चायना पोस्ट - ५

Submitted by शर्मिला फडके on 24 December, 2010 - 00:17

चायना पोस्ट-एक

चायना पोस्ट-दोन

चायना पोस्ट-तीन

चायना पोस्ट-चार

बिजिंग शहराचा इतिहास खूप जुना. सहा प्रदीर्घ साम्राज्यांचा उदय आणि अस्त पाहिलेले हे शहर. इथल्या प्रत्येक गोष्टीला आहे तसाच बिजिंगच्या या गल्ल्यांना म्हणजेच हुटॉन्ग्जनाही एक मोठा इतिहास आहे. हुटॉन्ग्जची स्वत:ची अशी एक संस्कृती आहे.

फ़ॉरबिडन पॅलेसमधे सम्राट आणि त्याच्या जवळचे अधिकारी, सरदार वगैरेंची निवासस्थाने होती. त्यापासून दूर अंतरावर, उत्तर आणि दक्षिण दिशेला बिजिंगमधली सामान्य, कष्टकरी, मध्यम व्यापारी, कलाकारांची वस्ती पसरलेली होती. हे जुनं बिजिंग शहर. इथल्या चिनी नागरिकांची घरं वैशिष्ट्यपूर्ण होती. या सिहुयान किंवा पारंपरिक वाड्यांची अंगणे बंदिस्त चौकांसारखी असतात. वाडे एकालगत एक असे बांधलेले असल्याने त्यांच्या बंदिस्त अंगणांना लगटून जाणारे चिंचोळे बोळ एकत्र होऊन एक लांबलचक गल्ली तयार व्हायची त्यांना हुटॉन्ग्ज म्हणतात. या हुटॉन्ग्ज एकमेकांना जोडल्या गेलेल्या असल्याने त्यांचे एक मोठे जाळेच शहरामधे पसरलेले असायचे. चांगल्या उजेडासाठी किंवा पारंपारिक चिनी वास्तूशास्त्रानुसार वाड्यांची दारे शक्यतो दक्षिणाभिमुख होती त्यामुळे या हुटॉन्ग्ज बहुतेककरुन बिजिंग शहराच्या पूर्व पश्चिम दिशेमधून जातात.

हुटॉन्ग्जच्या दोन्ही बाजूंना वाड्यांचे दरवाजे उघडतात. चिनी शेजार्‍यांची त्या दरवाजांमधे बसून आपापसात गप्पा,सुखदु:खांची देवाणघेवाण व्हायची. चिनी गृहिणी कलाकुसरीची कामं, खाद्यपदार्थांची देवाणघेवाण एकमेकींमधे करायच्या. हुटॉन्ग्जची शेजारसंस्कृती खूप भक्कम होती. खरी चिनी संस्कृती या हुटॉन्ग्जमधूनच विकसित होत गेली. प्रत्येक हुटॉन्ग्जची स्वत:ची अशी एक स्वतंत्र कथा आहे. अनेक नंतरच्या काळात चीनमधे प्रसिद्धीला आलेले लेखक, कवी, चित्रकार, कलाकार, ऑपेरा गायक या हुटॉन्ग्जमधे जन्मले, मोठे झाले. साध्या, सामान्य बिजिंगवासियांच्या या हुटॉन्ग्ज चिनी संस्कृतीच्या खूणा आत्ता आत्तापर्यंत जपत राहिल्या होत्या.
मात्र विसाव्या शतकाच्या अखेरीस जुन्या बिजिंगचा कायापालट करताना, नवे रस्ते, नव्या इमारतींची बांधणी करताना, बिजिंगचं पुर्वसन होत असताना पहिला घाला पडला तो या हुटॉन्ग्जवर. जुन्या वाड्यांवर बुलडोझर फ़िरला तेव्हा त्यांन लगटून असणार्‍या या हुटॉन्ग्जही नामशेष होत गेल्या. २००० ते २००४ या वर्षात बिजिंगमधले २०,००० जुने वाडे पाडले गेले.

चीनमधल्या नव्या पिढीला या जुनाट सिहुयान आणि हुटॉन्ग्जमधे रहाण्यात काहीच रस नव्हता. त्यांना अत्याधुनिक बिजिंगचं स्वच्छ, चकचकीत रुपडं खुणावत होतं. ते साहजिकच होतं. पण तरी काही जुन्या हुटॉन्ग्ज चिवटपणे शिल्लक राहिल्या. मुळ चिनी संस्कृतीचं उगमस्थान असणार्‍या या हुटॉन्ग्जचं अस्तित्त्व नाहीसं होत गेलं तेव्हा काही शहाण्या चिनी समजशास्त्रज्ञांना, नागरिकांना या हुटॉन्ग्ज जपण्याचं महत्व वाटायला लागलं. मग शिल्लक असणार्‍या हुटॉन्ग्ज लोक जपायला लागले. लिन सारखे विद्यार्थी एकत्र ग्रूप स्थापन करुन जुन्या हुटॉन्ग्जचा शोध घेत त्यांची नोंद करण्याचं काम स्वत:हून करतात.

हुटॉन्ग्जमधले सिहुयान आता टीहाऊस, पिझ्झा पार्लर्स, संग्रहालयं, हॉटेल्स अशा नव्या रुपांमधे जतन केले जातात. सिहुयान म्हणजेच वाड्यांची शान असणारे बंदिस्त चौक किंवा अंगणांमधले सुंदर बगिचे आहे त्या जुन्या स्वरुपातच शक्यतो राखलेले आहेत. हुटॉन्ग्जमधून फ़क्त सायकल रिक्षा जाऊ शकतात त्यामुळे इथे प्रदुषण नसते. गल्ल्यांतून निरव शांतता अनुभवता येते. वाड्यांच्या दरवाजांवर लाल, कागदी चिनी कंदिल लटकवलेले असतात, सुंदर नक्षी चितारलेली असते. चहा, नूडल्स, मोमो, डंपलिंग्ज यांचा आस्वाद घेत हुटॉन्गच्या एखाद्या सिहुयानमधे तासन तास बसून रहाण्यासारखं सुख नाही. हिरव्यागार वेली, चिनी गुलाबांच्या माळांनी सजलेल्या सिहुयानच्या भिंतींमधून शांतता पाझरत रहाते.
हुटॉन्ग्जची नावंही वैशिष्ट्यपूर्ण असतात. काही तिथल्या झाडांवरुन उदा. लिशू म्हणजे विलो हुटॉन्ग, काही दिशादर्शक, काही तिथे पूर्वी चालणार्‍या व्यवसायांवरुन उदा. साबण गल्ल्या, कापड गल्ल्या किंवा मेंढी गल्ल्या, काही भावदर्शक म्हणजे आनंदी, उत्साही गल्ल्या इत्यादी.
हुटॉन्ग्जमधे शेजारपरंपरा अजूनही खूप जपली जाते. घराण्याच्या जशा पिढ्या असतात तशा शेजा-यांच्याही असतात. वंशावळीमधे शेजार्‍यांची नावंही आवर्जून लिहिली जातात. हुटॉन्ग्जमधे अजूनही काही नांदते वाडे आहेत. मात्र दर वर्षी नव्या स्काय स्क्रॅपर्सच्या, रिंगरोडच्या, फ़्लायओव्हरच्या रेट्यात हुटॉन्ग्जचा नष्ट होण्याचा वेग वाढत आहे.
चीनमधली एक समृद्ध संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असलेली लिन आणि त्याच्या मित्रांसारखी काही मोजकी लोकं अजून आहेत हे त्या हुटॉन्ग्जचं नशीबच म्हणायच!

पहिल्या दिवशी हुटॉन्ग्जची सैर करुन झाल्यावर लिन आम्हाला तिथल्याच एका हुटॉन्गमधल्या त्याच्या आजीच्या ओळखीच्या एका चिनी कुटुंबामधे घेऊन गेला. तिथल्या चिनी आजी ९२ वर्षांच्या होत्या. चौकातल्या एका झाडाखाली खाट टाकून संध्याकाळच्या उतरत्या उन्हामधे अंग शेकत बसल्या होत्या. त्यांची सतरा वर्षांची पणती शिकायला त्यांच्याजवळ रहात होती आणि बाकी कुटुंबीय शांघायला स्थायीक झाले होते.
आजीबाईंनी आपल्या अर्ध्या वाड्याचं रुपांतर टीहाऊस मधे केलं होतं. छोटी छोटी गोल टेबलं, त्यावर चिनी कशिदाकारी केलेले रुमाल, सुंदर निळ्या काचांचे चिमुकले कप आणि किटली, गरम पाण्याचा जार, मोगर्‍याच्या कळ्या, क्रिसेन्थेमम, कॅमोमाईल आणि इतरही अनेक चवींचा ग्रीन टी प्रत्येक टेबलावर सुबकपणे सजवून ठेवलेला. यावं, चहा प्यावा, चौकातल्या फ़ुलांनी बहरलेल्या वेली, झाडांच्या सावलीखाली वाचावं, गाणी ऐकावी आणि जाताना आपण प्यायलेल्या चहाचे पैसे आजीबाईंनी खाटल्याशेजारी ठेवलेल्या एका लाकडी खोक्यात टाकून निघून जावे. हवं असेल तर आजींशी गप्पा माराव्या.

आजींना आजूबाजूच्या सर्व सिहुयानमधे रहाणार्‍या लोकांची इत्यंभुत माहिती होती. कोणाच्या घरात किती माणसं आहेत, मुलं कुठे काय शिकत आहेत, लग्न झालेल्या मुली कुठे दिल्या आहेत.. आपल्या गल्लीमधल्या शेजा-यांबद्दल पुरेशी माहिती आपल्याला नसली तर तो एक मोठा शेजारधर्माचा अपराध समजला जातो असं लिन आजींची बडबड ऐकून झाल्यावर आणि मला त्याचा थोडक्यात आशय सांगून झाल्यावर म्हणाला.

हुटॉन्ग्जचं वैशिष्ट्य असणार्‍या सिहुयानभोवतालच्या बंदिस्त चौकात आवर्जून राखल्या जाणार्‍या बागांमधे कोणती झाडं लावायची याचंही एक शास्त्र चिनी परंपरेमधे आहे आणि अजूनही ते काटेकोरपणे जपलं जातं. काही झाडं जी आयुर्मान वाढवतात ती चौकाच्या मध्यभागी असायलाच हवीत असा आग्रह चिनी आजोबा आजींचा असतो. घरासमोरच्या अंगणातल्या तुळशी वृंदावनासारखीच ही संस्कृती आपल्या भारतीय मनाला अर्थातच जवळची वाटते.

नुसतं तुळशी वृंदावनच कशाला? बिजिंगच्या या गल्ल्या, त्यातले हे पुरातन वाडे, त्यांचे चौक, चौकातल्या फ़ुलांच्या झाडांखालच्या खाटेवर पहुडलेल्या आजीबाई, त्यांचं हे चिमुकलं टीहाऊस, आजींची आसपास चिवचिवणारी नात, टीहाऊसमधे पिझ्झा पण ठेवायला हवा असा तिचा टिपिकल तरुण आग्रह या सगळ्यामधून वाहत जाणारा संस्कृतीचा सगळाच प्रवाह मला माझ्यातल्या भारतीयपणाला अगदी जवळचा वाटत होता.
पौर्वात्य संस्कॄतीची सारी वैशिष्ट्य जपणारी एक अखंड परंपराच या हुटॉन्ग्जमधून वाहते आहे.

बिजिंगमधल्या पारंपारिक हुटॉन्ग्जच्या दोन्ही बाजू हिरव्यागार वेली-वृक्षांनी वर्षातले बाराही महिने बहरलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्यातून जाताना जीवाला थंडावा, शांतता मिळतो जी आजूबाजूला पसरलेल्या अत्याधुनिक बिजिंगमधे क्वचितच मिळू शकते. मात्र हिरव्या वृक्षराजीची बिजिंगमधे इतरत्रही अजिबात कमतरता नाही हे मान्य करायलाच हवं.
बिजिंग अत्याधुनिक करण्याच्या नादात तिथली अनेक प्राचीन वृक्षराजी तोडली गेली होती. त्याचे परिणाम बिजिंगच्या नागरिकांना भोगावे लागले. प्रचंड कोरडी धूळ, टोकाचे तापमान, प्रदुषणाचे प्रमाण पहाता इथे ऑलिम्पिक सुरळीतपणे पार पडण्याची शक्यता क्रीडातज्ञांना फ़ारशी वाटत नव्हती. पण ऑलिम्पिकच्या काळात बिजिंग महानगरपालिकेने आठ वर्षे अगोदर पद्धतशीर नियोजन करुन २००८ च्या नववर्ष स्वागताला बिजिंग धूळमुक्त करुन दाखवले.प्रत्येक मीटरवर एक सदहरित वृक्ष असे असंख्य वृक्ष शास्त्रीय पद्धतीने लावून शहराचे तापमान सहा ते आठ अंश कमी करुन दाखवले. फ़ुलांचे ताटवे पावलापावलांवर बहरले.
आज बिजिंगमधे सर्वत्र धूळविरहित सहा-आठ पदरी सुरेख रस्ते, दुतर्फ़ा दाट वृक्षराजी, रस्त्यांच्या कडेला रंगित फ़ुलांची पखरण, मखमली हिरवळ, रस्त्यापलीकडच्या कालव्यांमधली निळी गुलाबी लिलीची फ़ुलं, पाणवनस्पती ज्या पाणी शुद्ध राखण्याचं काम करतात असं विलोभनीय दृश्य दिसत आहे ते बिजिंग महानगरपालिकेच्या त्या कष्टांचं फ़ळ.
बिजिंग हे जवळपास दोन कोटी लोकसंख्येचं शहर आज अडीचकोटी हिरव्यागार वृक्षांनी आणि त्याच्या दुपट्ट संखेत फ़ुलांच्या रोपांनी बहरुन गेलं आहे. सगळे वृक्ष, वेली, फ़ुलांची झाडं, गुलाब तजेलदार रंगरुपात, आकर्षक ताज्या टवटवीत रुपात दिसतात.

बिजिंगमधल्या वृक्षराजीचंच नाही तर मी जितकं चीन पाहू शकले त्यापैकी बहुतेक ठिकाणच्या वृक्षसंपदेवर एक स्वतंत्र लेखच लिहिण्यासारखा आहे. चीनी पारंपरिक वैद्यक वृक्षसंपदेवरच प्रामुख्याने आधारलेलं आहे. आधुनिक रंगारुपातलं चीन आपली पारंपारिक वृक्षसंपत्ती जपण्यातलं हित पुरेपुर ओळखून आहे ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटली. चीनमधले पाच हजार वर्षांचे पुरातन वृक्ष सहज पहायला मिळतात, त्यांना राष्ट्रीय संपत्ती मानून जपलं जातं. चिनी नागरिकांच्या मनातही या हिरव्या वृक्षराजीबद्दल अपार आपुलकी असते.
चीनी वृक्षराजीबद्दल, तिथल्या एकंदरीतच वाईल्डलाईफ़ बद्दल, जंगलांबद्दल पुढच्या भागात-

गुलमोहर: 

सुरेख लिहिलं आहेस हुटॉन्ग्जबद्दल. खूप माहिती मिळाली.
>जितकं चीन पाहू शकले त्यापैकी बहुतेक ठिकाणच्या वृक्षसंपदेवर एक स्वतंत्र लेखच लिहिण्यासारखा > लिखो Happy

>>त्या झाडांचे फोटो हवेत बॉ.
आणि त्या हुटॉन्ग्जचे पण!!
ब्लॉगवर पण वाचलं होतं!!!लेखमाला छान चालु आहे!!! Happy

इंटरेस्टिंग! शेवटच्या पॅरामधलं वृक्षराजीचं वर्णन वाचून बिजींगवासीयांचा हेवा तर त्या महानगरपालिकेचं कौतुक वाटलं! Happy

मस्त. ती आजी आवडली. अश्या ठिकाणी आवडीचे पुस्तक घेउन बसण्यातील आनंद काही औरच असेल.