कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत हिच्यासोबत संयुक्ता सदस्य 'साया' ने केलेया गप्पांवर आधारीत लेख 'महिला दिना' निमित्त मायाबोलीकरांसाठी प्रकाशित करत आहोत.
कोल्हापूरसारख्या छोट्या शहरात लहानाची मोठी झालेली राही सरनोबत अवघ्या चार वर्षांच्या कारकीर्दीत १९व्या राष्ट्रकुल स्पर्धेत २५ मीटर स्पोर्टंस पिस्तूल इव्हेंटमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवते ही गोष्ट केवळ कौतुकास्पदच नाही, तर या क्षेत्रात कामगिरी करू इच्छिणार्या असंख्य नवोदितांसाठी ती आदर्शही ठरू शकते. लहानपणी शाळेत खेळांपेक्षा निबंध लेखन, पुस्तके वाचणे अशी साहित्यिक आवड असणारी राही मोठेपणी किलो-दीड किलोचे पिस्तूल हाताळेल, असे खरे तर तिलाही कधी वाटले नव्हते. म्हणूनच खेळण्यातल्या पिस्तुलाचेही आकर्षण नसणारी राही पुढे २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल इव्हेंटमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवते, ही घटना साधीसुधी बातमी न राहता ती एक यशोगाथा होते. नेमबाजीची राह राहीने कशी पकडली, या वाटचालीत तिला कोणाचे व कसे मार्गदर्शन मिळाले, तिने कशी मेहनत घेतली, या अनोख्या आवडीसाठी घरच्यांचा पाठिंबा कसा मिळाला, या वाटचालीतील यशानंतर आलेले-येणारे अनुभव.. असे अनेक प्रश्न मनात उभे राहिले आणि राहीकडूनच मिळालेल्या त्यांच्या उत्तरांतूनच साकार झाली राहीची ही यशोगाथा.
एकदा वर्तमानपत्रातील एका बातमीने राहीचे लक्ष वेधून घेतले. ती बातमी होती २००६ च्या ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीत कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतला २ सुवर्णपदके मिळाल्याची. सार्याच वर्तमानपत्रांतून तिला प्रसिद्धी मिळाली होती. ते वाचून, तिचे होणारे कौतुक पाहून भारावून गेलेली राही कोल्हापुरात गंगावेशीतील संभाजी राजे नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात कुतूहल म्हणून प्रथम नेमबाजी पहायला गेली. तिथे अनेक अनोळखी नवे नेमबाज सराव करत होते. काही तरी वेगळे करण्याची इच्छा राहीच्या मनात होतीच. पण हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कुतुहलाची जागा आवडीने घेतली आणि नेमबाजीने पूर्णपणे तिच्या स्वप्नांचा ताबा घेतला.
तेजस्विनी सावंत ही जरी राहीची स्फूर्ती होती, तरी राहीने तेजस्विनीच्या रायफल नेमबाजीऐवजी पिस्तूल नेमबाजीचे क्षेत्र निवडले. रायफल नेमबाजीसाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री आणि ड्रेस कोड / शूज इ. च्या अनिवार्यतेची अट पाहून राहीने पिस्तूल नेमबाजीचा सुटसुटीत पर्याय निवडला आणि ती मनोमन नेमबाज होण्याची स्वप्ने पाहू लागली.
१० वीची परीक्षा दिल्यानंतर मिळणार्या मोठ्या सुट्टीत मात्र राहीने अचानक नेमबाज होण्याची आपली मनीषा घरी बोलून दाखवली. शाळेत अभ्यासात राहीची चांगली प्रगती असल्याने तिने चांगले शिकावे, विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा असे राहीच्या बाबांना वाटत होते पण तरीही त्यांनी आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलीला प्रोत्साहन द्यायचे ठरविले. राहीला घेऊन त्यांनी प्रशिक्षक अजित पाटील यांची भेट घेतली आणि २००६ मध्ये राहीचा सराव सुरू झाला. तरीही घरचे सारे तोपर्यंत या सरावाकडे राहीचा केवळ सुट्टीतला छंद म्हणूनच पहात होते. आपले पहिले प्रशिक्षक अजित पाटील यांच्याकडे राहीचा सराव मात्र अगदी मनापासून चालू होता.
सराव सुरू झाल्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात पुण्याला बालेवाडी स्टेडियमवर आयोजित केलेल्या २००६ च्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये राहीने भाग घेतला आणि रौप्यपदक मिळविले. पहिल्याच स्पर्धेत मिळालेल्या या रुपेरी यशाने राहीचा उत्साह दुणावला. २००६ च्या मे महिन्यात अवघ्या ६ महिन्यांच्या सरावावर राहीने पुढे राज्यस्पर्धेमध्ये सीनियर व ज्युनियर गटात २ सुवर्णपदके मिळवली. लगेचच महिन्याभरात नोयडा, दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विक्रमासह तिने सुवर्णपदक पटकावले. अल्पावधीतच राहीने मिळवलेले हे खूप मोठे यश होते. या काळापर्यंत तिचे प्रेरणास्थान असलेल्या तेजस्विनी सावंतशी तिची भेटही झाली नव्हती. यानंतर राहीने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. २००७ पासून मुंबईच्या शीला कानूनगो यांचेही मार्गदर्शन तिला लाभले.
२००८ मध्ये जर्मनीतील ज्युनियर आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये राहीला सुपर कप मिळाला. २००८ च्याच ऑक्टोबरमध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धा होत्या. १८ वर्षांखालील गटात राहीला सुवर्णपदक मिळाले. १८ वर्षाखालील गटात नेमबाजीचे सुवर्णपदक मिळवणारी एकमेव नेमबाज राही ! त्या नंतर युवा राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये १८ वर्षांखालील गटात नेमबाजी या प्रकारावर बंदी आली. इतर अनेक देशांमध्ये १८ वर्षांखालील गटासाठी शस्त्र हाताळणीला बंदी असल्याने, तो बंदीचा नियम येथेही लागू करण्यात आला. या पूर्वीही १८ वर्षांखालील गटासाठी हा क्रीडा प्रकार अस्तित्वात नव्हता. त्यामुळे २००८ च्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये १८ वर्षांखालील पिस्तूल नेमबाजीत राहीला मिळालेला हा सुवर्णपदकाचा मान 'न भूतो न भविष्यति' असाच म्हणावा लागेल.
वास्तविक या स्पर्धेतील स्वत:च्या कामगिरीवर राही समाधानी नव्हती, पण सुवर्णपदकाची मानकरी ठरल्याचा आनंद होताच. या यशाबद्दल खूप मान-सन्मान, सत्कार झाले. स्पर्धेहून परतल्यावर कोल्हापुरकरांनीही तिचे भव्य स्वागत करून मिरवणूक काढली होती. राहीचे नाव सर्वतोमुखी झाले होते. आता प्रभा सरनोबत व जीवन सरनोबत यांना राहीचे आई-बाबा अशी एक नवी ओळख मिळाली होती. नरसोबाच्या वाडीजवळचे घालवड हे राहीचे मूळ गाव. तिथे आजही राहीचे नातेवाईक आहेत. त्यांनी केलेला हृदय सत्कार व त्यांचे अगत्य वर्णन करताना आजही राहीच्या घरचे सगळे भारावून जातात.
२१ वर्षांखालील नेमबाजी गटात २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धांची व खेळांची तयारी २००९ मध्येच सुरू झाली. या दरम्यान राही म्युनिकला वर्ल्ड चँपियनशिप स्पर्धा खेळली. त्यात ती आठव्या स्थानावर होती. एप्रिल २०१० मध्ये तिचे जागतिक स्थान (वर्ल्ड रँकिंग) १३व्या क्रमांकावर होते.
जो देश राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन करतो त्या देशाला राष्ट्रकुल स्पर्धेच्या ६ महीने आधी ' कॉमनवेल्थ चँपियनशिप ' आयोजित करावी लागते. भारतात २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेआधी कॉमनवेल्थ चँपियनशिप फेब्रुवारीत दिल्लीला घेतली गेली. त्यात राही चौथ्या स्थानावर होती. १९व्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये नेमबाजीतील एक सुवर्णपदक व एक रौप्यपदक मिळवून राहीने यशाच्या या चढत्या आलेखावर कळस चढविला. सिडनी, चायना, जर्मनी, सरबियामध्ये चार विश्वचषक स्पर्धा होत्या. राहीला जर्मनीत एक सुवर्णपदक व एक कांस्यपदक मिळाले. अवघ्या ४ वर्षात राहीने हे नेत्रदीपक यश मिळविले. चीनच्या आशियाई स्पर्धांमध्ये नोव्हेंबर २०१० मध्ये राही नवव्या स्थानावर होती.
नुकतेच २०११ च्या जानेवारीत ५४व्या राष्ट्रीय नेमबाजी चँपियनशिपमध्येही राहीने दोन सुवर्णपदके व ४ रौप्यपदके पटकावली आहेत. अगदी परवा, ५ मार्च २०११ ला, दिल्लीत झालेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यासाठी ज्या स्पर्धा घेतल्या गेल्या त्यात राहीने प्रथम स्थान मिळवले आहे. त्यामुळे १५ ते २३ मे २०११ पर्यंत फोर्टबेनिंग, अमेरिका येथे होणार्या व त्यानंतर १६ ते २३ जून २०११ मध्ये म्यूनिक, जर्मनी येथे होणार्या विश्वचषक स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. त्यापूर्वी २१ ते ३१ मार्च २०११ ला सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे व ७ ते १५ एप्रिल २०११ मध्ये चॅंगवॉंग, कोरिया येथे होणार्या विश्वचषकासाठीही तिची निवड झाली आहे. यासाठी तिची जोरदार तयारी चालू आहे. यात ती भरघोस यश मिळवेल यात शंकाच नाही. आतापर्यंत ५ वर्षांच्या कालावधीत राहीने ५७ पदके मिळविली आहेत. त्यात २३ सुवर्ण, २६ रौप्य आणि ८ कांस्य पदकांचा समावेश आहे.
या पूर्वी २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल या इव्हेंटमध्ये श्वेता चौधरी व सुषमा सिंह यांची नावे होती. पण आता त्यात विक्रम स्थापित करून राहीने आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. सुषमा आणि श्वेता या दोघींनाही नेमबाजीची कौटुंबिक पार्श्वभूमी होती. जवळ-जवळ ऐंशी टक्के नेमबाज कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने या क्षेत्रात येतात पण राहीने अशी कोणतीही पार्श्वभूमी नसताना पूर्णपणे स्वत:च्या जोरावर एक नवी वाट चोखाळली आणि त्यात यशाचे शिखर गाठले. २०१० मध्ये राही ज्या-ज्या स्पर्धा खेळली त्यांत ती वयाने सर्वात लहान नेमबाज होती.
आशियाई स्पर्धांमध्ये मात्र आपण नेमबाजीत फारशी लक्षवेधी कामगिरी करू शकत नसल्याबद्दल खंत व्यक्त करताना राही म्हणते, ''आपल्याकडे पिस्तुलाला कोच नसतो. इतर देशांतील नेमबाजांसोबत त्यांचे कोच असतात. सरावासाठी कधी-कधी आपल्याला हवी तशी साधने वेळेवर उपलब्ध होत नाहीत. कधी व्हिसाच तयार नसतो. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत व्हिसा हातात नाही अशीही परिस्थिती असते. त्यामुळे खेळाडूंवर याचा खूप मानसिक ताण असतो. अशा अनेक लहान-मोठ्या अडथळ्यांचा खेळाडूच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.''
लहान मोठ्या समस्या असतातच पण त्यांवर मात करतच पुढे जायचे असते. ऑलिंपिकमध्ये लक्षवेधी कामगिरी करून यश संपादन करण्याचे राहीचे स्वप्न आहे. २०११ च्या जानेवारीतील राष्ट्रीय नेमबाजी चँपियनशिपपासून राहीला कुमार बिल्डर्सचे 'लक्ष्य ऑर्गनायझेशन' प्रायोजक म्हणून लाभले आहेत. आता इथून पुढे २०११-१२ साठी खेळासंबंधीच्या सर्व खर्चाची जबाबदारी 'लक्ष्य' ने स्वीकारली आहे, तर वर्ष २०११ साठी सहारा ग्रुप प्रायोजक आहे. राही आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी दिवसाला ७ ते ८ तासाचा सराव करते. सरावातील नियमितपणा हे तिचे आणखी एक वैशिष्ट्य. ज्योती मॅडमचे दीड तासाचे फिजिकल ट्रेनिंग आणि डॉ. भीष्मराज बाम यांचे एक तासाचे मेंटल ट्रेनिंगही खेळासाठी खूपच उपयोगी ठरते असे राही सांगते.
आपल्या यशाबद्दल बोलताना राही म्हणते, ''कधी एकटीने कोल्हापूर-पुणे प्रवाससुद्धा मी केला नव्हता. कधी वेळच आली नव्हती. घरचे कुणी ना कुणी नेहमी सोबत असायचेच. पुण्या-मुंबईला रेंजवर सरावासाठी जातानाही माझी आई सोबत असायची. पण आज इतर खेळाडूंसोबत देश-विदेशांचे दौरे करताना खूप आत्मविश्वास वाटतो. प्रवासातही खूप गोष्टी शिकायला मिळतात.'' राहीचा आत्मविश्वास तिच्या बोलण्यातून, तिच्या नजरेतून, तिच्या प्रत्येक हालचालीतून जाणवतो.
राहीने ग्रॅज्युएट व्हावे व कॉम्प्युटरशी निगडित काम शिकून घरीच बसून करता येण्याजोगे काही काम करावे, लग्न-संसार करावा अशी राहीच्या आईची तिच्याकडून माफक अपेक्षा होती. आज राहीचे यश पाहून ती म्हणते, ''कदाचित तिच्यावर आम्ही फार मोठ्या अपेक्षा लादल्या नाहीत म्हणूनच ती तिला हवे ते मनापासून करू शकली असावी. पहिल्याच स्पर्धेत केवळ चार-पाच गोळ्यांच्या सरावावर राहीने रौप्यपदक मिळवल्यामुळे आम्हाला राहीचा निर्णय मान्य करणेच योग्य वाटले.'' या क्षेत्रात पुढे जाण्याच्या तिच्या इच्छेखातर विज्ञानशाखेऐवजी वाणिज्य शाखेला जाण्याचा राहीचा निर्णयही तिच्या वडिलांनी मान्य केला. आज तिने जे यश मिळवले आहे त्यात तिच्या निर्णयाचा व मेहनतीचाच अधिक वाटा आहे, तसेच तिच्यावर जो विश्वास टाकला, प्रोत्साहन दिले त्याचे तिने चीज केले असे तिच्या आई-बाबांना वाटते. कोल्हापूरच्या उषाराजे हायस्कूल व विवेकानंद महाविद्यालयात शिकलेली राही सध्या बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या दुसर्या वर्षाला आहे.
नव्याने या क्षेत्रात येऊ इच्छिणार्यांना राहीचे इतकेच सांगणे आहे, '' चांगल्या वृत्तीने खेळामध्ये या. स्वत:च्या कामगिरीकडे लक्ष द्या. दुसर्याशी तुलना नको.'' राहीच्या अतुलनीय कामगिरीमागे कदाचित हीच तीन सूत्रे असावीत.
परिचयः साया
वे टू गो राही! उत्तम
वे टू गो राही! उत्तम परिचय!!
धन्यवाद साया.
राहीला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
वॉव. राही तुझ्या पुढच्या
वॉव. राही तुझ्या पुढच्या वाटचाली साठी खुपखूप शुभेच्छा.
अशीच तुझ्यापासुनही स्फुर्ती घेऊन तुझ्या पावलांवर पाऊल टाकणार्या अनेक राही घडोत.
इतक्या छान मुलाखतीसाठी धन्यवाद साया.
छान परिचय! राहीला शुभेच्छा!
छान परिचय! राहीला शुभेच्छा!
राहीच्या यशाबद्दल तिचं
राहीच्या यशाबद्दल तिचं मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा!
साया, परिचय सुंदर लिहिलाय!
राहीला आपल्या सर्वांच्या
राहीला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा पोचवाव्यात.
राहीला मनःपुर्वक शुभेच्छा.
राहीला मनःपुर्वक शुभेच्छा.
राहीचं मनःपूर्वक अभिनंदन! छान
राहीचं मनःपूर्वक अभिनंदन!
छान मुलाखत आणि फोटोही. त्या आईवडिलांसोबतच्या अगदी अकृत्रिम फोटोने मुलाखतीला आपोआप एक घरगुती आपलेपणाचा टोन आला आहे. सायाचे धन्यवाद.
राहीचं अभिनंदन आणि तिला
राहीचं अभिनंदन आणि तिला शुभेच्छा.
वेगळ्याच क्षेत्रात एवढी भरीव कामगिरी करणार्या या मुलीची ओळख करुन दिल्याबद्दल सायाचेपण आभार. न रुळलेल्या वाटेवर जाण्याच्या राहीच्या निर्णयाचे खूप कौतुक वाटले.
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा,
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा, राही!!
साया, धन्यवाद.
राहीच्या यशाबद्दल तिचं
राहीच्या यशाबद्दल तिचं अभिनंदन
तिच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!!
वाह ! छान परिचय.. राहीचे
वाह ! छान परिचय.. राहीचे कौतुकच आहे.. नि पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
राहीचं अभिनंदन! धन्यवाद
राहीचं अभिनंदन!
धन्यवाद साया.
मस्त परिचय.. राहीला पुढच्या
मस्त परिचय.. राहीला पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा...
छान! धन्यवाद साया ! राहीला
छान! धन्यवाद साया ! राहीला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!
चांगला परिचय! राहीला खूप
चांगला परिचय! राहीला खूप शुभेच्छा!
वा! स्फुर्तीदायक. धन्यवाद
वा! स्फुर्तीदायक.
धन्यवाद साया.
चांगला परिचय.............
चांगला परिचय.............
राहीला खुप खुप शुभेच्छा!
राहीला शुभेच्छा
राहीला शुभेच्छा
उत्तम!! ऑल द बेस्ट राही..!
उत्तम!!
ऑल द बेस्ट राही..!
छान परिचय साया!
राहीची ऑलिंपिकसाठी निवड झाली
राहीची ऑलिंपिकसाठी निवड झाली आहे. तिने मायबोलीवरच्या सर्व शुभचिंतकांना धन्यवाद दिले आहेत!
http://timesofindia.indiatimes.com/sports/more-sports/shooting/Rahis-fou...
राहीचे अभिनंदन.
राहीचे अभिनंदन.
मस्त बातमी! अभिनंदन, राही.
मस्त बातमी!
अभिनंदन, राही.
अर्रे वा, राहीचं अभिनंदन!
अर्रे वा, राहीचं अभिनंदन!
अभिनंदन राही!
अभिनंदन राही!
अभिनंदन राही!
अभिनंदन राही!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
मस्त!! राही ला शुभेच्छा!!
मस्त!! राही ला शुभेच्छा!!
हे सहीय. अभिनंदन राही.
हे सहीय. अभिनंदन राही. पदकासाठी शुभेच्छा!!
राहीला अनेकोत्तम शुभेच्छा!!!
राहीला अनेकोत्तम शुभेच्छा!!!
राही, अभिनंदन आणि शुभेच्छा!
राही, अभिनंदन आणि शुभेच्छा!
Pages