शापित यक्ष

Submitted by नीलिमा क्षत्रिय on 31 January, 2011 - 08:13

मागील वर्षी मुलींच्या शाळेत गॅदरींग बघायला गेले होते. चित्रविचित्र पोषाखातले मुलांमुलींचे घोळके, पाल्यांचे कार्यक्रम बघण्यास उत्सुक पालक, स्वयंसेवक यांची लगबग सुरु होती. शिक्षकांची गडबड, संयोजकांची धावपळ आणि मुलांच्या किलबिलीने सर्व वातावरण भरुन गेले होते.

हळूहळू कार्यक्रम सुरु झाले. सात आठ नॄत्यांनंतर कार्यक्रम चांगलाच रंगात आला. इतरांबरोबरच मूकबधिर विद्यालयाच्या मुलामुलींचा एक कार्यक्रम खास आयोजित केला गेला होता. त्यांचा एक समूह स्टेजवर येऊन नॄत्यप्रकार सादर करु लागला. बुमरो ऽ बुमरो ऽ शाम रंग बुमरो ऽऽऽ . गाणे ऐन रंगात आले होते. आधीचे कार्यक्रम फिके वाटावेत असे त्या मुलांचे नॄत्यकौशल्य होते. एक कडवे झाले आणि संयोजकांनी गाण्याची कॅसेट बंद केली.

आणि ..... त्यानंतर स्टेजवरील दृष्य पाहून प्रेक्षकांचे भान हरपले. टेपवरील गाणे बंद होऊनही त्या मुलांच्या नृत्यात खंड पडला नव्हता. कारण ते वाजत असलेले गाणे नृत्य करणार्‍या मुलांकरिता नव्हतेच तर केवळ प्रेक्षकांसाठी होते. ती मुले फक्त नृत्य दिग्दर्शकाच्या डोळ्यातील भाव व बोटांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन नाचत होती.

त्या क्षणी तो नृत्य दिग्दर्शक म्हणजे एखादा देवदूत आणि ती मूकबधीर मुले म्हणजे शापित यक्षांसारखी भासत होती. देवदूताच्या डोळ्यातून यक्षांकरीता अपार स्नेह पाझरत होता. दोघांमध्ये विश्वासाचा अतूट सेतू तयार झाला होता. आजुबाजुला चाललेल्या घडामोडींपासून ते पूर्णपणे अलिप्त होते. फक्त देवदूताची नजर आणि बोटे व त्यावर त्यांनी विश्वासाने धरलेला ठेका, एवढेच त्या वातावरणात भरून उरले होते. टेपवरील गाणे शेवटच्या ओळीला पुन्हा सुरू झाले आणि ते स्वर्गीय नॄत्य संपले.

प्रेक्षकांचे देह्भान हरपले होते. टाळ्या वाजविण्याचीही कोणाला शुध्द राहिली नव्हती. शेवटी मागच्या बाजुने एक टाळ्यांची लाट उसळली व ह्ळूह्ळू स्टेजवर येऊन आदळली. परंतू त्या शापित यक्षांचे विश्व टाळ्यांच्या पलीकडे होते. ते आपल्या निरव विश्वात परत निघुन गेले. पण जाताना उपस्थित सुह्र्दांच्या पापण्या मात्र ओलावून गेले.

गुलमोहर: 

खुपच छान टिपलंत आणि इथे मांडलत. थेट मनात पोहोचलं.

आपण किती करंटे! देवाकडे काही ना काही मागत असतो. त्याने खरंतर सगळं दिलय आपल्याला पण हे कळण्याची बुध्दी द्यायला विसरला. जेव्हा अशा शापित यक्षांना बघतो तेव्हा स्वत:च्या खुजेपणाची जाणीव होते.

खरेच शापित नाहीयेत ही मुले... उलट आजुबाजुच्या निरर्थक कोलाहलापासुन दुर आहेत.

ट्रेनच्या प्रवासात मला रोज ही मुले भेटायची. अजिबात आवाज न करता काय गप्पा रंगायच्या त्यांच्या... हसताहेत्,खिदळताहेत, एकमेकांच्या खोड्या काढताहेत... एकजण बोलायचा थांबला की दुसरा लगेच त्याला स्पर्श करुन त्याचे लक्ष आपल्याकडे वेधुन घ्यायचा आणि मग तो सुरू...मग तिसरा..... खुप बोलायची ही मुले आपापसात पण मला एक अक्षर ऐकु यायचे नाही.... Happy मी नुसते बघत रहायचे त्यांच्याकडे.

माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगी आहे. ती जन्मतः व्यवस्थित होती पण बारावीत असताना तिला ब्रेन ट्यूमर झाला आणि तिची वाचा व श्रवणशक्ती गेली. त्या परिस्थितीतही तिने सीए करायला सुरूवात केली. त्यातच तिची तीन मोठी ऑपरेशन्स झाली. आज ती सीए आहे.

ती आणि तिची बहिण लहान असतानाच वडीलही अकाली अशाच असाध्य आजाराने देवाघरी गेले. आईने केटरींगचा व्यवसाय करून मुलींना मोठे केले.

तिच्यावर टाईम्स ऑफ ईंडिया मध्ये एक लेखसुद्धा आला होता. त्याची लिंक मिळाली की इथे देईन. शारिरीक व आर्थिक प्रतिकूलतेवर मात करुन सीए सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सीए इन्स्टीट्यूटने तिचा विशेष सत्कार केला होता.