अनुदिनी: आनंदघन http://anandghan.blogspot.com/
अनुदिनीकार: आनंद घारे
अनुदिनीची सुरूवात: जानेवारी २००६
अनुदिनीची वाचकसंख्या: १ मे २००८ पासून वाचनसंख्या ६१५१८
अनुदिनीचे अनुसरणकर्ते: ७५
अनुदिनीतील एकूण नोंदी: ६७७
अनुदिनीकारांची ओळख: मी कोण? याबाबत अनुदिनीकार म्हणतात, "इंग्रजी भाषेतून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कामाचे ढीग उपसता उपसता 'उत्कृष्ट वैज्ञानिक' उपाधि पदरात पडली. आता सरळ सोप्या मायमराठी भाषेत चार शब्द लिहायची धडपड सुरू आहे."
३ जानेवारी २००६ ला या अनुदिनीचा श्रीगणेशा केलेला आहे. इंग्लंडमधील प्रवासवर्णनाने अनुदिनीची सुरूवात होते. मराठीमध्ये अनुदिनी लिहिणे त्याकाळी किती अवघड होते, हेही सविस्तर वर्णन केलेले आहे. आधी वर्डप्रेसवर असलेली ही अनुदिनी मग ब्लॉगरवर आणतांना चित्ररूप आणावी लागल्याने झालेली विस्कळ स्पष्ट जाणवते. ह्या वर्णनांत “कोटी कोटी रुपे तुझी” ही गणेशाच्या विविध स्वरूपांवर आधारित लेखमाला आहे. “लिडसच्या चिप्स” नावाचीही एक लेखमाला आहे. मग “तोच चंद्रमा नभात” या वैज्ञानिक विषयावरील मालिकेस सुरूवात झाली. ही तेहत्तीस भागांची सुंदर मालिका जरी चित्ररूप लेखांनी बनलेली असली तरीही त्यांचे एक नितांतसुंदर पुस्तक होऊ शकेल इतकी ती चांगली आहे. २००६ मध्ये एकूण ७५ नोंदी केलेल्या आढळतात. २००७ मध्ये केवळ ६ च नोंदी आहेत. यात २००७ च्या रंगोत्सवावरही म्हणजे होळीवरही एक लेख आहे.
२००८ साली एकूण नोंदी २५१ आहेत. आता युनिकोडमधे देवनागरी लिहिता येऊ लागल्याने अनुदिनी अधिक सोपीसाधी, सुबक दिसू लागली. “मुंबई ते अल्फारेटा” मालिका, दत्तजन्माची कथा, “तेथे कर माझे जुळती” ही भीमसेन जोशी, पांढुरंगशास्त्री आठवले इत्यादीकांचे परिचय करून देणारी मालिका, “झुकझुकगाडी-भारतातली आणि विलायतेतली” ही मालिका, “मेरी ख्रिसमस” मालिका, “यॉर्कला भेट” ही मालिका इत्यादी भरपूर मौलिक लेखन इथे वाचायला मिळते.
२००९ साली एकूण नोंदी २२६ आहेत. यात “अमेरिकेची लघुसहल” मालिका आहे. ब्लॉग माझा-२००९ स्पर्धेत या अनुदिनीस उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले त्याची वर्णने आहेत. “आयुधे, औजारे आणि यंत्रे” ही चार भागांची सुरेख मालिका मराठीत विज्ञान आणते. इथेच तीन भागांत डॉ.होमी भाभा यांचा करून दिलेला प्रत्ययकारक परिचय वाचनीय आहे.
२००९ साली एकूण नोंदी १०० आहेत. यात “मन” विषयावरची सात भागांची सुरेख निरुपणात्मक मालिका आहे. मग या अनुदिनीच्या नित्य वाचकांचा थवा वाढतच गेला. लेखक त्याबद्दल म्हणतातः
जात होतो एकटा मी मार्ग शोधूनी नवा ।
मागुनी पांथस्थ आले जाहला त्यांचा थवा ।।
आता त्यांची “पंपपुराण” माला सुरू झाली होती. अत्यंत सोप्या शब्दांत निरनिराळ्या पंपांचे कामकाज सोप्या मराठीत समजावून सांगतांना त्यांनी आपल्या कार्यकारी जीवनातील विपुल अनुभवाचा उत्तम वापर केलेला दिसून येतो. सचिनवरचा “विक्रमादित्य रेकॉर्डर” हा लेख आहे. मग “ब्लॉगर्स मेळाव्या”चा अहवाल आहे. मराठी सुभाषिते आहेत. अनेक स्फूट लेख आहेत. कौटुंबिक संमेलनाच्या हकिकती सात लेखांत दिलेल्या आहेत. मराठी गाण्यांवर दोन लेखांची एक मालिका आहे. गणेशोत्सव, मराठी मातृदिन, महिला दिन, हरतालिका, श्रीकृष्ण इत्यादींवर लेख आहेत. कल्याणम नावाची मनोरंजनात्मक मालिका आहे. नव(ल)रात्री नावाची मालिका आहे. “मोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे” ही स्वानुभावरील मालिका आहे. २६ नोव्हेंबर २००८ च्या “कालरात्री” वर एक मालिका लेखन आहे.
२०११ साली १९ लेख लिहून झालेले आहेत. त्यात “संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे” वरील मालिका आहे. अखेरीस आजचा ज्वलंत प्रश्न अणुशक्तीचा. तोही नुकताच “अणुशक्ती वीजकेंद्र आणि अणुबाँब” या लेखात चर्चिला आहे. तोही अधिकारवाणीने. “संगीत साधना - पूर्वीच्या काळातली आणि आताची” यावरही एक मालिकालेखन आहे.
http://anandghare2.wordpress.com/ या एका निराळ्या, कदाचित मूळ अनुदिनीवर “निवडक आनंदघन” या नावाने खालील मजकूर आढळतो.
आजीचे घड्याळ (कालगणना) (12), चंद्रमा (35), थोडी गंमत (2), दिवाळी (9), धार्मिक (35), गणपती (14), देवी (8), विठ्ठल (8), श्रीकृष्ण (5), निवेदन (1), प्रवासवर्णन (59), माझीही अपूर्वाई (7), मैसूर (6), युरोप (15), राणीचे शहर लंडन (6), लीड्स (23), बोलू ऐसे बोल (8), ललित कथा (4), विज्ञान आणि तंत्रज्ञान (12), विविध विषय (21), विवेचन (11), व्यक्तीचित्रे (8), साहित्यिक (3).
अनुदिनी का वाचनीय आहे? लेखक गोष्टीवेल्हाळ, सिद्धहस्त, अधिकारप्राप्त, अनुभवी व्यक्ती आहे. त्यांचे लेखन लोकरुचीचे समाधान करणारे, सुरस आणि यथातथ्य असते. लेखनास कमालीचे सातत्य आहे. २००६ सालापासून एवढ्या नियमिततेने सुबोध, सुंदर मराठी विशेषतः उच्च तांत्रिक विषयांवर लेखन करणारे, अनुदिनीकार मोजकेच आहेत. त्यातीलच आनंद घारे एक आहेत. मला त्यांचे लेखन आवडते. तुम्हालाही नक्कीच आवडेल.
हा केवळ “अनुदिनी परिचय” आहे. म्हणून जास्त तपशीलात लिहिलेले नाही. तपशीलाकरता ती अनुदिनी मुळातच वाचणे चांगले. तरीही “मन” या विषयावरली इथल्याइतकी मनोरंजक लेखमालिका मी तरी इतरत्र पाहिलेली नाही, हे इथे नमूद करावेच लागेल.
.
http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
अनुदिनी चाळली आहे. जपानच्या
अनुदिनी चाळली आहे. जपानच्या अनु उर्जा प्रकल्पाविषईच्या तांत्रिकतेचा घारेंना चांगला अभ्यास आहे असे वाटते.