नाटक कसे वाटले?

Submitted by webmaster on 2 June, 2008 - 20:43

नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.

याआधीचे अनुभव ईथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युट्युब वर खालील मराठी नाटके पाहिली

१. अनोळखी ओळख
वैजयंती चिटणीस , आनंद अभ्यंकर
लग्न, वांझोटेपणा, सामाजिक स्तर इत्यादी.
..
२. द गेम
प्रमुख भूमिका : रेवती केतकर
विषय : एक उद्योगपती स्त्री राजकारणांना कशी नमवते
पहिल्या अंकाच्या अखेरचा धक्काबिंदू चांगला.

युट्युबवर वसंत कानेटकरांच्या बेईमान या नाटकाचे दोन अंक आलेले आहेत ते पाहिले.
हे नाटक आणि हिंदी चित्रपट नमकहराम यांचा काही संबंध आहे का?
विकिपीडियावर तर तसं काही म्हटलेलं नाही

एक इंग्लिश सिनेमा आणि नमकहराम यांचा आहे असं काहीतरी दिसते

नुकत्या झालेल्या भारतवारीत 'चारचौघी' आणि 'नियम व अटी लागू' ही दोन नाटकं बघितली.
चारचौघी खूप आवडलं. मी जुन्या संचातलं पाहिलं नव्हतं त्यामुळे तुलना करायला वाव नव्हता. प्रयोग उत्तम झाला! एकदम गोळीबंद म्हणतात तसा प्रयोग झाल.
मुक्ता बर्वे आणि रोहीणी हट्टंगडी कसलेल्या आहेतच, त्यामुळे मस्तच कामं करतात पण पर्ण पेठे, कादंबरी कदम आणि तीनही पुरूष पात्राचे अभिनयही आवडले.
पर्ण पेठे सिनेमा आणि वेब सिरीज पेक्षा नाटकात जास्त मॅच्युअर अभिनय करते असं जाणवलं. तिचा अमर फोटो स्टुडीओचा प्रयोगही आवडला होता. मला आता जुन्या संचात हे कसं होत असेल ह्याची उत्सुकता वाटते आहे. दिपा श्रीराम आईचा रोल रोहीणी हट्टंगडी पेक्षा नक्कीच खूप वेगळा करत असणार. मुक्ता बर्वेचा फोनचा प्रवेश आणि चौघींचा एकत्र पहिल्या अंकातला खोलीतला संवाद आणि शेवटचा तो साड्यांच्या प्रवेश भारी होते! हे नाटक कधी इथे आलं तर पुन्हा बघायलाही आवडेल.

नियम व अटी लागू ठिक ठिक होतं. सुरूवातीचा अर्धा पाऊण तास प्रचंड बोअर झालं (त्यात बलगंधर्वला खूप डास होते!) पण नंतर पकड घेतली. संकर्षणच्या अभिनयावर प्रशांत दामलेंचा खूपच प्रभाव आहे. स्क्रिप्टमधले विनोद आणि अभिनयाची शैली दोन्ही मध्ये तो दामलेंचा वरसा चालवणार असं वाटलं.

मी पण दोन दिवसात दोन नाटकं बघितली.
१. नियम व अटी लागू
पाहिल्यावर ठीकठाक आहे असेच मत झाले.

२. तू तू मी मी - भरत जाधव आणि आणखी तीन कलाकार..
भयंकर. केदार शिंदेंनी लिहिले आहे म्हणे. पण खूपच वाईट. त्यामुळे मागे वळून पाहता नियम व अटी एकदम मास्टरपिस वाटू लागला आहे. भरत जाधवच्या १४ एकसारख्याच रटाळ आणि तेच ते जोक करणाऱ्या भूमिका आहेत. चौदा आकडा गाठायला उगाच वाट्टेल ते लिहिले आहे.

विशाखा सुभेदारच कुर्रर्र बघितलं

पण कंटाळा आला खूप खेचलंय असं वाटलं. उगाच पॅडी ला पाडणं, बनवा बनवीचा सीन, डोकं दुखायला लागलं शेवटी शेवटी.
प्रसाद खांडेकर २० मिनिटांचं स्क्रिप्ट चांगलं लिहितो पण नाटकाची भट्टी जमली नाही.

आज आमच्या गावात पुष्कर क्षोत्री, सतीश राजवाडे यांचं “पर्फेक्ट मर्डर‘ झालं. कथा बहुतेकांना माहिती आहेच तरीही या २ अस्सल कलाकारांना स्टेजवर अभिनय करताना पहाणे चुकवणे शक्यच नव्हते. पहिल्या अंकात साधारण आपल्याला काय होते ते माहित होते पण दुसर्‍या अंकात राजवाडेंची एंट्री झाल्यावर जी धमाल आली नाटकात की बास.
राजवाडे-पुष्कर क्षोत्री जोडीचे संवाद भारी होते. कमाल मजा आली त्यांना पहाताना. ही मंडळी प्रचंड थकलेली होती तरी कुठेही कळले नाही. तुमच्या गावात येणार असेल तर नक्की पहा. आणि दुसरा अंक १ मिनिटाकरताही चुकवु नका.

चारचौघी पाहिलं. पाहिले दोन अंक खूप स्ट्राँग आहेत. सगळ्यांचेच अभिनय जबरदस्त, डायलॉग एकदम पंच करणारे.
तिसरा अंक, आणि एकूण तिसऱ्या बहिणीची गोष्ट (पर्ण पेठे) तितकी चांगली नाही वाटली. ओपन रिलेशनशिप बद्दल मांडण्याचा चांगला प्रयत्न केलाय, पण नाटकाच्या एकूण थीम मध्ये बसत नाही असे वाटले.

अस्तित्व, नवीन नाटक आहे. भरत जाधव आणि चिन्मयी सुमित मुख्य भूमिकेत. भरत महापालिकेत सफाई कामगार असतो. दोन मुलं असतात त्यांना, एक तरुण मुलगा आणि एक मुलगी. पालिकेने दिलेल्या चाळीतल्या घरात रहात असतात. मुंबईत स्वतःचं घरं नसतं पण तरुण मुलांना मुंबई सोडून जायचं नसतं आणि भरतला रिटायर झाल्यावर मुंबई सोडून गावाला जायचं असतं. चौघानचा दृष्टिकोन, स्ट्रुगल यावर आणि एवढंच नाटक आहे. पहिल्या अंकात सगळं कथाबीज स्पष्ट होतं. दुसऱ्या अंकात काही वेगळं घडत नाही. एकतर नाटक गंभीर आहे आणि गोष्ट अशी नाही त्यामुळे दुसरा अंक कंटाळवाणा होतो. शेवटही आनंदी किंवा गोड नाही. भरत जातीने महार असतो तर त्या अँगलनेही संवाद आहेत. नेपथ्य छान आहे, चाळीतील घर खरं वाटत राहतं. चौघांची कामे चांगली झाली आहेत.

217 पद्मिनी धाम
आज पाहिले. एक उत्कृष्ट नाट्य अनुभव !

रत्नाकर मतकरी यांच्या ‘कामगिरी’ या कथेवर आधारित नाटक. नाटकाचे नेपथ्य अतिशय सुंदर व प्रकाशयोजनाही गूढ वातावरणाला पूरक.
ज्येष्ठ कलाकार मिलिंद शिंदे (माजखोर बेरकी रावराजे) आणि इतर सर्व तरुण कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत. उद्योगपती रावराजे यांनी पोसलेले एक कॉलेज. त्यातल्या प्रयोगशाळेतला एक सहाय्यक. त्याचे व रावराजे यांच्या मुलीचे-पद्मिनीचे प्रेम असते. परंतु अखेर ते असफल राहते आणि शोकांतही. नंतर रावराजांनी दुष्टबुद्धीने घेतलेला ‘बदला’ हे नाटकाचे मुख्य सूत्र.

दुसरा अंक सुरू होताना रंगमंचावर जो टांगा दाखवलाय तो केवळ अप्रतिम. टांग्यात बसलेला तो सहाय्यक आणि त्याच्या जोडीला कॉलेजला देण्यासाठी म्हणून दिलेली “भीतीदायक भेटवस्तू” असते. हे दृश्य अप्रतिम ! ती भेटवस्तू कॉलेजला पोचवण्याची ‘कामगिरी’ त्याला पार पाडायची आहे. परंतु वास्तवात काहीतरी भलतेसलतेच घडते. ते प्रत्यक्ष पाहण्यातच थरार आहे ..

नाटक संपल्यानंतर सर्व कलाकार तर रंगमंचावर येऊन उभे राहतातच. परंतु त्याच बरोबर नाटकाचे निर्माते, दिग्दर्शक आणि सर्व पडद्यामागील तंत्रज्ञानाही रंगमंचावर बोलावले जाते आणि प्रेक्षकांना अभिवादन केले जाते. हा सुद्धा एक सुरेख पायंडा म्हणावा लागेल.

नेपथ्य संस्मरणीय !!

>>>>नाटकाचे निर्माते, दिग्दर्शक आणि सर्व पडद्यामागील तंत्रज्ञानाही रंगमंचावर बोलावले जाते आणि प्रेक्षकांना अभिवादन केले जाते.
मस्त!

३८ कॄष्ण व्हिला सस्पेन्स थ्रिलर नाटक कोणी बघितलंय का ? कसं आहे? गिरीश ओक असल्यामुळे जरा होप्स आहेत. इकडे रविवारी आहे.

ह्या शनिवारी सकाळीं अकराचा "चारर्चौघी" प्रयोग पाहण्याचा (San Jose ला ) योग आला.
खर तर हे ९१ साली आलेलं नाटक, तीस वर्षांनी नवीन ताज्या दमाच्या कलाकारां सह परत आणलं तेही स्क्रिप्ट मध्ये कोणताही बदल न करता.

रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, पर्ण पेठे, कादंबरी कदम सगळ्यांचा कसदार अभिनय, इतर तीन पुरुष सह कलाकारांचीही तेव्हढीच उत्तम साथ. चंद्रकांत कुलकर्णींच उत्कृष्ट दिग्दर्शन.. तीन साडेतीन तासांच, तीन अंकी नाटक करणं म्हणजे आताच्या ३० सेकंदाच्या shorts च्या जमान्यात एकदम धाडसी वाटतं खर.. पण ते शिवधनुष्य या मंडळींनी लीलया पेललंय.
इतकं फास्ट, विचार करायला लावणारं, आणि तुम्हाला गुंतवून टाकणार स्क्रिप्ट आहे की नाटक कधी संपत कळतही नाही.
रोहिणी हट्टंगडींचं खूपच कौतुक वाटलं, एका दिवसात त्यांनी दोन प्रयोग केले, एक ११ चा दुसरा संध्याकाळी ६ चा.
या प्रयोगाचं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे नाटकानंतर चंद्रकांत कुलकर्णीनी प्रेक्षकांबरोबर संवाद साधला. त्यातही त्यांचे, ही कलाकृती ३० वर्षांनी परत आणण्या मागचे विचार कळले.

कथानक अर्थात त्या चौघिंवर केंद्रीत आहे.

आई, रोहिणी हट्टंगडी, शाळेतील मुख्याध्यापिका, तिने काळाच्या पुढे(?) जाऊन निर्णय घेतला आणि एका विवाहित माणसाशी संबंध ठेवले. त्यातून पुढे तीन मुलींना जन्म दिला, त्यांचे पालन पोषण केले. अर्थात हे करत असताना समाजामधून होणाऱ्या टीकेला, विरोधाला समर्थपणे तोंड देत आलीये.

तिची मोठी मुलगी, दिद्या(?)- मुक्ता, प्रोफेसर, जीची पुस्तके मुलांना अभ्यासक्रमाला आहेत. हिच्या नवऱ्याच बाहेर प्रकरण ( तिला आधीपासूनच कल्पना असते ) असल्याचं कळतं आणि ती दोन वर्षांच्या मुलीला नवऱ्या कडे सोडून माहेरी निघून येते. मग तिचा लढा.

दूसरी मुलगी, वैजू - कादंबरी, जी साधी नोकरी करतेय. समोरच राहणाऱ्या एका छान, रुबाबदार तरुणाच्या प्रेमात पडून लग्न केलंय. लग्ना नंतर तिच्या लक्षात येत की हा नुसताच दिसायला चांगला आहे पण नोकरीत स्थिरता नाही, धडाडी नाही, पण बड्या घराचा (पोकळ वासा?) असल्यामुळे मिजास खूप जास्त… त्यामुळे तिचा त्याच्यातील रस संपलाय पण घटस्फोट घ्यायला प्रबळ कारण नाही म्हणून त्याच्याबरोबर संसार रेटण्याचा , त्याच मुलं जन्माला घालायचा निर्णय घेतलाय.

सगळ्यात धाकटी, पर्ण पेठे, कॉलेजात शिकात्ये. तिला दोन तरुण / मित्र मनापासून आवडतात. तिला कोण एकत्याशी लग्न न करता दोघांबरोबर एकत्र एकाच घरात रहायचंय.

अशा ह्या फारशा सर्रास न आढळणाऱ्या चार चौघी ३० वर्षांपूर्वी पहिल्यांदा साकारलेल्या.. आणि आताही तशाच आहेत.

या ३० वर्षांमध्ये समाजात काही बदल झाले का ? तेव्हा जे विषय खूप अवघड किंवा समाजमान्य नव्हते ते आता कसे आहेत? परिस्थिती बदललीय का अजून तशीच आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात.

तीस वर्षांपूर्वी ९१ साली जेव्हा हे नाटक आल, तेव्हा माझ्या पिढीच्या मुली शाळेत होत्या. मी हे नाटक तेव्हा बघितल नव्हतं. आणि आज माझ्या चाळिशीत हे नाटक बघितलं तेव्हा त्या चौघी मला कितपत रीलेट झाल्या, पटल्या किंवा आजच्या काळाला ( तीस वर्षांनंतर तरी ) सुसंगत वाटल्या की अजूनही काळाच्या पुढची गोष्ट वाटली? तर त्याच अस आहे..

रोहिणी ताई किंवा आईने विवाहित पुरुषाशी संबंध ठेवले, जे दोन्ही कुटुंबात माहीत आहेत. आपल्या निर्णयासाठी समाजाचा विरोध पत्करून किंवा परवा न करता कणखर पणे उभे राहाणे, लढणे हे चांगलं वाटलं. पण ज्या व्यक्ती साठी हे सगळं करतोय ती त्या योग्यतेची आहे का हा विचार बहुदा केला नसावा असे ही वाटले… कारण ती व्यक्ती म्हणजे आबा थोडे नेभळट किंवा निर्णय क्षमतेचा अभाव असणारे किंवा कचखाऊ वाटले.. तर इतक्या अतिसामान्य माणसासाठी तेव्हढी उठाठेव ( किंवा मुळात जरी लग्न करावं वाटलं असतं तरी ) का करावी असा प्रश्न मला पडला.

विद्या, मुक्ता बर्वे,इतकी उच्च विद्या विभूषित. पण जेव्हा नवऱ्याचे बाहेर लफडे आहे हे कळते तेव्हा ती एवढी असहाय्य का फील.करते, तिला तिचा तो पराभव का वाटतो? नवऱ्याने आपल्याला पसंती द्यावी त्याच्या कडून validation मिळावं हा अट्टाहास कशाला?? असे अनेक प्रश्न आजच्या स्त्रीला विद्याकडे बगून नक्कीच पडतील.
दोन वर्षाच्या बाळाला सोडून सहजा सहजी कोणी आई सोडून येऊ शकेल ही गोष्ट आजही पटत नाही.. त्याही पुढे जाऊन नवऱ्याला जबाबदारीची जाणीव करून द्यावी म्हणून बाळाला सहा महिने नवऱ्या कडे आणि सहा महिने स्वात कडे ठेवण्याचा तिचा प्रस्ताव म्हणजे तर कडी वाटते. शेवटी ते मूल आहे, त्याला भावना आहेत त्याची अशी वाटणी कशी होऊ शकते… मानवी भावना, आई मुलाचं नात किंवा त्याची वीण ही मला वाटतं कालातीत आहे.

कादंबरीला नवरा काहीच कामाचा/ धडाडीचा नाही हे बरच उशिरा कळत.. त्याच्या नोकरीचा पत्ता नसतानाही ती मुलं जन्माला घालायचा निर्णय घेते.. ते पण फार अव्यवहार्य वाटते.
आजची सुजाण स्त्री अशा भोवऱ्यात स्वतःल अडकवेल ही शक्यता दुर्मिळ किंवा शून्य.
पण तसच खर तर आजकाल फक्त पुरुषाची नोकरी (bread winner ) महत्वाची आणि स्त्रीची दुय्यम असे राहिलेले नाही अनेक ठिकाणी ह्याच्या उलट चित्रही दिसते म्हणजे स्त्री मुख्य कमावणारी किंवा कर्तबगारी असून नवरा थोडी बॅक सीट घेतो. ते त्यांच्या संगनमताने होत असल्याने अशी स्त्री कादंबरी सारखी react होणार नाही असाच काहीस वाटतं.

आता शेवटची विनू, दोन पुरुषांबरोबर एकत्र राहायची कल्पना मला वाटतं प्रगत/ अप्रगत किंवा modernity chya कल्पनेच्या पुढची वाटते.. अतर्क्य वाटते.. ह्यात व्यक्ती म्हणून त्या पुरुषांच्या / किंवा (उलट केस मध्ये दोन स्त्रिया आणि एक पुरुष आसताना) स्त्रियांच्या भावना/ मनाचा विचारच होत नाहीये का असं वाटतं राहत.. की फक्त कधीतरी द्रौपदीने केलं ( जे तिनेही मनापासून स्वीकारले नव्हते तिच्यावर लादलेले होते) मग आपण आता का करू नये फक्त ह्या विचाराने असे करणे… अर्थात तिन्ही adults सह संमतीने असे काही करू ही शकतात.. पण मग समाजमान्यता वगैरे कशाला हवी? तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटत ते तुमच्या जबाबदारीवर करावं.. ते स्वातंत्र्य , सीमा रेषा त्यांचं पालन हा सर्वस्वी अशा व्यवस्थेत राहणाऱ्या स्त्री पुरुषांचा प्रश्न कणव जबाबदारी आहे..

कथेतील सर्व गोष्टी, पात्र, त्यांचे विचार जरी पटले नाहीत तरी ते नाटक तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते.

आवडलेली वाक्ये:
(रोहिणी हट्टंगडीच्या स्वगतातील, थोडेफार शब्द चुकले असतील पण मतितार्थ असच काहीसं असावा)
एकदा एखादी कृती केली की तिच्या परिणामांची जबाबदारी घ्यायची आणि निभवयाची पण तयारी हवी.
आयुष्यात घेतलेल्या निर्णयाचे मोल किती हे जाणून ते चुकवायची हिमत ठेवायला हवी.

परीक्षण आवडले. तुमचे विचारही पटले विशेषतः विद्या व विनुच्या बाबतीत. तसंच एकाच घरात साऱ्याच वेगळ्या मार्गाने जाणाऱ्या हे ही पटलं नव्हतं.

प्राजक्ता आणि mazeman धन्यवाद!

Mazeman, तुम्ही म्हणता ते खर आहे की एकच घरात या चारजणी, केवढा योगायोग. पण मी ते लेखकाचे स्वातंत्र्य पकडले. .. कारण त्या सगळ्या केसेस त्याला एकत्र बांधायला काही धागा हवा..

स्थळ आले धावून !
नाट्यगृहात पाहिले (प्र. क्र १६). हलकेफुलके खुसखुशीत मनोरंजन.
ले. व दि. : हेमंत एदलाबादकर
गिरीश ओक, संजय मोने व पूर्णिमा तळवलकर

एक साठी उलटलेला विधुर, एक 54 वर्षाची अविवाहित स्त्री आणि त्यांचे लग्न जुळवून देणारे सहजीवन विवाह संस्थेचे संचालक अशी कहाणी.
मध्येच या तिघांच्या प्रेमाचा त्रिकोण निर्माण होणे, दोन्ही बाजूंनी नाटके करून एकमेकांची ‘परीक्षा’ घेणे आणि अखेरीस गोड शेवट.

नेपथ्य सुंदर. व्यायामाच्या उद्यानापासून ते कृष्ण मंदिरापर्यंतचे विविध सेट्स आकर्षक.

पत्रापत्री - रॉयल ऑपेरा हाऊस, मुंबई - ९ नोव्हेंबर २०२४

नाटकाच्या आधी व्हेन्युबद्दल लिहिते. नुतनीकरणानंतर रॉयल ऑपेरा हाऊस कात टाकून नव्यानं झळकतेय हे अनेकदा बाहेरून बघितलं होतं. पण आतमध्ये अजून पोहोचले नव्हते, ते या द्विपात्री प्रयोगाच्या निमित्ताने पोहोचले. अ फ ला तू न सुंदर आहे हे प्रकरण. देखणं, सुबक, बुटिक नाट्यगृह. गेलात तर आधी अर्धा-पाऊण तास घेऊन जा. बघायला आणि सेल्फि काढायला चिक्कार स्कोप आहे आत. सगळं जुनं वैभव तसंच ठेऊन बाकी बदल केले आहेत. ध्वनीव्यवस्था उत्कृष्ट आहे. दोन बाल्कन्या आहेत. शिवाय ते ऑपेरामधले सुप्रसिद्ध बॉक्सेस आहेत पण त्यात बसण्याची सोय नाही आता. एखाद्या मोठ्ठ्या ऑपेरा थिएटरचं मिनिएचर रुप आहे.

तर पत्रापत्री. दोन सुहृदांमधील पत्ररुपी संवाद असं थोडक्यात वर्णन करता येईल. आलेली पत्रं वाचताना त्यातून झालेली माहिती-घटनांची देवाणघेवाण आणि त्या अनुषंगानं उलगडलेलं प्रत्येकाचं व्यक्तीमत्त्व, आयुष्य आणि एकमेकांच्यातील मैत्र हे हलक्याफुलक्या आणि खुसखुशीत पद्धतीनं लिहिलं आहेत. दिलिप प्रभावळकर आणि विजय केंकरे हे दोघेही कसलेले कलाकार त्यामुळे अभिनयाबद्दल मी पामर काय लिहिणार? मध्येच दोघं आपापल्या वडिलांच्याही भुमिका करतात. त्याही उत्तम. विशेषतः विजय केंकरे यांनी वडिलांचा जो आवाज लावला तो फारच उकृष्ट होता.

नेपथ्यही आवडले. पांढर्या कॅनवासवर काळ्या मार्करनं स्केच केल्यासारख्या मागच्या भिंती आणि टेबल-खुर्च्याही.

नाटक दोन अंकी होतं जे मला थोडं पसरट वाटलं. मध्यंतरातली कॉफी कमी गोड आणि मस्त होती.

अनेक वर्षांपूर्वी एक नाटक बघितलं होतं. कथानक आठवत नाही पण रहस्यमय होतं. त्यात काहीतरी एका आ़कृतीत नाव लपलं होतं. काहीतरी फुल्याफुल्यांची आकृती होती ती. कोणाला आठवतंय का? कुठे ऑनलाईन उपलब्ध असेल तर बघायला आवडेल.

सई परांजपे लिखित व दिग्दर्शित
इवलेसे रोप' नाट्यगृहात पाहिले. आवडले.
प्र. भू : लीना भागवत, मंगेश कदम

पंचाहत्तरी उलटलेल्या जोडप्याची जीवनकथा चालू आणि फ्लॅशबॅक अशाप्रकारे आलटून पाठवून सादर. त्यांच्या प्रत्यक्ष प्रवेशापूर्वी प्रत्येक वेळेस एक तरुण जोडपे या वृद्धांची कथा सांगते आहे ही कल्पना वेगळी.

पहिला अंक संपताना रोप हे कशाचे रूपक आहे ते स्वच्छ दिसते. कौटुंबिक विनोद आणि खुसखुशीतपणाच्या अंगाने जाणारे नाटक दुसऱ्या अंकात हळुवारपणे कारुण्यात शिरते.

नाटक चालू असतानाच रंगमंचावर पूर्ण अंधार न करता दोन-तीनदा प्रेक्षकांसमोरच नेपथ्य बदलण्याची कल्पना आवडली.

पत्रापत्री

आम्ही काल संध्याकाळी पाहून आलो. अपेक्षेपेक्षा गर्दी कमी होती. नवीन नाटक आणि वेगळा प्रयोग म्हणून कदाचीत असे असेल.

प्रयोग मस्त झाला. दोघेही कसलेले कलाकार असल्याने त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यास मज्जा आली. तसा अभिवाचनाचा प्रकार असला तरी दोघांनीही आपापल्या चेहऱ्यावरचे वेगवेगळे भाव सुंदर दर्शवले. एकाच्या वाचनाला दुसऱ्याची चेहऱ्यावरच्या बदललेल्या भावांनी दिलेली प्रतिक्रिया, त्यांच्या आवाजातले चढ उतार, त्यांची बोलण्याची लय असे सगळे पाहून गंमत वाटली. दोघांनी ही एक एक अधिक भूमिका ९०-१०० तील वृद्धांची केली. मामीने लिहिल्याप्रमाणे केंकरेंचा आवाज मस्त लागला तिथे.

मला त्यांचे प्रत्येक प्रसंगाला दिलेले वेगवेगळे गाण्यांचे क्यू आवडले. त्यामुळे प्रसंग काय असणार आहे त्याची पार्श्वभूमी तयार होते. प्रभावळकरांनी इतक्या वयात पण असे नाटक करणे म्हणजे त्यांच्या कलेला हॅट्स ऑफ! सुरुवात थोडी संथ वाटली पण लगेचच वेग पकडला नाटकाने आणि मग संपताना अरे अजून थोडे हवे होते असे वाटले.

त्यांचे अजून दोन तीन आठवडे इकडे प्रयोग आहेत. कोणाला आवड असल्यास नक्की जा. इथे तिकिटांची लिंक -

https://kallolentertainment.org/patrapatri

Pages