक करायचं. साधारण आंब्याची डाळ करतो तशी कन्सिस्टन्सी ठेवून भेळ तयार करताना त्यात मिसळायची. मस्त चव येते अगदी. सुकी भेळ्-ओली भेळ दोन्हीसाठी चालते.

सोप्प आहे अमित..
डाळ(पंढरपुरी), ओला नारळ, आलाच्या तुकडा, हिंग, साखर, हिरवी मिरची, लिंबु रस, चवी प्रमाणे मीठ एकत्र गुळगुळीत वाटुन घ्या वरुन तेल, कढीपत्ता, लाला मिरची, मोहोरी व हिंगाची फोडणी द्या. एकदम सही होते.

वा वा, तोंपासु धागा!! मेधा, टॅगमध्ये भेळ, पाणीपुरी, चटणी असे शब्दही घालशील का प्लीज? त्या संदर्भात रेसिपीज धुंडाळणार्‍यांना धागा सापडायला सोपा जाईल म्हणजे.

सायो ने दिल्याप्रमाणेच मी चटण्या करते. त्यातली भेळेची (गोड) चटणी भरपुर करुन ठेऊन त्याला एक उकळी काढुन काचेच्या बाटलीत भरुन फ्रिज मध्ये ठेवावी चांगली महिनाभर टिकते. आयत्या वेळेला पुदिना चटणी करता येते.ती पण करुन ठेवल्यावर ८ दिवस तरी चांगली राहते (फ्रिज मध्ये)

एकदा नुस्ता मिरचीचा खर्डा आणि चिरलेला कांदा घातलेली सुकी भेळ खाल्ली होती चाकणच्या जवळपास. अ फ ला तू न चव!! भेळभत्ता एकदम ताजा, कुरकुरीत होता. तेव्हा असा ताजा भेळभत्ता असेल तर सुकी भेळ खायलाही जाम मजा येते.

इडलीची चटणी करताना डाळ्याऐवजी २-३ tbsp कान्दा घालुन बघा आणि मी त्यात दही पन घालते थोडेसे. वरून फोडणी लाल मिरची घालून, आहाहा तोन्पासु
दीपा

ही चिंचेच्या चटणीला पर्याय चटणी. कधी कधी एखाद्याला चिंच चालत नाही. पूर्वी उसगावात चिंचेची चटणी ईतकी सर्रास मिळत नसे. चिंच पण मिळण्याची तशी मारामारच असे. तेव्हा खूप वर्षांपूर्वी ईथे आलेल्या गुज्जु बायकांनी उपलब्ध सामग्रीतून जे काही शोध लावले त्यातला हा प्रकार. पाणीपुरी, शेवपुरी बरोबर कळतही नाही की ही चटणी चिंचेची नाहीये.जास्त प्रमाणात हवी असेल चटणी तर हा सोप्पा प्रकार आहे. चिंच कोळा, खजूर वाटून गाळणं वगैरे भानगडी नाहीत.

कोशर फूडच्या आइल मधे गोया ब्रँडची पेरूची पेस्ट मिळते.बरेचदा देसी ग्रोसरी मधे पण मिळते. बर्यापैकी मोठा चपटा गोल डबा येतो. तर हा एक डबा पेस्ट घेऊन ति पेस्ट मिक्सर मधून फिरवावी. तिखट, मीठ, आमचूर्,जिरेपूड आणी सरसरीत करायला अंदाजाने पाणी घालून परत एकदा मिक्सर मधून फिरवावी. चटणी तयार.

मास्टरफुड्स किंवा तत्सम बार्बेक्यु सॉस... साधा स्मोकी व्हरायटी नाही....या सॉस मधे चाट मसाला किंवा ध्णे-जीरे पूड, आमचुर वगैरे नेहमीच्या पावडरी घातल्या तर झटपट चिंचेची गोड चटणी तय्यार Happy अजिब्बात फरक कळत नाही Happy

स्नेहश्री ठाण्याच्या गावदेवी मार्केटमध्ये एक भेळपुरीवाला आहे त्याच्याकडे ह्या सगळ्या चटण्या एकदम भारी मिळतात.. तसेच तो चाट च्या काही टिप्स पण देतो..-- त्याचा नाव व पत्ता (आजुबाजुची खुन) मिलेल का?

Pages