सोनाली आज ऑफिसच्या कामाकडे लक्ष देण्यासाठी स्वतःशीच झगडत होती. कालच्या सुबिरशी झालेल्या भांडणाचे विचार काही केल्या तिच्या डोक्यातून जाताच नव्हते. तसं म्हटलं तर त्या दोघांमध्ये भांडण असं नव्हतच मूळी. कालचं भांडणही तसं मूकंच होतं. जो काही झगडा होता तो तिच्या मनातच होता. नेहमीप्रमाणे तिने कालही मोकळेपणाने बोलायचा विचार केला होता पण वादविवाद टाळणारा सुबीर नेहमीप्रमाणे मौन धरून बसेल आणि ती एकटीच तिचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करेल असं वाटून तिनेही गप्पच रहायचं ठरवलं. सुबीर मुद्दाम गप्प राहिला कि कालच्या घटनेचं त्याच्या लेखी काही महत्वाच नव्हतं? सोनालीच्या मनाला शांत करणारं उत्तरच सापडत नव्हतं.
तसं पाहिलं तर तिच्या मैत्रिणींकडून ऐकू येणारे नेहमीचे अनेक वादाचे मुद्दे सोनाली आणि सुबिरच्या वाटेला येत नाहीत. कदाचित हे सर्वांमध्ये होणारे वाद आहेत हे गृहीत धरून त्यांच्याकडे फारसं लक्ष न देण्याचं कसब दोघांनाही जमलय. सोनालीचे विचार त्यांच्या भांडणाकडून मैत्रिणींच्या भांडणांकडे वळले होते. खरंच किती साचेबंद असतात जोडप्यांमधल्या तक्रारी... सोनालीच्या ज्या मैत्रिणी केवळ लग्न झालं म्हणून इथे अमेरिकेत आल्या होत्या, त्यांच्या तक्रारी साधारण सारख्याच होत्या. इथे त्या नवीन होत्या. साधा पेपर टॉवेल कसा वापरायचा किंवा रस्ता कसा क्रॉस करायचा इथपासून नवऱ्याकडून शिकण्याची सुरवात झाल्याने नेहमीच, “ तुला काय कळतंय इथलं?” असा अहोंचा थोडाफार सूर असायचा. सुरवातीला या सर्व नवीन वातावरणात बावरलेल्या तिच्या मैत्रिणींनाही स्वतःचा आत्मविश्वास सापडत नव्हता. पण काही दिवसांनी, “याला काय वाटतं, मी काय बावळट आहे?” अश्या तक्रारी सुरु व्हायच्या. नवऱ्याकडून ड्रायव्हिंग शिकणे म्हणजे तर ‘भांडण नहीं तो पैसा वापस’ एवढी हमी पुरवणारा विषय. पण या सर्व मैत्रिणींच्या नवऱ्यांना, हि केवळ आपल्यासाठी एवढ्या लांब आली आहे याची सतत जाण किंवा काही अंशी रुखरुखही होती. त्यामुळे या मैत्रिणींच्या वाटेला सरप्राईझ बर्थडे पार्टीज्, गुलाब, कँडलस्, इथल्यासारखा वॉर्डरोब तयार करण्यासाठी का होईनात पण उत्साहाने नवऱ्यासोबत केलेलं शॉपिंग, आणि कधी कधी डायमंड रिंग्स वगैरे उंची गिफ्ट्स अश्या गोष्टी, थोड्या अधिक प्रमाणात येत असत.
त्या उलट सोनालीसारख्या इथे मास्टर्स करून, नोकरी करून मग लग्न झालेल्या मैत्रिणी बऱ्याच स्वावलंबी होत्या. दोघांचं नवीन घर सजवतानाही त्या नवऱ्यांच्या बरोबरीने सर्व कामं करत होत्या. ड्रायव्हिंग तर त्यांना येतच होतं आणि काहीजणींच्या तर लग्नापूर्वीच स्वतःच्या गाड्यापण होत्या. पण या सर्व मैत्रिणींच्या वाटेला नवऱ्यांनी असं सरप्राईझ देणं वगैरे मात्र थोडं कमी यायचं. त्यांचा स्वतःचा मित्रपरिवार, एक सपोर्ट ग्रुप आधीच असल्या कारणाने त्यांना इथल्या वातावरणात सेटल करण्याची फारशी गरजच नव्हती. घरची आठवण, इथे जाणवणारा एकटेपणा ह्या सर्व गोष्टींशी लढायला त्या स्वतःच सरावलेल्या होत्या. पण या मैत्रिणींची नेहमीची तक्रार म्हणजे आधीच आम्ही इतका कमी वेळ भेटतो, तरी याची अपेक्षा असते कि शॉपिंगसारख्या त्याला कंटाळवाण्या वाटणाऱ्या गोष्टी मी मैत्रिणींसोबतच कराव्या. त्या इतर मैत्रिणींचे नवरे बघ कसे लाड करतात त्यांचे; मी मात्र फक्त सगळी मरमर करायची पण साधं कौतुक पण कधी होत नाही. काही जणींची नवरा घर कामात फारशी मदत करत नाही अशी पण तक्रार असे.
सोनालीची सुबीरबद्दल नक्की काय तक्रार होती बरं? सुबीर नेहमीच तिच्या मतांना महत्व देत असे आणि त्याला तिच्या क्षमतांची जाण होती. दागिने किंवा उंची कपड्यांचं सोनालीला फारसं अप्रूप नव्हतं. असही काही हवं असल्यास ते स्वतःच घेणं तिला सहज शक्य होतं. सुबिरने तिच्याशी गप्पा माराव्यात, ते दोघे एका खोलीत असतांना सोनालीची बडबड किंवा टीव्ही बंद असल्यास घरात शांतता पसरू नये अशी मात्र तिची अपेक्षा असे. त्याला स्वतःहून बोलावसं का नाही वाटत? गुलाबांच्या पायघड्या नाही तरी निदान वाढदिवसाला एखादं रोमँटिक कार्ड तरी द्यावसं का वाटू नये सुबिरला? त्याला आपण अजून हवेसे वाटतो का? लग्नाला जेमतेम २ वर्ष झालीत तर हि तऱ्हा, अजून काही वर्षांनी काय होईल?..... या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून सोनाली हताश होत होती. सुबीर तिचं व्यक्तिस्वातंत्र्य सांभाळण्या इतका आणि तिला घर कामात जमेल तितकी मदत करण्या इतपत अमेरिकन झाला होता पण ‘क्वालिटी टाईम’, “Honey, I really appreciate this”, अश्या अमेरिकन गोष्टी हास्यास्पद वाटण्या इतका भारतीयच राहिला होता. या सर्वांतून त्यांचा संसार जाणाऱ्या प्रत्येक वर्षासोबत लज्जत वाढणाऱ्या वाईन सारखा न होता हवा गेलेला सोडा होणार हि काळजी सोनालीला पोखरत होती. या साऱ्यातून तिचा नेहमी एकाच निष्कर्ष निघत असे – ‘त्याला माझ्याबद्दल पूर्वीसारखं आकर्षणच नाही राहिलंय’. आणि हीच तिची एकमेव तक्रार होती सुबीर बद्दल.....
“Subir, you just don’t like me any more”
तसं तर सोनालीला सुबिरची बाजूही कळत होती. ते भारतात असते तर घरात सासू – सासरे, शेजारी – पाजारी, लोकल कॉलच्या टप्प्यात असणाऱ्या लहानपणीच्या मैत्रिणी, तिचे आई – बाबा, एवढ्या साऱ्यांशी गप्पा केल्यावर कदाचित तिला सुबिरचं शांत रहाणं एवढ्या प्रकर्षाने जाणवलच नसतं. इथे सुबिरलाही टीव्ही सोडला तर ऑफिस आणि बायको यांच्यापासून ब्रेक देणारा फारसा काही विरंगुळाच नव्हता. शॉपिंग असो कि टेनिस खेळायला पार्टनर, सर्वकाही सोनालीच असे. नव्याने ओळखी झाल्या असल्या तरी इथले मित्र लहानपणीच्या मित्रांसारखे जवळचे वाटत नसत. मुख्य म्हणजे भारतात बायको माहेरी जाते. मग थोडे दिवस स्वातंत्र्य उपभोगता येतं आणि मग आपसूक बायकोची कमतरता जाणवायला लागते.
हे मात्र खरं आहे. आपणही काही दिवसांसाठी एकटच बाहेर जाण्याची सोय केली पाहिजे या विचाराने सोनालीने न्यू - यॉर्क ऑफिसात ८-१० दिवसांसाठी असणाऱ्या कामासाठी वॉलेंटीयर केलं. परतीच्या प्रवासात, सुबीर आपली आतुरतेने वाट पहात असेल,तो खूप उत्साहाने आपलं स्वागत करेल अशी स्वप्न ती रंगवत होती. पण प्रत्यक्षात काल वेगळच घडलं होतं. सोनाली रोज प्रमाणे ऑफिसातून आली असावी इतक्या थंडपणे सुबिरने तिला पिक – अप केलं होतं.आणि हा निर्वाणीचा प्रयत्नही फसल्यामुळे सोनाली मनातल्या मनात खचली होती. “Subir just doesn’t like me any more” याची तिला आता खात्रीच पटली होती आणि म्हणूनच आज पूर्ण दिवस ऑफिसातही तिचं कामात लक्ष लागत नव्हतं.
सोनालीने एकदा चेहरा धुवून काम संपवण्याचं ठरवलं. लॉबीत फ्रँक आजोबा रोजच्यासारखे एलिझाबेथ आजींची वाट बघत बसले होते. एलिझाबेथ आजी म्हणजे नाजूक, सुंदर, नेहमी उत्साहाने नटलेली ६०-६५ वर्षांची तरुणी. रोज फ्रँक आजोबा त्यांची वाट बघत बसतात. आजी आल्यावर त्यांना प्रेमाने जवळ घेतात. दोघांच्याही चेहऱ्यावर युगान्ताराने भेटल्याचा आनंद असतो. ते जेव्हा हातात हात घालून गाडीकडे जातात तेव्हा काल – परवाच प्रेमात पडलेले टीन – एजर्स वाटतात. सोनालीला आणि आजूबाजूच्या सर्वांनाच या आजी आजोबांच्या प्रेमाचं कौतुक, कुतूहल आणि हेवा वाटतो. मागे एकदा बोलता बोलता ते दोघे २५ वर्ष एकत्र आहेत असं तिने आजींकडून ऐकलं होतं. आज त्यांच्या चिरंतन प्रेमाचं गुपित त्यांना विचारायचच असं सोनालीने ठरवलं. एलिझाबेथ आजी आरश्य समोर केस सारखे करत होत्या. औपचारिक हाय, हलो झाल्यावर सोनालीने त्यांना विचारलं, “ Liz, you and Frank are so amazing together, how do you keep the fire going?” एलिझाबेथ आजी मंद हासत म्हणाल्या, “Simple, because we are not married and most importantly we don’t even live together. We just meet each other every day.” जेंव्हा आपण कुणाच्या प्रेमात पडतो त्यांना भेटायची एक वेगळीच ओढ असते आपल्याला. आपल्या नेहमीच्या कंटाळवाण्या आयुष्याला एक वेगळच वळण मिळतं. पण जेंव्हा जोडपी लग्न करतात, त्यांची समांतर आयुष्यं एक होतात. अजून पर्यंत जी व्यक्ती आपल्या रोजच्या कटकटी विसरायला मदत करायची तीच व्यक्ती बिलं, मुलं या सगळ्या कटकटींचा भाग होऊन जाते. आयुष्याला पुन्हा एकदा शिळोपा आल्यासारखं वाटू लागतं. आमच्या बाबतीत तसं झालं नाही कारण आम्ही प्रियकर – प्रेयसीच राहिलो. नवरा – बायको होऊन तसंच प्रेमात रहाण्याची अशक्य कसरत आम्ही केलीच नाही. कोणीही आमच्या सारखी रोमँटिक अमृताची मजा लुटू शकतं, पण त्यासाठी सामाजिक आणि आर्थिक असुरक्षिततेचं विष पचवण्याची किती जणांची तयारी असते? सोनाली, तू तरी असा आर या पार निर्णय घेऊ शकली असतीस का?
काम संपवून सोनाली घरी निघाली तरीही आजींच्या प्रश्नाचं तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. खरं तर तिचा मेंदू थिजल्या सारखाच झाला होता. दार उघडताच सुबीर ने विचारलं, “ आज बराच उशीर झाला तुला, ट्रॅफिक होता वाटतं?” सोनालीने होकारार्थी मान हलवली आणि ती घाई घाईने कपडे बदलून किचन मध्ये शिरली. गॅसवर राजमा करून ठेवलेला होता आणि शेजारी विकतच्या पोळ्यांचं पॅकेट. मनातल्या मनात हायसं वाटून तिने सुबिरला विचारलं, “ अरे! तू कशाला करत बसलास हे सगळं?” सुबिरने पेपरातून डोकं बाहेर न काढताच उत्तर दिलं, “ Well, beacause I just don’t like you any more”...........
आवडली, अजून नीट मांडायला
आवडली, अजून नीट मांडायला हवीशी वाटते.
एक मात्र पटलं To keep the Fire ON, you need to BURN something.
कथा आवडली. शेवटचे वाक्य
कथा आवडली.
शेवटचे वाक्य टोकाचे वाटते आहे. कदाचीत जोकींगले म्हंटले आहे?
आवडली. पुलेशु
आवडली.
पुलेशु
i love this............. हेच
i love this.............
हेच तर रहस्य आहे जे आजवर ते आजी-आजोबा अनुभवू शकले नाहित. हेच तर मोल आहे लग्नाचं.
१००% सहमत.
(No subject)
छान आहे गोष्ट आवडली
छान आहे गोष्ट आवडली
सही आहे..एकदम आवडली
सही आहे..एकदम आवडली
(No subject)
मस्त आहे गोष्ट एकदम खुप
मस्त आहे गोष्ट एकदम खुप आवडलि.
(No subject)
आवडली!
आवडली!
आवडली ...छान जमली आहे
आवडली ...छान जमली आहे
आवडली.
आवडली.