शर्यत

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

जवळजवळ पाच हजार वर्षेतरी उलटून गेली असतील. पण ससा आणि कासव मात्र तारुण्याने ओथंबून वहात होते. त्यातल्यात्यात ससा वयाने आणि आकारानेही मोठा होता. कासव लहान होत आणि त्याला सशाविषयी नितांत आदर होता. सशा कासवाची मैत्री साऱ्या जंगलाचं कुतूहल बनून राहीली होती. ससा आणि कासव जेव्हा भेटत तेव्हा कासव प्रेमापोटी ससा-कासव भाई भाईचे नारेही देत असे.

असं सगळं काही छान सुरु असताना एका रात्री मात्र घात झाला. सशाने रात्रीच्या अंधारात कासवावर चक्क हल्ला केला. कासवाकडे पाठीवरचं कवच होतं पण ते कोवळं होतं. सशाला कासवाच्या कवचाचे तुकडे उडवायला फारसा वेळ लागला नाही. कासवाला काय करावे तेच कळेना. त्याला प्रचंड शारीरीक आणि मानसिक धक्का बसला. सिंहादी इतर प्राण्यांनी सशाचा धिक्कार केला. कासवाचं कवच पूर्णपणे उध्वस्त करुन सशाने आपला हल्ला स्वत:हूनच थांबवला. कासवाला श्वास घ्यायला उसंत मिळाली. हालचाल करण्याइतके त्राण तर त्याच्यात उरलेच नव्हते म्हणा. कासव गलितगात्र अवस्थेत विचार करु लागलं - काय चुकलं माझं? सशाने हे कुठलं भांडण उकरुन काढलं? आणि माझं एवढं टणक कवच - त्याच्या चिंध्या एवढ्या लवकर कशा उडाल्या? सशासारखा प्राणी जर माझ्या चिंध्या उडवू शकतो तर इतरांच काय? ससा आणि कासवाची मैत्री अशी संपुष्टात आली.

काही वर्षे निघून गेली. प्राण्यांच्या राज्यात बरेच बदल होत होते. एव्हाना सशाने सिंहाशी मैत्री केली होती. सिंहाने दिलेलं बाळकडू पिऊन सशाची तब्ब्येत अधिकच सुधारली होती. आता सशाची स्वप्न मोठी होत होती.त्याला म्हातारा होत असलेला सिंह डोळ्यासमोर दिसत होता. या सिंहाच सिंहासन दूर क्षितीजावर असलेल्या डोंगरावर होतं. तिथली वाट बिकट होती. पण सशाने ठरवलं होतं - त्याने हळू हळू मार्गक्रमणा सुरु केली. आपल्या हातापायांना त्याने दामटायला सुरुवात केली. एकदा तर सशाचा पाय असंख्य काट्यांच्या जाळ्यावर पडला. रक्त भळभळून वाहीलं, पण सशाने पर्वा केली नाही. त्याला पक्कं माहित होत - आपण थांबता कामा नये. सिंहालाही हळूहळू सशाचा संशय येऊ लागला. आपले बाळकडू पिऊन आपल्याच गादीवर बसण्याची स्वप्नं ससा बघत आहे की काय अशी शंका सिंहाला येऊ लागली. पण बलवान सशाशी उघडउघड वैर पत्करण्याच्या परिस्थितीत सिंह नव्हता.

कासवाने हळूहळू आपल्या पायावर उभं राहायला सुरुवात केली. मानसिक धक्क्यातनं ते बाहेर आलं. सशाशीही वरवरुन बोलायला सुरुवात केली. पण कासवाच्या मनातली सशाविषयीची अढी अजून गेली नव्हतीच. त्याच्या मनावर झालेली खोल जखम कासव कधीच विसरणार नव्हतं. कासवानेही सिंहाशी मैत्री करायला सुरुवात केली. सिंहाचं बाळकडू आपल्यालाही आवश्यक आहे हे कासवाला कळलं होतं. सिंहाची मैत्री केल्याने एका दगडात दोन पक्षी कासव मारणार होतं. बाळकडूही मिळणार होतं आणि उद्या सशाने पुन्हा हल्ला केलाच तर सिंहाचं संरक्षणही मिळणार होतं. सिंहालाही ही मैत्री फायद्याची होती. सशाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी कासव त्याला उत्तम जोडीदार वाटत होता.

सिंहाचं बाळकडू नियमित घ्यायला लागल्यानंतर मात्र कासवाची तब्बेत भरभर सुधारायला लागली. त्याच्या पायात बळ येऊ लागलं. कवच अधिकाधिक टणक होऊ लागलं. एक शतक संपून दुसऱ्या शतकाची सुरुवात होत होती. कासवाची तब्ब्येत चांगलीच सुधारायला लागली होती. त्याचा प्रभावही हळू हळू जंगलात वाढू लागला होता. कासवाच्या महत्वाकांक्षानाही आता पंख फुटायला लागले होते. कासवाच्या पायात सशाचा वेग नव्हता पण त्याचे पाय सशासारखे मऊ नव्हते. कितीही काट्याकुट्यांनी भरलेल्या वाटेतून त्याला सहज मार्गक्रमणाकरता येत होती - रक्ताचा थेंबही न सांडता.

एके दिवशी संध्याकाळी क्षितीजाकडे मार्गक्रमण करणाऱ्या सशाने सहज म्हणून मागे वळून पाहिले. त्याला लांबवर कासव मंदगतीने येतान दिसले. कासव सशाच्या मागावर होते. ते दोघेही ज्या वाटेवर होते ती वाट क्षितीजावर असलेल्या सिंहासनाकडे जात होती. जंगलातील प्राणी उत्सुकतेने पाहत होते - ससा आणि कासवाची शर्यत लागली होती.

प्रेरणा - Superpower?: The Amazing Race Between China's Hare and India's Tortoise

प्रकार: 

धन्यवाद. चांगले लिहीले आहे. बर्‍याच दिवसांनी लिहीलत इथे. आधी मी राज, उद्धव आणि बाळासाहेब ठाकरे असे गृहीत धरून वाचत होते त्यामुळे काही संदर्भ जुळले काही नाही जुळले. प्रेरणा संदर्भ वाचल्यानंतर अपेक्षित अर्थ लागला.

आधी मी राज, उद्धव आणि बाळासाहेब ठाकरे असे गृहीत धरून वाचत होते त्यामुळे काही संदर्भ जुळले काही नाही जुळले.>>> मी पण Happy

छान लिहिलय...