कवडी

Submitted by राजेंद्र क्षत्रिय on 31 January, 2011 - 07:31

दिवस मावळायला लागला तशी छातीत धड्धड सुरू झाली. आजकाल रोजच असं व्हायला लागलं. मन काही ताळ्यावर राहत नाही. मधेच छातीत कळ मारल्यासारखं व्हायचं. सगळ्या अंगातून एक शिरशिरी उठून जायची. बाहेर अंधार वाढू लागला तसं मन उदास होऊ लागलं. ठकीचं आई , भूक लागली, भूक लागली असं गाणं सुरु झालं. स्वयंपाक होत आला होता.

तसं म्हटलं तर आमचा राजा राणीचा संसार. ठकी, मी आणि हे. ठकीनंतर आमच्या घरात पाळणा हलला नव्हता.

खरं तर मीच मामंजींकडे ह्ट्ट केला, माझं-माझं बि-हाड वेगळं करुन द्या म्हणून. राजा राणीसारखा संसार करु म्हटलं. मामंजींनी मनावर घेतलं. भरल्या कुटुंबातून, खटल्याच्या घरातून वेगळी झाले. माळरानापलीकडे दोन खोल्यात बि-हाड थाटलं. रोजच भांड्याला भांडं लागून होणा-या कटकटींपासून सुटका होईल असं वाटलं. ठकीचा बाप तसा सज्जन माणूस. मध्यम उंची, सडसडीत बांधा, सावळा रंग, ओठावर छोटी मिशी, डोक्यावर पांढरी टोपी. पोटापुरती जमीन होती. गाई, म्हशी, दूधदूभतं. दूधाचं, डेअरीचं पेमेंट येत होतं.खाण्यापिण्याची तशी ददात नव्हती.

पण संसाराला दृष्ट लागली. हे रोज रात्री दारू पिऊन येऊ लागले. सुरुवातीला कधी कधी नंतर रोजच. मारहाण, शिवीगाळ करू लागले. कधी जेवणावरुन तर कधी विनाकारण कटकटी होऊ लागल्या. एक दिवस शांततेत जाईल तर शप्पथ. मामंजींचे पण ऐकेनासे झाले.

ठकीला जेवू घातलं. पोरगी सकाळपासून शाळेत आणि संध्याकाळपर्यंत भागीच्या पोरीबरोबर खेळत असायची. दोघींचं भारी प्रेम, जशा सख्ख्या बहिणी.

रात्री पोर थकून गाढ झोपली तसं घर आवरून घेतलं. गाईंना चारापाणी बघून आले. जरा पडावं म्हटलं तर हे आले. रोजच्या सारखचं, भांडणं, शिवीगाळ आणि कटकटी. तशी यांची तब्येत आधीच किरकोळ त्यात दारू पिऊन पिऊन आणखी खराब करून घेतली होती. न खाण्यात लक्ष, न घरात. जेवण आटोपलं तसं खाटल्यावर मुटकूळ घालून झोपले. गपगार. आता कोणी मरून पडले तरी यांना जाग येणार नाही. लाश.

दिवा विझवला. ठकीशेजारी सतरंजी अंथरून जरा आडवी झाले तर बाहेर गोठ्यात कसलासा खडखड आवाज झाला तशी ओसरीवर आले. वाटलं कुत्रंबित्रं आलं असेल. गोठ्यावरून एक चक्कर टाकली. पण तसं काही दिसत नव्हतं.

रात्र बरीच झाली होती. नूकताच जानेवारी संपून फेब्रुवारी सुरू झाला होता. हवेत अजूनही बराच गारवा होता. सहज भागीच्या घराकडे लक्ष गेलं. भागीच्या घरात दिवा अजून जळत होता. भागी माझी बालमैत्रिण. दिसायला साधारणच होती. थोडी बुटकी, काळी सावळी पण अंगाने मजबूत. स्वभावाने भोळी, समजूतदार. आमची गट्टी शाळेपासून. आम्हां मैत्रिणींमध्ये मी त्यातल्या त्यात दिसायला चांगली. नाकी डोळी निटस, भरदार बांधा, गोरा रंग, दहावीपर्यंत शिकलेली. पाटलाचं स्थळ आलं. बाबांनी घरदार, शेतीवाडी बघून यांच्याशी लग्न लावून दिलं. भागीची परिस्थिती बेताचीच होती. वडील वारलेले. घरात आई आणि दोन भाऊ. लांबच्या नात्यातल्याच एक मुलाशी तिचं लग्न झालं. भागीचा नवरा दिसायला चांगला रुबाबदार, उंचापुरा, दणकट शरीरयष्टीचा होता. चालताना छाती फुगवून, दमदार पावले टाकीत चालायचा. झुबकेदार मिशी, चेहर्‍यावर कायम हसू. दिलहौशी गडी. तितकाच स्वभावाने भोळा होता. भागीचं नशीब चांगलं, नवर्‍याला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही. कमाई बेताचीच पण कुटुंबाचं भागायचं.

विचारातच ओसरीवर आले. ठकीने दुपारी खेळताना ओसरीवर अंथरलेली चटई तशीच होती. क्षणभर घरात जायची इच्छा होईना. तेथेच अंग टाकलं. कळ दाबावी अन सगळीकडे स्वच्छ प्रकाश पसरावा तसे डोळे मिटले अन एक एक प्रसंग डोळ्यांपुढे तरळू लागले....

भागीच्या घरापलीकडे मोकळे माळरान. माळरानाच्या बाजुला चार दोन घरे. त्या पुढे छोटासा ओढा. ओढ्यालगत साठ सत्तर उंबर्‍यांचं गांव. आजुबाजुला पुष्कळ वाड्या, वस्त्या. खंडोबा हे ग्रामदैवत. गांवाच्या मधोमध खंडोबाचं मोठं मंदिर होतं. मंदिराच्या बाजुलाच दिपमाळ. समोर भव्य सभामंडप. सभामंडपाच्या दोन्ही बाजुला प्रशस्त ओटा, मधे पायर्‍या. पुढे विस्तीर्ण पटांगण. पटांगणाच्या एक बाजुला ग्रामपंचायत, दुसर्‍या बाजुला वडाचा पार. शेजारी दोन तीन आंब्याची झाडे. दर वर्षी पौर्णिमेला खंडोबाची जत्रा भरायची. परवाच जत्रा होऊन गेली. ठकीने सकाळपासूनच बापाकडे जत्रेत जाण्याचा हट्ट धरला होता. पण त्याला पिण्यातूनच फूरसत नव्हती.

ठकीला घेऊन जत्रेत गेले. गर्दी वाढत होती. हातगाडीवर मिठाईवाले, फुगेवाले, खेळणीवाले अशा अनेक विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. आजुबाजुच्या वाड्या, पाड्या, वस्त्या सर्व जत्रेत सामिल झाल्या होत्या. लहान मुले, मोठी मुले, बायाबापड्या, तरूण मंडळी, म्हातारीकोतारी यांनी जत्रा भरून गेली होती. पिपाण्या-तुतार्‍या, ढोलताशांच्या आवाजाने एकच कोलाहल माजला होता. मंदिरात नगार्‍या, तुतार्‍यांच्या आवाजातच लाऊडस्पीकरवर काहीतरी सूचना दिल्या जात होत्या. सभामंडपात भजनी मंडळाने फेर धरला होता. मंदिराच्या एका बाजुला देवदेवतांच्या फोटोफ्रेम, तसबिरींची दुकाने; फुलांची, पुजेच्या सामानांची दुकाने थाटली होती. या दुकानांमधे सी.डी.वर मोठ्या आवाजात आरत्या, गाणी वाजत होती. सगळीकडे भंडारा आणि खोबर्‍याच्या तुकड्यांचा सडा पडला होता. सभामंडपाच्या पुढील ओट्यावर फुले, हार, नारळाच्या करवंट्यांच्या निर्माल्याचा ढीग साचला होता.

मधेच भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. लवकर दर्शन मिळावे म्हणून बायाबापड्यांची लगबग सूरू होती. बर्फाचे गोळे, आईस कांडी विकणारे रांगांच्या आजुबाजुला तसेच लहान मुलांच्या भोवती मुद्दाम घिरट्या घालीत होते. ठकी हातातील बर्फाचा गोळा संपण्याआधीच एक नारिंगी आईस कांडीची फर्माइश करीत होती. जाताना रहाटगाड्ग्यात बसायचे होते.

पटांगणात पंधरा वीस माणसे घोळका करून उभे होते. चार पाच जण खाली बसून काहीतरी करत होते. बाजुलाच भागीचा नवराही हाताची घडी करुन उभा होता. नकळत त्याचे लक्ष आमच्याकडे गेले. मी त्याच्याकडेच बघतेय असे लक्षात येताच तो जोडीदाराकडे बघून काहीतरी बोलू लागला. थोड्या वेळाने तो त्या घोळक्याच्या मधोमध बसला. माझी उत्सूकता ताणली गेली. म्हटलं काय चाललेय ते बघावे तरी. मी ठकीला घेऊन पुढे सरसावले. कसलासा खेळ चालला होता. एका पिवळ्या कापडावर एक एक कवडी ठेवली जात होती. बाकी मंडळी " येळकोट येळकोट जय मल्हार " चा घोष देत होती. खेळ सुरू झाला होता. पहिली कवडी ठेवली गेली. भागीचा नवरा श्वास रोखून कवडीकडे बघू लागला. त्याचे बाहू स्फुरू लागले. नजर एकटक कवडीकडे आणि हात झडप घालायला तयार." येळकोट येळकोट जय मल्हार " आणि " र" म्हणताच विद्युतवेगाने त्याने कवडीवर झडप घातली व मूठ आवळली. बाकी चार जणं पूर्ण ताकदीने त्याची मूठ सोडविण्याचा प्रयत्न करीत होती. पण त्याच्या मजबूत मुठीपुढे त्यांचे काही चालले नाही. त्याने कवडी जिंकली आणि तो विजयी मुद्रेने इकडे तिकडे पाहू लागला. पुन्हा डाव खेळण्याचे ठरले. एकदा, दोनदा, तीनदा प्रत्येक वेळी त्यानेच कवडी जिंकली. तो जग जिंकल्याच्या आनंदात नाचू लागला. मी ही नकळत खेळात रमले होते. माझा आनंद मला लपवता आला नाही. आनंदाने मी टाळ्या वाजवू लागले. त्याने हळूच माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. मी वरमले. खाली बघत तेथून सटकले.

जत्रा ऐन रंगात आली होती. मंदिरापुढील दिपमाळ पेटविली गेली होती.... आणि बघता बघता त्या बोचर्‍या वार्‍यात कधी झोप लागली ते कळलंच नाही.

हवेतला गारवा आता आणखीच वाढला होता. माझी झोप चाळवली, आणि .... रप-रप-रप कोणाच्या तरी पावलांचा आवाज जवळ येत होता. जवळ अगदी माझ्या जवळ. माझं अंग शहारलं. थोडा वेळ तसाच गेला. वाहत्या, खळाळत्या ओढ्यात उभे राहिल्यावर उघड्या पोटर्‍यांना पाण्याच्या स्पर्शाने व्हाव्यात तशा गुदगुल्या माझ्या पायांना होऊ लागल्या. हळूहळू त्या संवेदना मेंदूपर्यंत जाऊन भिडू लागल्या. कानातून उष्ण वारे वाहू लागले. गालावर मऊ पिस फिरावे तसे सर्वांगावर पिसं फिरू लागली. नाकात मंद पुरूषी सुवास घुमू लागला. डोळे अधिकाधिक घट्ट मिटू लागले. ओठातून हुंकार फुटू लागले. विशाल वटवॄक्षाच्या मजबूत पारंब्यांनी बाजुच्या कोवळ्या झाडाचा बुंधा घट्ट आवळून धरावा इतका की, त्याचे वेगळे अस्तित्व उरू नये. अशी मी आवळली गेले. त्या बंदीवासात कशी कुणास ठाऊक पण मी सुखावले. पावसाळ्यात खळाळत्या ओढ्याच्या दमदार लाटा काठावरच्या कातळाच्या पोटाखाली आदळून व्हावा तसा आवाज होऊ लागला. सारा आसमंत त्या लयबध्द आवाजाने भारून गेला. भर उन्हाळ्यात वळवाच्या पावसाने धरणी चिंब होऊन जावी तसे माझे झाले. सर्वांग पिसासारखं हलकं होऊन आकाशात तरंगत राहिलं.

किती वेळ गेला कुणास ठाऊक. सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरीप डोळ्यावर पडल्यावर जाग आली. सर्वांग जड झालं होतं. डोळे उघडायची इच्छा होत नव्हती. आणखी काही वेळ तसंच पडून रहायचं होतं. डोक्याखाली घेतलेल्या हातात काहीतरी असल्याची जाणीव झाली. हळूच डोळे किलकिले करून पाहिले तर हातात एक कवडी होती.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कथा आवडली. मांडणी थोडी विस्कळीत वाटली.
तुम्ही याहून सुंदर लिहू शकाल.
पुढिल लेखनासाठी शुभेच्छा.