पद्धति क्र.३- मानशौर्यपद्धति-
मानी किंवा शूर लोकांची लक्षणे या पद्धतीत सांगितली आहेत.
भाग १- अज्ञनिन्दा/मूर्खपद्धति
भाग२- विद्वत्प्रशंसा
प्राणाघातान्निवृत्ति: परधनहरणे संयमः सत्यवाक्यं
काले शक्त्या प्रदानं युवतिजनकथामूकभावः परेषाम् |
तृष्णास्रोतोविभङगो गुरुषु च विनयः सर्वभूतानुकम्पा
सामान्यः सर्वशास्त्रेष्वनुपहतविधि: श्रेयसामेष पन्था: ||२२|| (वृत्त-स्रग्धरा)
अर्थ- या श्लोकात श्रेयप्राप्तीचा सर्वशास्त्रांनी पुरस्कृत केलेला मार्ग सांगितला आहे. थोडक्यात, या श्लोकात नमूद केलेले गुण अंगी बाणले, तर त्या व्यक्तीला श्रेयप्राप्ती होते. श्रेयस् म्हणजे जे पारमार्थिकदृष्ट्या, व्यक्तीच्या आत्मिक उन्नती साठी योग्य असलेले असे सगळे.
प्राणाघातापासून निवृत्ती- थोडक्यात अकारण हिंसेचा त्याग. (अकारण या शब्दाला महत्व आहे)
परधनाची इच्छा नसणे, सत्य बोलणे, योग्य वेळी यथाशक्ती (दान) देणे, परस्त्रीबद्दल चर्चा (गॉसिप या अर्थाने) न करणे, लोभापासून दूर राहणे, वडीलधार्या माणसांशी विनयाने वागणे, सर्व प्राणिमात्रांवर दया करणे- इत्यादी गुण म्हणजेच श्रेयप्राप्तीचा मार्ग!
प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचै:
प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्या: |
विघ्नै: पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना:
प्रारब्धमुत्तमगुणा* न परित्यजन्ति || २३|| (वृत्त- वसन्ततिलका)
(* पाठभेद- प्रारब्धमुत्तमजना)
अर्थ- एखादे चांगले काम करायला घेतले तर त्यात विघ्ने ही येतातच. पण त्या विघ्नांशी कुठल्या प्रकारचे लोक कशा प्रकारे सामना करतात ते या श्लोकात सांगितले आहे.
नीच लोक विघ्न येईल या भीतीने चांगल्या कामाला सुरुवातच करत नाहीत, मध्यम लोक कामाला सुरुवात करतात, पण विघ्न आलं की थांबतात.
पण जे उत्तम गुणवान लोक असतात, ते कितीही विघ्ने आली तरीही एकदा सुरू केलेलं चांगलं काम अर्धवट सोडत नाहीत.
प्रिया न्याय्या वृत्तिर्मलिमसुभङ्गेप्यसुकरं
असन्तो नाभ्यर्थ्या: सुहृदपि न याच्यो कृशधनः |
विपद्युच्चै: स्थेयं पदमनुविधेयं च महतां
सतां केनोद्दिष्टं विषममसिधाराव्रतमिदम् ||२४ || (वृत्त- शिखरिणी)
अर्थ- सज्जनांना हे दुर्धर, अशक्यप्राय असं असिधाराव्रत कोणी सांगितलं?
असि म्हणजे तलवार/ खड्ग, त्याच्या धारेवर निजणे= असिधाराव्रत.
सज्जनांचं वागणं हे सामान्य लोकांना असिधाराव्रताप्रमाणे अशक्यकोटीतलं वाटतं म्हणून भर्तृहरि म्हणतो, की या सज्जनांना हे असिधाराव्रत कोणी सांगितलं असावं?
सज्जनांचं असिधाराव्रताप्रमाणे असणारं वागणं कोणतं? तर-
न्याय्य वृत्ती, प्राण गेला तरी चालेल पण वाईट, मलीन कृत्य न करणे, दुर्जन लोकांची स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी स्तुती न करणे/लाळघोटेपणा न करणे, मित्र जरी असला तरी त्याच्या कडे जर कमी संपत्ती असेल, तर त्याच्याकडे कसलीही याचना न करणे, संकटकाळीसुद्धा नीच कृत्य न करणे आणि स्वत:ची स्थिती ढळू न देणे, तसेच महान लोकांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे वागणे.
क्षुत्क्षामोऽपि जराकृशोऽपि शिथिलप्रायोऽपि कष्टां दशाम्-
आपन्नोऽपि विपन्नदीधितिरपि प्राणेषु गच्छत्स्वपि |
मत्तेभेन्द्रविभिन्नकुम्भकवलग्रासैकबद्धस्पृहः
किं जीर्णं तृणमत्ति मानमहतामग्रेसरः केसरी || २५|| (वृत्त- शार्दूलविक्रीडित)
अर्थ- सिंह जरी म्हातारा झाला तरी तो काही गवत खात नाही हे या श्लोकातून सांगितलं आहे.
सिंहाला भूक लागली असेल, वृद्धत्वामुळे जरी तो कृश झाला असेल, अतिशय हालाखीची परिस्थिती जरी त्याची झाली असेल आणि अगदी त्याचे प्राण जातील की काय अशी स्थिती जरी असली, तरी ज्याला केवळ माजलेल्या हत्तीचं गंडस्थळ फोडून त्याचा घास करण्यानेच समाधान मिळते असा मानी सिंह काय गवत खाईल? - अशक्य!!
स्वल्पस्नायुवसावशेषमलिनं निर्मांसमप्यस्थिकं
श्वा लब्ध्वा परितोषमेति न च तत्तस्य क्षुधाशान्तये |
सिंहो जम्बुकमङ्कमागतमपि त्यक्त्वा निहन्ति द्विपं
सर्वः कृच्छ्रगतोऽपि वाञ्छति जनः सत्त्वानुरूपं फलम् ||२६ || (वृत्त- शार्दूलविक्रीडित)
अर्थ- कुत्र्याला एखादे मांस नसलेलं, मळलेलं असं हाडुक मिळालं तरी कुत्रं खुष होतं. वास्तविक ते हाडुक त्या कुत्र्याची भूक भागवू शकत नाही.
उलट सिंहाच्या बाबतीत, एखादा लांडगा जरी हाती सापडला असला तरी त्याला त्यागून द्विप म्हणजे हत्तीलाच मारतो.
तात्पर्य- कितीही कठिण परिस्थिती असली तरी मानी लोक त्यांच्या योग्यतेनुरूप फळाची इच्छा करतात.
लाङ्गूलचालनमधश्चरणावपातं
भूमौ निपत्य वदनोदरदर्शनं च |
श्वा पिण्डदस्य कुरुते गजपुङ्गवस्तु
धीरं विलोकयति चाटुशतैश्च भुङ्क्ते ||२७|| (वृत्त- वसन्ततिलका)
अर्थ- कुत्रा हा त्याला खायला घालनार्यापुढे शेपूट हलवतो, त्याच्या पायाशी लोळतो, जमिनीवर उतानाहोऊन तोंड आणि पोट दाखवतो- थोडक्यात- फायद्यासाठी काय वाट्टेल ते करतो.
पण हत्ती मात्र धीरगंभीरपणे माहुताकडे पाहतो आणि त्याने शंभरवेळा चुचकारल्यानंतर मग खातो.
मानी लोक आपली पत राखून असतात हे यावरून सुचवले आहे.
कुसुमस्तबकस्येव द्वयी वृत्तिर्मनस्विनाम् |
मूर्ध्नि वा सर्वलोकस्य शीर्यते वन एव वा ||२८|| (वृत्त- श्लोक)
अर्थ- मानी लोकांची वृत्ती ही फुलांच्या गुच्छाप्रमाणे असते.
एक तर फुलं लोकांच्या डोक्यात तरी खोवली जातात किंवा ती वनातच झाडावरून गळून पडतात.
तद्वतच मानी लोक एक तर त्यांच्या योग्यतेनुरूप मान भोगतात किंवा लोकान्त न भोगता एकान्त भोगतात.
सन्त्यन्येऽपि बृहस्पतिप्रभृतयः सम्भाविता: पञ्चषास्-
-तान्प्रत्येष विशेषविक्रमरुची राहुर्न वैरायते |
द्वावेव ग्रसते दिवाकरनिशाप्राणेश्वरौ भास्वरौ
भ्रातः पर्वणि पश्य दानवपति: शीर्षावशेषीकृतः ||२९|| (वृत्त- शार्दूलविक्रीडित)
अर्थ- या श्लोकात राहूची स्तुती करून मानी /शूर लोकांची वृत्ती सांगितली आहे.
बृहस्पती आणि तत्सम इतर पाच-सहा सन्माननीय देव असूनसुद्धा, राहू हा पर्वकाली म्हणजेच अमावस्या-पौर्णिमेला अनुक्रमे सूर्य आणि चंद्र यांनाच ग्रासतो. म्हणजे केवळ शिर अवशिष्ट असलेला राहूसुद्धा इतर देवांना त्यागून जे तेजस्वी आहेत अशा सूर्य-चंद्रांनाच केवळ ग्रासून आपल्या विक्रमाचे प्रत्यंतर देतो, तद्वतच शूरवीर हे नेहमी तोडीस-तोड अशाच शत्रूवर चाल करतात.
वहति भुवनश्रेणीं शेषः फणाफलकस्थितां
कमठपतिना मध्ये पृष्ठं सदा स विधार्यते* | (पाठभेद- च धार्यते)
तमपि कुरुते क्रोडाधीनं पयोधिरनादरात्-
-अहह महतां नि:सीमानश्चरित्रविभूतयः ||३०|| (वृत्त- हरिणी)
अर्थ- थोरांचं चारित्र्य (वागणं किंवा सहनशीलता) हे खरोखर असीम असतं हे शेष, कासव आणि समुद्र यांच्या उदाहरणावरून सांगितलं आहे.
आपल्या पुराणांमध्ये असं सांगितलं आहे की शेष हा आपल्या फण्यावर पृथ्वी/स्वर्ग/पाताळ हे सगळे लोक तोलून धरतो. त्याने जो फणा उगारला आहे तो कासवाच्या पाठीवर आपली शेपूट टेकून आणि ते कासव समुद्राच्या तळाचा आधार घेतं.
म्हणजे खरोखर महान लोकांच्या सहनशीलतेला सीमाच नाही.
समुद्र कासवाला क्रोडाधीन करतो- म्हणजे स्वतःच्या मांडीवर घेतो (कासव समुद्रात असते/समुद्रतळाचा आधार घेते हे सांगण्यासाठी काय सुंदर उपमा वापरली आहे!)
वरं पक्षच्छेदः* समदमघवन्मुक्तकुलिश- (पाठभेद- प्राणच्छेदः)
-प्रहारैरुद्गच्छद्गहनदहनोद्गारगुरुभि:* |
(पाठभेद- प्रहारैरुद्गच्छद्बहुलदहनोद्गारगुरुभि:)
तुषाराद्रे: सूनोरहह पितरि क्लेशनिवशे
न चासौ सम्पातः पयसि पयसां पत्युरुचित:|| ३१ || (वृत्त- शिखरिणी)
अर्थ- पूर्वी पर्वतांना पंख होते म्हणे, त्यामुळे पर्वत इकडून तिकडे उडून सगळ्या लोकांना (पक्षी- स्वर्ग, पृथ्वी, पाताळ इ.) यांना त्रस्त करून सोडत. त्यामुळे चिडलेल्या इंद्राने वज्राचे घाव घालून एकेकाचे पंख छाटून टाकायला सुरुवात केली. त्यावेळी हिमालयाचा पुत्र- मैनाक पर्वत हा आपले पंख कापले जाण्याच्या भीतीने समुद्रात (पंख बुडवून) बसला. त्याबद्दल इथे सांगितलं आहे-
की- एक वेळ क्रुद्ध झालेल्या इंद्राच्या वज्राघातांनी, अतिशय तीव्र अशा यातना होऊन पंख कापले गेले तरी चालेल.
पण हिमालयासारख्या पर्वतराजाच्या पुत्राने, वडील संकटात असताना असे भित्रेपणाने समुद्रात लपणं शोभत नाही.
(वडील कितीही महान असले, तरी मुलगा तसाच वर्तन करेल असे नाही हे या श्लोकातून भर्तृहरीला सुवचायचे असावे. काहीही म्हणा, पर्वतांना पंख होते ही कल्पनाच भन्नाट आहे ना! )
यदचेतनोऽपि पादै: स्पृष्टः प्रज्वलति सवितुरिनकान्तः |
तत्तेजस्वी पुरुषः परकृतनिकृतिं कथं सहते || ३२|| (वृत्त- आर्या)
अर्थ- मानी/तेजस्वी लोक इतरांनी केलेला अपमान सहन करू शकत नाहीत हे इनकांत मण्याच्या उदाहरणाने स्पष्ट केलं आहे.
इनकान्तमणी हा सूर्यकिरणांत चकाकतो- या गोष्टीचं वर्णन- सूर्याने पाय लावला तर अचेतन असा इनकांत मणीसुद्धा पेटून उठतो- असं केलंय.
तर मग, जो जिवंत (सचेतन) आणि तेजस्वी असा पुरुष असेल, तर तो दुसर्याने केलेला अपमान कसा सहन करेल?
सिंहः शिशुरपि निपतति मदमलिनकपोलभित्तिषु गजेषु |
प्रकृतिरियं सत्त्ववतां न खलु वयस्तेजसो हेतु: || ३३|| (वृत्त- आर्या)
अर्थ- उपजत गुण किंवा तेज यांचा वयाशी काहीही संबंध नसतो. सिंहाचा छावा, हा छावा जरी असला (म्हणजे वयाने लहान जरी असला) तरीही तो मदोन्मत्त हत्तीवरच चालून जातो.
तेजस्वी लोकांची ही प्रकृतीच/स्वभावच असतो. त्यांच्या तेजस्वी वृत्तीचा वयाशी काहीही संबंध नसतो.
- मानशौर्यपद्धति समाप्त-
छान आहे लेखमाला. पुढचे भागही
छान आहे लेखमाला. पुढचे भागही येऊ द्या पटापटा
व्वा! हे झकास काम झाले
व्वा! हे झकास काम झाले
संस्कृत वाचणे/शिकणे बाजुलाच, नुस्ते मराठीतले दिलेले अर्थ वाचून मेन्दूत ठसवुन घेऊन त्याप्रमाणे आपण खरेच वागतो की नाही याची तपासणी जरी (माझ्याकडून) केली गेली तरी खुप झाले
[असल्या मजकुरास आत्मसात करण्यास, नुस्त्या धाग्यावरील प्रतिसादाच्या "हजेर्या" काय कामाच्या? - सन्दर्भः संस्कृत नष्टहोईलका हा बीबी]
धन्यवाद. हे लेखन करताना मलाही
धन्यवाद.
हे लेखन करताना मलाही हेच वाटत होतं की या श्लोकात लिहिलेल्या गोष्टींचं थोडं जरी मनन-चिंतन (माझ्याकडून) झालं तरि पुष्कळ आहे!
मस्त! धन्यवाद, पुढचेही
मस्त! धन्यवाद, पुढचेही येऊदेत.
वा, छान उपक्रम, अर्थ विश्लेषण
वा, छान उपक्रम, अर्थ विश्लेषण आवडले.
चैतन्य, ही मौक्तिकं अर्थासहित
चैतन्य,
ही मौक्तिकं अर्थासहित देतो आहेस त्यामुळे
त्यातील ज्ञान, विचार आमच्यापर्यंत पोचतायत .... धन्यवाद !
मस्त! शाळेतल्या सुभाषितमाला
मस्त!
शाळेतल्या सुभाषितमाला आठवल्या.