गोष्ट अल्केची-डायरीतील नोंदी,त्याही जशा हाताशी आल्या तश्या-भाग आठ

Submitted by किंकर on 11 March, 2011 - 21:21

दुसऱ्या दिवशी रुटीन सुरु करवयाचे असल्याने आम्ही रात्रीच परतीच्या प्रवासास लागलो. (क्रमशः)

१जानेवारी १९८८ नव वर्ष प्रारंभ- नवे संकल्प कि नवे प्रश्न- आज सकाळ पासून दिवस धावपळीतच गेला.कोकणातून परतायलाच उशीर झाला. जवळ जवळ सकाळी नऊ वाजता घर गाठले.रजा संपली असल्याने धावपळतच ऑफिस गाठले.दुपारी लंच घ्यायला पण उशीर झाला.त्यात नवीन वर्षाची सुरवात म्हणून, साहेबांनी मिटिंग ठेवली. दुपारी साडेतीन ते पाच वाजे पर्यंत मिटींगच चालली.
बोर्ड रूम मधून बाहेर आलो तर निरोप कि,या नंबरवर फोन करा.नंबर परिचित नाही पण निरोप वीरेंद्र धारवाडकर यांनाच देणे असा होता.मी टेबलवर गेलो,आणि तिथूनच नंबर फिरवला.लगेचच फोन लागला आणि पलीकडून मंजुळ आवाज आला.“नमस्कार! “,सुजाता बोलतेय.आणि दिवसभराच्या धावपळीतून सुस्कारा सोडताना,त्या शब्दांनी एकदम आठवण करून दिली.अरे आज १ तारीख,अलकाचा निरोप आणणारी,तिची मैत्रीण म्हणजे हीच ती सुजाता.आणि पुन्हा एकदा फोनवर, "अहो कोण आहे? "आवाज येतोय ना! मग मी दचकून, "मी वीरेंद्र आपण फोन करायला सांगितला होता ना."त्यावर पलीकडून आवाज.हे पहा मी अलका कडून निरोप आणला आहे.आपण उद्या सायंकाळी भेटू,आणि थोडे निवांत भेटता यावे म्हणून,बाहेरच खायला जावू,चालेल ना!मी हो म्हणालो आणि सुजाता म्हणाली,मग उद्या सायंकाळी बाल -गंधर्वच्या बाहेरील हॉटेलात बसू.बाय! आणि फोन ठेवल्याचा आवाज झाला.म्हटले,चला तर,म्हणजे अखेर अलकाने,तिचा निर्णय दिला तर.अगदी एक तारखेस हातात नाही,पण निर्णय झाल्याचे तर आज कानावर आले.आता उद्या सुजातास भेटले कि, काम झाले.असे मनाशी म्हणत म्हणत टेबल आवरले.बाईक काढली आणि थेट घर गाठले.एकूणच भरपूर काम आणि मनावरील ताण,आजच्या दिवसपुरता संपल्याने रात्री दहा वाजताच गादीवर अंग टाकले आणि गाढ झोपून गेलो.
ठिकाण बालगंधर्वचा कॅफे- सायंकाळची सुखद गारवा असलेली वेळ - कोपऱ्यातील टेबल-दि. २ जानेवारी १९८८- योगायोग काय फक्त हिंदी चित्रपटात,असतात असे वाटले काय? प्रत्यक्ष जीवनात देखील असे धक्के,नेहमीच बसतात. त्याची प्रचीती येण्याचा,आजचा दिवस होता.सुजाता नावाच्या जिला कधीही पूर्वी पाहिलेले नाही,फक्त एकदा फोन वर आवाज ऐकला आहे,त्या मुलीची मी वाट पहात बसलो आहे.आणि समोरून हलक्या शेवाळी रंगाचा सुरेख ड्रेस घालून, एक तरुणी थेट माझ्याच टेबला कडे येत आहे.जवळ येताच खूप दिवसापूर्वी हिला पहिले आहे पण कोण बरे?असा माझा स्वतःशीच विचार सुरु आहे.आणि ती समोर येवून मला म्हणतेय ओळखलस का विरू?मी नाही नाही असे इतक्या जोरात मान हलवत म्हटले कि,माझा गॉगल घसरून खाली पडला.आणि पाठोपाठ हसत अगदी आहे तसा धांदरट आहेस.सुंभ कुठचा! असे ती म्हणाली,आणि मी जवळ जवळ ओरडलोच, "कमळे तू ?" आणि ती हसत हसत सरळ समोर बसली.

मी या धक्यातून सावरत जरा स्थिर झालो.आणि आता दोन दिवसांपूर्वी ध्यानी मनी नसताना,अचानक घडलेल्या कोकण ट्रिपमुळे व त्यामुळे आठवलेली,कमला समोर आली म्हणून,आनंदून जावू,का आता हिला मी इथे,माझ्या मैत्रिणीने पाठवलेल्या तिच्या,मैत्रिणीची वाट पाहतोय हे सांगून नाराज करू मलाच कळेना!माझ्या एकूणच झालेल्या गोंधळा नंतर देखील शांत बसत,कमला मला म्हणाली," बोल रे इथे काय करतोयस,कोणी येणार आहे का? "त्यावर मी घसा खाकरत थोडा हिरमुसला होत,तिला म्हणालो; हो ग! माझ्या ऑफिस मधल्या एका परीचीत बाईंच्या,ओळखीची मुलगी येणार आहे निरोप घेवून.तिची वाट पाहतोय.
त्यावर कमला म्हणाली,"बर मग निघते रे, अलका बाईंचा निरोप घेवून सुजाता आली तर उगीच मी मध्ये नको."मी म्हणालो,"हो ना!"आणि पुन्हा एकदा एकदम खुर्चीत धडपडलो.अरे मी किती सहज,हो ना म्हणालो.पण हिला काय माहित,कोण अलका कोण सुजाता.आणि तीच वेळ गाठून हि इथे टपकली आणि वर निघताना असा धक्का दायक संदर्भ देत म्हणते,मी निघते.मलाच काय बोलावे हेच सुचेना,इतक्यात हॉटेलचा वेटर ऑर्डर साठी समोर उभा.मग किंचित सावरत,मी कमलाला म्हटले,अग थांब आलीच आहेस तर कॉफी घेवून जा.आणि वेटरला,दोन कॉफी! असे सांगून मी घटा घटा ग्लासभर पाणी प्यायलो.तर तिने पुढचा बॉम्ब टाकला, आणि म्हणाली,”अरे आपले बाहेर खायचे ठरले होते आणि तू नुसतीच कॉफी सांगितलीस.”
मग मात्र मी म्हटले," हे पहा मी जरी तुला जवळ जवळ पंधरा वर्षांनी पहात असलो,तरी तरी तुला ओळखले आहे.तू माझ्या आजीच्या वाड्यात राहायचीस,ती कमला सावंत आहेस ना !मग तुला मी इथे अलकाकडून येणाऱ्या,कोण सुजाताची वाट पाहतोय हे कसे काय ठाऊक? नक्की काय चाललेय मला कळेल का? "त्यावर एकदम गंभीर होत कमला म्हणाली, अरे विरू,सगळे सांगते.त्यासाठीच तर आली आहे.कारण सुजाता येणार नाही.त्यावर मी जवळ जवळ ओरडतच विचारले,"काय? सुजाता येणार नाही,तिची आणि तुझी कोठे भेट झाली ?मग जर आज तीने इथे ये म्हणून तिने फोन केला होता,तर आता येणार नाही असे न कळवता तुला का पाठवले? "
तर त्यावर कमला म्हणाली, "अरे असतात काही योग असे.आपण ठरवतो एक आणि घडते भलतेच.आता नाही का,तू वाट पाहतोयस सुजाताची आणि तुझ्यासमोर कमला."
"हे पहा काय ते स्पष्ट बोल.उगाच गुंतागुंतीचे बोलून,मला आणखीन गोंधळात टाकू नकोस."मी जरा खर्जातला आवाज काढत,थोडासा ताठ होत म्हणालो,इतक्यात वेटरने समोर एक्स्प्रेसो कॉफीचे दोन कप आणून ठेवले.आणि कमलाने बोलायला सुरवात केली."अरे विरू, सुजाता येणार नाही,असे मी तुला इतक्या ठामपणे सांगितले,कारण तुझ्या समोर जी बसली आहे ना कमला,तीच सुजाता आहे.मग मला सांग कमला आली म्हटल्यावर,आता सुजाता कोठून येणार.? कारण माझ्या लहानपणी मला सगळे कमला म्हणत,त्यामुळे माझे खरे नाव सुजाता हे तेंव्हा फक्त कागदावरच राहिले.अरे तू दहा/पंधरा वर्षांपूर्वी,तुझ्या आजीच्या वाड्यात यायचास,तेंव्हा मी तुझ्याकडे वाडा मालकांचा पाहुणा म्हणून पहायचे.नाकळती वये होती.तू ,तुझा धांदरटपणा,यासह तू कधी आवडू लागलास कळलेच नाही.तुझे खेळून येताना, माझ्यासाठी काही ना काही खाऊ म्हणून घेवून येणे,मी कडीपाटावर झोके घेत असताना, तुझे भिरभिरते पाहणे, काहीच नाही विसरले रे कधी!पण तो काळ असा होता कि, मने सहज गुंतून जात,पण व्यक्तच होता येत नसे.पुढे आमची बदली मुंबईस झाली.तुझ्या आजोळच्या वाड्याशी असलेले बंध तुटले.मनातील पाश मात्र तसेच राहिले.आणि आज नियतीने आपल्याला एकमेकासमोर उभे केले.पण किती विपरीत परिस्थितीत पाहिलेस ना! "
तर आता आपण आपले बालपण बाजूला ठेवून ज्या कामासाठी भेटतो आहोत, त्याची सुरवात करूयात.मी मुंबईस अंधेरीला राहते. तिथे श्री. गुप्ता म्हणून एक श्रीमंत आसामी आहे.त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी..गडगंज मिळकत अंधेरीत तीन मजली बंगला.माझ्या बाबांचा आणि त्यांचा जुना परीचय.त्यामुळे कोकणातून मुंबईस बदली होताच, गुप्ताजींनी त्यांच्या बंगल्यातच आमची राहण्याची व्यवस्था केली.आणि दोन वर्षांपूर्वी अलका त्यांच्या कडे आली आणि आमची ओळख झाली.मग आमची मैत्री आपोआपच घट्ट होत गेली.पुढे कधीतरी गप्पातून अलकाचे नोकरीचे ठिकाण,तेथे काम करणारे लोक, अशा ओघातून येणाऱ्या गप्पातून तिच्या ऑफिसात वीरेंद्र धारवाडकर म्हणू जो कोणी काम करतोय त्याने तिला विचारले आहे इथपर्यंत विषय झाले.पण त्यावेळी श्री. वीरेंद्र धारवाडकर म्हणजे कोकणात येणारा धांदरट वीरू आहे हे समजले पण नव्हते.पुढे अलकाचे येणे जाणे मुंबईस वाढले. तसेच गुप्ताजी पण बरेचदा तिच्या बरोबर असत.त्यातून परिचय वाढत गेला.मग तीन चार महिन्यापूर्वी,अलका जवळजवळ दोन आठवडे येवून राहिली होती.तेंव्हा तिला म्हटले,काय म्हणतायत धारवाडकर साहेब!कुठपर्यंत आलीय गाडी? तर त्यावर ती म्हणाली, सुजाता खूप मोठी जबाबदारी तुझ्यावर देणार आहे.ती पार पाडशील का ? मला काहीच समजले नाही. त्यावर ती इतकेच म्हणाली, वेळ आली कि सांगेन.त्यादिवशी आमचा विषय तसाच राहिला.
मग दोन दिवसांनी एकदा ती दुपारी निवांत होती,घरी कोणीच नव्हते.तशी माझ्या समोर बसत मला म्हणाली, काय ग सुजाता एक विचारू ? मी म्हटले काय? तर सरळ डोळ्यात पाहत म्हणाली, कोण आहे ग तुझ्या स्वप्नातला राजकुमार. मी म्हटले,अग स्वप्न पडण्यासाठी का होईना निवांत झोप यावी लागते डोळ्यात.तशी निवांत कधी झोपलेच नाही ग! पण विचारलेस म्हणून सांगते,एक आला होता,स्वप्नात नाही पण प्रत्यक्षात.पण कडीपाटाचा झुला तो कितीसा वर जाणार ? एक दोन वर्षे तो त्याच्या आजीकडे आला,मग आम्ही मुंबईस आलो.पुढे काय आपोआप सर्वच आठवणींच्या धुक्यात लपेटले गेले.पण का ग तू का विचारतेस.त्यावर डोळ्यात पाणी आणत मला म्हणाली, आहे एक असाच हवासा वाटतो पण माझा कधीच होणार नाही.पण तो माझ्या निर्णयाची वाट पाहत थांबलाय,त्याला निरोप आणि आधार,दोन्ही तूच द्यायचा आहेस.आणि हिच एक अवघड जबाबदारी मी तुझ्यावर टाकणार आहे.मी ते ऐकूनच सर्द झाले.
मग मी तिला सरळ सरळ विचारले जर कोणी आवडले आहे,तर त्याच्या प्राप्तीसाठी झगडायचे सोडून दूर काय पळतेस? त्यावर ती म्हणाली,"हे पहा सुजाता,मी तुझ्या पासून काहीच लपवणार नाही.वेळ येताच सर्वच,तेही सविस्तर सांगेन.आत्ता फक्त तू,माझ्या या विनंतीस साथ दे.आणि हो मी सर्व तुझे आई बाबा, तसेच गुप्ताजी यांचेशी पण बोलले आहे.तर सर्वात प्रथम,हे पार्सल तू वीरेंद्र धारवाडकर यांना नेवून दे. मग नंतर मी तुला सर्व समजावून सांगेन."
तर विरू, हे ते पार्सल.यात अलकानी तुला सविस्तर पत्र दिले आहेच ते वाच.आणि पुढे मी केंव्हा व काय करायचे,हे अलका मला सांगणार आहे.आणि हो अलकाची या योजनेत एक अट आहे.ती म्हणजे, मी हे पार्सल दिल्या नंतर, पुन्हा तुला परस्पर न भेटता, जेंव्हा अलकाच्या पत्राचे उत्तर देवून,मला बोलवशील तेंव्हाच,अलकाच्या व माझ्या आई बाबांच्या परवानगीने तुला भेटायचे आहे.
मी ज्या पत्राची वाट पाहत होतो ते,इतकी गुंतागुंत घेवून येईल,याची मला पुसटशी हि कल्पना नव्हती.सर्वावर कडी म्हणजे,सुजाता आणि कमला हि एकच आहे,आणि आता तिचा सहभाग यात एका वेगळ्याच पातळीवरचा आहे.शेवटी मी तिला म्हटले, थांब ! आताच उघडतो पत्र आणि तुझ्या समोर विषयाची सांगता करू.त्यावर सुजाता म्हणाली, " विरू, तू अगदी असा वागशील असे अलका आधीच म्हणाली होती.आणि त्यावर तिने सांगितले आहे,कि सुजाता हि देखील या योजनेचा भाग असल्याने, तुला असे करून चालणार नाही. तेंव्हा तू हे पत्र घरी जावू शांतपणे वाच.
मला एकूणच काय करावे हेच कळेना.शेवटी सुजाता म्हणाली, " विरू असे कर आपण थोडे थोडे खावून घेवू.पुन्हा कधी आणि कशासाठी भेटायचे आहे,आज माहित नाही.निदान आजची संध्याकाळ तरी आपण आनंदात पार पाडू " त्यावर मी मान हलवली, आणि सुजाताने जे ऑर्डर केले ते खावून,सुजाताला मुंबईच्या एशियाडला बसवून मी घरी आलो.( क्रमशः)

गुलमोहर: 
शब्दखुणा: