चायना पोस्ट-६

Submitted by शर्मिला फडके on 16 January, 2011 - 16:20

आपल्या नेहमीच्या परिचयातली झाडं नव्या प्रदेशात विशेषतः अनोळखी परदेशात उगवलेली पाहिली की सुरुवातीला त्यांची ओळखच पटत नाही. त्यांचं रुपरंग खूप अनोखं, अपरिचित वाटतं. पानांचे रंग वेगळे असतात, फुलांचे बहर कधी जास्त गडद कधी खूप फिके असतात, फांद्यांचा विस्तार आपल्या इथे असतो त्यापेक्षा जास्त भव्य तर कधी अगदी आखुडलेला असतो. हवामान, पाणी, माती, प्रदुषणाचं प्रमाण अशा घटकांमुळे वेगवेगळ्या दूरच्या प्रदेशांतली झाडं एकाच कुलातली असली तरी वेगळ्या संस्कारांची असल्यागत वाढतात. सिक्किमला तळहाताएव्हढ्या सोनचाफ्याच्या फुलानी आमची अशीच दिशाभूल केली होती. आपल्याकडच्या चाफ्याच्या फुलाच्या पाकळ्याही स्पर्शाला नाजूक, मऊ असणार्‍या आणि त्या चाफ्याच्या पाकळ्या ऑर्किडच्या मोठ्या फुलासारख्या बाहेरच्या बाजूला वळलेल्या, जाड आणि स्पर्शाला लेदरी.
बिजिंगच्या हुटॉन्ग्जच्या भिंतींवर सोडलेल्या चिनी गुलाबांच्या वेलीही आपल्याइथल्या बागेतल्या जमिनीवर पसरलेल्या चिनी गुलाबांपेक्षा दिसायला कितीतरी वेगळ्या. फुलंही आकाराने खूपच मोठी, जास्त दाट पाकळ्यांची आणि रंगांमधे लाल, गुलाबी पासून जांभळी, केशरी छटा वागवणारी.

होंगियानच्या आम्ही रहात होतो त्या अपार्टमेन्ट कॉम्प्लेक्सच्या सिक्युरिटी केबिनशेजारी एक जेमतेम फांद्यांचं बुटकं झाड होतं. त्याच्या फांद्या वरच्या दिशेने गोल वाढत गेलेल्या. त्या झाडाची काही ओळख असल्याचं चिन्हही नव्हतं. एक दिवस केबिनबाहेरच्या लाकडी बाकावर बसायला गेले तर तिथे नाजूक गुलाबी तंतुंचं आपल्याइथे सहज येता जाताही नजरेला पडणार्‍या रेनट्रीचं फुलं माझ्या आधीच जागा पकडून बसलेलं. मजाच वाटली. आपल्याइथे रस्त्यांच्या कडांना भव्य विस्ताराचे हे पर्जन्यवृक्ष किती वेगळे दिसतात आणि इथे हा असा एखाद्या अंग आक्रसून हात वर केलेल्या अवस्थेत कसा वेगळा दिसतोय!
पण मग लक्षात आलं की रस्त्याच्या कडांवर जिथे बाईकर्सवे वेगळा करायचा असतो तिथल्या आसूपालवांची आणि जंगली बदामांची रांग सुद्धा अशीच हात वर करायची शिक्षा दिलेल्या मुलासांरखी रांग करुन उभी असतात. त्यातल्या काही नुकत्याच लावलेल्या झाडांना खालून बांबूचे टेकू दिलेले पाहीले तेव्हा या हात वर केलेल्या फांद्यांचं रहस्य उलगडलं.. रस्त्यावरच्या वाहतुकीला वेड्यावाकड्या वाढणार्‍या फांद्यांमुळे अडथळा येऊ नये म्हणून ही झाडांना लावलेली कम्युनिस्ट शिस्त.त्यांची उंचीही वरच्या केबल्सच्या खाली वावभर अंतरावर असताना शिस्तीत थबकलेली पाहून तर भलताच आदर वाटला.
चिनी शहरांमधली दिसलेली ही झाडं बाकी फार काही आगळीवेगळी, मनावर छाप पाडून जाणारी वाटत नव्हती.
redbud.jpg

एखाद्या प्रदेशासंदर्भातली काही नाती मनात पक्की झालेली असतात. चीन आणि झाडं किंवा निसर्ग असलं काही नातं कधिही माझ्या मनात नव्हतं. आणि चीनमधे राहून बराच काळ उलटून गेल्यावरही तिथल्या निसर्गाचा किंवा झाडांचा काही वेगळा असा ठसा मनात उमटला नव्हता. होंगियान काय किंवा बिजिंग, हांगझो काय इथे सगळीकडे झाडं, हिरवाई यांची खरं तर काहीच कमतरता नाही. बिजिंग तर आता पोस्ट ऑलिम्पिक काळात सौंदर्यपूर्ण बागा, फुलझाडांची बेटं, ताटवे, गर्द झाडांच्या शिस्तशीर रांगा यांनी बहरुन गेलं होतं. त्याची प्रसन्न, टवटवीत छाप मनावर उमटत होती. बिजिंगच्या हुटॉन्ग्जमधल्या वेली, लहानशा उंचीची पण फुलांनी डवरुन गेलेली झाडं मनाला मोहून टाकत होती. हांगझोच्या तलावाभोवतालची विलोंची जाळी, कोणत्यातरी अनामिक शुभ्र फुलांनी लगडून गेलेल्या वृक्षाची त्या तलावातल्या पाण्यात पडलेली चांदण्यासारखी प्रतिबिंबंही न विसरण्याजोगी होतं पण ते तितकंच.

एकंदरीत चीनच्या मुख्य शहरांमधल्या अत्याधुनिक स्टील, काचा, कॉन्क्रिटयुक्त बंधकामांच्या अजस्त्रतेमुळेही असेल पण तिथला निसर्ग, तिथली झाडं मनावर सुरुवातीला काही वेगळा ठसा उमटवून गेली नव्हती हे खरं.
पण मग बिजिंगमधे असताना हळू हळू या सगळ्या अत्याधुनिकतेमागे आक्रसून मिटून गेल्याप्रमाणे झालेल्या जुन्या बिजिंगचा वेध लागत गेला आणि त्या जगात कोणे एके काळच्या तिथल्या समृद्ध निसर्गाचं शिल्लक अस्तित्व अकस्मातपणे दिसून आलं. त्या निसर्गाची भव्यता, देखणेपणा, प्राचीनता थक्क करुन टाकणारं होतं. आगळं होतं कारण ते उन्मुक्त होतं.बिजिंगच्या आत्ताच्या देखण्या शिस्तबद्ध हिरवाईची शान निसर्गाच्या त्या उन्मुक्त आविष्कारापुढे फारच फिकी वाटली.

फॉरबिडन सिटीच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आत जातानाच दिसत रहातात तिथल्या लाल-निळ्या-सोनेरी प्रासादांच्या पार्श्वभूमीवरचे प्रांगणातले विराट आणि वेडेवाकडे वाढत गेलेले लाल-तपकिरी गाठाळलेल्या वृद्ध खोडांचे सायप्रस वृक्ष. काही वृक्ष वाढता वाढता मुळं एकमेकांमधे गुंतून एकत्र वाढत गेलेली. ही जिवंत झाडं नसून काष्ठशिल्प जागोजागी मांडून ठेवलेली आहेत असा भास होण्याइतपत त्यांचे आकार आणि त्यांच्या जिवंतपणावर शतकनुशतकाच्या काळाचे थर जमा झालेले. इथल्या इतिहासापेक्षाही या वृक्षांची प्राचीनता जास्त आहे.

China 094.jpgChina 096.jpgstone_water_tree_022.jpg

कोणे एके काळी इथे अस्तित्वात असणार्‍या सायप्रस,रेडवूड,सेडारच्या जंगलाला साफ करुनच या प्रासाद नगरीची वाढ टप्प्या टप्प्याने होत गेली. सम्राटाच्या प्रत्येक आवडत्या राणीच्या महालासाठी काही शेकडो वृक्ष बळी जात राहिले. उरलेले वृक्ष त्या राण्यांच्या आणि अंगवस्त्रांच्या करुण कहाण्यांचे मुक साक्षिदार बनत तिथेच वाढत राहिले. शतकं लोटली. बघता बघता साम्राज्ये लयाला गेली. चीनमधे सांस्कृतिक क्रांती झाली आणि मग फॉरबिडन सिटीमधे घुसलेल्या संतप्त रेड आर्मीनी आपल्या नासधुसीची पहिली सुरुवात या सम्राटनगरीचं एकप्रकारे प्रतिकच बनलेल्या इथल्या झाडांवर घाव घालून केली. मग बिजिंग शहराच्या पुनर्बांधणीसाठीही तिथले हजारो वृक्ष तोडले गेले. फॉरबिडन सिटीमधले देखणे प्रासाद नागरिकांच्या नजरेला पहिल्यांदाच पडत होते. त्यांनी आपापल्या वाड्यांची, सिहुयानची रचना त्या प्रासादांच्या धर्तीच्या लाकडी बांधकामावर आधारीत केली. या सगळ्याकरता अमाप लाकडाची आवश्यकता होती. बिजिंग शहराच्या आसपासची जंगलं क्रमाक्रमाने नाहिशी होत गेली. इतर शहरांनीही त्याचं अनुकरण केलं. नागरिकांनीही शेतासाठी जंगलांची तोड केली. आधुनिक काळात उरली सुरली झाडं फ्लायओव्हर्स, स्कायस्क्रॅपर्सच्या उभारणीसाठी जागा करुन द्यायला मुकाट्याने मागे हटली.
या सगळ्यावर मात करुनही काही झाडं शिल्लक राहिली ती इथे आणि बाकी टेम्पल ऑफ हेवन, टेम्पल ऑफ लॉन्जिटेविटीच्या परिसरात. देवळांच्या आधाराने आपल्याकडे जशी वडा, उंबरांची झाडं निर्धोक वाढतात तशीच ही झाडं. मान वर करुन त्या झाडांच्या आकाशात पसरलेल्या विस्ताराकडे पहाताना लक्षात येतं त्या वृद्ध वृक्षांच्या नसानसांमधून अजूनही वहात असणारा जिजिविषु रस अजून किती जिवंत सळसळता आहे ते. एकमेकांमधे गुंतलेल्या त्या दमदार फांद्या, त्यांवरची पानं अजून हिरवीगार, काही लालसर तपकिरी. सेडार,सायप्रसच्या झाडांची खोडं त्यांची शंभराच्या पटीतल्या वयनिदर्शक लाल पट्ट्या अभिमानानं मिरवत होती. संपूर्ण बिजिंग आणि आसपासच्या परिसरात मिळून एकुण चाळीस हजार प्राचीन वृक्ष अजून शिल्लक आहेत.

टेम्पल ऑफ लॉन्जिटेविटीच्या आजूबाजूलाही असेच सुंदर, प्राचीन सायप्रस, स्कोलर वृक्ष आहेत. त्यांच्या अंगावरुन निरव शांतता पाझरत रहाते. इतकी निरव की बाजूलाच तियान्मेन चौकात हजारोंची झुंड आहे यावर विश्वासही बसू नये. इथल्या एका वृद्ध सायप्रसचं वय तर लॉन्जिटेविटी टेम्पलपेक्षाही जास्त आहे असं त्यावरची लाल पट्टी सांगते.
forbidden-city-50407122213504.jpg

शतकांचे उदयास्त अनुभवलेल्या अशा वृद्ध वृक्षांच्या खोडांवरुन हात फिरवायला मला अतिशय आवडतं. त्यांची एकेकाळची मजबूत, चिलखती खोडं आता भेगाळलेली, जीर्ण झालेली असतात. पण त्यांचं जिवंत स्पंदन आपल्या हातांना जाणवतं. सोबतच्या गाईडला बाजूला सारुन या वृक्षांच्या खोडांना कान लावून ऐकलं तर कदाचित खर्‍या कहाण्या समजतीलही याची खात्री पटते. चिनी सरकारने म्हणूनच बहुधा काही जास्त वृद्ध झाडांभोवती कुंपणं घालून ठेवली आहेत. गाईड सांगतो की या झाडांना मिठी मारल्याने आपलंही आयुष्य वाढतं असा चिन्यांचा विश्वास आहे आणि त्यामुळे या जीर्ण वृक्षांना धोका संभवतो म्हणून ही कुंपणं. माझा फारसा विश्वास बसत नाही.

चीनमधे डोंगरांच्या उतारावरची किंवा प्रवासात मधेच कुठेही दिसणारी बांबूची जंगलं मात्र अफाट सुंदर. त्या जंगलांमधे बांबूचा सुंदर हिरवा, पोपटी कधी चमकता पिवळा रंग एखाद्या अंगभुत प्रकाशासारखा कोंदून गेलेला दिसतो आपल्याला लांबून पहात असताना. मुद्दाम थांबून निरखावीत अशी ही बांबूची अनोखी जंगलं. लहानशी आणि सुबक.

DSC06317.JPG

चीनची भिंत चढत असतानाही दोन्ही बाजूला फार सुंदर वृक्षसंपदा नजरेला पडली. विशेषत: मंगोलियाच्या बाजूला घनदाट जंगलाची भिंतच आहे. मात्र ही जंगलही नंतर निर्माण केलेली. मानवनिर्मित. पन्नास वर्षांहून अधिक काळ चीनच्या पुनर्निर्माणासाठी बेसुमार जंगलतोडीचे दुषपरिणाम रेताड जमिनीच्या नाहीतर सततच्या पुराच्या स्वरुपात चीनमधल्या अनेक भागांमधे दिसायला लागले तरी ते सर्वात पहिल्यांदा आणि जास्त तीव्रतेने जाणवले ते उत्तर-पश्चिम प्रांतात ज्याला लगटूनच अफाट गोबीचं वाळवंट पसरलेलं आहे तिथे. तिथून सुसाटत येणार्‍या वाळूच्या वादळाला थेट बिजिंगपर्यंत येण्यापासून अटकाव करायला आता जंगलच शिल्लक उरलेलं नव्हतं. वाळूच्या वादळांच्या तडाख्याचा धोका चीन सरकारला खडबडून जागं करुन गेला. २००१ मधे त्यांनी ग्रेट ग्रीन वॉल प्रोजेक्ट सुरु केला आणि संपूर्ण उत्तर-पश्चिम प्रांताला गवसणी घालणारी तब्बल २८०० मैलाची झाडांची एक भिंत उभारायाला सुरुवात झाली. लाखो झपाट्यानं वाढणारी झाडं लावली गेली. जंगलाच्या या पुनर्निमाणाचे चांगले परिणाम आत्ता दिसायला लागले आहेत.

मात्र या ग्रेट ग्रीन वॉल प्रोजेक्टमधे काही मुळची चिनी मातीतली नसणारी कॉटनवुडसारखी झाडं होती त्यांच्या झपाट्याने होणार्‍या परागीभवनामुळे आणि बीजप्रसारणामुळे चीनची शान असणार्‍या औषधी जिन्को वृक्षांना फार मोठा धोका निर्माण झाला. असंख्य नागरिकांना अ‍ॅलर्जीचा त्रासही सुरु झाला. आता त्या झाडांच्या जागी पुन्हा जिन्कोची लागवड सुरु झाली आहे. एकंदर कहाणी आपल्या इथल्या झपाट्याने वनीकरणाच्या नादात लावल्या गेलेल्या सुभाबूळ, निलगिरीच्या जवळपास जाणारिच. शियाला चीनचा जुना वृक्ष जिन्को मोठ्या प्रमाणावर अजूनही शिल्लक आहे. शिया सोडलं तर जिन्को फारसा कुठे दिसला नाही. बाकी बिजिंगमधे रोड अ‍ॅव्हेन्यूसाठी सर्वात जास्त लावले गेलेले वृक्ष आहेत स्कोलर (sophora japonica) रेड बड किंवा कॉटनवुड.
चीनच्या भिंतीच्या इस्टर्न गांसू भागात दक्षिणेकडे खाली झुकत गेलेला आणि झिजल्यामुळे फार थोडा भिंतीचा भाग शिल्लक राहिलेला होता त्यामधून कदाचित त्या भिंतीइतकंच वय सांगणारं एक पुरातन झाड अकस्मात समोर आलं. चीनच्या भिंतीचं पुनर्वसन करताना चिनी सरकारने भिंतीच्या चिर्‍यांमधून वाढत गेलेली अनेक जुनी झाडं मुळापासून उपटून काढली आहेत. त्यांच्या नजरेतून सुटून गेलेलं कदाचित हे झाड होतं.

चीनमधे जंगलं झपाट्याने नाहिशी होण्यामागे त्यांचा पूर्वापार लाकडी बांधकामांचा हव्यास जसा कारणीभूत तसाच आणखी एक महत्वाचा वापर कारणीभूत ठरला वृक्षतोडीला तो म्हणजे चॉपस्टीकचा वापर. एक आकडेवारी सांगते की चीनमधे एका वर्षात ४५ बिलियन चॉपस्टिक्सच्या जोड्या वापरल्या जातात अणि त्यासाठी २५ मिलियन झाडांचा बळी जातो. अशा औद्योगिक वापरासाठी लागणार्‍या लाकडामधलं फायबरचं प्रमाण कमी करण्यासाठी चीनी सरकारने झाडांवर काही जेनेटिक मॉडिफिकेशन्सचा प्रयोग केला. फायबर कमी झालं की पल्पनिर्मितीसाठी फारसे कष्ट पडत नाहीत. पण त्याच्या दुष्परिणामामुळे झाडांची खोडं कमकुवत झाली आणि ती झपाट्याने कोसळायला लागली.
शु बिंग नावाच्या एका अत्यंत लोकप्रिय चिनी चित्रकाराने यावर प्रतिकात्मक उभारलेलं एक कोसळून पडलेल्या झाडाचं, चॉपस्टिक्सचा वापर करुन बनवलेलं शिल्प बिजिंग शहरात आहे. लोकांना लाकडी चॉपस्टिक्स वापरु नका असा संदेश देणारं हे शिल्प नक्कीच खूप परिणामकारक वाटतं.

chopstick-tree-1.jpg

या शु बिंगचीही एक आधुनिक कहाणीच आहे. अठरा वर्षं न्यूयॉर्कमधे राहिलेला हा चित्रकार नुकताच चीनला परतला तोच चीनमधल्या पर्यावरण रक्षणाचा ध्यास मनाशी घेऊन. २००५ साली शु बिंग एका आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे केनियाला गेला होता. यूएन लिस्टेड नॅशनल हेरिटेज स्थळांची देशोदेशी जाऊन चित्रं काढायचा कार्यक्रम त्यांनी आखला होता. केनियाच्या दुष्काळी भागातून प्रवास करताना शु बिंगला जाणलं की सर्वात जास्त जपणूक करण्यासारखी गोष्ट म्हणजे वृक्ष. त्यांची तोड हाच सर्वनाशाच्या दिशेचा प्रवास. माणसांची, प्राण्यांची सगळ्या पर्यावरणाची संस्कृती अवलंबून आहे झाडांवर. शु बिंगने मग एक अभिनव योजना आखली. त्याने लहान मुलांच्या कार्यशाळा भरवल्या आणि त्यात चिनी लोककथेतल्या एका मुलाची कथा सांगायला सुरुवात केली. या मुलाकडे एक जादूचा ब्रश असतो. त्या ब्रशने तो जे काढेल ते प्रत्यक्षात खरंखुरं बनतं. त्याने मुलांना आपल्या ब्रशने झाडं काढायला शिकवलं आणि त्यांन वचन दिलं की त्यांच्या कागदावरची ही झाडं प्रत्यक्षात खरी खुरी जमिनीवर लागतील. मग शु बिंगने एक वेबसाइट या चित्रांच्या विक्रीकरता उघडली. मुलांनी काढलेल्या या चित्रांची किंमत त्याने ठेवली प्रत्येकी दोन यूएस डॉलर्स. ही किंमत केनियामधे दहा झाडं लावण्याकरता पुरेशी होती. वेबसाइटवरच्या चित्रांच्या लिलावाला भरघोस प्रतिसाद मिळाला. शु बिंगने कागदावरची झाडं प्रत्यक्षात उतरवली. पुरेसा निधी जमा झाल्यावर मग शु बिंग आपल्या मायदेशात परतला. चिनी लोकांनी त्याचं भरघोस स्वागत केलं. शु बिंगने चीनच्या लहानमोठ्या शहरांमधे सात ते चौदा वयोगटातल्या मुलांच्या कार्यशाळा भरवायला सुरुवात केली. शु बिंग म्हणतो एक लहान मुल दहा मोठ्या माणसांशी जोडलेले असते. ते खरेच आहे कारण म्हणूनच शु बिंगचा हा जंगल प्रकल्प आता प्रचंड प्रमाणावर विस्तारला आहे.
चीनमधली वृक्षसंपदा पुन्हा नव्याने बहरु लागली ती या अशा शु बिंगसारख्यांच्या प्रयत्नांमुळेच.

गुलमोहर: 

मस्त. मला झाडांच्या सहवासात फार सुरक्षित वाट्ते. डे हाँग नावाच्या पुस्तकात चिनी निसर्गाचे उत्तम वर्णन आहे. लेखमाला सुरेख उतरते आहे.

हा आणि इतर भागही खूप आवडले.

झाडांचे, जंगलांचे पुनर्वसन चीनने ज्या झपाट्याने सुरू केले आहे तसे भारतातहि व्हायला हवे.

एखाद्या प्रदेशासंदर्भातली काही नाती मनात पक्की झालेली असतात. चीन आणि झाडं किंवा निसर्ग असलं काही नातं कधिही माझ्या मनात नव्हतं. >> वा!

शु बिंगची कहाणी आवडली. झाडांच्या सहवासात जे समाधान आणि शांती मिळते त्याचं वर्णन करणे अवघड आहे. एक झाड हजारो जीव पोसतं.
लेखमालेचा हा भागही छान झालाय. मला ते बांबूच्या बनाचे व गाठाळलेल्या बुंध्यांच्या झाडांचे फोटो विशेष आवडले.

मस्तं.... तुमचे लेख वाचते पण प्रतिसाद दिला जात नाही.... त्याबद्दल माफी असावी.
अनेक ठिकाणी दृश्यमान होण्याइतकं सुंदर... <त्यांच्या अंगावरुन निरव शांतता पाझरत रहाते.>
सुंदर लेख...

शु बिंग ची कहाणी खूपच कल्पक वाटली. असे जगावेगळे लोक जगासाठी किती देउन जातात ना?
ही लेखमालिका पण मस्त आहे. छोटे छोटे प्रसंग छानच रंगवले आहेत पण प्रत्येक गोष्टी/रीति मागचे कारण लिहून ही मालिका खूपच माहितीपुर्ण झालीये.