ठिकाण-घरीच,नाताळ-२५ डिसेंबर१९८७- काळ कसा वेगाने धावतो.कालच अलकाच्या आई घरी येवून गेल्या. त्यांनी निरोप दिला.खरेतर निरोपाचा अर्थ, मी रात्रभर विचार करून देखील उलगडलेला नाही.अलकाची कोण मैत्रीण? आणि ती मला कसले पार्सल देणार? काय असेल त्यात?बर हा निरोप आईकडून आणि तोही समक्ष,आई सोबत का दिला बरे या अलकानी! विचाराने अक्षरशः डोके फुटायची वेळ आली.
मन पुन्हा एकदा अलकाच्या पहिल्या भेटी पर्यंत जावून पोहचले.जाताना आई म्हणाल्या,चार वर्षे झाली,माझे त्यांच्या घरी जाणे झालेच नाही.अगदी खरे सांगायचे तर,मला खुपदा असे वाटायचे कि,जावे अचानक अलकाच्या घरी कधी तरी, तिला आणि तिच्या आईस,अचानक त्यांच्यासमोर 'दत्त' म्हणून उभे राहावे,आणि आश्चर्य चकित करावे.मग तिने आज अचानक इकडे कसे येणे केले म्हणत,आपल्याशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात.आईस म्हणावे,काहीतरी खायला कर? आईने म्हणावे,"अग,खायला काय?आता जेवून जाईल तो."आणि त्यावर,बर बाई चालेल!असे म्हणत गालात हसत,हळूच मला म्हणावे,थांबशील ना रे जेवायला? पण कसले काय? नुसतेच मनातले मांडे; प्रत्यक्षात आपण गेलो आणि तिचा भाऊ किंवा वडिलांना आपले असे 'दत्त' म्हणून उभा राहणे नाही आवडले,तर आपला दत्तू व्हायचा.इतक्या सगळ्या विचारांच्या उसळलेल्या आवर्तनानंतर मनाशी विचार केला जावू दे,आज पंचवीस तारीख आणखीन पाच किंवा सहा दिवसात आपल्याकडे ते पार्सल येईल मग ठरवू काय करयचे ते.
ठिकाण माझे गाव- गावची जत्रा-गावाबाहेरचे देऊळ आणि परिसर,-२८ डिसेंबर १९८७- आज जवळ जवळ सहा वर्षांनी गावी आलो.खरेतर शाळा/कॉलेजच्या दिवसात परीक्षेचा अखेरचा दिवस,हा गावी पळून येण्याचा हक्काचा दिवस.किती वर्षे हा आंनद आपण लुटलाय.
पण नोकरी सुरु झाली;आणि सहजगत्या सारे संदर्भच बदलत गेले. सुखाचे दिवस पावसाची हुलकावणी देत दूर जाणाऱ्या ढगांसारखे,कधी उडून गेले कळलेच नाही. अलका जेंव्हा थेऊरच्या देवळात डोळे मिटून डोक्यावरून पदर घेऊन उभी होती,तेंव्हा तिला गावच्या जत्रेला आणून कुलदैवतासमोर असेच उभे करून,त्या देवालाच विचारावे कि,काय आवडली का आमची गृहलक्ष्मी ? असे मनात आले होते.
पण खेडेगावात शहरातून लग्नापूर्वी,असे कुणा मुलीस घेवून येणे म्हणजे, माकडाच्या हाती कोलीत.गावभर नुसतीच चर्चा. बर एकमेकात सांगताना, धारवाडकरांच्या कडे कोणी तरी, पाहुणे जत्रेला आलेत असे नाहीत सांगणार.तर त्या घटनेची विशेष बातमी,आणि तीही तिथल्या प्राइम टाईमच्या वेळी म्हणजे सायंकाळी पारावर अड्डा जमला कि मग, आधी तंबाखूच्या चंच्या सुटणार आणि मग एकेकाची तोंडे.खेडेगावातील या वातावरणाचा अंदाज नसलेल्या,माझ्या बाळू खोत या मित्राने एकदा, त्यांच्या वर्गातील त्या मानसी नेने हिला, गावची जत्रा एन्जोय करायची म्हणून बरोबर घरी आणले.
त्या दिवशी संध्या काळी मी पारावर गेलो होतो आणि तिथले संवाद ऐकले. त्याची झलक मुद्दाम तुम्हाला सांगतोच.
उपसरपंच - " अरे त्या खोताच्या धाकल्या बेन्यान काय आणलाय रे जत्रला! "
तात्या- " अवो दादा, कोण ते धाकले चिरंजीव बाळासाहेब नव्हं का ? त्यांनी काय आणलाय म्हणतायसा ? लई जाळ केस हाय,आक्षी हेमामालिनीच म्हननसा."
उपसरपंच- "पर तात्या,आबा खोताचा ह्यो धाकला तिकड शहरातच राहतंय नाही का? मंग जत्रला येताना चीरगुटात विस्तव कशापाय घेवून आलाय."
मास्तर - "अहो, दादासाहेब तुम्ही पाच पावसाळे जास्तीच पाहिलेत आमच्या पेक्षा. पण तुम्हाला सांगतो शहरात आता समानतेचे वारे आहे. स्त्रिया आता पुरुषांच्या बरोबरीने वावरतात.त्यामुळे खोतांच्या चिरंजीवांनी त्याची परिचित कन्या आणलीय जत्रा कशी असते ते दाखवायला."
उपसरपंच-" मास्तर,तुम्ही जे काय समानता, वारे म्हणताय ना,ते राजकारणामुळे आम्ही पण जाणतोच कि,पण म्हणून काय कानात वारे शिरल्यासारखे उधळायचे का ?आणि त्या रंभेच्या बापासास नको का अक्कल कि विस्तवापाशी लोणी ठेवले कि ते पाघळणारच"
मास्तर- "अहो, दादासाहेब खोतांचे चिरंजीव खूप शिकलेत,वयांनी लहान असले तरी समज आहे.वरणार असतील त्या कन्येस.धारवाडकराची धाकटी पाती आणि खोतांचे चिरंजीव हे दोघे बालमित्र,त्यास ठावूक असेल.विचारा हवेतर."
या वाक्यांनी मात्र मी पुरता उडालो. मी कधीतरी गावी येणारा, सहज म्हणून पारावर आलो होतो. पण मी कोण? मुलात कितवा या सह माझी कुंडली तोंडपाठ असणारी हि गावाकडची मंडळी पाहून मी चक्रावून गेलो. आणि कोणी काही विचारायच्या आधी पटकन म्हणालो,"अहो बाळूच्या बरोबर ती शिकते.मानसी नेने नाव आहे तिचे आणि फक्त मैत्रीण आहे. बाकी काही नाही हो."
तात्या - "अरे विरू,बाळूला म्हणावे,जत्रेत फिरवायला ती का परकरी पोर आहे,नेनेंची मानसी."आणि आणायचे होते जत्रेला तर तिच्या घरचे,आणखीन दोन जण काही जड नव्हते, एस. टी.च्या लाल डब्याला आणि गाव गाड्याला."
उपसरपंच- "आबासाहेबांना सांगा;उद्या खणा नारळाने ओटी भरून लावून द्या परत परक्याचे धन."
आता यावर आणखी काही बोलून विषय वाढवणे तिथे ठीक दिसणार नाही म्हणून मी काढता पाय घेतला.आणि आत्ता ते आठवून,अलकास काही जत्रा दाखवण्यास नेता येणार नाही, याची मनोमन खात्री पटली. (क्रमशः)
खुप वाट पहात होते की, अलका
खुप वाट पहात होते की, अलका काय उत्तर देते.. लवकर टाका भाग. आवड्ली कथा. खुप सहज आणी छान लिहीता.
आवदली
आवदली
मस्त...पण खुपच छोटा भाग आहे.
मस्त...पण खुपच छोटा भाग आहे.
खुपच लहान भाग आहे. थोडे मोठे
खुपच लहान भाग आहे. थोडे मोठे भाग टाका प्लीज. बाकी तुमची शैली छान आहे.
murder mystery पेक्शा जास्त
murder mystery पेक्शा जास्त suspense आहे
किकर, वाचली मस्त आहे. भाग
किकर, वाचली मस्त आहे.
भाग छोटा आहे. पण सध्या जास्त लिहीणं तुम्हाला शक्य नसेल. अच्छा.
पार्सलमध्ये काय असेल? हे
पार्सलमध्ये काय असेल? हे समजले नाहीच आज....पण जत्रेचा किस्सा म्हणजे लई भारी!!!!:) मस्त मनोरंजन झाले.
लवकर पार्सलचे कोडे उलगडा हो, किंकर... किती ताणाल उत्सुकता?