फेयर अॅण्ड लवली आणून देना बाबा मला

Submitted by तुषार जोशी on 27 January, 2011 - 19:57

टिव्ही मधे दाखवती गोरे गोरे रंग
क्रीम कोणते मी लावू गोरे होण्या अंग
मला पण हवा माझा चेहरा चांगला
फेयर अॅण्ड लवली आणून देना बाबा मला

तुझा आहे तोच रंग गोड आहे बेटा
रंग बदलण्याचा नको ग आटापिटा
रंग जो मिळाला जन्मताना आपल्याला
तोच रंग छान रंग तोपण चांगला
बागेमध्ये मोगऱ्याची फुले असती ना
गुलाबाची पण असतात काय हो ना
गुलाबाने मोगरा व्हायचे नसते गं
गुलाबाचे वेगळे सौंदर्य असते गं
आवडतेस तू आहे तशीच आम्हाला
रंग गोरा करण्याचा विचार कशाला

जाहिरात दाखवावी लागतेच त्यांना
खोटी स्वप्ने विकायची असतात ज्यांना
गोरे छान काळे घाण म्हणावे लागते
पुन्हा पुन्हा तेच तेच सांगावे लागते
जगामध्ये सावळेसे बघ किती लोक
गोरे तर थोडे काळे सावळे अधिक
बदकांच्या सौंदर्याची व्याख्या ही वेगळी
चिमणीने तुलनाच करू नाही मुळी
सावळ्या रंगाची गोड गुणाची देखणी
तू आमुची अलौकिक सावळी चिमणी

सावळ्या रंगाचा पोरी अभिमान ठेव
त्याला आवडते तेच बनवतो देव
रंग गोरा रंग काळा आणिक सावळा
सगळेच त्याने बनवले हो ना बाळा?
सगळेच रंग छान असतात बघ
कुणाचाही करू नये द्वेष किंवा राग
लक्ष देऊ नये जर चिडवले कोणी
आपल्याच तालामध्ये म्हणायची गाणी
कितीतरी लोक पुढे भेटतील तुला
भाळतील बघ तुझ्या सावळ्या रंगाला

(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)

गुलमोहर: 

छान आहे

अवो सावळं ते रावळं अस म्हन्त्यात आमचाकडं. म्हंजी देवाचं रूप. मात्र सावळच असाव; एकदम कायकिटांग नसावं. ब्येस कविता.

भाळतील बघ तुझ्या सावळ्या रंगाला>>>>ए मस्त्च आहे...अगदी खरं आहे Happy

सावळ्या रंगाची गोड गुणाची देखणी
तू आमुची अलौकिक सावळी चिमणी>>>हे ही खुप छान..हे बाबाच म्हनु शकतो Happy

मस्त