औषधी वनस्पती

Submitted by जिप्सी on 20 February, 2011 - 22:49

=================================================
=================================================
पूर्वी कुणाला खोकला, सर्दी पडसं झाले कि डॉक्टरकडे न जाता अडुळशाचा काढा, गवती चहाचा काढा असे द्यायचे. पोटात दुखायला लागले कि ओव्याचा अर्क किंवा पाण्यात हिंग टाकुन द्यायचे. मुका मार लागला असता निर्गुडीच्या पालांचा लेप गरम करून त्या भागावर लावला जायचा. लहानपणी आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आई आम्हाला कडु किराईताचा काढा प्यायला द्यायची. अतिशय कडु असलेला हा काढा जबरदस्तीने प्यायला लागायचा. हा इतका कडु कि याच्या काडीला स्पर्श करून बोट तोंडात टाकले असता जबरदस्त कडवटपणा यायचा. अर्थात हे सारे शरीरासाठी चांगले म्हणुन ते इच्छा नसताना प्यायला लागायचे. अशाच प्रकारच्या औषधी वनस्पती आपल्या अवतीभोवती आहेत पण आपल्याला त्याबद्दल माहिती नसते. बर्‍याचवेळा त्या वनस्पती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर, "अरे, याला अमुक अमुक म्हणतात का?" हे तर आमच्या इथे भरपूर आहे अस ऐकायला मिळते. तर कधी "आजुबाजुला अडुळशाचा पाला आहे, पण त्याचा काढा कसा करायचा ते माहित नसते" किंवा केला तरी तो कोणत्या मात्रेत द्यायचा हे माहित नसते. आज पेनकिलरने त्वरीत आराम जरी मिळत असला तरी सतत सेवनामुळे त्याचे शरीरावर वाईट परीणाम होतात. म्हणुनच कि काय आजही वनौषधीला पर्याय नाही.

आपणांसही या सार्‍या औषधी वनस्पतींची माहिती आणि ओळख एकत्र मिळावी म्हणुन हा वेगळा धागा काढतोय. यापैकी काहि वनस्पतींची लागवड घरच्या घरी करणे सहज शक्य आहे.

ही माहिती फक्त औषधी वनस्पती ओळखण्यासाठी आहे. स्वप्रयोगांसाठी नाही. यात लिहिलेले उपचार तज्ञांच्या सल्ल्यानेच/मार्गदर्शनाखालीच करावेत.
=================================================
=================================================
पान १
वनस्पतींची प्रकाशचित्रे आणि त्यांचे औषधी उपयोग:
अडुळसा, ब्राह्मी, अश्वगंधा, नागकेसर, मरवा, टाकळा, ओवा, वेखंड, रिठा, सब्जा, अक्कलकारा, कापूर तुळस, तमालपत्र, हाडजोडी, गवती चहा, हिरडा, वेलची, सागरगोटा, जायफळ, गुळवेल, सर्पगंधा, दंती, मेंदी, शेर, शतावरी, बेहडा, वनई उर्फ निरगुडी, रुई, रिंगण, पारिंगा, पानफुटी, माका, कोरफड, कडूलिंब, जास्वंद, गुंज, हळदकुंकू.

चर्चा आणि माहिती: विड्याचे पान, गुलबक्षीचे पान, गणेशपुजनात वापरण्यात येणार्‍या २१ पत्री आणि त्यांचे औषधी उपयोग.
=================================================
पान २
वनस्पतींची प्रकाशचित्रे आणि त्यांचे औषधी उपयोग:

कुर्डु, गेळफळ/मैनफळ, पुनर्नवा (शोथग्नी, श्वेतमूला, दीर्घपत्रिका),खडकी रास्ना, अग्निशिखा (कालिकारि, खड्यानाग, बचनाग, लांगलीकंद, कलिहरी).

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगेश,
लई भारी आणि उपयोगी लेख !
असा लेख तुम्ही (आणि जागु) सुरु केल्याबद्दल धन्यवाद !
Happy

हा आहे पारिंगा. ह्याची पाने चोळून रस काढून वाहत्या जखमेवर लावल्यावर रक्त वाहणे लगेच थांबते.
जागु,
या पारिंगाची (पांगराची) झाडाला असणार्‍या तीक्ष्ण काटा लागुन हाताला लगेच रक्त यायचं पण याचीच पाने यावर उपाय आहे हे आता कळालं !
Lol

या पारिंगाची (पांगराची) झाडाला असणार्‍या तीक्ष्ण काटा लागुन हाताला लगेच रक्त यायचं पण याचीच पाने यावर उपाय आहे हे आता कळालं >>>>>>>अनिलला मोदक Happy

अनिल, योगेश मी लहान असताना आमच्या घरात जखमेवरचे औषध नव्हतेच घरात. वारंगाला ही पारिंग्याची झाडे होती. जरा लागल की आजी लगेच पारिंग्याचा कोवळा पाला काढून त्याचा रस जखमेवर लावायची मग परत खेळायला तयार.

धन्स जागू, खरंच हि नविन माहिती समजली.
पूर्वी आमच्या बिल्डिंगसमोर दोन मोट्ठी पांगार्‍याची झाडे होती. त्या चटक्याच्या बिया काढताना काटे लागायचे. आता ती झाडही नाही आणि बालपणही नाही. Sad

योगेश, इथे तूला मुखपृष्ठ अपडेट करायची जबाबदारी घ्यावी लागेल. माझ्या जून्या रंगीबेरंगी पानांवर बहुतेक वनस्पतिंचे औषधी उपयोग दिलेले आहेत. कुणाला वेळ असेल तर इथे लिंक्स देऊ शकाल. (इथून ती पाने उघडणे, फार त्रासाचे होतेय.)

इथे तूला मुखपृष्ठ अपडेट करायची जबाबदारी घ्यावी लागेल.>>>>>नक्कीच Happy

माझ्या जून्या रंगीबेरंगी पानांवर बहुतेक वनस्पतिंचे औषधी उपयोग दिलेले आहेत. कुणाला वेळ असेल तर इथे लिंक्स देऊ शकाल. (इथून ती पाने उघडणे, फार त्रासाचे होतेय.)>>>>>दिनेशदा मीच विचारणार होतो याबद्दल तुम्हाला Happy वेळ मिळाल्यावर त्या लिंक्स देतो इथे.

अमि, बिब्ब्याच्या बिया, ज्यांना गोडांब्या म्हणतात. त्या सुपारीमधे वगैरे घालून खातात. वातावर गुणकारी आहेत. तसा बिब्बा पण अनेक विकारावर वापरतात, पण तो तीक्ष्ण असल्याने अनेक जणांना सहन होत नाही.

Celosia_argenteannn.jpg

संस्कृत नाव- शितवार, सितिवार, कुरण्डिका, क्षेत्रभूषाति
इतर नाव- कुरण्ड, कुरडु, सगेद मुर्गा, लोंपडी
लॅटिन नाव- Celosia argentea L.
कूळ - Amaranthaceae (आघाडा कूळ)
उपयोगी भाग- बिया, पाने व मूळ

बियांचे चूर्ण जेवढे बारीक करुन वापरता येइल तेवढे केल्यास अधिक लाभदायक. बियांचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास लघवीतुन जाणारी खर व मूतखडा यावर उपयुक्त. त्याबरोबर जि-याचे चूर्ण घेतल्यास लघवीतील जळजळ थांबते.

डॉ. राणी बंग यांनी लिहीलेले ' गोईण ' नावाचे पुस्तक आहे. गोईण म्हणजे मैत्रीण. आदिवासी बायका झाडांना मैत्रीणीच समजतात. या पुस्तकात विविध झाडांचे उपयोग, गडचिरोलीतील स्त्रीयांचे झाडांबरोबर असलेले नाते वगैरे रंजक आणि उपयोगी माहिती आहे.

gel phal.JPG

नावः गेळ
संस्कृत नावः करहाट, विषपुष्पक, मदन
इतर नावे: गेळफळ, मैनफळ
लॅटीन नावः Catunaregam spinosa (Thunb.) Tirveng.
कूळः Rubiaceae (गेळफळ कूळ)
उपयोगी भागः फळे

उपयोगः आयुर्वेदामधे वमनचिकित्सेसाठी (उलटी घडवुन आणणे) गेळफळ श्रेष्ठ मानले जाते. त्यासाठी त्याचा गीर वापरला जातो परंतु हा प्रयोग तज्ञांच्या देखरेखीखालीच केला जातो.
गेळफळाची साल अतिसारावर उत्कृष्ठ काम करते. कुडासाल आणी गेळफळाची साल समभाग एकत्र करुन अल्सरेटिव्ह कोलायटीसवर वापरतात. हुरमळ बी, गेळफळाचा गीर, खैराची साल व पिंपळाची लाख एकत्र मिश्रण योग्य देखरेखीखाली वजन कमी करण्यास व त्याचबरोबर असलेले घोरणे, खोकला, सुस्ती , सांधेदुखी कमी करण्यास वापरतात.

आर्या,दिनेशदा
हे कुरण्ड (कुरडु, सगेद मुर्गा, लोंपडी) गावाकडे सगळ्या रानात अजुही खुप दिसतं, पण बहुतेक उन्हाळ्यात, लहानपणी गावाकडे पांडवपंचमीला अंगणात (शेणाचे) पांडव आणि इतरांचे देखावे मांडले जायचे, त्यात अनेक फुले दिसायची, त्यात ही फुले खुप असायची.
हे गेळफळ दिसायला अगदी छान दिसतेयं

जिप्सी,
त्या चटक्याच्या बिया काढताना काटे लागायचे. आता ती झाडही नाही आणि बालपणही नाही>> अगदी रे !
Happy

गेळ आपल्या डोंगरात अगदी कॉमन आहे. त्याची फूले आधी पांढरी असतात मग पिवळी होतात. एकाचवेळी दोन्ही रंगाची फूले झाडावर असतात. या फळाला खूप गोडूस वास येतो. पण खाल्ल्यावर तितके गोड लागत नाही.

शुगोल, गोईण आहे माझ्याकडे. पण त्यात अजिबातच चित्र वा फोटो नसल्याने, झाडं ओळखता येत नाहीत. मला संधी मिळाली, तर तिथे जाऊन फोटो काढायला मला आवडेल.

B__diffusa_x.JPG

नावः पुनर्नवा
संस्कृत नावः पुनर्नवा, शोथग्नी, श्वेतमूला, दीर्घपत्रिका
इतर नावे: लाल पुनर्नवा, ठिकरी, सांठ, सारोडी
लॅटिन नाव-
कूळ- (पुनर्नवा कूळ)
उपयोगी भागः मूळ

उपयोगः बाह्य व अंतर्गत सूज आणणा-या रोगांवर पुनर्नवा उपयुक्त आहे. आणि ताजी वापरल्यास जास्त उपयोगी ठरते. मूत्रपिंडापासुन मूत्राशयापर्यंतच्या मार्गावर ही वनस्पती कार्य करते. नविन संधिवातात तात्पुरता फायदा होतो. ही फारशी तीव्र नाही पण एकेरी वापरुन याचा उपयोग दिसत नाही . ही नेहमी सुगंधी द्रव्याबरोबर वापरतात.

दिनेशदा, मलाही ' गोईण ' वाचताना फोटोची उणीव जाणवली होती. तुम्ही नक्कीच तिथे जाउन फोटो काढण्याचं जमवा. बंग दांपत्य तुमच्या कल्पनेचं स्वागत करेल असं वाटतं.

आर्या, फोटोबद्दल काँप्लिमेंट द्यायची राहिली. छान आहेत.
मला माझ्या एका जेष्ठ मित्रांनी एक मोलाचा सल्ला दिला होता. समजा या झाडाची पाने वगैरे आपण तोडली, तर तिथे क्षणभर थांबून आभार मानायचे. तसेच याचे काढे वगैरे केले तर चोथा, कचर्‍यात न फेकता, तूळशीला घालावा. त्याने जास्त फायदा होतो. झाडाबद्दल हि भावना, मला मनापासून पटते.

धन्स दिनेशदा! खुप छान सल्ला! मी पण असं वाचलय आपण समिधेसाठी किंवा औषधासाठी झाडाच्या फांद्या/मुळे वगैरे तोडतांना आधी त्याची माफी मागायची ! यासंदर्भात संस्कृत मधे सुंदर श्लोक आहे 'स्वामी समर्थांच्या पुस्तकात! Happy

khadki Raasna.JPG

ही एक दुर्मिळ वनस्पती. मी कधीपासुन हिच्या शोधात आहे. (कोणाकडे असेल तर मला प्लिज संपर्क करा) Happy

नावः खडकी रास्ना
विविधभाषी नावे: मराठी- खडकी रास्ना, पित्तमारी, पित्तकारी, अंतमूळ, पित्तवेल
संस्कृत- मूलरास्ना, पित्तवल्ली, अंत्रपाचक, अर्कपत्री, मूलिनी
हिंदी- अंतमूळ, जंगली, पिंकवान
गुजराती- जडीबुटी, दमनी
लॅटिन नावः Tylophora indica, Tylophora asthmatica
कूळः Asclepiadaceae अस्कलपिडीएसी

उपयोगी भागः पाने, मूळ
उपयोगः या वनौषधीत 'टायलोफोराईन' नावाचे अल्कलॉईड असते. पानांचा काढा किंवा मूळांचा अर्क दमा व अमांशावर मौल्यवान औषध आहे.
खडकी रास्नाची क्रिया एपिकॅकसारखी आहे. ती अतिसाराच्या उपचारात उपयोगी आहे. मूळांचा किंवा पानांचा काढा दम्यात आणि फुफ्फुसांच्या नळ्या सुजण्यावर देण्यात येतो म्हणुन दम्यात आराम मिळविण्यासाठी खडकी रास्नाचा उपयोग करण्यात येतो. अजिर्णात आणि पित्तप्रकोपात याच्या मुळाची साल पाण्यात घासुन देतात. कफ रोगात वेखंड व सुगंधी पदार्थांबरोबर याचा फांट करुन देतात. अंगदुखी व संधिवातात मुळे इतर द्रव्यांबरोबर देतात.
दमा विकारात याचा चांगला उपयोग असल्याने पानांना चांगली मागणी आहे.

.

हो शोभा... पुनर्नवाचेच पुनर्नवासव करतात. सब्जाबद्दल माहिती मिळाली तर टाकेन, सध्यातरी इतकंच माहितीये की सब्जाचं बी थंड असतं आणि उन्हाळ्यात ऊन लागु नये, उन्हाळी लागु नये म्हणुन त्याचं सरबत सेवन करतात.

Gloriosa%20superba.jpg

संस्कृत नावः अग्निशिखा, कालिकारि
इतर नावे: खड्यानाग, बचनाग, लांगलीकंद, कलिहरी
लॅटिन नावः Gloriosa superba L.
कूळ: Liliaceae (कळलावी कूळ)
उपयोगी भागः कंद

उपयोगः
कळलावीला पांढरा बचनाग म्हणुन ओळखले जाते, परंतु पांढ-या बचनागाशी याचे कोणतेही साम्य नाही . पांढरा बचनाग ( Aconitum napellus) वनस्पती हिमालयात आढळते. गर्भपातासाठी कळलावी वापरणे अतिशय चुकीचे आहे. तसेच सर्पविषावरही याचा उपयोग होत नाही. कळलावीच्या कंदाच्या चकत्या ताकात पाच दिवस भिजवुन नंतरच वापरतात. हे औषध योग्य प्रमाणात वापरल्यास संधिवाताची तिव्रता कमी होते. त्याहीपेक्षा अजुन अल्कोहोलमधे तयार केलेला अर्क अधिक उपयुक्त आहे आणि अगदी १ ते २ थेंब ही घेतला तर चालतो.

आर्या,
प्लीज, एक डिस्क्लेमर टाकणे गरजेचे आहे. हि माहिती केवळ माहितीसाठीच आहे असा.
याचा थेट (म्हणजे इथले फोटो बघून ) गंभीर आजारावर उपचार करु नये. त्यासाठी उपचारासाठी योग्य त्या तज्ञाची मदत घ्यावी.
ही झाडे जरी ओळखता आली तरी त्यापासून औषधे करण्यासाठी काहि सिद्धता करावी लागते. वनस्पतीदेखील योग्य तितक्या वाढलेल्या असाव्यात. हे केवळ अनुभवानेच वैद्य मंडळीना कळते.

आर्या,
प्लीज, एक डिस्क्लेमर टाकणे गरजेचे आहे. हि माहिती केवळ माहितीसाठीच आहे असा.
याचा थेट (म्हणजे इथले फोटो बघून ) गंभीर आजारावर उपचार करु नये. त्यासाठी उपचारासाठी योग्य त्या तज्ञाची मदत घ्यावी.>>>>दिनेशदांना अनुमोदन.
बाह्यउपचार (जसे सुज आल्यास निर्गुडीचा पाल्याचा लेप इ.) करू शकतो, पण इतर उपचारांसाठी तज्ञांची मदत मस्टच. Happy

Pages