चायना पोस्ट - ४

Submitted by शर्मिला फडके on 24 December, 2010 - 00:11

बिजिंगमधे पाऊल ठेवल्यावर पहिला ठसा उमटतो तो भव्यतेचा. आणि जर संध्याकाळ होऊन गेल्यावर आपण शहरात प्रवेश केला असेल तर लखलखाटाचाही. मात्र शहराला पुरेसं सरावल्यावर रोजच्या रोज ही अशी अतिरेकी दिव्यांची रोषणाई, निऑन्सची आरास गरजेची आहे का हा एक टिपिकल मध्यमवर्गीय विचार मुंबईसारख्या शहरातून येऊनही मनात डोकावल्यावाचून राहिला नाही.
खरं तर बिजिंग शहराला एक प्राचीन असा इतिहास आहे. असा इतिहास असणार्‍या शहरांना वेगळा काही नखरा करायची गरज नसते. त्यांचा इतिहासात, जुनेपणातच त्यांचं स्वतःच असं एक अंगभूत सौंदर्य असतं. बिजिंग शहराच्या आधुनिकीकरणात (बहुतेक ऑलिम्पिकच्या काळात) शहराच्या या अंगभूत सौंदर्याला कुठेतरी बाधा आल्याची एक भावना मनात सारखी डोकावून जात होती.

बिजिंग शहरामधे मोठमोठे चौक आहेत, अनेकपदरी रस्ते आहेत, अनेक मजली फ्लायओव्हर्स आहेत आणि त्याला न जुमानता भरुन वाहणारी, वाहता वाहता ठप्प होणारी वाहतुक आहे. ट्रॅफिक जॅम बिजिंग शहराची इतर कोणत्याही मेट्रो शहरासारखीच अपरिहार्य डोकेदुखी आहे. त्याला तोंड देत वैतागून जात, आकाशात टोकं खुपसून जमिनीवर पसरलेल्या प्रचंड आधुनिक इमारतींच्या जाळ्यामधून वाट काढत आपण पुढे सरकत रहातो, आधुनिक बिजिंगची आता शान झालेलं बर्डनेस्ट स्टेडियम, शहराच्या मधोमध बर्फाचा महाकाय क्यूब कोणीतरी आणून ठेवलेला असावा तसं वितळत्या निळ्या रंगातलं, संपूर्णपणे टेट्राफ्लुरोएथीलीन वापरुन बांधलेले विलोभनीय वॉटरक्यूब स्टेडियम वगैरे पहात फोटो काढत आपण रमलेलो असतो आणि एका क्षणी अचानक एका पुरातन नगराच्या वेशीवर येऊन थडकतो.
बिजिंग शहराच्या अत्याधुनिक परिघाच्या मधोमध असणार्‍या फॉरबिडन सिटीमधला आपला प्रवेश इतका अकस्मात असतो की तिथल्या उत्तुंग, नक्षीदार प्रवेशद्वारामधून आत शिरेपर्यंत आपल्याला आपण एकविसाव्या शतकातून थेट चौदाव्या शतकात प्रवेश करत आहोत हे उमगलेलेही नसते नीटसे.
पण आत पाय ठेवल्यावर मात्र समोर पाताळातून एकदम उगवून वर आल्यासारखे अजस्त्र, खडबडीत, वेडेवाकडे वाढलेले वृद्ध खोडांचे वृक्ष दिसायला लागतात. त्यामागे निळे सोनेरी, आकाशात वळलेल्या छतांचे एका मागोमाग एक लाकडी प्रासाद असतात. त्यांच्या समोर पाषाणांची शिल्पे असतात, गूढ चिनी प्रतिके मांडून सजवलेले प्रासादांच्या पुढचे बगिचे असतात. या सगळ्याची निगा कसोशीने राखण्याचा प्रयत्न करुनही त्यांचे जुनेपण लपलेले नसते. त्यांच्यामधून पाझरणारी शांतता कित्येक शतकांपूर्वीचं जुनेपण अंगावर घेऊन आपल्यापर्यंत पोचते.

34773_474959009831_575109831_6471750_870738_n.jpg

फॉरबिडन सिटीचा परिसर काहीच्या काही मोठा आहे. एकुण ३००० प्रासाद आहेत या जागेत. चीनच्या विविध राजघराण्यातल्या सम्राटांचं हे निवासस्थान. सामान्य चिनी जनतेला या प्रासादनगरीच्या दिशेने मान वर करुन पहाण्याचीही मुभा नव्हती. प्रवेश तर पुढची गोष्ट.
गरीब,सामान्य प्रजेला प्रवेश निषिद्ध असला तरी या प्रासादांमधे रहाणार्‍या वयस्क चिनी सम्राटांना त्यांच्या घरी जन्मलेल्या मुली अजिबातच निषिद्ध नसायच्या. दरिद्री चिनी घरातली मुलगी वयात आली की नगरातले चित्रकार घराच्या अंगणात उभं राहून त्या मुलीचं जलरंगात चित्रं रंगवत. मग अशी चार पाच चित्रं राजप्रासादत रवाना होतं. सूर्यास्तानंतर सम्राटांपुढे ती चित्रं सादर केली जात. मग सम्राट त्यातल्या त्याला आवडलेल्या एखाद्या चित्रावर बोट टेकवणार. सम्राटांना ही मुलगी आवडली आहे हे कळलं की तिच्या घरच्या लोकांना सात स्वर्ग मिळाल्यासारखा आनंद. कारण त्यांचं घर मग धनधान्याने भरलं जाई. सम्राटांची रात्र या मुलीसोबत घालवून झाल्यावर मग पहाटे पडदा बाजूला करुन सम्राटांना 'रात्र कशी गेली?' असा प्रश्न विचारला जाई. चांगली गेली नाही असं उत्तर आलं तर मुलीची रवानगी थेट राजवैद्यांसमोर. अ‍ॅक्युपंक्चरचा वापर करुन त्या मुलीची गर्भधारणेची शक्यता आधी निकालात काढली जाई.
सम्राटांना मुलगी आवडली असेल तर तिच्या रहाण्याची व्यवस्था प्रासादनगरीतल्या असंख्य महालांपैकी एकामधे केली जायची. सम्राटांच्या मुख्य प्रासादाभोवती असा तर्‍हेने बांधत गेलेले, संख्येने वाढत गेलेले हे सगळे 'रखेल्यांचे महाल.' किंवा 'काँकुबाईन्स पॅलेस'. यथावकाश जर या मुलीला पुत्रप्राप्ती झाली तर तो सम्राटांचा वारस.
पुत्र होवो अथवा न होवो.. त्या मुलीचे आयुष्य त्या महालाच्या चार भिंतीच्या आडच जाणार. पुन्हा तिला ना सम्राटांचे दर्शन, ना बाहेरच्या जगाचे. तिच्या महालाभोवती सदैव तृतियपंथियांचा पहारा. हे हिजडे किंवा तृतियपंथिय म्हणजे सामान्य चिनी घरांमधूनच जन्मलेली मुलं. दरिद्री चिनी जनता घरातल्या मुलींना पैशांच्या लोभाने जशी स्वखुशीने सम्राटांच्या हवाली करत तसं घरच्या मुलांनाही करत. त्यांचं खच्चीकरण करुन त्यांना महालाचे पहारेकरी बनवलं जाई.

34773_474958999831_575109831_6471748_5855186_n.jpg38456_474959139831_575109831_6471759_783508_n.jpg

फॉरबिडन सिटीची एकातएक गुंतलेली असंख्य महालांची वर्तुळं, प्रासादांच्या समोरच्या बागांमधे सम्राटांचं तारुण्य टिकवणार्‍या औषधी वनस्पतींची लागवड, कासव, करकोचे वगैरे दीर्घ आयुष्यमानाची चिनी प्रतिके जागोजाग मांडलेली, सम्राटाच्या निधनानंतर त्याच्या रखेल्यांना त्याच्यासोबत जिवंत पुरण्यासाठी ज्या मार्गांवरुन नेण्यात येई ते मार्ग.. हे सगळं पहात हिंडताना, फॉरबिडन सिटीमधे फिरताना माझा जीव गुदमरुन गेला. इंपिरियल पॅलेसचं नक्षीकाम दाखवण्यात आमचा गाईड रमून गेला पण तिथले काढले त्यापेक्षा जास्त फोटो काढण्याचीही मला इच्छा राहिली नाही.

फॉरबिडन सिटीमधे फिरताना आमच्यासोबत लिन होता. तिथल्या युनिव्हर्सिटीमधे समाजशास्त्र शिकवणारा तरुण प्राध्यापक. लिनसोबत त्याचा एक कॅनेडियन मित्र मार्कही होता. लिन बरीच वर्षं परदेशात राहून मग आपल्या आता वय झालेल्या आईवडिलांना सांभाळण्यासाठी पुन्हा चीनमधे परतला होता. मार्कला जेड फॅक्टरी बघण्यात जास्त इंटरेस्ट होता. आपण ती बघायला जाऊया अशी सारखी भुणभुण त्याने लावली होती. त्याच्या कॅनडातल्या गर्लफ़्रेन्डने त्याला जेडची ज्युवेलरी घेऊन यायची विनंती केली होती. त्याच्या चला जाऊया ला वैतागून किंवा तिथल्या त्या सम्राटांच्या क्रूर कहाण्यांचा कंटाळा येऊन तिथून शेवटी आम्ही काढता पाय घेतलाच.
आम्ही तिथून निघता निघता चीनमधल्या एका प्रवासी कंपनीच्या लागोपाठ चार बस फॉरबिडन सिटी बघण्यासाठी येऊन थडकल्या. त्यातून मुंग्यांचं वारुळ फुटावं तशी अनेक चिनी माणसं फॉरबिडन सिटीच्या गेटातून आत शिरली. हे ठिकाण चिनी लोकांच्या आवडत्या पर्यटन स्थळांच्या यादीतलं सर्वात वरच्या क्रमांकावर आहे असं लिन आम्हाला म्हणाला. इतकी असंख्य शतकं जिथे प्रवेशाला परवानगी नाकारली गेली, जिथल्या सम्राटांनी सामान्य जनतेवर फ़क्त जुलूमच लादला, ज्यांच्या घरच्या मुलामुलींना जिथे रखेली आणि हिजडे बनवून नजरकैदेत ठेवलं गेलं त्या प्रासाद साम्राज्याचं आता लयाला गेलेलं रुप असं पुन्हा पुन्हा येऊन न्याहाळण्यात चिनी जनतेला नक्की कोणतं समाधान मिळत असेल काय माहित? लिनकडेही याचं उत्तर नव्हतं.
फॉरबिडन सिटीचा शेवटचा दरवाजा तियानमेन स्क्वेअरमधे उघडतो. निघे निघेपर्यंतही फ़ॉरबिडन सिटीमधल्या दरवाजांचं, प्रासादांचं आणि आतल्या रस्त्यांचं दिशामाहात्म्य आम्हाला समजावून सांगण्याचा आमचा गाईड अतोनात प्रयत्न करत होता पण आम्ही त्याला चांगल्या रेस्टॉरन्टची दिशा दाखवायची विनंती तितक्याच कळकळीने केली. मग त्याने आमचा मोर्चा शेवटी तिआनमेन चौकात वळवला.

दुपारची दोनची वेळ. ऐन माध्यान्हीच्या लखलखीत सूर्यप्रकाशात तो प्रचंड विस्ताराचा राजेशाही चौक न्हाउन निघाला होता. त्या चौकाच्या भव्यतेने पुन्हा एकदा आम्हाला प्रभावित केलं. खूप छान, उत्साही दर्शन होतं त्या प्रशस्त चौकाचं. चेअरमन माओच्या भव्य तैलचित्राखाली उभं राहून फोटो काढून घ्यायची पर्यटकांची झुंबड उडाली होती.
तिआनमेन चौकातल्या विद्यार्थ्यांच्या उद्रेक आणि तो चिरडून टाकण्याच्या तेव्हाच्या सरकारच्या प्रयत्नांबद्दल, तिथे सांडलेल्या शेकडो कोवळ्या तरुण विद्यार्थ्यांच्या रक्ताबद्दल आमच्या गाईडने ’नक्की काय झालं माहित नाही’ असं एक निर्विकार चेहर्‍याचं उत्तर देऊन टाकलं. लिन सुद्धा फ़ारसं काही बोलायला उत्सुक दिसला नाही तिथे. जेवताना बोलू असं मात्र म्हणाला.

लिनने तिआनमेन चौकापासून जवळच असलेल्या निवडलेल्या रेस्टॉरन्टमधे आम्हाला जेवायला नेलं तर ते फ़ुल भरलेलं. बाहेर उभ्या असलेल्या लोकांची गर्दी पाहून अजून दोन तास तरी आम्हाला आत प्रवेशाची काहीच शक्यता नव्हती. या रेस्टॉरन्टमधे मिळणारं पेकिंग डक आख्ख्या बिजिंगमधे मशहूर असल्याने लिन आम्हाला खास इथे घेऊन आला होता. आम्ही बाहेरच्या लाकडी बाकावर बसलो. आतून आमच्यासाठी लाकडी उंच कपांमधे गरम रेड टी आला. बशांमधून हिरव्या सोयाबिनचे उकडलेले दाणे, उकडलेल्या शेंगा, व्हिनेगरमधली काकडी, चायनीज कॅबेज, लोण्यावर परतलेली छोटी गाजरे, मक्याची लहान कणसे वगैरे आणून ठेवले गेले. लहान गोल बशांमधे अजून एक पांढर्‍या मुळ्याच्या लांबट चकत्यांप्रमाणे दिसणारा पदार्थ होता. शंका आली की त्या पदार्थाचं कुळ जाणून घेतल्याशिवाय हात लावायचा नाही असा माझ्यापुरता मी चीनमधे नियम घालून घेतला होता. त्या पांढर्‍या मुळ्याच्या चकत्या नसून बदकांच्या जीभा आहेत असं सांगून लिनने माझी शंका खरी असल्याचे सिद्ध केले.
पेकिंग डक खाण्यात तसाही मला इंटरेस्ट नव्हता आणि प्रत्यक्ष जेवणाआधी आणून ठेवलेल्या इतर गोष्टी खाऊनच माझं पोट भरलं म्हणून मी कॅमेरा हातात घेऊन गजबजलेल्या तिआनमेन चौकाच्या आसपासचा परिसर धुंडाळायला निघाले. पण लिन जाऊ देईना. रस्ता विसरुन भरकटत जाण्याच्या आणि कितीही समजावून सांगीतलेला पत्ता सुद्धा सहज विसरुन जाण्याच्या माझ्या अंगभूत वैशिष्ट्याबद्दल माझ्या नवर्‍याने लिनला इतकं सावध करुन ठेवलेलं होतं की तो मला अजिबातच एकट्याने भटकायला जाऊ देईना. बिजिंग शहराचा हा जुना भाग आणि इथलं गल्ल्यांचं जाळ इतकं गुंतागुंतीचं आहे की त्यात हरवायला होतं तेव्हा तु निदान इथे तरी एकटं जाऊ नकोस असं लिन मला इतकं कळवळून बजावत होता की आता मला त्या गल्ल्यांचंच आकर्षण वाटायला लागलं.

आम्ही रहात होतो त्या होंगियान शहरातल्या काही गल्ल्या मी श्यूसोबत शॉपिंगला जाताना पाहिल्या होत्या. तिथलं रंगीबेरंगी, सळसळतं चिनी लोकजीवन इतकं वैशिष्ट्यपूर्ण पौर्वात्य होतं की कुणालाही त्याचा मोह पडावा. बिजिंगच्या अत्याधुनिक, भव्य, प्रचंड वास्तू नाहीतर मग प्राचीन, शतकांपूर्वीचे प्रासाद सारखं सारखं बघून तसाही मला पुरेसा कंटाळा आला होता. थक्क होऊन तरी कितीवेळा व्हायचं अशातला सगळा प्रकार. बिजिंगचं दर्शन बिजिंगमधे येणार्‍या पर्यटकांना दिपवूनच टाकायचा असा एक अट्टाहास त्या सगळ्यात होता आणि आता दिपून जाण्याची माझी कपॅसिटी संपली होती म्हणूनही असेल पण मला बिजिंगच्या गल्ल्यांमधून फ़िरायची ओढच लागल्यासारखी झाली होती.
शेवटी मी एकटं जाऊ नये, त्या तिघांचं जेवण होईपर्यंत चौकातल्याच सुव्हेनियर शॉपमधे वेळ काढावा आणि मग दुपारी समर पॅलेस ( पुन्हा एकदा सम्राटांचे प्राचीन प्रासाद- यावेळी उन्हाळी) बघण्याचा कार्यक्रम होता त्याऐवजी बिजिंगच्या हुटॉन्ग्जमधली सैर करवून आणण्याचं लिनने कबूल केलं. आणि त्याप्रमाणे त्यादिवशी सायकल रिक्षा करुन आम्ही त्या हुटॉन्ग्जमधे उरलेला संपूर्ण दिवस भटकलो.
बिजिंगच्या हुटॉन्ग्जची सैर हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. इतका की मग दुस-या दिवशी आणि त्यानंतर बिजिंगमधे आम्ही होतो त्या दिवसांत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कधी आम्ही दोघं, कधी मी आणि लिन, कधी मी एकटी सुद्धा त्या हुटॉन्ग्ज मधून फ़िरत राहिले.
-- continued..

गुलमोहर: 

आता दिसतय का? काय गडबड माहीत नाही. बहुतेक खूप मोठं एकत्र झालं असावं. दोन भागात स्प्लिट केल्यावर दिसतय असं वाटत आहे.

वाचते आहे.... फॉरबिडन सिटीबद्दल वाचून अंगावर काटा आला! बरं झालं तो काळ मागे सरला ते....

सुरेख लिहीलाय हा भाग पण. फॉरबीडन सिटी असे नाव ऐकुण होते, कश्यासाठी फॉरबीडन सिटी म्हणतात ते इथे वाचून कळले.

मस्त वर्णन. आवडले.
चीनबद्दल एक सुप्त आकर्षण आहे. त्यात विक्रम सेठने केलेला चिनी कवितांचा अनुवाद वाचल्यानंतर आणखीच भर पडलीय. कधी योग येतो आहे बघायचे.

कित्ती तो कॄरपणा.. वाचुनही गुदमरल्यासारखं वाटतंय.. राजाला पसंत पडल्याची शिक्षा म्हणुन आयुष्यभराचा एकांतवास आणि त्याच राजाच्या मॄत्युबरोबर जबरदस्तीने संपवला गेलेला आयुष्याचा प्रवास..नैसर्गिक उर्मी दाबुन टाकुन, कोवळ्या मुलांवर लादलेले आयुष्यभराचे नपुंसकत्व.. कवडीमोलाची आयुष्यं! Sad Sad

तुमची लिहीण्याची शैली सुंदर आहे..समोर उभा केलात सारा परिसर!

वर्णन छान पण ते फॉरबिडन सिटीबद्दल जास्त काही वाचावंसं वाटेना.
फोटोंकरता हात का आखडता घेतलाय? आणखीन बघायला आवडले असते.

हे ही मस्त. ते मुला मुलींचे वाचून वाईट वाटले. असे सोसून मगच जनता साम्यवादाची पुरस्कर्ती झाली का?