पुस्तक पारायण...

Submitted by हर्ट on 7 February, 2008 - 00:00

वाचन ही एक चांगली सवय आहे. मी वाचन करतो हे जर कुणाला सांगितले तर जनमानसात आपला सन्मान वाढतो. आपलेच कौतूक आपण करू नये म्हणतात पण ह्या बीबीला ही गोष्ट काही मानवणार नाही. ज्यांना वाचनाची आवड आहे, त्यांच्याकडे काही पुस्तकं संग्रही असतात. अधुनमधुन आपण ही पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचतो, निदान काही भाग तरी विरंगुळा म्हणून वाचतोच वाचतो. कधी कधी असे होते की आपण एखादे पुस्तक अनेकदा वाचून देखील आपले पोट भरत नाही. सुदैवाने खूप पाने खायची सवय मला जडली नाही. पण अलिकडे मी एका पुस्तकाचे २१ वेळा पारायण केले तेंव्हा माझे हे पुस्तक चोरीला गेले. जळी स्थळी काष्ठी पाषाणी हे पुस्तक माझ्या सोबत असायचे कारण ते छोटेखानी होते. वर त्या पुस्तकाचे अनेक पदर माझ्या लक्षात सातत्याने येत गेले. मग गोडी वाढत गेली. कधीकधी मीटींगला देखील ते पुस्तक डायरीच्या आत ठेवून मी वाचले आहे. अनेकदा एकच एक पुस्तक वाचून त्या पुस्तकाची धार जाते म्हणतात. पण माझ्याबाबतीत उलटच होत गेले. चोरीला गेलेले पुस्तक सापडले खरे पण ते पुस्तक एका कोकणी व्यक्तीने तिच्या घरी ठेवून दिले आहे. आता अगदी वर्षभरानंतरच परत मिळणार आहे म्हणाली. ते पुस्तक आहे 'आहे हे असे आहे'. लेखक कोण हे इथे सांगणे न लगे. सगळेच त्यांचे पंखे आहेत. मला ह्या पुस्तकाने प्रचंड वेड लावले. काही पुस्तके मी दोन किंवा फ़ार फ़ार तर तिन वेळा पारायण केलेली असतील पण २१ वेळा खूप झाले की नाही

आज मराठी भाषा दिवस आहे. साहित्य हे भाषा टिकवण्याचे, तिला वृद्धींगत करण्याचे एक उत्तम साधन मानले जाते. ह्या दिनानिमित्त आणि चिरंजीव तुषार ह्यांना खूष करण्यासाठी मी हा बीबी उघडला आहे. (मिस नंदीनीला राग येणार नाही अशी अपेक्षा.)

तर मंडळी, तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचे तुम्ही किती वेळा पारायण केले ते आधी लिहा, आणि का आवडले हे जर सांगता येत असेल तर तेही नक्की सांगा. कदाचित आम्ही देखील ते पुस्तक वाचून बघू.

या आधिची चर्चा या दुव्यावर वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>पुस्तक वाचून जितका आनंद मिळतो, तितकाच आनंद आपल्याला आवडलेलं पुस्तक दुसर्‍याला आवडलं की होतो..>>
चिनूक्ष, दिल खुष कर दिया आपने..

मी सध्या हॉलंड मध्ये आहे.. २-४ महिन्यात भारतात जाईन परत.. तु दिलेल्या पुस्तकांची यादी वाचुन आता व्हाया रशिया-मंगोलिया-चायना-तिबेट असे जावे हा किडा डोक्यात वळवळु लागला आहे..

>>केतकर वहिनी उमा कुलकर्णी यांनी लिहिलं आहे. त्यांच्या मुलीचं नाव प्रस्तावनेत दिलं आहे.<<
are you sure? माझ्या आठवणीप्रमाणे उमा कुलकर्णीच त्यांची मुलगी आणि लेखिका वेगळी आहे. चेक करून बघते आणि सांगते दोनतीन दिवसात.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अज्जुका,
हे बघा,
kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=16168

farend, धन्यवाद. आणते आता शोधुन ह्यातले काही.
.
"पारायण" category मधले अजुन एक- Thank You Mr Glad. ह्याची इतकी पारायणे केलीत की नुसते नाव घेतले तरी कानात Mr Glad चे बुट खाड खाड वाजायला लागतात Wink

चिनूक्स, पुल परफॉर्मर होते हे अगदी पटतं. त्यामुळे एक नेमकेपणा असतो त्यांच्या लिखाणात आणि कथनाच्या अंगाने घेतल्यामुळे शैलीही पकड घेते. भैरप्पा (अनु -उमा कुलकर्णी) दिवाळी अंकातुन वाचलं आहे आणि आवडलं आहे. आता पुस्तकं आणून वाचलं पाहीजे. सानियांचं आवर्तन आणि स्थलांतर मला तुफान आवडतात. गौरींचं मुक्काम आणि एकेक पान गळावया...
सिंड्रेला, अग आपल्यासाठी पुस्तक ओळख आहे ही आणि चिनूक्स साठी पुस्तक पारायण Happy

बापरे, चिनूक्स, केवढी मोठी यादी दिली आहे, आता हे सगळं वाचून असं वाटतंय की २ महीन्याची सुट्टी घेऊन आधी हे वाचून काढावं. असो, यादी जपून ठेवेन आणि वेळ मिळेल तसे वाचेन. >>> पुस्तक वाचून जितका आनंद मिळतो, तितकाच आनंद आपल्याला आवडलेलं पुस्तक दुसर्‍याला आवडलं की होतो.".>>> हे खूपच खरं, अनेकदा ते दुसर्‍याला आवडावं यासाठी चर्चा केल्या आहेत.. Happy
बाकी इथली सगळी यादी वाचून (बहुतेक इथलीच) एक गोष्ट आठवली, एका माणसाला पैसे हवे म्हणुन पैजेवर २५ वर्ष एका खोलीत राहायचे असते, त्याला जेवण व हवी ती पुस्तके तिथे मिळत असतात. २५ वर्ष तो फक्त वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचून काढतो..
(या बीबी चा मुद्दा नाही पण सहज डोक्यात आलं - जे लोक अफाट वाचन करतात त्यांना मित्रांची गरज इतरांइतकी वाटते का ?)

मराठी वाचक,
ही गोष्ट मी पण कुठेतरी वाचली होती... बहुतेक "रविवार सकाळ "मधे.
जे लोक अफाट वाचन करतात त्यांना मित्रांची गरज इतरांइतकी वाटते का ?>>>
पुस्तक वाचून जितका आनंद मिळतो, तितकाच आनंद आपल्याला आवडलेलं पुस्तक दुसर्‍याला आवडलं की होतो.".>>> हे खूपच खरं, अनेकदा ते दुसर्‍याला आवडावं यासाठी चर्चा केल्या आहेत.. >> हे बोलणार्‍या तुलाच हा प्रश्न पडावा??
माझ्या मते जास्तच वाटत असावी. कदाचित आपल्या सारखाच एखादा वाचक मित्र मिळावा ही महत्त्वाची गरज असेल. कारण आपण वाचलेले जर व्यक्त करायला कुणीच नसेल तर आपण एकलकोंडे , घुमे होऊन जाऊ. या बीबी वर धडाधड पडणार्‍या पोस्ट्स त्याचाच पुरावा नाही काय??

Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

इथे विषय भरकटवल्याबद्दल क्षमस्व Sad
आशू, माझाच असा अनुभव आहे की जेव्हा माझं वाचन खूप होतं तेव्हा मला मित्र्-मैत्रिणींची जास्त गरज वाटत नसे, मोकळ्या वेळात, मित्र की पुस्तकं असा प्रश्ण आला तर पुस्तकांची निवड होत असे, तासंतास वाचत बसणं, त्यावर विचार करणं, इतकंच काय स्वप्नात पण तेच ! (हॉवर्ड रोअर्क ;)).. पण आता जसं जसं इतर जबाबदार्‍या वाढल्या तसं वाचन कमी झालं अन आता मैत्रिणींशी बोलण्यासाठी स्वत:चं रुटीन थोडं बदलेपर्यंत मजल गेली आहे. Happy म्हणून वाटलं.

कदाचित आपल्या सारखाच एखादा वाचक मित्र मिळावा ही महत्त्वाची गरज असेल >>> माझ्या एका खुप जवळच्या मैत्रिणीला आणि माझ्या धकट्या बहिणीला पण वाचन करायचा फार कंटाळा आहे. मैत्रीणीच्या आईला, बहिणीला आणि आमच्या घरातही सगळ्यांना वाचनाची खुप आवड. आम्ही काही वाचले कि ह्यांना (अर्थातच) सांगतो. दोघी पण ते मन लावुन ऐकतात, त्यावर चर्चा करतात. असे कुणी ऐकणारे असले तरी खुप असा माझा अनुभव आहे Happy
.
आयुष्यात पुस्तक "पारायण" करणे ज्यापासुन सुरु झाले त्या "आईच्या देणगी" ला कशी विसरले Sad आता "आईच्या देणगी" चा समग्र संच मिळतो असे ऐकले.

अरे हो की. मी वाचायची ठणठणपाळ ललितमधे - ललित मासिकात सदर होतं. अगदी लहान असताना. बर्‍याचवेळा डोक्यावरून जायचा तेव्हा. आता वाचायला पहिजे. धन्स चिन्मय आठवण करुन दिल्या बद्दल. त्या वेळी ते सदर कोणाचं ह्यावर बरीच चर्चा होत असे. मग ते दळवी लिहितात असं कळलं.

चिनूक्स, धन्यवाद! आणि दळवींची आठवण करून दिल्याबद्दल सुद्धा.
Hindoo Holiday - J. R. Ackerly - वेगळं आहे, चमत्कारिक आहे, बरं आहे.
सुभाष अवचटांनी जी. एं. वर कुलुपांच्या फोटोंसहित लिहिलेलं पुस्त़क - नाव विसरलो आता - उत्तम.
भा. रा. भागवतांचाही उल्लेख करावासा वाटतो - फास्टर फेणे पासून ते सूर्यावर स्वारी, मुक्काम शेंडेनक्षत्र पर्यंत.

सुहास शिरवळकर.... जाणीव, पळभर जन, सर्व भय-भूतकथा, मन्दार कथा, अमरकथा...... आणि या कथान्ची जन्म कथा सान्गणारे त्यान्चे पुस्तक... ( त्याचे नाव विसरलो. .. आता परत शोधून वाचेन..)

>> आणि या कथान्ची जन्म कथा सान्गणारे त्यान्चे पुस्तक...
फलश्रुती का?

मी इथे सगळ्यांचे अभिप्राय वाचून "आहे हे असं आहे" वाचतीये. जबरी आहे!! पहिल्यांदा थोडा वेळ लागला त्या लेखनशैलीशी जुळवून घ्यायला...पण आता खूप मस्त वाटतंय.. विशेष म्हणजे लेखिकेचे विचार १९७१ च्या काळातल्या एखाद्या स्त्री चे आहेत असं अजिबात वाटत नाही. म्हणजे आधुनिकता,विचार स्वातंत्र्य, प्रगल्भता हे सगळं जपूनही कुठेही स्त्री मुक्तीचा अथवा बदलत्या काळाचा झेंडा मिरवल्याचा दर्प येत नाही. पण गंमत म्हणजे तेव्हा जे वास्तव "आहे हे असं आहे" म्हणून त्यांनी आपल्या समोर मांडलंय.. ते अजून ही आहे हे असंच आहे!! कालातीत द्रष्टेपणा... दुसरे काय!!
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रोके तुझे कोई क्यूँ भला
संग संग तेरे आकाश है

आशू डी, कुणाचं आहे 'आहे हे असं आहे?' लेखक सांग जरा.

गौरी देशपांडे.. हे वर्णन, त्या,सानिया वगैरे लेखिकांना लागू होईल.. Happy माझ्या आवडत्या लेखिका!

होय .........फलश्रुती

तुलनेने नवीन लेखक - जगन्नाथ कुंटे. नर्मदा परिक्रमेवर छान पुस्तके आहेत.

जगन्नाथ कुंटे यांची नर्मदा परिक्रमेवर ३ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
कृष्णमेघ कुंटे हा त्यांचा मुलगा, त्याचं 'एका रानवेड्याची शोधयात्रा' मस्त आहे..

धारप, मतकरींचे कुणी चाहते?

मर्ढेकरांचे "सौंदर्य आणि साहित्य" - अलौकिक. सौंदर्यशास्त्रापासून ते "राक्षसविवाह", "व्याधाची चांदणी" या पुस्तक समीक्षेपर्यंत आणि लुईजी पिरांदेल्लो व गंगाधर गाडगीळ यांच्या लेखनाबद्दलसुद्धा. प्रखर आणि व्यासंगी बुद्धिमत्तेचा अत्यंत तर्कशुद्ध आणि संयत आविष्कार थोडक्यात म्हणजे अगदी मर्ढेकरी.

विंदा - "परंपरा आणि नवता" - चांगल्या कवींची खास करंदीकरी प्रतिभावान शैलीतील केलेली उत्तम मूल्यमापने, काही स्वतःबद्दल, "मुक्तीमधले मोल हरवले" कवितेविषयी विन्दा आणि गंगाधर गाडगीळ यांनी केलेली उच्च चर्चा. सारेच छान.

आनंद साधलेंचं "आनंदध्वजाच्या कथा" - प्रचण्ड करमणूक (थोडं प्रौढांसाठी आहे). विश्वास बसत नाही की "हा जय नावाचा इतिहास आहे" हे पुस्तक लिहिणार्‍या लेखकानेच हे लिहिलं आहे. "हा जय नावाचा इतिहास आहे" - महाभारतावर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर मराठीत लिहिल्या गेलेल्या चांगल्या पुस्तकांपैकी एक.

'जय नावाचा इतिहास' बरंच वादग्रस्त ठरलं होतं.
दुर्गाबाई, पुलं त्यावर तुटून पडले होते. दुर्गाबाई बरेचदा संतापून बोलायच्या या पुस्तकाबद्दल.. 'ऐसपैस गप्प दुर्गाबाईंशी'मध्ये तसा उल्लेखसुद्धा आहे..
वाचायला हवं एकदा..

गाण्याची आवड असल्यास - गोविंदराव टेंबेंनी लिहिलेले अल्लादियाखाँसाहेबांचे चरित्र - आवर्जून वाचण्यासारखे.
इतर उल्लेखनीय मराठी लेखक (उ. भारतीय शास्त्रीय संगीतासंदर्भात) - विष्णू नारायण भात़खण्डे, ना. र. मारुलकर (म्हणजे दत्ता मारुलकर नव्हेत!), कॄ. द. दीक्षित, वामनराव देशपाण्डे, स्वामी धर्मव्रत (शामराव कुलकर्णी), अशोक रानडे इ.
सुरुवात करू इच्छिणार्‍यांसाठी - Sandeep Bagchee (Naad - Understanding Raaga Music)

बी. आर. देवधरांचे भारतीय गायक/वादकांवरील पुस्तक.. नाव विसरलो..

चिनूक्स - आनंद साधलेंबद्दलही थोडा टीकेचा सूर काढला गेलेला आहे. ठणठणपाळनेही त्यांची मनसोक्त खिल्ली उडवली आहे. पण ते त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील गोष्टींमुळे. या पुस्तकात बरंच मूर्तिभंजन आहे. आता दुर्गाबाई किंवा पु.लं. काही मूर्तिभंजक म्हणून फक्त संतापून बोलणारे नक्कीच नव्हेत ...

दुर्गाबाईंच्या मते आनंद साधलेंचा अभ्यास तोकडा होता, पुस्तकात बर्‍याच गोष्टींचा विपर्यास केला गेला होता..
मी वाचलेलं नसल्याने दुर्गाबाईंकडून जे ऐकलं ते लिहिलं..
एखाद्या लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यातील शुचितेबद्दल दुर्गाबाईंची खास मतं होती, पण त्याचा आणि त्या लेखकाच्या साहित्याशी त्याचा संबंध नसायचा.
दुर्गाबाईंनी आनंद साधलेंना 'सुमार' म्हटलं ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नव्हे..
असो.. मिळवून वाचतो आता हे पुस्तक..

मला नाव नाही आठवत आत्ता.. नवीन आवृत्तीला पुलंची प्रस्तावना होती..
मी ४-५दा वाचलंय ते.. मस्त आहे..

विषय बदलतो आहे (आणि तोही चहाटळ गप्पांसाठी) त्याबद्दल क्षमस्व पण दुर्गाबाई - इरावती कर्वे - युगान्त हा त्रिकोणी वाद असल्याचं कुणाला स्मरतं का?

मोहन नाडकर्णी ह्यांचे हिंदुस्तानी - गायन- संगीत ह्यावर इंग्रजी मध्ये एक सुंदर पुस्तक आहे.
The Great Masters ; Profiles in Hindustani Classical Vocal Music
पुस्तकाच्या पहिल्या भागात हिंदुस्तानी संगीताची वाटचाल (ध्रुपद-धमार - ख्याल वगैरे वगैरे) सादर केली आहे. पुस्तकाच्या मुख्य भागात गेल्या १०० वर्षातील प्रसिद्ध गायकांची प्रत्येकी १०-१५ पानी माहिती आहे. हे सर्व गायक (१-२ अपवाद वगळता) नाडकर्णींनी स्वतः मैफिलीमध्ये ऐकले आहेत. शास्त्रीय हिंदुस्तानी संगीत म्हणजे काय आणि कोण-कोण रथी-महारथी होवून गेले ह्याची माहिती हवी असल्यात उत्तम पुस्तक (अर्थात बिगीनर्ससाठी)

Pages