मागील भागः नीतिशतक भाग १ (http://www.maayboli.com/node/22848)
या भागात पुढील पद्धति (विद्वत्प्रशंसा) पाहू.
विद्यावंतापुढे सगळं जग नतमस्तक होतं हे सत्य (जरी क्वचित्प्रसंगी तशी स्थिती दिसली नाही, तरीही ते सत्य आहे) या श्लोकांतून सांगितले आहे.
शास्त्रोपस्कृतशब्दसुन्दरगिरः शिष्यप्रदेयागमा:
विख्याता: कवयो वसन्ति विषये यस्य प्रभोर्निर्धना: |
तज्जाड्यं वसुधाधिपस्य सुधियो (कवयो) ह्यर्थं विनापीश्वरा:
कुत्स्या: स्यु: कुपरीक्षका न मणयो यैरर्घतः पातिता: || १२|| (वृत्त- शार्दूलविक्रीडित)
सरस्वती आणि लक्ष्मी एके जागी नांदत नाहीत असे जे म्हणतात त्यावरची एक टिप्पणी असा हा श्लोक आहे.
ज्या राजाच्या राज्यात अतिशय विद्वान लोक निर्धन अवस्थेत राहतात त्यात त्या विद्वान लोकांची काही चूक नसून ते त्या राजाचे अज्ञान आहे. त्या विद्वानांची विशेषणे- ज्यांच्याकडे शास्त्रोक्त असं शब्दज्ञान आणि सुंदर गिरा म्हणजे वाणी आहे, शिष्यांना देण्याजोगं ज्ञान आहे आणि जे कवी म्हणून विख्यात आहेत, असे विद्वान लोक ज्या राजाच्या राज्यात निर्धनावस्थेत राहतात, ते खरे तर त्या राजाचे अज्ञान आहे. विद्वान लोकांना त्याने काही फरक पडत नाही कारण ते अर्थाशिवायही राजेच असतात. पण ज्याप्रमाणे कु-परीक्षक मूल्यवान रत्नांची पारख न जमल्याने त्यांची किंमत कमी लावतो, त्याप्रमाणेच हा राजाही त्या विद्वानांचे मूल्य जाणत नाही.
हर्तुर्याति न गोचरं किमपि शं पुष्णाति यत्सर्वदा
ह्यर्थिभ्यः प्रतिपाद्यमानमनिशं प्राप्नोति वृद्धिं पराम् |
कप्लान्तेष्वपि न प्रयाति निधनं विद्याख्यमन्तर्धनं
येषां तान्प्रति मानमुज्झत नृपा: कस्तै: सह स्पर्धते ||१३|| (वृत्त- शार्दूलविक्रीडित)
अर्थ- विद्या नावाचं धन कसं आहे हे या श्लोकात सांगितलं आहे.
हे धन चोरू पाहणार्याला दिसू शकत नाही. ते धन नेहमीच काही ना काही चांगल्या गोस्टीचं पोषण करतं. हे धन याचकाला निरंतर देत राहिलं तरीही ते वाढतच राहतं, घटत नाही.कदा कल्पांतीही ते नासत नाही.
हे राजा, असं विद्यारूपी धन ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासमोर तुझा अभिमान सोडून दे, कारण त्यांच्याशी कुणीही स्पर्धा करू शकत नाही.
अधिगतपरमार्थान्पण्डितान्मावमंस्थास्-
तृणमिव लघुलक्ष्मीर्नैव तान्संरुणद्धि |
अभिनवमदलेखाश्यामगण्डस्थलानां
न भवति बिसतन्तुर्वारणंवारणानाम् ||१४|| (वृत्त- मालिनी)
अर्थ- हे राजाला उद्देशून असलेलं सुभाषित आहे. राजाने स्वतःच्या धनाच्या माजामुळे परमार्थ जाणणार्या पंडितांचा अवमान करू नये. कारण अशा ज्ञानी लोकांसाठी लक्ष्मी ही कस्पटासमान असते, त्यामुळे ते पैशाच्या मोहात पडत नाहीत आणि पैशाच्या जोरावर त्यांना वश करता येत नाही. जसे कमळाचा देठ एखाद्या मदोन्मत्त हत्तीला अडवू शकत नाही (बांधू शकत नाही) त्याचप्रमाणे पैशाने अशा ज्ञानी लोकांना वश करता येत नाही.
(मालिनी हे वृत्त त्यातल्या सलग ६ लघु अक्षरांमुळे म्हणायला कधी कधी अवघड जाते पण या वृत्ताची लय मात्र सुंदर असते.
वरील श्लोकात 'वारणं वारणानां' यातला अनुप्रासही छान आहे. वारणं- म्हणजे बंधन/अडवणे आणि वारण-हत्ती.
वातापि गणपतिं मधे 'वारणास्यं' असा शब्द आहे, त्यातही वारण+आस्यं= हत्तीचे तोंड असलेला.)
अम्भोजिनीवनविलासनिवासमेव
हंसस्य हन्ति नितरां कुपितो विधाता |
नत्वस दुग्धजलभेदविधौ प्रसिद्धां
वैदग्ध्यकीर्तिमपहर्तुमसौ समर्थः || १५|| (वृत्त- वसंततिलका)
अर्थ- पुन्हा, विद्वान लोकांच्या बाबतीत आर्थिक बाबतीत राजाकडून त्यांचे नुकसान जरी झाले (किंवा राजाने त्यांचे धन-गृहादि सर्व जप्त केले/नष्ट केले) तरीही त्यांची विद्वत्ता अबाधित असते हे हंसाच्या उदाहरणावरून सांगितले आहे.
हंसाबद्दल पुराणादि संस्कृतकाव्यात एक समज प्रसिद्ध आहे तो म्हणजे, हंस दूध आणि पाणी मिसळले असेल, तर त्यातून दूध आणि पाणी वेगळं करू शकतो. त्याच्याच आधारे हा श्लोक रचला आहे.
समजा ब्रह्मदेवाला अतिशय राग आला तर तो एक वेळ हंसाचं कमळांच्या वनात असलेलं हंसाचं घर पार विस्कटून टाकू शकेल.
पण तो त्याची (हंसाची) दूध आणि पाणी वेगळं करण्याबाबतची कीर्ती पुसून टाकू शकत नाही.
केयूरा न विभूषयन्ति पुरुषं हारा न चन्द्रोज्ज्वला
न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङकृता मूर्धजा: |
वाण्येका समलङकरोति पुरुषं या संस्कृता धार्यते
क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषण्म् ||१६|| (वृत्त- शार्दूलविक्रीडित)
अर्थ- सुसंस्कारित वाणी हेच खरे भूषण आहे, इतर आभूषणे तात्पुरती कामाची आहेत आणि ती झिजून जातात किंवा नाश पावतात. पण वाणी हे कधीही लयाला न जाणारं भूषण आहे.
केयूरसारखी रत्नं, चन्द्रासारख्या तेजाचे हार पुरुषाला भूषवित नाहीत, शोभा देत नाहीत.
स्नान, सुगंधलेपन इत्यादी किंवा अलंकृत केसांनीही पुरुषाला शोभा येत नाही. केवळ सुसंस्कारित वाणी असेल, तर तो पुरुष शोभून दिसतो. इतर भूषणे गळून पडतील, नाश पावतील पण संस्कारित वाणी कधीच नष्ट होणार नाही.
(कदाचित या श्लोकावर अनेक मतभेद असू शकतील. 'ती फुलराणी' मध्येही शुद्ध आणि अशुद्ध बोलण्यावरून माणसा माणसातला भेद दाखवला आहेच. या श्लोकातून तसा अर्थही घेता येतोच. पण श्लोकातला 'वाणी' हा शब्द 'ज्ञान' समजून श्लोक पाहिला, तर विद्या/ज्ञान असेल तर खरा अर्थ, तेच खरं भूषण असा अर्थ निघतो.)
विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनं
विद्या भोगकरी यशःसुखकरी विद्या गुरूणां गुरु: |
विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परा देवता (परं देवतं)
विद्या राजसु पूज्यते न हि धनं विद्याविहीनः पशु: ||१७|| (वृत्त- शार्दूलविक्रीडित)
अर्थ- विद्या (ज्ञान) असण्याचे फायदे या श्लोकात सांगितले आहेत.
विद्या हेच पुरुषाचं (स्त्री-पुरुष मतभेद नाही हा, नर= मनुष्य) सगळ्यात चांगलं रूप आहे, जणू ते एक गुप्तधनच आहे.
विद्येमुळे माणूस अनेकविध भोग भोगू शकतो (विद्येच्या जोरावर अर्थार्जन करता येते, ज्यातून अनेकविध भोग भोगता येऊ शकतात) विद्येने यशप्राप्ती होते आणि ते सुखाचं एक कारण आहे. विद्या ही सगळ्यात मोठी गुरू आहे.
परदेशात (किंवा परराज्यातही) विद्या ही एखाद्या भावासारखी (किंवा नातेवाइकासारखी) असते. अशी विद्या हे सर्वात श्रेष्ठ दैवत आहे म्हणूनच राजे लोक विद्येला (विद्या असणार्याला) पुजतात, धनाला नाही. त्यामुळे ज्याच्याकडे विद्या नाही तो पशूच समजला पाहिजे.
क्षान्तिश्चेत्कवचेन किं किमरिभि: क्रोधोऽस्ति चेद्देहिनां
ज्ञातिश्चेदनलेन किं यदि सुहृद्दिव्यौषधे: किं फलम् |
किं सर्पैर्यदि दुर्जना: किमु धनैर्विद्यानवद्या यदि
व्रीडा चेत्किमु भूषणै: सुकविता यद्यस्ति राज्येन किं ||१८|| (वृत्त-शार्दूलविक्रीडित)
अर्थ- माणसाकडे क्षमाशीलता असेल तर त्याला इतर कवचाची काय गरज?
जर क्रोध असेल तर दुसर्या शत्रूची काय गरज? जर (दुष्ट) नातेवाईक असतील तर आगीची गरज काय?
जर चांगला मित्र असेल, तर दिव्य औषधींची काय गरज? जर दुर्जन लोक आजूबाजूला असतील तर सापांची काय गरज?
जर उत्त्म विद्या जवळ असेल तर धनाची काय गरज? जर लज्जा असेल, तर इतर भूषणांची काय गरज?
आणि जर चांगली कविता असेल, तर राज्याची काय गरज?
दाक्षिण्यं स्वजने दया परजने शाठ्यं जने दुर्जने
प्रीति: साधुजने नयो नृपजने विद्वज्जने चार्जवम् |
शौर्यं शत्रुजने क्षमा गुरुजने नारीजने धूर्तता
ये चैवं पुरुषा: कलासु निपुणास्तेष्वेव लोकस्थिति: ||१९|| (वृत्त-शार्दूलविक्रीडित)
अर्थ- ज्याच्याकडे खालील कौशल्यं आहेत तोच या जगात तरून जाऊ शकतो.
स्व-जनांविषयी दाक्षिण्य (चांगुलपणा), परक्याविषयी दया, दुर्जनांविषयी दुर्जनत्व (भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा ही वृत्ती), साधुजनांविषयी प्रेम, राजासमोर विनय, विद्वानांबद्दल आदर, शत्रूविरुद्ध शौर्य, गुरुजनांविषयी संयम, स्त्रियांबद्दल चाणाक्षपणा (धूर्तता या शब्दाचा अर्थ- अतिशय चाणाक्षपणे स्त्रियांच्या मोहात स्वत:ला अडकवून न घेणे ही कला असा अपेक्षित आहे.)
जाड्यं धियो हरति सिञ्चति वाचि सत्यं
मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति |
चेतः प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं
सत्सङगति: कथय किं न करोति पुंसाम् ||२०|| (वृत्त- वसंततिलका)
अर्थ- सत्संगतीचं महत्व या श्लोकात सांगितलं आहे.
सत्संगती माणसाचं अज्ञान घालवते, त्याला सत्य बोलायची सवय लावते, सज्जनांना त्यांच्या सज्जनत्वामुळे मान मिळतो, त्यामुळे सज्जनांबरोबर राहिल्याने आपोआपच माणसाला मान मिळतो, कीर्ती दिगंतात पसरते-
सत्संगती काय करत नाही (ते सांगा) ? (म्हणजेच, सत्संगती बरंच काही करते)
जयन्ति ते सुकृतिनः रससिद्धा: कवीश्वरा: |
नास्ति येषां यशःकाये जरामरणजं भयम् ||२१|| (वृत्त- श्लोक)
अर्थ- ते पुण्यवान (सुकृतिनः) किंवा सु-कृतिनः (चांगली कृत्ये करणारे) असे आणि रससिद्ध (काव्यातून रसनिष्पत्तीची सिद्धी ज्यांना प्राप्त झाली आहे) अशा कविश्रेष्ठांचा विजय असो! कारण त्यांच्या यशरूपी शरीराला वृद्धपणा किंवा मरणाची भीती नाही.
सामान्य माणसाच्या शरीराला म्हातारपण आहे (म्हणजे झीज आहे) आणि मृत्यूची भीती आहे. पण कवी त्यांच्या यशरूपी शरीराने अमर असतात. त्यांच्या सुकृतींनी ते सगळ्यांच्या कायम स्मरणात राहतात त्यामुळेच त्यांच्या यशाला कधीच झीज नाही आणि मृत्यूही नाही.
नीतिशतक- विद्वत्प्रशंसा- समाप्त !
उत्तम उपक्रम. धन्यवाद.
उत्तम उपक्रम. धन्यवाद.
छान उपक्रम !
छान उपक्रम !
धन्यवाद! अजून बरेच श्लोक
धन्यवाद!
अजून बरेच श्लोक आहेत.
शक्यतो दर आठवड्याला एक याप्रमाणे भाग लिहीत जाईन.
- चैतन्य.
खूप छान वाचायला मिळतंय
खूप छान वाचायला मिळतंय
ह्म्म्म येथे पण जरा खिन्नता
ह्म्म्म येथे पण जरा खिन्नता आहेच. कारण विद्वान लोकांची स्तुती केली असली तरी अप्रत्यक्षरीत्या असे सुचवले आहे की राजसत्तेला विद्वानांची कदर नसते आणि विद्वान हे बरेचदा निर्धन (कमी प्रतिच्या परिस्थितीत) राहतात.