गेले दोन दिवस तिच्या अंगावर सुस्ती होती. अन्नावरची वासना उडाली होती. बारिकशी हालचाल करण्याचाही
उत्साह नव्हता अंगात. एक प्रकारचे जडत्व आले होते शरीरात. अंगाला डसणाऱ्य मुंग्यांचेही तिला काही
वाटत नव्हते. तिच्या अंधा-या घरात ती निपचित पडून होती. यापूर्वीही तिला असे झाले होते, दोन चार
वेळा. बेचैनी अगदी शिगेला पोहोचली होती.
पण आजचा दिवस उजाडला तोच मुळी नवे चैतन्य घेउन. तिच्या सर्व शरिराला त्या चैतन्याने व्यापले.
घरातल्या अंधारात थांबणे अशक्य झाले तिला. ती बाहेर पडलीच. मोकळ्या हवेत तिने श्वास घेतला.
दिवस नुकताच उजाडला होता. सूर्याची कोवळी किरणे सर्व आसमंताला कुरवाळत होती. तिच्या मूळच्याच
सोनसळी कांतीवर नवी झळाळी आली होती. नजरच ठरत नव्हती, तिच्या शरीरावर. तिने जरा डोके
उंचाऊन परिसर न्याहाळून घेतला. रोजचाच परिसर आज काहितरी नवा भासत होता. मग तिने एक
खोल श्वास घेतला.
अरे, कसला हा गंध ? अनोळखी तरीही हवाहवासा वाटणारा. पण अनोळखी तरी कसा म्हणायचा ?
कुठेतरी या गंधाची ओळख पटतेय. आत खोलखोल कुठेतरी उमलायला होतेय. याच नव्हे तर जन्मोजन्मीची
ओळख आहे, तिला या गंधाची. आजवरच्या प्रत्येक जन्मात, या गंधाने तिला असेच वेड लावले होते.
अजून त्याचे गारुड उतरले नव्हते.
आणि या गंधाची तिला आता नव्याने ओढ लागली. त्या गंधाच्या स्त्रोताकडे जायची एषा तिच्या मनालाच
नव्हे तर पूर्ण शरीराला व्यापून राहिली. तिला आता क्षणभर देखील स्वत:ला रोखणे शक्य नव्हते. आता
कुठलेच बंधन तिला अडवू शकत नव्हते.
तिच्या अंगात एक नवीन बळ आले. चालीत वेगळीच चपळता आली. वाटेतले काटेकूटे, दगडधोंडे यांची तिला तमा नव्हती. सूर्य आता जरा वर आला होता. एरवी न सोसणारा, उन्हाचा दाहही, तिला आता जाणवत नव्हता.
एरवी इतक्या उन्हाची ती बाहेर पडतीच ना. पण आज नेणीवा, जाणीवांपेक्षा प्रखर झाल्या होत्या.
वाटेत एक वाहती नदी आडवी आली. एरवी ती पाण्यात उतरती ना. पण आज तिला ते धाडसच वाटत नव्हते.
ती एक क्षण थांबली. तो गंध नदीपलीकडूनच येतोय, याची तिने एकवार खात्री करुन घेतली. भर दिवसा असे ओलेत्या अंगाने उघड्यावर वावरणे, तसे योग्य नव्हते, पण तिचा दराराच एवढा होता, कि सहसा तिच्या वाटेला, कुणी जात नसे.
नाही म्हणायला तिच्यावर नजर असणारी काही गिधाडे होती, पण आज तिला त्यांचीही तमा नव्हती.
नेमके कुठे जायचे ते तिला माहीत नव्हते. रस्ताही ओळखीचा नव्हताच. पण त्या गंधाचे आवतण तिला
बरोबर वाट दाखवत होते. त्या गंधाच्या समीप जायचे, त्या गंधात सामावून जायचे, एवढेच ती जाणत होती. कसला होता तो गंध ?
तो गंध होता एका नराचा, एका पुरुषाचा. तो कदाचित तिच्यासाठी नसेलही. पण या क्षणी तिला त्याचीच ओढ लागली होती. जसजसे अंतर कमी होत चालले होते तसतशी त्या गंधाची तीव्रता वाढतच चालली होती, आणि तिचा वेगदेखील.
हा गंध याजन्मीतरी ती पहिल्यांदाच अनुभवत होती.पण कदाचित असेही असू शकेल, कि या गंधाचे आव्हान आजवर तिच्या आकलनशक्तीच्या पलिकडचे होते. आज मात्र ही सर्व गूढ कोडी, सूटल्यासारखी वाटत होती.
त्याच्याकडे जाण्यातली अपरिहार्यता तिला पूर्णपणे जाणवली होती. त्या तृप्त करणा-या क्षणाच्या, तिच्या
जन्माआधीपासूनच्या स्मृती आज जाग्या झाल्या होत्या. देह आणि मन यांचा क्वचितच होणारा समन्वय आज
झाला होता.
आपले काही चूकतेय असे तिला वाटलेच नाही. ती जे करतेय ते तसेच करायला हवे आहे, याची तिला मनोमन खात्री होती. वरवर दिसणा-या अविचारात एक खोल शहाणपणा दडलेला होता. आजवर कधीही न पाहिलेल्या, अशा त्याच्या अधीन होणं, एका नव्या युगाची सुरवात नव्हती, तर तिच्या पूर्वसूरिंनी आखून दिलेल्या मार्गावरचे केवळ चालणे होते. जीवनाच्या आरंभापासून, जीवनाच्या अंतापर्यंत असणा-या एका साखळिची, ती केवळ एक कडी होती. आणि एक कडी म्हणून असलेले तिचे कर्तव्यच ती पार पाडत होती.
ती अमर नाही हे तिला माहीत होते. आणि प्रत्यक्ष मृत्यूच्या आधी, ती मरणयातना भोगणार होती. या यातना
भोगायची तिची तयारी होती. याही बाबतीत तिच्या भावनांनी, तिच्या शरिरावर विजय मिळवला होता.
स्वर्गीय सुखाच्या त्या क्षणानंतर येणारी, सृजनाची जबाबदारी, ती कुणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता, पेलणार होती. त्या दरम्यान येणारे शारिरीक अवघडलेपण, कष्ट, हे तिला विचलीत करु शकत नव्हते. प्रत्यक्ष निर्मितीच्या आनंदात ती या वेणा अगदी सहज सोसणार होती. कारण तिला माहीत होते की, एक धरित्री सोडली, तर फ़क्त तिच जननक्षम होती. त्याबद्दल ती उतराई तर होतीच, पण अभिमानीदेखील होती.
आणि अचानक तोच समोर ठाकला. तिने त्याच्या देहाकडे निरखून बघितले. नजरच ठरत नव्हती त्याच्या पौरूषावर.
त्याला निर्माण करणारी, कुणीतरी तिच होती आणि यापुढेही त्याची प्रतिमा निर्माण करणे, केवळ तिलाच शक्य होते. एक क्षण त्याच्याबद्दलही वात्सल्य दाटून आले, तिच्या मनात.
कदाचित तोही असाच दूरवरुन तिचा शोध घेत आलेला असण्याची शक्यता होती. पण ते कबूल करण्याची त्याची तयारी नव्हती. त्याने तिच्याकडे दुर्लक्षच केले. चक्क मान वळवली. परत जायचा पवित्राही घेतला.
तिलाही हा खेळ नवीन नव्हता. जन्मोजन्मीच्या त्याच्या खोड्या तिला चांगल्याच परिचयाच्या होत्या. आणि अशा प्रसंगी काय करायचे, हेही तिला माहित होते.
ती त्याच्या वाटेत आडवी पडली. नजरेने आर्जव केले. आपल्या देहाच्या यौवनाचे गारुड त्याच्यावर होणार, हेही तिला माहीत होते.
"का अलीस ?" त्याच्या नजरेत सवाल होता. "फक्त तूझ्याचसाठी." तिच्या देहबोलीनेच उत्तर दिले. त्याचे फुरंगटून बसणे, एखाद्या लहान बाळासारखे वाटले तिला.
भावना व्यक्त करणे अवघडच वाटत होते त्याला. पण त्याचे मन ओळखणे तिला अवघड नव्हते. या खेळाचे सर्व नियम तिला माहित होते आणि वेळप्रसंगी हार पत्करुन, हवे ते पदरात पाडून घेणार होती ती.
त्याचा सहभाग फक्त काही क्षणांचा आणि काहि कणांचा. तरी पण आव आणि ताठा मात्र दात्याचा. तिला विचारेवेसे वाटले, " अरे कोण तू देणारा ? असे काय देतोस तू ? तूझे अवघे अस्तित्वच, माझ्यासारख्याच कुणीतरी, आपल्या रक्तामांसाची आहुति, देऊन बहाल केले आहे." पण तिने हे सवाल केले नाहीत.
तिने त्याचा अनुनय सुरु केला. त्याच्या देहावर आपला देह घासू लागली. मग त्यालाही मदनज्वराची बाधा झाली.
त्याच्या नेहमीचा धुसमुसळेपणा, आक्रमकपणा सोडून तो तिला हळूवार स्पर्श करु लागला. त्या क्षणापर्यंत पोहोचण्याची त्यांना आस लागली.
त्या दोघांच्या प्रत्येक पेशीला एकमेकांच्या देहाची ओढ लागली. ती आस पूर्णपणे शमवणे त्यांना अशक्य होते, तरीही त्यांचा तसाच प्रयत्न चालला होता. देहांचा विळखा एकमेकांभोवती पडला. तो क्षण पूर्णपणे त्यांना जगायचा होता.
एकमेकांच्या नजरेनेच एकमेकांची नजरबंदी केली जात होती. नजरेत एकाचवेळी आर्जव आणि समाधान होते. दिलासाही होता आणि वेदनाही.
धात्री धरित्री आणि पित्यासमान नभाला त्यांनी साक्षीदार केले होते. धरित्री आणि आभाळाचे मिलन व्हावे म्हणून त्यांनी आपल्या देहांच्या अद्वैतातून एक सेतू केला होता. त्यांच्या मिलनाला, इतर कुठल्याही साक्षीदाराची त्यांना ना गरज होती ना तमा.
पण जे कुणी या क्षणाचे साक्षीदार होते, ते अनिमिष नेत्रांनी हे नागमंडल, डोळ्यात साठवून ठेवत होते.
हि पण माझी एक जूनीच कथा.
हि पण माझी एक जूनीच कथा. त्यावेळी रसिकांना आवडली होती.
हि कथा ज्या दृष्यावरुन सूचली तो फारच करुण होता. मग लिहिन तो.
दिनेश दा ,त्या दृष्याबद्दल
दिनेश दा ,त्या दृष्याबद्दल लिहिलं असतं आधी तर कथेचा तुमच्या मनात असलेला संदर्भ आमच्यापर्यन्त पोचला असता..
आत्ता वाचताना काहीशी गूढ कथा वाटतेय.. पण वर्णन अतिशय बोलकं आहे .. खिळवून ठेवणारं
ओढ फार सुंदर वर्णिली आहे.....
ओढ फार सुंदर वर्णिली आहे.....
फक्त एक तांत्रिक चूक जाणवली....साप्/नागांना घ्राणेंद्रिय नसते.... वास किंवा सृष्टीतील बदल ते जीभ बाहेर काढून त्याने ओळखतात.... त्यामुळे गंधाच्या ओढीने नागीणीने ओढले जाणे अयोग्य वाटले.....
असो... बाकी वर्णन अप्रतिम.
समोर उभं केलंत नागमंडल!!!
समोर उभं केलंत नागमंडल!!! "बघायचं नसतं" असं आमची आजी नेहमी सांगायची... सर्पाना, त्यातल्या त्यात नागिणींना व्यत्यय आवडत नाही असं सांगायची. पण ज्यांनी बघितलं त्यांनी असंच रोखून अनिमिष नेत्रांनी बघितलं आणि भानावर येऊन XXला पाय लावून धूम ठोकली...
शब्द रचना सुरेख!
दिनेशदा मस्त वर्णन केलय
दिनेशदा मस्त वर्णन केलय
या कथानकाचा हेतू समजला नाही.
या कथानकाचा हेतू समजला नाही. किंवा कथानकच समजले नाही. क्षमस्व!
(समजून घेण्याची इच्छा आहे म्हणून प्रतिसाद दिला आहे.)
-'बेफिकीर'!
छान लिखाण... आत्ता वाचताना
छान लिखाण...
आत्ता वाचताना काहीशी गूढ कथा वाटतेय>>अनुमोदन
दिनेशदा, वर्णन छान आहे, पण
दिनेशदा,
वर्णन छान आहे, पण मला फारशी कळाली नाहि. Sorry.
डॉ., सर्पाना नाक नसते हे खरे
डॉ., सर्पाना नाक नसते हे खरे आहे पण आपल्या दुभंगलेल्या जिभेच्या सहाय्याने ते हवेतील "गंध" कणांचाच मागोवा घेतात. जिभेच्या त्या दोन टोकांपैकी कुठल्या टोकांवर जास्त तीव्रतेने गंधकण जमा झालेत, त्यावरुन त्यांना कुठल्या दिशेने जायचे ते कळते.
मला या कथेत थोडासा गूढपणाच अपेक्षित होता.
बेफिकीर, आता नक्कीच कळेल. खरे तर तिच्या जागी कुणीही स्त्री असू शकते.
दिनेशदा , मस्त वर्णन केलंयत.
दिनेशदा , मस्त वर्णन केलंयत. वाचताना अगदी गूढ वाटत होतं.
ज्यांनी हे नागमंडल पाहिले
ज्यांनी हे नागमंडल पाहिले आहे, त्यांना तो आवेग वेगळा सांगायला नकोच. मी यात वर्णन केलेला प्रवास खरे तर बीबीसीच्या एका माहितीपटातला. पण तो होता एका जंगलातला.
एकदा पनवेलच्या गाढेश्वर भागात जाताना, भर दुपारी मला रस्त्यात एक पिवळाधम्मक साप गाडीखाली आलेला दिसला. अक्षरशः सोनेरी रंगाचा होता तो. त्याचे डोकेच गाडीखाली आले होते.
माझ्या सोबत जे होते ते म्हणाले कि भर उन्हात, रहदारीच्या रस्त्यावर असा साप येत नाही, समजा रस्ता क्रॉस जरी करायचा असेल तर तो रस्त्यावर जाणवणार्या कंपनाचा अंदाज घेईल. आणि मगच रस्ता क्रॉस करेल.
भक्षाचा पाठलाग हि शक्यता पण त्यांनी टाळली. ते म्हणाले सापाकडे जबरदस्त संयम असतो. तो भक्ष्याच्या वाटेवर दबा घरुन बसतो, आणि भक्ष आवाक्यात येताच त्यावर झडप घालतो. भक्षाचा पाठलाग करणे त्याला पाण्यात एकवेळ शक्य आहे.
मग सापाने अविचाराने भर रस्त्यावर येण्यामागची २ कारणे असू शकतात, एक तो घाबरला आणि त्याच्यावर हल्ला करणार्यापासून स्वतःचा बचाव करायचा असेल, किंवा ही....
दिनेशदा, एक अतिशयच सुंदर
दिनेशदा, एक अतिशयच सुंदर संदिग्धकथा!
ती आणि तो कोणीही असू शकतात. मला तर आधी वाटले की तुम्ही परागीकरणाचे वर्णन करताय आणि ते बाकीचे वर्णन म्हणजे त्यामागील मानवीय विचार आहेत. तुमचे सगळे निसर्गाचे बाफ वाचल्यामुळे हे झालयं.
मामी
मामी
दिनेशदा.. कथा वाचली , पण
दिनेशदा.. कथा वाचली , पण उमजली नाही.. थोडक्यात संदर्भ सांगाल का..?
सूंदर. वाचताना काहीशी गूढ
सूंदर.
वाचताना काहीशी गूढ कथा वाटतेय.. पण वर्णन अतिशय बोलकं आहे .. खिळवून ठेवणारं - अनुमोदन.
छान वाटली.
दिनेशदा नका अर्थ सांगू
दिनेशदा
नका अर्थ सांगू इतक्यात. तुम्ही छान मांडणी केलीत. आता आम्हाला आमच्या नजरेतून अर्थ लावू देत. प्रत्येकाला काही तरी वेगळ दिसलं असेल. दिसलं यासाठीच म्हणतोय कि तुम्ही कथा दाखवलीत. व्हिज्युअल इफेक्टस दिलेत...
कदाचित ते नागमंडलही असेल.. किंवा ही रूपककथाही असू शकते.
कदाचित ते पुरातन नर मादी चक्र असेल. जीवसृष्टीचं कोडं असेल...
वेगळेपण आवडलं..
बेफिकीर, आता नक्कीच कळेल. खरे
बेफिकीर, आता नक्कीच कळेल. खरे तर तिच्या जागी कुणीही स्त्री असू शकते>>>
कुणीही स्त्री समजूनच वाचले होते कथानक!
प्रतिसादांमध्ये नागमंडल वाचले.
पण काय सांगायचे आहे ते समजले नाही इतकेच पहिल्या प्रतिसादात म्हणालो.
-'बेफिकीर'!
खुपच सुंदर....
खुपच सुंदर.... आवडली.
<<<वाचताना काहीशी गूढ कथा वाटतेय.. पण वर्णन अतिशय बोलकं आहे .. खिळवून ठेवणारं>>> अनुमोदन.
दिनेशदा खुपच सुंदर कथा.
दिनेशदा
खुपच सुंदर कथा. खिळवून ठेवणारं वर्णन.....
<<<तुम्ही कथा दाखवलीत. व्हिज्युअल इफेक्टस दिलेत...>>> अनुमोदन.
दिनेशदा खुपच सुंदर कथा.
दिनेशदा
खुपच सुंदर कथा. खिळवून ठेवणारं वर्णन.....
<<<तुम्ही कथा दाखवलीत. व्हिज्युअल इफेक्टस दिलेत...>>> अनुमोदन.
अप्रतिम ! खूपच सुंदर ! माझी
अप्रतिम ! खूपच सुंदर ! माझी प्रतिक्रिया अगदी अनिल सोनावणेंसारखीच आहे.
<<<<प्रत्येकाला काही तरी वेगळ दिसलं असेल. दिसलं यासाठीच म्हणतोय कि तुम्ही कथा दाखवलीत. व्हिज्युअल इफेक्टस दिलेत...
कदाचित ते नागमंडलही असेल.. किंवा ही रूपककथाही असू शकते.
कदाचित ते पुरातन नर मादी चक्र असेल. जीवसृष्टीचं कोडं असेल... >>>
आता पर्यंत कधी मी प्रतिक्रिया दिल्या नाहीत फारशा. पण आज मला लिहावंच लागलं. मी तर खुप दिवसांनी एवढी impress झाले काही वाचून.
<
<
<
१८-सप्टेंबर-२०११
परत वाचली आणि आज वेगळीच समजली. पुन्हा एकदा खुप आवडली ही कथा.
मनिमाऊ, मीही सामान्यच आहे की!
मनिमाऊ,
मीही सामान्यच आहे की!
पण तुमचा किंवा मूळ लेखकाचा चर्चेचा उद्देश निर्माण होऊ शकत असेल तर मीही चर्चा करायला तयार आहे.
माझी मते मी लिहीन थोड्या वेळाने! तेव्हा ऑनलाईन असलात तर कृपया मतप्रदर्शन करावेत.
धन्यवाद!
(अर्थात, हे आपण इथेच सोडूनही देऊ शकतोच म्हणा! ज्याने त्याने आस्वाद घ्यावा हेही खरेच! आपण माझा उल्लेख केलात म्हणून प्रपंच!)
-'बेफिकीर'!
नाव जितके गुढ... तितकीच कथाही
नाव जितके गुढ... तितकीच कथाही गुढ-रम्य वाटली... ते नागमंडल होते, हे तुम्ही शेवटी स्पष्ट केल्यामुळेच समजू शकले... तो कुठला प्राणी असावा किंवा ते नेमकं काय असावं, ही पूर्ण कथाभर उत्सुकता होती...ती शमेल की नाही ही शंकाच होती. पण सुदैवाने तुम्ही ते शेवटी सांगितलेत... अतिशय छान... अनिमिष नेत्रांनीच ही कथा वाचली.
हि कथा पुर्वि वाचली
हि कथा पुर्वि वाचली होती..तेव्हाहि ति आवडली आणी आजहि..
निव्वळ अप्रतिम ...!!! दुसरा
निव्वळ अप्रतिम ...!!!
दुसरा शब्दच नाही.
- मैत्रेयी भागवत
कथा अप्रतिम. पण एक विसंगती
कथा अप्रतिम.
पण एक विसंगती जाणवली. प्राण्यांमधे मादि नराचा अनुनय सहसा करत नाही किंबहुना मला तरि वाचलेलं आठवतय त्या प्रमाणे नेहेमी नरच अनुनय करतो आणी मादिचे मन वळवण्यासाठि त्याच्याकडे कधी रंगित पिसं /घर बांधायचे स्किल/ आवाज अशा अनेक देणग्या निसर्गाने दिलेल्या असतात. अर्थात सापामधे काही वेगळे असु शकेल. कोणाला माहीत असेल तर सांगतीलच इथे.
दिनेशदा, फार सुंदर
दिनेशदा,
फार सुंदर लिहिलेत.
वर्णन फारच छान.
सावली अचूक निरिक्षण, आणि ते
सावली अचूक निरिक्षण, आणि ते खरंही आहे. या प्रवासातला बराचसा प्रवास नर करतो, पण मादी थोडी "पावले" पुढे जातेच. काहि किटकांत योग्य तो संदेश देणारा गंध, माद्याच हवेत सोडतात, आणि नर त्याचा मागोवा घेत येतो.
शिवाय हि कथा तितकिशी नराला लागू होत नाही कारण त्याचा निर्मितीप्रकियेतला सहभाग काही कणांचा आणि क्षणांचा. त्याचा उद्देश वंशविस्तार इतकाच असू शकतो. शारिरीक अवघडलेपण आणि वेणा त्याच्या वाट्याला येत नाही. (त्यातही काही मासे अपवाद आहेतच ) फारच थोडे नर संगोपनात हातभार लावतात. म्हणून मी ते स्वातंत्र्य घेतले.
मिलनानंतर मरुन जाणार्या काही नरांचे (उदा कोळी, मुंग्या ) उदाहरण घेतले असते, तर शमा परवाना टाईप कथा झाली असती. अणि तशी कथा बेफिकिर जास्त चांगली लिहू शकतील.
बेफिकीर, वाचताय ना ? आत तूम्ही कथा लिहायला लागलाच आहात, तर माझी एक फर्माईश समजा.
माणसाचा बौद्धिक विकास झालाय
माणसाचा बौद्धिक विकास झालाय असे आपण मानतो. मानवामधे आपल्या मूलांकडून किती अपेक्षा असतात बरं, म्हणजे म्हातारपणाची काठी न् काय काय.
मी माझ्या बाजूला अनेक पक्षी घरटे बांधण्यासाठी, पिल्लाना वाढवण्यासाठी जीवाचा आटापिटा करताना बघतो. निव्वळ पिल्लाना मोठे करायचे, एवढीच अपेक्षा. एक कर्तव्य पर पाडायचे तितक्या निष्ठेने आणि निरपेक्षपणे ही धडपड चाललेली असते. म्हातारपणी, पिल्लाने आईबाबांची काळजी घेतल्याचे काही उदाहरण नाही दिसत.
तोही विचार होता या कथेत.
दिनेश, सध्या इथे (म्हणजे
दिनेश,
सध्या इथे (म्हणजे पुण्यात) रात्रीचा एक वाजत आला आहे. अशा वेळेस मी सहसा (सामाजिक अर्थाने) शुद्धीत नसतो. त्यामुळे अशा वेळेसचे प्रतिसाद अत्यंत खरे दिले जातात माझ्याकडून!
तेव्हा, 'मी कशा प्रकारच्या कथा लिहू शकतो' अन तुम्ही काय लिहीले आहेत याबाबत आपण (पुण्यातल्या) उद्या बोलू.
-'बेफिकीर'!
Pages