गोष्ट जन्मांतरीची

Submitted by दिनेश. on 22 December, 2010 - 03:42

गेले दोन दिवस तिच्या अंगावर सुस्ती होती. अन्नावरची वासना उडाली होती. बारिकशी हालचाल करण्याचाही
उत्साह नव्हता अंगात. एक प्रकारचे जडत्व आले होते शरीरात. अंगाला डसणाऱ्य मुंग्यांचेही तिला काही
वाटत नव्हते. तिच्या अंधा-या घरात ती निपचित पडून होती. यापूर्वीही तिला असे झाले होते, दोन चार
वेळा. बेचैनी अगदी शिगेला पोहोचली होती.

पण आजचा दिवस उजाडला तोच मुळी नवे चैतन्य घेउन. तिच्या सर्व शरिराला त्या चैतन्याने व्यापले.
घरातल्या अंधारात थांबणे अशक्य झाले तिला. ती बाहेर पडलीच. मोकळ्या हवेत तिने श्वास घेतला.
दिवस नुकताच उजाडला होता. सूर्याची कोवळी किरणे सर्व आसमंताला कुरवाळत होती. तिच्या मूळच्याच
सोनसळी कांतीवर नवी झळाळी आली होती. नजरच ठरत नव्हती, तिच्या शरीरावर. तिने जरा डोके
उंचाऊन परिसर न्याहाळून घेतला. रोजचाच परिसर आज काहितरी नवा भासत होता. मग तिने एक
खोल श्वास घेतला.

अरे, कसला हा गंध ? अनोळखी तरीही हवाहवासा वाटणारा. पण अनोळखी तरी कसा म्हणायचा ?
कुठेतरी या गंधाची ओळख पटतेय. आत खोलखोल कुठेतरी उमलायला होतेय. याच नव्हे तर जन्मोजन्मीची
ओळख आहे, तिला या गंधाची. आजवरच्या प्रत्येक जन्मात, या गंधाने तिला असेच वेड लावले होते.
अजून त्याचे गारुड उतरले नव्हते.

आणि या गंधाची तिला आता नव्याने ओढ लागली. त्या गंधाच्या स्त्रोताकडे जायची एषा तिच्या मनालाच
नव्हे तर पूर्ण शरीराला व्यापून राहिली. तिला आता क्षणभर देखील स्वत:ला रोखणे शक्य नव्हते. आता
कुठलेच बंधन तिला अडवू शकत नव्हते.

तिच्या अंगात एक नवीन बळ आले. चालीत वेगळीच चपळता आली. वाटेतले काटेकूटे, दगडधोंडे यांची तिला तमा नव्हती. सूर्य आता जरा वर आला होता. एरवी न सोसणारा, उन्हाचा दाहही, तिला आता जाणवत नव्हता.

एरवी इतक्या उन्हाची ती बाहेर पडतीच ना. पण आज नेणीवा, जाणीवांपेक्षा प्रखर झाल्या होत्या.

वाटेत एक वाहती नदी आडवी आली. एरवी ती पाण्यात उतरती ना. पण आज तिला ते धाडसच वाटत नव्हते.

ती एक क्षण थांबली. तो गंध नदीपलीकडूनच येतोय, याची तिने एकवार खात्री करुन घेतली. भर दिवसा असे ओलेत्या अंगाने उघड्यावर वावरणे, तसे योग्य नव्हते, पण तिचा दराराच एवढा होता, कि सहसा तिच्या वाटेला, कुणी जात नसे.

नाही म्हणायला तिच्यावर नजर असणारी काही गिधाडे होती, पण आज तिला त्यांचीही तमा नव्हती.

नेमके कुठे जायचे ते तिला माहीत नव्हते. रस्ताही ओळखीचा नव्हताच. पण त्या गंधाचे आवतण तिला
बरोबर वाट दाखवत होते. त्या गंधाच्या समीप जायचे, त्या गंधात सामावून जायचे, एवढेच ती जाणत होती. कसला होता तो गंध ?

तो गंध होता एका नराचा, एका पुरुषाचा. तो कदाचित तिच्यासाठी नसेलही. पण या क्षणी तिला त्याचीच ओढ लागली होती. जसजसे अंतर कमी होत चालले होते तसतशी त्या गंधाची तीव्रता वाढतच चालली होती, आणि तिचा वेगदेखील.

हा गंध याजन्मीतरी ती पहिल्यांदाच अनुभवत होती.पण कदाचित असेही असू शकेल, कि या गंधाचे आव्हान आजवर तिच्या आकलनशक्तीच्या पलिकडचे होते. आज मात्र ही सर्व गूढ कोडी, सूटल्यासारखी वाटत होती.

त्याच्याकडे जाण्यातली अपरिहार्यता तिला पूर्णपणे जाणवली होती. त्या तृप्त करणा-या क्षणाच्या, तिच्या
जन्माआधीपासूनच्या स्मृती आज जाग्या झाल्या होत्या. देह आणि मन यांचा क्वचितच होणारा समन्वय आज
झाला होता.

आपले काही चूकतेय असे तिला वाटलेच नाही. ती जे करतेय ते तसेच करायला हवे आहे, याची तिला मनोमन खात्री होती. वरवर दिसणा-या अविचारात एक खोल शहाणपणा दडलेला होता. आजवर कधीही न पाहिलेल्या, अशा त्याच्या अधीन होणं, एका नव्या युगाची सुरवात नव्हती, तर तिच्या पूर्वसूरिंनी आखून दिलेल्या मार्गावरचे केवळ चालणे होते. जीवनाच्या आरंभापासून, जीवनाच्या अंतापर्यंत असणा-या एका साखळिची, ती केवळ एक कडी होती. आणि एक कडी म्हणून असलेले तिचे कर्तव्यच ती पार पाडत होती.

ती अमर नाही हे तिला माहीत होते. आणि प्रत्यक्ष मृत्यूच्या आधी, ती मरणयातना भोगणार होती. या यातना
भोगायची तिची तयारी होती. याही बाबतीत तिच्या भावनांनी, तिच्या शरिरावर विजय मिळवला होता.

स्वर्गीय सुखाच्या त्या क्षणानंतर येणारी, सृजनाची जबाबदारी, ती कुणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता, पेलणार होती. त्या दरम्यान येणारे शारिरीक अवघडलेपण, कष्ट, हे तिला विचलीत करु शकत नव्हते. प्रत्यक्ष निर्मितीच्या आनंदात ती या वेणा अगदी सहज सोसणार होती. कारण तिला माहीत होते की, एक धरित्री सोडली, तर फ़क्त तिच जननक्षम होती. त्याबद्दल ती उतराई तर होतीच, पण अभिमानीदेखील होती.

आणि अचानक तोच समोर ठाकला. तिने त्याच्या देहाकडे निरखून बघितले. नजरच ठरत नव्हती त्याच्या पौरूषावर.

त्याला निर्माण करणारी, कुणीतरी तिच होती आणि यापुढेही त्याची प्रतिमा निर्माण करणे, केवळ तिलाच शक्य होते. एक क्षण त्याच्याबद्दलही वात्सल्य दाटून आले, तिच्या मनात.

कदाचित तोही असाच दूरवरुन तिचा शोध घेत आलेला असण्याची शक्यता होती. पण ते कबूल करण्याची त्याची तयारी नव्हती. त्याने तिच्याकडे दुर्लक्षच केले. चक्क मान वळवली. परत जायचा पवित्राही घेतला.

तिलाही हा खेळ नवीन नव्हता. जन्मोजन्मीच्या त्याच्या खोड्या तिला चांगल्याच परिचयाच्या होत्या. आणि अशा प्रसंगी काय करायचे, हेही तिला माहित होते.

ती त्याच्या वाटेत आडवी पडली. नजरेने आर्जव केले. आपल्या देहाच्या यौवनाचे गारुड त्याच्यावर होणार, हेही तिला माहीत होते.

"का अलीस ?" त्याच्या नजरेत सवाल होता. "फक्त तूझ्याचसाठी." तिच्या देहबोलीनेच उत्तर दिले. त्याचे फुरंगटून बसणे, एखाद्या लहान बाळासारखे वाटले तिला.

भावना व्यक्त करणे अवघडच वाटत होते त्याला. पण त्याचे मन ओळखणे तिला अवघड नव्हते. या खेळाचे सर्व नियम तिला माहित होते आणि वेळप्रसंगी हार पत्करुन, हवे ते पदरात पाडून घेणार होती ती.

त्याचा सहभाग फक्त काही क्षणांचा आणि काहि कणांचा. तरी पण आव आणि ताठा मात्र दात्याचा. तिला विचारेवेसे वाटले, " अरे कोण तू देणारा ? असे काय देतोस तू ? तूझे अवघे अस्तित्वच, माझ्यासारख्याच कुणीतरी, आपल्या रक्तामांसाची आहुति, देऊन बहाल केले आहे." पण तिने हे सवाल केले नाहीत.

तिने त्याचा अनुनय सुरु केला. त्याच्या देहावर आपला देह घासू लागली. मग त्यालाही मदनज्वराची बाधा झाली.
त्याच्या नेहमीचा धुसमुसळेपणा, आक्रमकपणा सोडून तो तिला हळूवार स्पर्श करु लागला. त्या क्षणापर्यंत पोहोचण्याची त्यांना आस लागली.

त्या दोघांच्या प्रत्येक पेशीला एकमेकांच्या देहाची ओढ लागली. ती आस पूर्णपणे शमवणे त्यांना अशक्य होते, तरीही त्यांचा तसाच प्रयत्न चालला होता. देहांचा विळखा एकमेकांभोवती पडला. तो क्षण पूर्णपणे त्यांना जगायचा होता.

एकमेकांच्या नजरेनेच एकमेकांची नजरबंदी केली जात होती. नजरेत एकाचवेळी आर्जव आणि समाधान होते. दिलासाही होता आणि वेदनाही.

धात्री धरित्री आणि पित्यासमान नभाला त्यांनी साक्षीदार केले होते. धरित्री आणि आभाळाचे मिलन व्हावे म्हणून त्यांनी आपल्या देहांच्या अद्वैतातून एक सेतू केला होता. त्यांच्या मिलनाला, इतर कुठल्याही साक्षीदाराची त्यांना ना गरज होती ना तमा.

पण जे कुणी या क्षणाचे साक्षीदार होते, ते अनिमिष नेत्रांनी हे नागमंडल, डोळ्यात साठवून ठेवत होते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दिनेशदा कथा आवड्ली. प ण मोहाचे झाड जास्त जमलेली .खुप पुर्वी वाचलेली तेन्व्हा सुध्हा आणी आता परवा परवा परत वाचली तेन्व्हापण खास वाट्लेली.
लहानपणी मारुती चितमपल्ली खुप वाचाय चो ..परदेशात आल्याला कित्तेक वर्शे झाली. काहीच वाचल नाही नन्तर ...तुमच्या या कथेमुळे चितमपल्लीन्चे लेख आटवले. माझे टायपिन्ग ...चुकभुल माफी.

<<तुमच्या या कथेमुळे चितमपल्लीन्चे लेख आटवले. >> Lol
नोरा, त्या आटवले शब्दाला aaThavale असं टाईप कर गं. मग बरोबर येईल.
दिनेशदा,
<<शारिरीक अवघडलेपण आणि वेणा त्याच्या वाट्याला येत नाही. (त्यातही काही मासे अपवाद आहेतच )>>
ही माशांची माहिती नवीन आहे माझ्यासाठी. कुठले मासे ?
आणि त्याच्याखालची पोस्ट ( पिल्लांना केवळ मोठं करण्यासाठीचा आटापिटा) फार आवडली ! How true ! Happy

अग रुणुझुणु ,हसु नका बरे अवस्था आहे सध्या पण शिकतेय हळूहळू.मदती बद्दल धन्स्.जुन्या मा बो ची आठवण झाली. लोक्स तेव्हा नव्या लोकान्चे स्वागत करायचे,मद्त पण्. असो.धन्स.

बाकी आजकाल स्मरण शक्ती पण भारीच झालीय्,आठवायचे काम आटवण्या इतके अवघड झालेय! Happy

नोरा, तुला नाही हसले. मला शब्दातून होणार्‍या अर्थाचं हसू आलं. राग आला असल्यास.....विसरून जा.
गैरसमज नसावा.

Aadhi kahi samjli navti pan, pratisad vachalyavar samajli......
chhan...............

Pages