सोबत....

Submitted by विशाल कुलकर्णी on 21 January, 2011 - 14:29

"साssलाss ! ही रात्र नेहमी काळीच का असते बे?" वैतागलेल्या सुन्याने एकदाचे तोंड उघडले.

"अबे पहाट गुलाबी असते ना, म्हणुन रात्र काळी..., हाकानाका!" पक्या खुसखुसला.....

"गपे, उगाच फालतू जोक्स मारु नकोस. साला इथे बुडाला रग लागलीये बसुन बसुन. तुझा तो वाघ काही येत नाही पाणी प्यायला आज. आ़ज दिसायची शक्यता कमीच वाटतेय मला. बहुतेक निर्जळी अमावस्या दिसतेय त्याची." सुन्या करवादला.

सुन्या उर्फ सुनील जगताप आणि पक्या उर्फ प्रकाश देशमाने...... दोन जिवलग मित्र! लहानपणापासुन एकत्र वाढलेले, शिकलेले. सुदैवाने नोकरीही एकाच शहरात आणि अजुन दोघेही बॅचलर्स. त्यामुळे प्रत्येक विकांताला कुठे ना कुठे भटकंती ठरलेली. यावेळी मात्र दोघेही आठवडाभराची रजा काढून भटकायला निघाले होते. पहिले तीन्-चार दिवस कुठे कुठे निरुद्देश्य भटकून शेवटच्या दोन दिवसासांठी म्हणून घोराळ्याच्या जंगलात शिरले होते. मागच्या वेळी पक्याच्या काही मित्रांनी घोराळ्याला भेट दिली होती. त्यावेळी इथल्या जंगलात वाघ असतात असे कळाले होते. तेव्हा वाघ बघण्यासाठी म्हणुन हे दोघे मित्र घोराळ्याच्या जंगलात येवुन दाखल झाले होते. गेल्या दोन रात्री जंगलातील मचाणावर काढाव्या लागल्याने सुन्या वैतागला होता. वाघ तर दुरच लांडगा पण दिसला नव्हता अजुन. नाही म्हणायला वास काढत आलेली रानटी कुत्र्यांची एक टोळी मचाणाखाली बराच वेळ गोंधळ घालून परत गेली होती. त्यामुळे आधीच टरकलेला सुन्या आता भडकायला लागला होता. मध्यरात्र व्हायला आली होती. आजही एकतर दुपारी दिडच्या दरम्यान जेवण झालेले, त्यानंतर काहीच नाही, त्यामुळे सडकुन भुक लागली होती. त्यात सध्याची परिस्थीती अशी की जवळचे पाणीही संपलेले!

रात्रीचे दिड वाजून गेले होते. साधारण रात्रीच्या दहानंतर जंगलातले प्राणी पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर यायला सुरूवात होते. तशी झालीही होती. आत्तापर्यंत हरणाची एक जोडी आणि त्यांच्या मागावर आलेले दोन रानटी कुत्रे येवुन गेले होते. पण त्यानंतर सगळीकडे भीषण शांतता.

घोराळ्याचं हे जंगल तसं अस्पर्श्यच राहीलेलं आहे. अर्थात वाघामुळे नाही तर त्याबद्दल असलेल्या अनेक किवदंतींमुळे! अगदी गावातली माणसेदेखिल भर दिवसासुद्धा सोबत असल्याशिवाय जंगलात शिरत नाहीत. रात्रीतर विचारच सोडा. त्यांच्यामते रात्रीच्या वेळी जंगलात शिरणारी माणसे कधीच परत येत नाहीत. काल दुपारी जेव्हा गावातल्या चावडीवर सुन्या आणि पक्या पोहोचले तेव्हा कुठल्याही खेडेगावात अनोळखी व्यक्तीचं होतं तसंच त्यांचंही स्वागत झालं होतं. गावातली जवळजवळ प्रत्येक नजर एकदा का होइना पण दोघांवर दृष्टीक्षेप टाकून गेलेली. साहजिकच होते म्हणा ते. मुळात घोराळे गाव, गाव कसलं वस्तीच ती. इनमीन ३०-३५ घरांची आदिवासी वस्ती. सह्याद्रीच्या कुठल्यातरी एका कोपर्‍यात असलेली, सर्वसाधारण विकासापासून दुर राहीलेली हि एक आदिवासी वस्ती. सगळी मिळुन १५०-२०० ची लोकसंख्या. शिक्षणाचा, विकासाचा गंध नाही. सरपण, जंगलातील लाख, डिंक, जडी-बुटी यासारखी वनसंपदा आसपासच्या गावातून विकून त्यावर गुजराण करणारे हे लोक. मुळात पैसा-रुपया हे विनिमयाचे चलनदेखील अलिकडेच माहीत झालेले, त्यामुळे हल्लीच समाजाशी संपर्क वाढला होता त्यांचा. नाहीतर हि सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वाढलेली सह्याद्रीची लेकरं पुर्णपणे अज्ञातच होती. आणि अशा वस्तीत जिथे कंबरेला गुंडाळलेले एखादे जुनाट वस्त्र , स्त्रियांच्या बाबतीत दोन वस्त्रे हा पेहराव तिथे हे दोन नमुने पोहोचले....

पक्या पुर्ण कपड्यात म्हणजे जीन्सची पँट, स्पोर्टस शुज, जॅकेट तर सुन्या टी शर्ट बर्मुडामध्ये ! खांद्यावर मिलीट्रीच्या असतात तशा रक सॅक्स, गॉगल्स आणि पक्याकडची सागवानी 'केन' ! (केन : पोलीस अधिकार्‍यांजवळ असते ती एक ते दीड फुटी लाकडी काठी) . या केनमध्ये एक छुपी गुप्ती होती. जंगले किंवा दर्‍या-खोर्‍यातून भटकताना पक्या कायम ही केन जवळ ठेवायचा. कधी गरज पडेल ते सांगता येत नाही. त्या आदिवास्यांमध्ये आणि या दोघांमध्ये एक साम्य मात्र होते. खांद्यापर्यंत रुळणारे केस. फक्त सुन्या त्याची पोनीटेल बांधायचा तर पक्याने ते तसेच संजय दत्त स्टाईलमध्ये मोकळे सोडलेले असायचे. तेवढे एक साम्य सोडले तर पुर्ण आधुनिक वेशातली ही जोडगोळी त्या वस्तीवरच्या लोकांचे आकर्षण ठरली नसती तरच नवल. अर्थात सह्याद्रीच्या दर्‍या-खोर्‍यात भटकण्यात आतापर्यंतचे सगळे आयुष्य घालवल्याने पक्याला या लोकांशी कसे वागायचे असते त्याची कल्पना होती. थोड्याफार प्रमाणात अशा आदिवासी वस्त्यांवर बोलल्या जाणार्‍या बोली भाषांचेही ज्ञान पक्याला होते.

आपल्या मोडक्या-तोडक्या ज्ञानानुसार त्याने या लोकांशी संपर्क साधला होता. आधी कुणी जवळ यायलाच तयार नव्हते. पण यावरही उपाय पक्याकडे होता. त्याने आपल्या बॅगेतली चिलीम काढली, त्यात तंबाखु भरून शिलगावली. दोन दीर्घ झुरके घेतले आणि गावकर्‍यांना आमंत्रण दिले. यानंतर मात्र त्या लोकांशी दोस्ती व्हायला वेळ लागला नाही. थोड्याच वेळात त्यांच्यापैकी काही लोक त्यांना वस्तीच्या मुख्याकडे घेवून गेले. त्यांना , खासकरुन पक्याला बघताच त्या मुख्याच्या चेहर्‍यावर एक वेगळीच चमक आली. त्याने अगदी उठुन स्वागत केलं पक्याचं.

"च्यायला यांची ओळख आहे की काय पुर्वीची?" सुन्या स्वतःशीच पुटपुटत त्या म्हातार्‍याला न्याहाळायला लागला.

'देसु बिरसा' थोडंसं विचित्र भासणारं नाव असणारा हा मुखिया पण विचित्रच वाटत होता. वयाचा अंदाज येत नव्हता पण ऐंशीच्या पुढे नक्कीच असावं त्याचं वय. पण चाळीशीतल्या तरुणासारखा काटक वाटत होता. सगळ्या चेहर्‍यावर व्यापलेल्या असंख्य सुरकुत्या त्याच्या चेहर्‍याला अजुनच भीतीदायक बनवत होत्या. वेणी घालता येइल एवढे वाढलेले केस, पण त्यांच्या जटा झालेल्या. कंबरेला एक लंगोट. डोक्याला एक रानटी वेल गुंडाळुन त्यात एक रानफुल खोवलेलं. (हा अधिकार फक्त मुखियालाच होता म्हणे, बाकीच्यांच्या डोक्याला नुसत्याच रानवेली गुंडाळलेल्या). देसुने त्यांना कसलेसे एक पेय ऑफर केले. थोडीशी गुळमट वाटली तरी चव चांगलीच होती.

त्याच्याशी बोलता बोलता पक्याने आपला मुख्य उद्देश्य जाहीर केला. हे दोघे घोराळ्याच्या जंगलात वाघ बघायला आले आहेत म्हणल्यावर म्हातारा चमकलाच. आधी तर त्याने विरोधच केला जायला. सुन्याला थोडं आश्चर्यच वाटलं. सगळं आयुष्य त्या जंगलात गेलेली, अजुनही तिथेच वावरणारी हि माणसं, त्याच जंगलात यायला घाबरतात म्हणजे काय? काय कारण असावे? पक्या आपल्या मोडक्या तोडक्या शब्दात देसुबरोबर बोलत होता, पण ती भाषा डोक्यावरुन जात असल्याने सुन्याचे लक्ष त्यांच्या संभाषणात नव्हते. तो देसुची झोपडी निरखत होता. एका गोष्टीचे त्याला आश्चर्य वाटले. सगळ्या झोपडीत हाडांच्या माळा लावल्या होत्या. मातीने सारवलेल्या कुडाच्या भिंतींवर कसलीतरी अगम्य, भीती वाटावी असली चित्रे आणि आकृत्या रेखाटलेल्या होत्या.

तेवढ्यात पक्याचे आणि देसुचे बोलणे संपले आणि पक्याने सांगितलेल्या कहाणीवरुन त्याला असे समजले की रानात पाणवठ्यापाशी काहीतरी अमानवी, पाशवी अशा शक्तींचा वास आहे. त्यांच्यापैकी काही आदिवासी त्या जागेपाशी गायब झालेले आहेत. त्यामुळे तिथे जायला ते घाबरतात. पण देसुला त्यांच्या देवर्ष्याने कसलातरी ताईत दिला आहे, त्यामुळे तो तिथे जाऊ शकतो. तरीही खुप आढेवेढे घेतल्यानंतर, पक्याने त्याला गांजाच्या दोन पुड्या आणि काही पैसे ऑफर केल्यावरच देसु त्यांना फक्त जंगलातील पाणवठ्यापर्यंत पोचवायला तयार झाला आहे.

"आयला म्हणजे भुतं बघायला मिळण्याची शक्यता आहे!" सुन्या खदखदायला लागला. तसा पक्याही त्याच्याबरोबर हसायला लागला.....

"अबे तू आहेसच की, अजुन काय बघायचय?".......................................

"हे हे हे...बाय द वे, तुझ्याकडे हा मसाला पण आहे हे बोलला नाहीस बे पक्या तू मला!" सुन्या देसुच्या हातातल्या गांजाच्या पुड्यांकडे बघत बोलला.

************************************************************************************************************

त्यानंतर देसुने त्यांना त्या पाणवठ्यापाशी सोडले होते. फ़क्त एक सुचना देसुने केली होती की तिथे एका जुनाट झाडावर बांधलेल्या मचाणावरच बसुन त्यांनी वाघाची वाट बघावी. त्याच्यामते ते झाड त्यांच्या देवऋष्याने मंत्रीत करुन ठेवले होते, त्यावर बसणार्‍यांना कसलीही भीती नव्हती. पण कुठल्याही परिस्थितीत रात्रीच्या वेळी झाडावरुन उतरायचे नाही अशी चेतावणी द्यायलाही तो विसरला नव्हता. देसु त्यांना तिथे सोडुन गेल्याला आता किती तरी तास उलटुन गेले होते. मध्यंतरी कालची रात्र उलटुन गेल्यावर आजचा दिवसभर त्यांनी जंगलात एक फेरफटका मारला होता. पण त्यांना तिथे काहीही भीतीदायक वाटावे असे आढळले नव्हते. उलट जंगलातील निसर्गसौंदर्याने वेड लागल्यासारखे झाले होते दोघांनाही. पण ज्यासाठी आले होते तो वाघ काही दिसत नव्हता. पक्या जंगलभर शोध घेत होता पण त्याला काही तो वाघ सापडला नाही. शेवटी आजची एक रात्र वाट बघायची आणि सकाळी परतीची वाट धरायची असे ठरवून दोघेही पुन्हा एकदा मचाणावर हजर झाले होते. मात्र मध्यरात्र झाली तरी अजुनही वाघाचे दर्शन झाले नव्हते.

"पक्या, आता मात्र कहर झालाय यार! तुझा वाघ कधी येणार आहे. अपॉईंटमेंट घेतली होतीस ना तू? च्यायला इथे मरणाची भुक लागली. आता तुझा तो वाघ आणि तू... दोघे मिळून गोंधळ घाला. मी चाललो" आणि चिडलेला सुन्या मचाणावरून खाली उतरायला लागला.

"थांब सुन्या.....! मी तुझ्याशी थोडं खोटं बोललोय ! मी तुला इथे वाघ बघायला नाही आणलय. इथे येण्याचं कारण काही वेगळं आहे. खरेतर मला कुणाचीतरी सोबत हवी होती कारण इथे एकट्याने यायची माझी हिंमत नव्हती, माझ्याकडे तेवढे धाडस नव्हते."

पक्या नरमाईच्या सुरात बोलला. तसा सुन्या थबकला....

"पॅक्स, आर यु क्रेझी? एकतर गेले दोन दिवस सॉरी दोन दिवस आणि एक रात्र मी तुझ्याबरोबर इथे सडतोय तो फडतुस वाघ बघण्यासाठी. साल्या काल शुक्रवार, २२ तारीख ना, बिप्सची नवीन मुव्ही रिलीज होणार होती. तुझ्यामुळे मी माझा फर्स्ट डे. फर्स्ट शो चुकवला आणि आता तू मला सांगतोयस की इथे आपण वाघ पाहण्यासाठी आलोच नाहीये. तू त्या देसुशी बोलत होतास त्या कुठल्यातरी अगम्य भाषेत तेव्हाच खरेतर मला संशय यायला हवा होता काहीतरी शिजतय म्हणून. पण........"

"ते सोड, मला एक सांग पक्या, तू माझ्याशी खोटं का बोललास? जर वाघ नाही बघायचाय तर इथे आपण का सडतोय गेले दोन दिवस?"

"सुन्या, खरे सांगायचे तर मला एक स्वप्न पडतेय गेले महिनाभर. त्या स्वप्नात..........." पक्या दबक्या आवाजात बोलत होता...

"एक, एक मिनीट पक्या, तूला कुठलंतरी एक टिनपाट स्वप्न पडलं आणि त्यासाठी तू मला इथे घेवुन आलास, काहीही कारण नसताना." सुन्याने आता पक्याला फटके द्यायचेच काय ते बाकी ठेवले होते.

"सुन्या, तू माझे पुर्ण म्हणणे ऐकुन घेणार आहेस का? लेट मी कंप्लीट फर्स्ट, मग काय घालायच्या त्या शिव्या घाल्.....ओके?" पक्याने अक्षरशः हात जोडले तसा सुन्या नरमला.

"तसं नाही बे, पण तू खोटं बोललास ना म्हणुन सालं पेटलो मी. तू खरं कारण सांगुन चल म्हटला असतास तरी मी आलो असतो यार....!"

"मला खात्री आहे, तू नक्की आला असतास. पण मग हजार प्रश्न विचारले असतेस आणि माझ्याकडे तर तुझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर नव्हते. काय सांगणार होतो मी तुला. माझा ८-९ महिन्यापुर्वी गायब झालेला एक ट्रेकर मित्र माझ्या स्वप्नात येतो. कुठल्यातरी एका घनदाट जंगलात, एका मचाणावर बसुन तो मला हाका मारतो....

"प्रकाश, हेल्प मी ! वाचव मला म्हणुन !! आणि त्याला वाचवायला म्हणुन मी अशा जागी तुला बरोबर घेतोय जिथे तो नक्की असेलच याची मलाही खात्री नाहीये. काय स्पष्टीकरण देणार होतो मी? "

पक्या बोलत होता. सुन्याने पुढे होवुन त्याच्या खांद्यावर थाप मारली.

"ठिक आहे यार ! पण आता मला सांग कुणाबद्दल बोलतोयस तू. आणि या जागेबद्दल कसे काय कळाले तुला?"

पक्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला लागला.

"या सगळ्याला साधारण एक महिन्यापुर्वी सुरुवात झाली. मला रोज रात्री एक ठराविक स्वप्न पडत होते. त्यात एक जंगल दिसायचे, जंगलात एक जनावरांची पाणी प्यायची जागा दिसायची. हळु हळू जंगलाची भयानकता जाणवायला लागली. आधी हिरवेगार दिसणारे जंगल आता काळ्या रंगात परावर्तीत होवु लागले होते. सुरुवातीला ही स्वप्ने म्युट , नि:शब्द असायची. नंतर मग जंगलातले आवाज जाणवायला लागले. घनदाट जंगलातील काळी कुट्ट रात्र, मधुनच एखादा काजवा चमकुन त्या भयावहतेत अजुनच भर घालतोय. रात किड्यांच्या किरकिरण्याचा आवाज. जंगलातल्या विविध प्राण्यांचे चित्र विचित्र आवाज. रात्रीच्या भयाण शांततेत सलगपणे चालणारी वार्‍याची मंद सळसळ अंगावर काटा आणायची. मधुनच पायाखालचा पाचोळा कुरकुरण्याचे आवाज ! काही दिवसानंतर हळु हळु असे भास व्हायला लागले की मी स्वतः त्या जंगलात अडकलो आहे. बाहेर यायचा रस्ताच सापडत नाहीये........!"

सुन्या सावरुन बसला होता.

" पुढे काय झालं आणि तुझा कोण तो हरवलेला ट्रेकर मित्र, मला कसा माहीत नाही? "

"तूला माहीतेय तो सुन्या, तूही ओळखतोस त्याला चांगलाच......! गिरीश गायकवाड आठवतो?"

"न आठवायला काय झालं, पण गिर्‍या सद्ध्या सौदीत आहे ना?" सुन्याने चमकुन विचारलं.

"मी पण असेच समजत होतो इतके दिवस. कारण त्याने मला तसेच सांगितले होते. तुला आठवते आपण शेवटचे भेटलो होतो गिर्‍याला?"

"न आठवायला काय झालं. माहिमचा पास्कलचा बार, तिथली गिर्‍याची ती भन्नाट पार्टी, दारुचा महापूर आणि हाय.... ती बिजलीसारखी नाचणारी चंचल बाला, 'नफिसा' ........ कैसे भुल सकता हु यार?" सुन्या त्या आठवणींनी कळवळला.

"येस, तीच पार्टी. त्यानंतर गिर्‍या आपल्याला भेटलाच नाही कधी. मीही समजत राहीलो की तो सौदीला गेला. पण......

"एनी वेज, बॅक टू जंगल...., नंतर हळु हळू त्या जंगलातले चित्र्-विचित्र आवाज जाणवायला लागले. स्वप्नात जंगलातली ती काळीकुट्ट रात्र यायची.

मग......, तो पाणवठा...., पाणवठ्यावर पाणी प्यायला येणारे प्राणी...., खरेतर येणारे प्राणी कसे म्हणू? मला फक्त एकच प्राणी दिसायचा तिथे....., अंगावर सोनेरी पिवळसर रंगावर काळे ठिपके मिरवणारा जंगलचा राजा.... वाघ ! मी एका झाडाआड लपलेलो असायचो. वाघ पाणी प्यायला म्हणुन तिथे पाणवठ्यावर यायचा.....

त्या पाणवठ्याकडे जाता जाता सावकाश वळुन मी लपलेल्या झाडाकडे बघायचा. जणुकाही माझं अस्तित्व त्याला जाणवलं असावं. माझ्या रक्ताचं पाणी पाणी व्हायचं. सगळ्या अंगाला घाम फुटायचा. मी घाबरुन पळायच्या बेतात ....

आणि स्वप्न संपून मी जागा व्हायचो !"

"कम क्विक, पक्या... पाल्हाळ लावु नकोस ! गिर्‍या..., गिर्‍या.......(?) तो कुठे येतो या प्रकरणात?"

"हळु हळु स्वप्नाचा पल्ला वाढायला लागला होता. तो वाघ मी लपलेल्या झाडाकडे बघत बघत पाणवठ्याकडे जात असायचा. मध्येच त्याचे ते तिक्ष्ण सुळे चमकायचे. माझा जीव अर्धा झालेला असायचा. आणि त्यात एके दिवशी मी ते ऐकलं........

आधी तर मला ते नीट ऐकुच आलं नाही. पण दोन तीन वेळा तेच स्वप्न रिपीट झाल्यावर लक्षात आलं की तो कुजबुजल्या सारखा आवाज त्या झाडावरुन येतोय ज्याच्या मागे मी लपलेला होतो. मी कुतुहलाने वर बघितलं तर वर झाडावर एक लाकडी , जंगलाच्या वेलींनी बांधलेलं मचाण होतं. त्या मचाणावरुन कुणीतरी दबक्या स्वरात मला हाक मारत होतं. मी थोडं वर चढुन बघीतलं....तर....

त्या मचाणावर गिर्‍या बसलेला होता.

"पॅक्स, मी गिरीश, ओळखलंस मला?" तो माझ्याशी बोलला....

पण खरे सागायचे तर मी त्याला ओळखलाच नाही क्षणभर. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झालेल्या, केस वाढलेले. सगळे अंग रक्ताने माखलेले अशा अवस्थेत गिर्‍या मला हाका मारत होता...

"प्रकाश, मी इथे गेले कित्येक दिवस अगदी एकटा आहे रे. प्रचंड भीती वाटतेय. कसलीच सोबत नाहीये. मला वाचव प्रकाश......, मला या एकटेपणाची खुप भीती वाटतेय...."

एकदम मी ज्या फांदीवर उभा होतो ती फांदी तुटली आणि मी धपकन खाली पडलो. जागा झालो तेव्हा पलंगावरुन खाली पडलेलो होतो.

सुन्या का कोण जाणे पण मला अजुनही असं वाटतय की गिर्‍या जिवंत आहे. तो मला मदतीसाठी बोलवतोय. ते म्हणतात ना की तुमची जगण्याची इच्छा, जिवनाबद्दलची आसक्ती जर खुप तिव्र असेल तर ती मानसिक पातळीवर तुम्हाला इतरांशी संपर्क साधायची शक्ती प्राप्त करुन देते. आणि गिर्‍याचे तर भविष्याबद्दल किती सॉलीड प्लान्स आहेत. तुला आठवतं ना, तो नेहमी भरभरून बोलायचा...., काही वर्षे तिकडे पैसा कमवुन परत यायचं. मग स्वतःचा व्यवसाय, घर, गाडी ! शक्यता आहे की त्याची ही जिवनेच्छाच त्याच्या संकटाबद्दलची माहिती अशा पद्धतीने माझ्यापर्यंत पोचवत असेल. दिवा विझायला लागला की त्याची झळाळी अचानक वाढते. मे बी गिर्‍या नसेलही जिवंत कारण हि स्वप्ने सुरू होवून महिन्याच्यावर कालावधी होवुन गेलाय. पण यदाकदाचित जर तो असेलच तर मला एक संधी घेणे किंवा गिर्‍यासाठी म्हणुन एक संधी देणे भागच आहे ना रे.....

म्हणुनच मग मी त्या स्वप्नात दिसलेल्या जंगलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. वेगवेगळी पुस्तके चाळली, जुने ग्रंथ चाळले, इंटरनेटवर खंगाळून पाहीले. जिथे जिथे म्हणुन जंगलांबद्दल माहिती मिळायची शक्यता होती अर्थात फोटोसकट, ती शोधुन पाहीली आणि सुदैवाने जगप्रसिद्ध शिकारी लालु दुर्वे यांच्या एका पुस्तकात मला ते जंगल, तो पाणवठा दिसला........., त्या मचाणासहीत होता तो फोटो! मी स्वप्नात बघितलेल्या मचाणाचा फोटो. आय वाज शॉक्ड बट हॅप्पी ऑल्सो! त्यानंतर एकदा मी इथे येवुन पण गेलो, पण मला ते मचाण, तो पाणवठा सापडला नाही. गेल्या महिन्यात चार्-पाच दिवस अन्न्-पाण्याशिवाय या जंगलात भटकत होतो मी. तेव्हा या देसुनेच वाचवलं मला. त्यांनेच पुन्हा मनुष्यवस्तीत आणुन सोडलं..........

पण स्वप्नांनी माझा पिच्छा सोडला नव्हता. पुन्हा पुन्हा गिर्‍या स्वप्नात यायचा आणि मदतीची याचना करायचा. मग मी पुर्ण तयारीनिशी परत यायचं ठरवलं. आणि तुला घेवुन इथे येवुन पोहोचलो." पक्याने एक निश्वास सोडला

"अरे पण मग मला सगळे सांगितले असते तर काय झाले असते." सुन्या थोडा समजुतीच्या सुरात म्हणाला.

"सोड ना यार, पुढे काय करायचं ते ठरवु या का?"

"अर्थात आता इथपर्यंत आलोच आहोत तर आजची रात्र अजुन वाट पाहू या. पण मला एक कळत नाही गिर्‍या जर जिवंत असेलच तर तो इथुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल ना की इथे मचाणावर बसुन राहील. मग आपण त्याला जंगलात इतरत्र शोधायच्या ऐवजी इथे मचाणावर काय करतोय? अर्थात त्याला दिवसभर शोधुन झालेय पण एवढ्या विस्तारलेल्या जंगलात आपण दोघेच काय शोध घेणार?"

"सुन्या, तू विसरतो आहेस. मला अगदी शेवटपर्यंत हे मचाण आणि मचाणावर बसलेला गिर्‍या दिसत होता. पण जेव्हा मी इथे शोधलं तेव्हा हे मचाणच काय हा पाणवठापण मला दिसला नाही. यावेळेस जेव्हा देसुला पटवण्यात यश आले तेव्हा त्याने या जागेपर्यंत पोचवले. तुला आठवतं देसुने काय सांगितलं होतं.....

"काहीही झालं तरी या मचाणावरून उतरायचं नाही. हि एकच जागा सुरक्षीत आहे. त्याच्या कुठल्यातरी भगताने की देवऋष्याने मंत्रीत केलेली आहे." छोड यार, मुर्खपणा आहे सगळा. असलं काही नसतं. " सुन्या प्रामाणिकपणे म्हणाला.

"अ‍ॅग्रीड, पुर्णपणॅ मान्य ! पण मग स्वप्नात कायम हे मचाण आणि हा पाणवठा येण्याचे कारण काय? जे मी कधीही बघितलेले नव्हते, अगदी चित्रात सुद्धा ती जागा माझ्या मित्रासकट माझ्या स्वप्नात येते. काही काळानंतर ती जागा प्रत्यक्षात अस्तित्वात आहे हे देखील सिद्ध होते, म्हणजे जर मला स्वप्नात दिसणारी ती जागा जर अस्तित्वात असेल तर त्या मचाणावर दिसलेला आणि परवापर्यंत दिसणारा गिर्‍यादेखील अजुनही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित या जागेचा वापर गिर्‍या रात्रीच्या मुक्कामासाठी करत असेल कारण येथुन पाणवठा जवळ आहे. दिवसा जंगलाबाहेर पडणारा रस्ता शोधणे आणि रात्री इथे मुक्कामाला असा गिर्‍याचा इथला कार्यक्रम असु शकतो. काल ज्या रस्त्यावरुन आपण आलो..... उद्या सकाळी जर देसु आपल्याला न्यायला नाही आला तर तुला वाटते आपण रस्ता शोधु शकु परत जायचा?"

पक्या खुपच गंभीर झाला होता.

"डोंट वरी यार, माझ्याकडे कंपास आहे. ते आपल्याला दिशा दाखवेल नक्की. त्याची काळजी करु नको तू. आणि येताना मी गपचुप सगळ्या रस्त्याने काही ठराविक खुणा करत आलोय, जेणेकरुन परतीचा रस्ता सापडणे सोपे जावे. सो तो देसु आपल्याला न्यायला येवो न येवो. मी माझ्या हँडीकॅमवर पुर्ण रस्ता जवळजवळ शुट केलाय. डोंट वरी अबाऊट दॅट! "

सुन्याने डोळे मिचकावत सांगितले.

"ग्रेट, हे काम चांगले केलेस तू. पण कंपासवर अवलंबुन राहु नकोस, ते तुझी काहीही मदत करु शकणार नाहीये." पक्या गंभीरपणे बोलला.

"कम ऑन पक्या, तु एक जातीवंत ट्रेकर असुन असे बोलावेस. अशा ठिकाणी कंपास हाच सगळ्यात चांगला वाटाड्या असतो मित्रा, फक्त तो तुम्हाला वापरता यायला हवा."

"अस्सं, काढ बर तुझा कंपास बाहेर आणि सांग मला कुठली ट्रु नॉर्थ आहे ते?"

सुन्याने बॅगेतले होकायंत्र बाहेर काढले, तळहातावर धरुन त्याकडे नजर टाकली आणि चमकलाच.................

होकायंत्राची सुई ३६० अंशात गरागरा फिरत होती, एखाद्या चक्रासारखी ! सुन्या वेड्यासारखा एकदा त्या भिरभिरणार्‍या सुइकडे तर एकदा पक्याकडे पाहात राहीला.

"आयल्ला, ही काय भानगड आहे बे?"

"आत्ता कळलं, मी त्याचा काही उपयोग होणार नाही असं म्हटलं ते? मी मागच्यावेळी हा अनुभव घेतलाय सुन्या. खरेतर तुला नाऊमेद करायचा बिलकुल हेतु नाहीये पण.....! माफ कर यार, मी तुला बरोबर आणायलाच नको होतं, विनाकारण माझ्याबरोबर मी तुझाही जीव धोक्यात घातलाय."

पक्या विलक्षण बेचैन झाला होता.

"कानफाट फोडीन साल्या. आजची मैत्री आहे का आपली? खरेतर तू मला आणले नसते तर मला राग आला असता. माझा मित्र इथे प्राणाशी खेळतोय आणि मी तिथे मस्त चिल्ड बिअर मारतोय. साल्या शरमेने आत्महत्या करायची वेळ आली असती माझ्यावर. पुन्हा काहीतरी मुर्खासारखे बोलू नकोस."

"सॉरी मित्रा, पण मला खरेच माझे चुकल्यासारखे वाटतेय."

पक्याच्या आवाजात एक प्रकारचा कंप होता. त्यामुळे लीड घेण्याची पाळी आता सुन्याची होती. एकदम त्याला काहीतरी आठवले आणि त्याने बॅगेतुन आपला हँडीकॅम बाहेर काढला.

"काय करतोयस तू? एवढ्या अंधारात काही रेकॉर्ड करणे मला तरी कठीणच वाटतेय सुन्या..................

"शुSSS...., सुन्याने तोंडावर बोट ठेवले. थांब जरा मला एक शंका आलीय.....!" कॅमेर्‍यात पाहता पाहता सुन्याने चेहरा वर केला आणि डोळे मिचकावले....

"आता माझ्या शंकावर काही कोटी करु नकोस..!"

पक्या हसला, "नाही रे, आता कोट्या करायची मनस्थितीच उरलेली नाहीये बे !"

सुन्या अतिशय व्यग्र चेहर्‍याने आपल्या हॅंडीकॅममध्ये काहीतरी शोधत होता. पक्या त्याच्याकडे बघत होता. जसजसा वेळ जायला लागल तसतसा सुन्याच्या चेहर्‍याचा रंग बदलायला लागला होता. शेवटी जेव्हा सुन्याने कॅममधुन आपले डोके बाहेर काढले तेव्हा त्याचा चेहरा अतिशय गंभीर झाला होता.

"पक्या..... वाईट बातमी ! कालपासुन आपण जे जे शुट केले या कॅमेर्‍याने ते सगळे आहे इथे. फक्त एक क्लिप गायब आहे. इथपर्यंत येताना आपण वापरलेल्या रस्त्याचे शुटींग केले होते मी. नेमकी तीच क्लिप गायब आहे डिस्कवरुन. हे मात्र धक्कादायक आहे मित्रा! त्या आधीच्या क्लिप्स आहेत, नंतरच्या आहेत फक्त ती एकच क्लिप गायब. मला पक्के आठवतेय मी ती नक्की स्टोअर केली होती आणि आत्तापर्यंत मी काहीही डिलीट केलेले नाहीये डिस्कवरुन."

सुन्याचा आवाज आता खुप व्रेगळा वाटत होता.

"मला माहीत होतं असं काहीतरी होणार म्हणुन. इनफॅक्ट मला खात्री आहे सुन्या, तू येताना झाडांवर केलेल्या खुणादेखील आता त्या जागेवर नसतील. कारण हा अनुभव मी पुर्वी घेतलेला आहे."

पक्याने एक थंड निश्वास सोडला.

"याचा अर्थ असा की आता आपल्याला पुर्णपणे आपल्या स्मरणशक्तीवरच अवलंबुन राहावे लागणार आहे तर." इति सुन्या...

"तिचाही फारसा उपयोग होइल असे वाटत नाही सुन्या."

"कमॉन पक्या, तू फारच निराश झालेला दिसतोयस यार. डोंट वरी यार, आपण काहीतरी मार्ग काढू यातून."

इतक्यात आसमंतात एक वाघाची डरकाळी घुमली. तसे दोघेही सावध झाले.

"पक्या, ज्यासाठी आलोय ती वेळ आता जवळ आल्यासारखी वाटतेय. गिर्‍या मिळो ना मिळो वाघ मात्र बघायला मिळणार बहुदा." सुन्या हसुन म्हणाला.

"यार कधीतरी गंभीर हो...!" इति पक्या

तेवढ्यात त्यांच्या मचाणाच्या झाडापासुन साधारण १००-१५० मिटरवर असलेल्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकु आली. त्या जाळीतून येणारा गुरगुरणारा आवाज तिथे वाघाच्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होता. जाळी थोडा वेळ खसफसली आणि थोडावेळाने त्यातुन काहीतरी बाहेर आलं. बाहेर आलेल्या त्या प्राण्याकडे बघितल्यावर मात्र दोघेही प्रचंड चमकले. त्या प्राण्याला माणसाप्रमाणे दोन हात, दोन पाय होते. हातापायाची नखे वाढलेली. एखाद्या आदिमानवासारखा दिसत असला तरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे केस मात्र तेवढे वाढलेले नव्हते. अंगावर काही झाडांच्या पानांपासुन बनवलेले वस्त्र पांघरलेले. तो स्वतःदेखील दबकत दबकत , इकडे तिकडे बघत पाण्याकडे सरकत होता. तो झाडाच्या आणखी जवळ आला.....! तो अगदी दृष्टीच्या टप्प्यात येवुन पोचला आणि पक्या जवळ जवळ ओरडलाच.

गिर्‍या.........!

**********************************************************************************************************

सुन्या शुंभासारखा बघतच राहीला. त्या प्राण्याला गिर्‍या कसे म्हणावे हाच मोठा प्रश्न होता. कारण सुन्याच्या डोळ्यासमोर अजुनही तो हसतमुख, देखणा गिरीशच होता. पण कटु असले तरी सत्य होते ते. तो गिर्‍याच होता. अतिशय वाईट अवस्थेत असला तरी गिर्‍याच होता. पक्याचा आवाज ऐकला आणि चमकुन त्याने वर बघितले. या दोघांना बघुन आधी त्याचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. पण ते सत्य आहे हे लक्षात आल्यावर त्याच्या डोळ्यातून अक्षरशः पाण्याच्या धारा लागल्या.

"तू खरोख आलास पॅक्स ? मला वाचवायला, माझी मदत करायला. माझा स्वतःच्या नशिबावर विश्वासच बसत नाहीये मित्रा. तुम्ही दोघे माझ्यासाठी इथवर आलात. मी इथे सारखा तुझीच आठवण काढतोय. पण ...., पण तुम्हाला कळले कसे मी इथे अडकलोय म्हणुन?"

गिर्‍याच्या आवाजात प्रचंड आश्चर्य होते.

"गिर्‍या तुझ्या इच्छाशक्तीने आम्हाला इथवर खेचुन आणले रे. तुझं ते बोलावणं माझ्यापर्यंत पोचलं म्हणुन तर इथपर्यंत येवु शकलो आम्ही."

पक्याने त्याला थोडक्यात आपल्या स्वप्नांची कहाणी ऐकवली. तसा गिर्‍या सदगदित होवुन त्यांच्याकडे बघायला लागला.

"केवळ स्वप्नावर विश्वास ठेवुन तूम्ही माझा शोध घेत इथपर्यंत आलात? तुमचे हे उपकार मी कसे फेडु मित्रांनो. आज प्रचंड आनंद झालाय मला. इथे खुप एकटेपणा जाणवत होता रे. प्रत्येक रात्र मी अक्षरशः जीव मुठीत धरुन काढलीय गेले काही महिने. प्रचंड भीती वाटायची. पण दुसरा पर्यायच नव्हता. आता तुम्हीपण आलात. आपण तिघे झालो. खुप आनंद झालाय रे मला."

सुन्याला त्याचं बोलणं काहीसं विचित्र वाटलं. पण ते बोलण्याची हि वेळ नव्हती.

"पण तु इथे कसा काय आलास गिर्‍या?"

"वाघ बघायला म्हणुन आलो होतो आणि वाघच काळ झाला आमचा!" गिर्‍याने एक थंड सुस्कारा सोडला.

"आमचा......? आणखी कोण आहे तुझ्याबरोबर?"

"आहे नाही होते म्हण. दोघे मित्र होते. पण ते सुटले बिचारे."

"म्हणजे?"

"सोड ना, नंतर सांगेन सगळं सविस्तर आधी इथुन चला. चला...लवकर उतरा त्या मचाणावरुन. नाहीतर उशीर होइल. थोड्याच वेळात दोन वाजतील आणि मग त्याची यायची वेळ येइल."

पक्या घाई-घाईत मचाणावरुन उतरायला लागला. तसे सुन्याने त्याला अडवले...

"थांब पक्या, आठवतं देसुने काय सांगितले होते ते. काहीही झाले तरी रात्रीच्या वेळी मचाणावरुन उतरायचे नाही, काहीही. तु एक काम कर ना गिर्‍या, तु पण ये वरच. उद्या सकाळी उअतरुन जाऊ आपण."

"अहं तोपर्यंत खुप उशीर झालेला असेल. खुप उशीर! चला, लवकर उतरा आणि इथुन शक्य तितके दुर चला नाहीतर तो येइल इतक्यात. "

गिर्‍या खुपच घाबराघुबरा झाला होता.

"तो म्हणजे...?" सुन्याने साशंक आवाजात विचारले.

"तो म्हणजे वाघ, खरेतर तो एक चित्ता आहे. झाडावर देखील चढता येते त्याला. आणि ज्या मचाणावर तुम्ही बसलाय ना ती त्या आदिवासींची बळी द्यायची जागा आहे. तो साला, देसु....., आम्हालाही त्यानेच इथेच बसायला सांगितले होते. त्या रात्री चित्त्याने हल्ला केला आणि......

ते दोघे सुटले बिचारे कायमचे आणि मी मात्र अडकलो इथे. चला लवकर दुर चला इथुन."

गिर्‍या खुपच घाई करायला लागला तसा पक्या सरसर झाडावरुन खाली उतरला.

"चल बे सुन्या, मघापर्यंत तुझा तसल्या गोष्टीवर विश्वास नव्हता आणि आता गिर्‍या समोर दिसतोय, ज्यासाठी इथवर आलो ते कार्य सिद्ध झालेय तर तु त्या गोष्टी करतोयस."

शेवटी नाईलाजानेच सुन्यापण खाली उतरला. पण त्याच्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह कायम होते.

"गिर्‍या... एक सांग, तू एवढ्या रात्री एखाद्या सुरक्षीत ठिकाणी थांबायचे तर इथे तुझ्यामते या धोक्याच्या असलेल्या जागी काय करतोयस?"

गिर्‍याच्या ऐवजी पक्यानेच उत्तर दिले....

"चल बे सुन्या आता गपचुप. उगाचच फाटे फोडु नकोस."

गिर्‍या पुढे आणि दोघे त्याच्या मागे चालु लागले. गिर्‍या जंगलात अजुन आत चालला होता. म्हणुन पक्याने विचारले...

"गिर्‍या, आत कुठे चाललास अजुन? बाहेर पडायचा रस्ता तिकडे आहे."

"हो, पण त्या रस्त्यावर ते आदिवासी वाट बघत असतील आपली. हा चित्ता त्यांच्या वस्तीवरची माणसे पळवायचा म्हणुन ते बाहेरुन कुणी आले की सरळ सरळ त्याला बळी म्हणुन या मचाणावर पाठवतात. चित्ता इथे पाणी प्यायला म्हणुन आला की त्याला मानवी शरीराचा गंध येतो आणि तो हल्ला करुन त्यांना मारुन टाकतो. आमच्यावरदेखील त्यानेच हल्ला केला होता. माझे दोन्ही मित्र कायमचे सुटले.....! मी मात्र इथे अडकलो.......

बोलता बोलता गिर्‍या एका दाट, माणसाच्या उंचीएवढ्या झुडपात शिरला. सुन्या आणि पक्या दोघेही त्याच्या मागोमाग आत शिरले. आत शिरताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आत एक प्रशस्त गुहाच होती. एका झुडपामागे एवढी मोठी गुहा? दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसला.

"मी इथे राहतो.....!" त्यांच्याकडे वळत गिर्‍या म्हणाला.........,

"आणि हि इथे पडलेली हाडे.........!"

सुन्याने साशंक स्वरात विचारले तशी गिर्‍याच्या डोळ्यात एक विलक्षण चमक आली. त्याचे डोळे एका वेगळ्याच तेजाने चमकायला लागले.

"खरं सांगु? ती हाडं आहेत्...माणसांची...! मी खाल्लेल्या माणसांची. त्यात काही आदिवासी असतील, त्यात तुमच्यासारखी बाहेरुन वाघ बघायला येणारी माणसे असतील. त्यात..... त्यात तुमचा 'गिर्‍या' पण असेल......!"

"गिर्‍या पण असेल? म्हणजे तुला काय म्हणायचेय? तु गिर्‍या नाहीस? तर तु कोण आहेस मग......?"

गिर्‍या बोलायला लागला. पण आता त्याची भाषा काहीशी विचित्र होती. सुन्याला काहीच कळेना. हि भाषा कुठेतरी ऐकली असल्याची ओझरती जाणीव मात्र झाली. पण पक्याला मात्र ती भाषा खुप चांगल्या पद्धतीने कळत होती.

"ज्याला तुम्ही बघायला आला होतात... तोच ! तो या जंगलातला कुप्रसिद्ध वाघ. असे आश्चर्याने बघु नका. मी "डेका" आहे, डेका बिरसा. देसुचा मुलगा ! काही वर्षापुर्वी त्या आदिवाश्यांनी मला या जंगलात घेरुन, जाळुन मारले होते. त्यांच्या मते मी एक चेटक्या होतो. ठिक आहे, मला होत्या अवगत काळ्या जादु. माझ्या बापाकडुनच शिकलो होतो मी. पण तो मुर्ख एवढ्या प्रचंड शक्तीचा उपयोग म्हणे त्या मुर्ख आदिवास्यांच्या रक्षणासाठी, कल्याणासाठी करायचा. मी त्यांचा उपयोग आणखी ताकद मिळवण्यासाठी केला. काही आदिवास्यांना तिथेच त्या मचाणापाशी बळी दिले सैतानाला. मला अजुन शक्ती हव्या होत्या. शेवटी एक दिवस सगळे उघडकीला आल्यावर त्यांनी मला पकडुन जाळुन मारले. तिथे त्याच मचाणापाशी !

पण त्या मुर्खांना कुठे माहीत आहे. देह हे माझ्यासाठी केवल एक माध्यम आहे. हा नाही तर तो. मग मी या चित्त्याच्या शरीरात शिरलो. माझी साधना चालु ठेवली. एकुण दहा शेकडा बळी द्यायचेत सैतानाला. त्यानंतर माझा धनी मला सर्वशक्तीमान बनवेल. मग मी या समस्त जगावर राज्य करेन. पण माझ्या या साधनेत माझा मुर्ख बापच सर्वात मोठा अडथळा आहे. आणि अजुनतरी त्याच्याशी झुंझ घेण्याची माझ्यात शक्ती नाही. त्याने माझे साधनास्थळ, ते मचाणच अभिमंत्रीत करुन माझ्यासाठी बंद केले. त्याला वाटले ती जागा बंदीस्त केली की मीही बांधला जाईन. त्याने तुम्हाला बरोबरच सांगितले होते, मचाणावरुन खाली उतरु नका कारण त्याला माहीत आहे आता मी त्या मचाणावर चढु शकत नाही. पण तो मुर्ख माझा बाप आहे. अजुनही माझ्याबद्दल कुठेतरी, त्याच्या मनात प्रेम आहे. त्यामुळे अजुन त्याने मला संपवण्याचा प्रयत्न केलेला नाही.

मग मचाण नाही म्हटल्यावर मी दुसरे साधनास्थळ तयार केले. आता माझ्या बळींना मी इथे घेवुन येतो. तुमच्या मित्राला देखील इथेच बळी दिला मी. त्याचे ते दोन मित्र शहाणे ठरले. त्यांनी देसुचे ऐकले व मचाणावरुन उतरलेच नाहीत. त्यामुळे वाचले आणि माझ्ज्या तावडीतुन सुटले. हा मुर्ख मात्र खाली उतरला , एक गरीब आदिवासी त्याच्यासमोर तडफडुन मरताना बघवला नाही त्याला. त्याची मदत करायला म्हणुन खाली उतरला आणि फसला. वेगवेगळी रुपे घेण्यात माझा हातखंडा आहे. आता तुमची पाळी. तुमचा नंबर आठ शेकडा आणि १०,११ ! अजुन खुप बळी शोधायचेत मला. जेव्हा तुमचा मित्र सापडला तेव्हा त्याच्या विचारांमार्फत मी या मुर्ख पक्यापर्यंत पोचलो. हा मुर्ख, भावुक माणुस आपल्या मित्राचा शोध घ्यायला म्हणुन इथपर्यंत आला आणि येताना तुलाही बरोबर घेवुन आला. चला तयार व्हा, आपल्या मित्राला सोबत करायला आलात ना! माझ्या मुर्ख बापाचा देसुचा विचार बदलायच्या, त्याचे रुपांतर एका कर्तव्यनिष्ठ मानवहितचिंतकात व्हायच्या आत आत मला माझे बळी पुर्ण करायचेत. तयार व्हा........."

पक्या गर्भगळीत होवून त्याच्याकडे बघत होता. तर सुन्याला काहीच कळालेले नव्हते. एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात आलेली होती....

"आपल्या आयुष्याचा हा शेवट आहे."

त्याने पक्याला कडकडुन मिठी मारली.

"आत्तापर्यंत प्रत्येक सुख्-दु:खात एकत्र राहीलोय, आता मरणही एकत्र पत्करु मित्रा."

पक्याने आपले बाहु त्यांच्या खांद्यावर टाकले आणि आपली मिठी घट्ट केली.
हळुहळु समोर उभा असलेला गिर्‍या धुक्यात विरघळुन गेला, आता त्याच्या जागी एक चित्ता उभा होता. जिभल्या चाटणारा, हे मोठे मोठे सुळे बाहेर आलेला, आपल्या बळींची वाट पाहात उभा असलेला चित्ता. कुठल्यातरी कोपर्‍यातुन, त्या धुसर धुक्यातुन पुन्हा एकदा डेकाचा आवाज आला.

"ज्याला तुम्ही पाहताय तो मी नाही. तो माझा धनी आहे. माझा सर्वशक्तीमान धनी! सैतान..........!!"

एक प्रचंड डऱकाळी फोडत त्या चित्त्याने आपल्या सावजांवर झेप घेतली....................

**********************************************************************************************************

देसुने आपल्या हातातली दोन हाडे दारावरच्या खोबणीत खोचुन टाकली.

तो मनाशी काहीतरी पुटपुटला. पक्या असता तर त्याला त्याचे पुटपुटणे बरोबर कळाले असते....

८१०, ८११ ! आता फक्त १८९ राहीले. लवकरच काहीतरी करायला हवे. काहीही करुन डेकाला रोखायलाच हवे. आत्ता बस्स झाले !

एक मात्र नक्की आता गिर्‍याला कधीच एकटेपणा जाणवणार नव्हता. त्याला पक्या आणि सुन्याची सोबत होती ना आता. खंत इतकीच, या सगळ्या मागचे रहस्य, आपल्या मृत्युचे कारण जे पक्याला कळाले ते गिर्‍या आणि सुन्याला कधीच कळणार नव्हते !

समाप्त

गुलमोहर: 

बापरे...टेरिफिक.... शेवटपर्यंत गोष्टीतला थरार कायम होता....

मलापण आवडली, जमल्येय भट्टी बरिचशी... पु.ले.शु.

चिंगीला मोदकं, मी पण बघितलं कि खाली क्रमशः नाहीये ना ते आधी Happy ....काय करणार, आजकाल क्रमशः ची साथ आल्येय ना Sad

अमित अरुण पेठे

छान... Happy

वि.कु. फर्मास कमबॅक.

सुन्याने अक्षरशः हात जोडले तसा सुन्या नरमला.>> पक्याने अक्षरशः हात जोडले तसा सुन्या नरमला. असं हवंय बहुदा. फक्त १च चूक मिळाली Happy

सर्वांचे मनःपूर्वक आभार Happy

<<सही.. शेवटचं वाक्य कळलं नाही पण>>> शिरिश, या वाक्याचे कारण/अर्थ अगदी साधे आहे. जोपर्यंत डेका गिर्‍याच्या रुपात असतो तोवर तो गिर्‍याची भाषा बोलतो. पण जेव्हा तो जाहीर करतो की तो गिर्‍या नसुन डेका आहे त्यानंतर तो डेकाची आदिवासी भाषा बोलायला लागतो.
<<<गिर्‍या बोलायला लागला. पण आता त्याची भाषा काहीशी विचित्र होती. सुन्याला काहीच कळेना. हि भाषा कुठेतरी ऐकली असल्याची ओझरती जाणीव मात्र झाली. पण पक्याला मात्र ती भाषा खुप चांगल्या पद्धतीने कळत होती.>>>> त्यामुळे या सर्वामागची जी कारणे, पार्श्वभूमी तो सांगतो ती डेकाने त्याच्या आदिवासी भाषेत सांगीतलेली असल्याने व ती भाषा सुन्याला येत नसल्याने आपल्या मृत्युचे खरे कारण त्याला कळतच नाही, गिर्‍यालातर ती संधीही मिळालेली नसते. पक्याला ती भाषा कळत असल्याने त्याला मात्र डेकाचे शेवटचे बोलणे बर्‍यापैकी समजते. Happy
ड्रिम धन्स, बदल करतोय Happy

विकु शेवट विस्तृत करुन सांगितल्यावर कळले. असो. छान जमलिये. पुन्हा एकदा वेल्कम बॅक.

काय लिहिलस आहेस तु...जबरदस्त्..भयकथा....वाचताना मी पण त्या जंगलात होते..ति भिति अजुनहि जाणवते आहे.. खुप सुंदर..

विशाल, टाकली होती तेव्हाच वाचली पण प्रतिसाद द्यायचा राहूनच गेला होता. आवडली हे मुद्दामहून सांगायला नकोच खरेतर कारण तुमची एकच गोष्ट वाचल्यावर धडाधड बाकीच्या वाचून काढल्याहेत. ही गोष्ट तर एका वेगळ्याच सेटिंगमध्ये आहे आणि नेहेमीपेक्षा वेगळी, वेगळ्या शेवटाची. मस्त जमलीये.

एक सुचना :

...... त्याचा विचार बदलायच्या आत मला माझे बळी पुर्ण करायचेत. तयार व्हा........."

>>>>>>> या वाक्यात 'देसुचा विचार बदलायच्या .......' असं घालायला हवं का?

धन्यवाद सावली, मामी Happy
मामी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे अन्यथा त्या वाक्याच्या अर्थात संदिग्धता डोकावतेय. बदल करतोय Happy

<<शेवट नाही आवडला!>>> निखिल, प्रामाणिक मताबद्दल मनःपूर्वक आभार Happy
शेवट का नाही आवडला ते दिले असते तर छान वाटले असते. म्हणजे नीट जमलाच नाही म्हणुन नाही आवडला की नकारार्थक आहे म्हणुन नाही आवडला? Happy

शेवट का नाही आवडला ते दिले असते तर छान वाटले असते. म्हणजे नीट जमलाच नाही म्हणुन नाही आवडला की नकारार्थक आहे म्हणुन नाही आवडला? >>>>>>>>>>>>

सुखांत शेवटाच्या भयकथा या लहान मुलांसाठी असतात! ज्या त्यांना सकारात्म वागणं आणि त्याचं महत्व शिकवतात. पुढे जाऊन याच मुलांना त्याचा त्रास होऊ लागतो, कारण आयुष्यात बहुतेकदा नकारात्मकताच समोर येते. आणि सुखांत शेवटामध्ये भुताचं पात्र कमजोर असतं, ते वेगळंच. असो. मला शेवट का नाही आवडला? कारण सांगतो. तत्पुर्वी भयकथा किंवा रहस्यकथा याविषयी थोडे. या कथांचा विचार करता त्या ढोबळमानाने दोन प्रकारात विभागता येतील. १. ज्याच्यामध्ये भूत, आत्मा वगैरे कोण आहे, ते सर्वांना माहित असतं. आणि कथेची पात्रं त्याच्या मागे लागलेली असतात. उदा. रामसे बंधू इत्यादी. २. ज्याच्यामध्ये अमानवीय घटना घडत असतात; पण त्याच्या मागे कोण असेल, हे कळत नाही आणि क्लायमॅक्सला ती व्यक्ती समोर येते. उदा. sixth sense, अदर्स इत्यादी (यापेक्षा वेगळी फोड करता येणे शक्य आहे, मला ती आत्ता गरजेची वाटत नाही!)
आपली कथा ही साधारणतः दुसर्‍या प्रकारची आहे. इथे होतंय काय की, गिर्‍या हे पात्र त्यांना भेटल्यावर पुढच्या काही वेळात ही पात्र मरतात. कथेची सुरुवात होते, तेव्हा आपल्याला कळते की, पाणवठ्याच्या आसपास काहीतरी अशूभ शक्ती आहे, मग कळतं की त्या दोघांच्या मित्राच्या शोधासाठी हा सगळा खटाटोप सुरु आके. हे कळतं आहे तोच तो मित्र त्या ठिकाणी प्रकट होतो आणि दोन्ही माणसं त्याच्यासोबत जाऊन मारली जातात.
एक विचित्र व्यक्ती पाणवठ्यावर येते आणि ती गिर्‍या असते, हे कळते, तेव्हाच संशय त्याच्यावर जातो आणी शेवट कळतो. मग शेवटी, तो त्या मुखियाचा मुलगा आहे या सस्पेन्सला फारशी किंमत राहत नाही. सोबत पात्रांचा गिर्‍यावर विश्वास ठेवणे, वेडेपणाचे वाटते. मुखियाच्या मुलाचे रुप बदलणे आणि विचार पोहोचवणे वगैरे निरर्थक वाटतं. गिर्‍या समोर येतो तोपर्यंत आपण जे मांडलं आहे, ती कथेची पार्श्वभूमी म्हणता येईल! तिथून पुढे काही थरारक मिळेल अशी अपेक्षा होती, पण ती पूर्ण झाली नाही. गिर्‍याच्या एन्ट्रीला जिथं ती पात्र फसतात तिथेच, मी वर म्हटलो तो क्लायमॅक्स चा सस्पेन्स उघडा पडतो. मुखियाचा मुलगा हा धक्कतंत्र म्हणून वापरून मिळणारा धक्का हा बाळबोध वाटतो.

एक विचार सुचला म्हणून सांगतो; काय झालं असतं जर, एवढे दिवस जंगलामध्ये राहून गिर्‍याच पशू झाला असता?

हे सगळं लिहिलं कारण कथेची सुरुवात आणि वातावरणनिर्मिती मला आवडली.

आभार!

Pages