जरी वाटेल माझे बोलणे

Submitted by अ. अ. जोशी on 16 February, 2011 - 11:08

जरी वाटेल माझे बोलणे खोटे तुला
हृदय माझे कधी नव्हते दिले उसने तुला

मनाशी रोजची हितगूज होती चालली
तुझ्याशी बोललो मी वाटले होते तुला

जगाशी भांडल्याने आपले होते हसे
जगालाही मजा येते जशी येते तुला

जसा हा चंद्र आकाशी बदलतो वागणे
तसे आकाश त्या बदल्यात बोलवते तुला ?

महागाई किती प्रेमातही बघ वाढली
तरी स्वस्तात माझा भरवसा आहे तुला

मला तू सोडले आहेस नाही खंत ही
दिले आहे जगाशी बांधुनी नाते तुला

मला सर्वांपुढे तू टाळते आहेस; पण...
मला माहीत आहे कोण आवडते तुला

गुलमोहर: 

मनाशी रोजची हितगूज होती चालली
तुझ्याशी बोललो मी वाटले होते तुला

हा शेर आवडला. काही सुटे मिसरेही छान आहेत.

मला तू सोडले आहेस याची खंत नाही
दिले आहे जगाशी बांधुनी नाते तुला

पहिल्या मिसर्‍यात दोन मात्रा जास्त आहेत. शेवटचा गुरु जास्तीचा झाला आहे. ''ही'' काढले तरी चालेल.

फोनवर बोलता बोलता लिहिल्याने लक्ष गेले नाही. दुरुस्त केले आहे.

संदर्भ न लागल्याने कदाचित काही शेर आपल्याला क्लिक झालेही नसतील असे वाटते.

असो. धन्यवाद!