हेलन - The Dancing Legend!
वरचा फोटो कुणाचा ते तुम्हाला वेगळं सांगण्याची गरजंच नाही. पण तिचा असा फोटो म्हणजे दुर्मिळ छबीच... आपण सर्वांनी बहुतेक वेळेला तिला कॅब्रे किंवा नाईटक्लबमध्ये डान्स करताना पाहिलय.
आपल्याला जरी ती फक्त 'हेलन' म्हणून माहीत असली तरी तिचं संपूर्ण मूळ नाव हेलन जयराग रिचर्डसन होतं व ती जन्माने अॅम्ग्लो बर्मिस होती. म्हणजे वडील अॅंग्लो इंडियन व आई बर्मिस... बर्मा मध्ये २१ ऑक्टोबर १९३९ रोजी या सौंदर्याने जन्म घेतला आणि पुढे ती बॉलिवुड मध्ये तिच्या अनेकविध भुमिकांमुळे व विशेषकरून नृत्याविष्कारामुळे फक्त 'हेलन' या नावाने भरपूर गाजली.
हेलनचे कुटुंब हे बर्मातील अॅंग्लो इंडियन निर्वासित होते. दुसर्या महायुद्धाच्या दरम्यान तिच्या वडीलांचा मृत्यू झाल्याने १९४३ मध्ये हे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले. हेलन व तिची आई या व्यतिरिक्त कुटुंबात एक भाऊ (रॉजर) आणि एक बहिण(जेनिफर) असे एकूण चार सदस्य होते. मुंबईत स्थायिक झाल्यावर हेलनची आई नर्स म्हणून काम करत असे पण मिळणार्या तुटपुंज्या पगारात कुटुंब चालवणे कठिण झाल्याने त्यांच्या व स्वत:च्या चरितार्थासाठी हेलनने शाळा सोडून देऊन नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली. हे शिक्षण घेताना तिला साक्षात्कार झाला की आपल्याला नृत्याचे अंग आहे, त्यांचीच एक कुटुंब स्नेही; अभिनेत्री कुकू ही त्यावेळी बॉलिवूड मधली एक अग्रगण्य नर्तिका म्हणून ओळखली जायची, तिच्या ओळखीने हेलनला अतिशय लहान वयातच चित्रपटात कोरस डान्सर म्हणून काम मिळाले. कुकूचा नृत्याचा वारसा तिने पुढे चालू ठेवला. कुकूप्रमाणे हेलनही मुद्राभिनयात तरबेज झाली होती.
बर्याच चित्रपटात कोरस डान्सर म्हणून काम केल्यानंतर हेलनला हुर्-ए-अरब आणि अलिफ लैला यांसारख्या चित्रपटात सोलो डान्सर च्या भुमिका मिळाल्या. उत्तम नृत्याचे अंग असल्याने, हेलनचे नशिब हे तिच्या हातात नसून तिच्या 'पायांत' आहे असे त्या काळी बोलले जायचे. १९५७ मध्ये 'बारिश' चित्रपटात 'मिस्टर जॉन या बाबा खान...' व लगेच १९५८ मध्ये 'हावडा ब्रिज' या चित्रपटातल्या सुरेख चायनिज पोषाखात 'मेरा नाम चिं चिं चू....' म्हणत हेलनने यशस्वी पदार्पण केले.
१९५०-६० आणि ७० च्या दशकातील नाईटक्लब व कॅब्रे डान्स नंबर्सनी तर हेलनला भरपूर यश मिळवून दिले. त्याकाळात तिची तुलना मेरिलिन मनरो बरोबर केली जायची. पण त्याच बरोबर तिची काही सेमी क्लासिकल डान्समधली गाणी (उदा. 'गंगा जमुना'तलं 'तोरा मन बडा पापी' किंवा 'जिंदगी' मधलं 'घुंघरवा मोरा छम छम बाजे') यांनीही तिला प्रचंड यश मिळवून दिले.
हेलनचं अॅंग्लो+बर्मिस सौंदर्य हे चित्रपटातील मुख्य अभिनेत्री बनण्याच्या मार्गातला मोठा अडथळा ठरले. तिचे सौंदर्य, शार्प लुक्स आणि चमकणारे डोळे हे मुख्यत्वे करून चित्रपटातल्या 'भारतीय नारी रोल'च्या विरूद्ध बर्याचदा 'हायलायटींग' म्हणून वापरले जायचे. त्यामुळे चंद्रशेखर ते अमिताभ बच्चन यांसारख्या 'लिडींग' हिरोंबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून काम करून सुद्धा हेलनला खरे नाव व प्रसिद्धी ही तिच्या बर्याचश्या 'व्हॅम्प' व 'निगेटिव्ह' रोल्सनीच दिली. या अशा रोल्सची मागणी म्हणजे अतिश्य कमी कपडे व पडद्यावर उत्तेजक दृश्य... पण जन्मत:च सुंदर अशी हेलन कधीही कमी कपड्यात सुद्धा 'उत्तान' दिसली नाही. असे कपडे वापरताना नेहमी ती त्वचेशी मिळत्या जुळत्या रंगाच्या स्टॉकिंग्ज वापरायची. शिवाय चित्रपटाच्या सेट्स वर तिच्या अलिप्त राहण्याच्या स्वभावामुळे सुद्धा असे रोल्स करूनही तिला कोणत्याही बदनामीला किंवा गॉसिपला सामोरे जावे लागले नाही.
हेलन तिच्या काळात जबरदस्त प्रसिद्ध होती. रस्त्यावरून जाताना तिला कधीही उघड चेहर्याने बाहेर फिरता आले नाही. कायम काहीतरी मुखवटासदृश घालून वावरावे लागे. कारण तिचा चाहतावर्ग तिच्यासाठी अमर्याद वेडा होता.. (अवांतर - मी तर हेलनसाठी अजूनही प्रचंड वेडी आहे. टिव्हीवर कधीही 'डॉन' लागला तर त्यातलं तिचं "ये मेरा दिल यार का दिवाना..." हे गाणं मी अजिबात चुकवत नाही.)
१९५८ च्या 'मेरा नाम चिं चिं चू' पासून ते १९७० च्या दशकातील 'ये मेरा दिल प्यार का दिवाना' पर्यंत हेलनने चित्रपटसृष्टीवर 'कॅब्रे क्विन' म्हणून अधिराज्य गाजवले. तिच्यानंतर या चमकदार दुनियेत प्रवेशलेल्या बिंदुने थोडक्या व्हॅम्प रोल्स वर समाधान मानले. यथावकाश, कॅब्रे व व्हॅम्प रोल करणार्या हिरॉइन्सची लाट आली. अरूणा इराणी, पद्मा खन्ना यांसारख्यांनी हेलनची लॉबी बर्यापैकी डळमळीत केली.
१९७० च्या दशकात तिच्यानंतर नविन प्रवेशत्या झालेल्या नट्यांनी शरिरप्रदर्शनाची तयारी दाखवली तेव्हा हेलनची प्रसिद्धी बरीच खालावली व ती आर्थिक अडचणीतही सापडली. त्या काळात तिला साथ लाभली ती प्रसिद्ध लेखक सलिम खान यांची. जावेद अख्तर यांच्या बरोबर लिहित असलेल्या २ चित्रपटात उदा. इमान धरम, डॉन यात त्यांनी हेलनला चांगली भूमिका देऊ केली.
माझ्या वाचनात आलं की डॉन मधलं 'ये मेरा दिल प्यार का दिवाना..." हे गाणं जेव्हा हेलनने केलं तेव्हा ती चक्क ४० वर्षांची होती... (वाटते का चाळिशीची ? :अओ:)
हेलनच्या गाजलेल्या सर्व गाण्यांच्या यशात तिच्यासाठी गाणार्या गायिकांचे ही महत्व तितकेच आहे. 'मेरा नाम चिं चिं चू' व इतर बरीच गाणी गीता दत्तने, तर ६० च्या दशकात व ७० च्या दशकाच्या सुरवातीला आशा भोसले यांनी ही हेलनसाठी पार्श्वगायन केले. 'इन्तेकाम' मध्ये 'आ जानेजाँ' साठी लता..... आणि 'इन्कार' यातल्या प्रचंड गाजलेल्या 'तु मुंगळा मुंगळा..' साठी उषा मंगेशकर.
१९७३ मध्ये 'मर्चंट आयव्हरी' ची ३० मिनिटांची डॉक्यूमेंट्री फिल्म ""Helen, Queen of the Nautch Girls" ने हेलनची ओळख देशा-विदेशात बॉलिवूड मधली एक उत्तम आणि प्रसिद्ध डान्सर म्हणून करून दिली. आपल्यापैकी बर्याच जणांना माहिती नसेल, हेलन चे टोपणनाव होते "H-Bomb."
२००६ मध्ये हेलनच्या आयुष्यावर 'जेरी पिंटो' लिखित एक पुस्तक प्रकाशित झाले, त्याचं नाव होतं. "The Life and Time Of An H-Bomb" या पुस्तकात तिच्या चित्रपटसृष्टीतल्या एकूण कारकिर्दीवर प्रकाश टाकला गेला.
पुढे १९८० च्या दरम्याने ती सलिम खान यांच्याशी विवाहबद्ध झाली. सलिम खान हे आधीपासून विवाहीत होते. आजचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा त्यांचा मुलगा. हेलनला या कुटुंबात सुरूवातीला खूप त्रास झाला. पण सलमान आणि त्याचे इतर २ भाऊ कळत्या वयाचे झाल्यावर सर्व काही सुरळित सुरू झाले. हेलन आणि सलिम खान यांनी 'अर्पिता' नावाची मुलगी दत्तक घेतली.
अलिकडच्या काळात तिने सलमान खान बरोबर खामोशी-द-म्युझिकल, हम दिल दे चुके सनम इ. चित्रपटात काम केले.
हेलनचे गाजलेले डान्सिकल आयटम नंबर्स...
'पिया तू अब तो आजा, शोला सा मन बहके....' (कारवाँ)
'तिसरी मंझिल' चित्रपटातील 'ओ हसिना जुल्फोवाली जानेजहाँ...' हे गाणं 'रॉक अॅन्ड रोल' या संगीत प्रकारावर आधारलेलं होतं आणि ते प्रचंड गाजलं. या व्यतिरिक्त 'शोले' चित्रपटातलं "मेहबूबा मेहबूबा..." 'इन्तेकाम' मधलं "आ जानेजा..."'दिल अपना और प्रीत पराई' मधलं "ऊंई$$$ इतनी बडी मेहफिल...." हे गाणं विशेष गाजलं नाही, पण माझ्या प्रचंड आवडीचं. and the last but not the least... 'डॉन' मधलं evergreen "ये मेरा दिल, प्यार का दिवाना..."
हेलनने चित्रपटात आयटम सॉन्गच्या ट्रेन्डचा झेंडा त्याकाळी फडकवला आणि आज ही तो कायम आहे. आजच्या आघाडीच्या अभिनेत्र्या सुद्धा अजूनही तिची गाजलेली गाणी व त्यावरचे डान्स हे इंटरनॅशनल स्टेज शोज मध्ये सादर करतात. हेलनच्या विग पासून ते हेवा वाटावा अश्या तिच्या वॉर्डरोबपर्यंत सर्व काही अत्यंत प्रभावी होतं आणि त्याचा प्रभाव आजही चित्रपटसृष्टीवर आणि तिच्या चाहत्यांवर आहे.
एवार्डस -
१९७९ - फिल्मफेअर बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस - लहू के दो रंग
१९९८ - फिल्मफेअर लाईफटाईम अचिव्हमेंट एवॉर्ड.
२००९ - पद्मश्री सन्मान.
*********************************************
तळटिप : सर्व माहीती व फोटोग्राफ्स पुस्तक आणि आंतरजालावरून साभार.
*********************************************
दक्षे, तुझी लेखणी सध्या बहरात
दक्षे, तुझी लेखणी सध्या बहरात आहे. लेख सुरेख झाला आहे. हेलनबद्दल बर्याच नवीन बाबी या लेखातून कळल्या. हेलन कधी उत्तान वाटली नाही यास पुर्ण अनुमोदन. (गुमनाम मधील तिचं वनपीस बिकिनी मधलं गाणं... इस दुनियामे जिना हो तो....) अभिनेत्री म्हणूनही हेलनची कामगिरी चांगली होती यात शंका नाही. त्या काळी हेलनच्या आयटम सॉन्गशिवाय सिनेमा बनुच शकत नाही अशी वंदता होती.
या लिखाणासाठी तुझं अभिनंदन !!! (बाय द वे, गायिका झाली, नृत्यांगना झाली, नाऊ हू इज नेक्स्ट ? )
मस्त लिहिलयस दक्षे कौतुक,
मस्त लिहिलयस दक्षे
कौतुक, दक्षी सुरैयावरुन हेलनवर आली, पुढचा लेख बहुतेक दुर्गा खोटेवर लिहिणार असेल!
सुरेख लेख
सुरेख लेख
दक्षे, आपल्याकडुन तुला एक
दक्षे, आपल्याकडुन तुला एक जंगी पार्टी याबद्दल
झकास..., आता असाच एक बहारदार लेख शशिकलावर पण लिही ना.
वा दक्षे..लेख मस्त जमलाय...आज
वा दक्षे..लेख मस्त जमलाय...आज मायबोलीवर आल्याचे सार्थक झाले..:)
दक्षे मस्त लेख हेलनबद्दल
दक्षे मस्त लेख
हेलनबद्दल बर्याच नवीन बाबी या लेखातून कळल्या.
कौतूकला अनुमोदन.
दक्षे, फार छान लेख !!
दक्षे, फार छान लेख !!
मास्टर गोपिकृष्णांची मुलाखत बघितली होती. त्यात ते म्हणाले होते की, हेलन एकमेव अशी नर्तकी आहे जिला मादकता दाखवण्यासाठी उगाच ओठ दाताखाली चावा वगैरे प्रकार करावे लागत नाहीत. तिचा मुद्राभिनयच असा जबरद्स्त असतो.
आशाबाईंची तर 'फेवरीट' डान्सर होती हेलन. "पिया तूSSS" किंवा "ओ हसिना" मधला तिचा डान्स विसरणं शक्यच नाही. "लहु के दो रंग" मधे तिने खरच सुंदर अभिनय केला होता. त्यासारख्या आणखी काही भूमिका तिला मिळायला हव्या होत्या. "गुमनाम" मधे देखिल तिचा मुद्राभिनय बघण्यासारखा आहे. त्यामानाने "हम दिल... " मधे बरीच कृत्रिम वाटली ती. असो.
दक्षे, तू हा छान उपक्रम घेतला आहेस, कालच्या गायिका, अभिनेत्रींवर लिहिण्याचा. याच सदरात आणखी बर्याचजणांबद्दल वाचायला मिळेल अशी आशा. पुढच्या लेखाची वाट बघतोय. पुलेशु.
दक्षे, एकदम सहि.. आवशीक
दक्षे, एकदम सहि..
खुश होतली.. 


आवशीक वाचुन देखवला पहिजे, तिका आजच्या आयटम नट्यांपेक्षा(?) नेहमीच हेलन वरचढ वाटली हा..
हेलन कधी उत्तान वाटली नाही >>> अनुमोदन..
आता एक लेख लिव की मधुबालावर.. तुका हवीतर माहिती देती तिची..
रूपल्या, लिवतसंय वायच धीर
रूपल्या, लिवतसंय वायच धीर धर.. हयल्या लोकांका आजिर्ण होवाक नुको
दक्षे, आधी सुरैया आणि आता
दक्षे, आधी सुरैया आणि आता हेलन. मस्त
मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही दक्षे तुझे हे लेख वाचून. तुझ्यात प्रतिभा आहे हे माहित होतं नक्कीच, फक्त वेळ काढून लिहीत रहा.
>>पण जन्मत:च सुंदर अशी हेलन कधीही कमी कपड्यात सुद्धा 'उत्तान' दिसली नाही.
अगदी, अगदी. १०१% सहमत. आयटम साँग हा प्रकार श्रवणीय असण्याबरोबरच प्रेक्षणीय करण्याचं श्रेय संपूर्णपणे हेलनला जातं.
>>माझ्या वाचनात आलं की डॉन मधलं 'ये मेरा दिल प्यार का दिवाना..." हे गाणं जेव्हा हेलनने केलं तेव्हा ती चक्क ४० वर्षांची होती... (वाटते का चाळिशीची ?
मलाही धक्का बसला. ३० ची वाटते जेमतेम.
>>झकास..., आता असाच एक बहारदार लेख शशिकलावर पण लिही ना.
मलाही तसंच वाटतं. हेलन नंतर शशिकला, बिंदू आणि ललिता पवार वर लिहीशील का?
अवांतरः सुरैयावरच्या लेखापेक्षा ह्या लेखाचा फ्लो आवडला
दक्षिणा, छान लिहिले
दक्षिणा,
छान लिहिले आहेस.
हेलन चे बर्माहून भारतात स्थलांतर इतक्या सहजासहजी नाही झाले. अनेक दिवस निबिड अरण्यातून पायी वाटचाल करत तिचे कुटुंब भारतात आले. त्या काळात त्यांच्याकडे फक्त पेलाभर तांदूळ होते, रोज ते शिजवून ते फक्त पेज पित आणि तांदूळ सुकवून दुसर्या दिवशी वापरत (या आठवणी तिनेच लिहिल्या होत्या.)
गुमनाम मधे , इस दुनिया मे जीना होतो सुनलो मेरी बात आणि इंतकाम मधले ओ जाने जा, हि लताने तिचासाठी गायलेली गाणी.
शिकार नावाच्या सिनेमात ती नृत्यांगना रागिणी बरोबर, तूमको पिया दिल दिया, या गाण्यावर तूफान नाचलीय. (रागिणीला केवळ तिची बहीण पद्मिनीच टक्कर देऊ शकत असे.)
तसेच, दो बदन प्यार कि आग मे जल गये, एक चमेली के मुंडवे तले, हे गाणे पण तिच्यावरच चित्रीत झालेत.
मला वाटते, उपासना नावाच्या सिनेमात, ती अंगभर साडीत वावरलीय.
अर्पिता ची कहाणी अजून करुण आहे, पण ती इथे नको.
फारच छान लेख. हेलनला लाईफटाईम
फारच छान लेख. हेलनला लाईफटाईम अचीवमेंट चा फिल्मफेअर मिळालाय हे ज्ञात होतं.... पण तिला बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेसचा अॅवॉर्डही मिळालाय हे या निमित्ताने कळालं.
राखी सावंत्,माझा आदर्श ''हेलन'' आहे असं म्हणते तेव्हा तिच्यातली दांभिकता उघडी होते.... हा लेख वाच म्हणावं तिला.....
खूप आवडला लेख....... मंदारशी सहमत... ह्या लेखाचा फ्लो फार छान आहे.
आपली लेखणी निरंतर बहरत राहो.
सुंदर लेख हेलन आणि
सुंदर लेख
हेलन आणि दारासिंगवर चित्रीत आशा भोसले यांनी गायलेले "ठाकूर जर्नलसिंग" या चित्रपटातील "हम तेरे बिन जीना सकेंगे सनम, दिल कि ये आवाज है....." हे प्रणय गीतहि नितांत सुंदर आहे.
दक्षिणा, तुम्ही लिहिलेला हेलन
दक्षिणा,
तुम्ही लिहिलेला हेलन वरचा लेख अगदी योगायोगाने वाचनात आला. खूप छान पद्धतीने संकलित केलेली माहिती, फोटो यामुळे लेख रंगतदार झालाय, रंगीबेरंगी सदराला शोभेल असाच.
तरूण वयात काही स्वप्नातल्या पर्या असतात, (ज्या स्व्प्नातच राहतात आणि त्यांनी स्व्प्नात राहणंच योग्य असतं.) हेलन ही आमच्या काळातल्या अशा पर्यांमधली एक, जिच्यासाठी काही काही सिनेमा परत परत पाहिले होते. उदा. ’तीसरी मंझिल’, शम्मी कपूर, गाणी आणि हेलन यासाठी ८ वेळा पाहिला होता. लेखात तुम्ही एका ठिकाणी अगदी बरोबर म्हटलंय, की जुन्या सिनेमात हेलन उत्तान कधीच वाटली नाही. पुढच्या काळात काही अपवाद सोडले तर. उदा. ‘मुंगडा’ हे गाणं. हे गाणं पाहताना हेलनला कराव्या लागलेल्या तडजोडीबद्दल मला खूप वाईट वाटलं होतं. मेरे हुजूर या चित्रपटात तिला राजकुमार बरोबर एक गाणं आहे. ’यह जुल्फ अगर खुलके बिखर जाए तो अच्छा’. या गाण्याचा उल्लेख, तिचं एक वेगळं गाणं म्हणून व्हायला हवा.
माझी बायको पूर्वी म्हणायची की तिला हेलन सारखी सडसडीत फिगर बनवायची आहे.
अर्थात् ही गोष्ट अंमलात आली नाही हे माझं नशीब. हो ! नाहीतर मला देखील त्या काळातल्या धर्मेंद्र सारखी बॉडी बनवून शम्मीकपूर सारखं ‘रॉक अॅन्ड रोल’ करावं लागलं असतं.
इथेच थांबतो, नाहीतर लेखापेक्षा प्रतिसाद लांबलचक व्हायचा. (झालाच आहे म्हणा !)
P.S.
लेख लिहून जुन्या आठवणी ताज्या केल्यात त्यासाठी धन्यवाद.
परंतु, मला या लेखाची लिंक न पाठविल्याबद्दल मात्र नाराजी व्यक्त करतो.
माझ्या वि.पू. मध्ये ’इथे रिक्षा ना बंदी आहे’ अशी (पुणेरी) पाटी लावलेली नाही.
उल्हासकाका, प्रतिसाद आवडला
उल्हासकाका, प्रतिसाद आवडला
आणि संपूर्ण सहमत.
>>नाहीतर मला देखील त्या काळातल्या धर्मेंद्र सारखी बॉडी बनवून शम्मीकपूर सारखं ‘रॉक अॅन्ड रोल’ करावं लागलं असतं.
मग दक्षिणाने तुमच्यावर देखील लिहीला असता लेख........नै नै...ती बायांवर लिहीत्ये......मीच लिहीला असता
>>माझ्या वि.पू. मध्ये ’इथे रिक्षा ना बंदी आहे’ अशी (पुणेरी) पाटी लावलेली नाही
मस्त लेख !
मस्त लेख !
दक्षे मस्त जमलाय लेख!! खूपशी
दक्षे मस्त जमलाय लेख!! खूपशी नवी माहिती मिळाली..
हेलन ला मात देऊ शकेल अशी कोणीही अजूनतरी पडद्यावर अवतरलेली नाहीये..
दक्षे, छान लेख! >> बाय द वे,
दक्षे, छान लेख!
>> बाय द वे, गायिका झाली, नृत्यांगना झाली, नाऊ हू इज नेक्स्ट ?
टुणटुण!
>> बाय द वे, गायिका झाली,
>> बाय द वे, गायिका झाली, नृत्यांगना झाली, नाऊ हू इज नेक्स्ट ?
टुणटुण>>>>>>>>>
रच्याकने, टुनटुन ही गायिका होतीच की.
उमादेवी. ( मेरे पिया गये रंगून )
हेलनची एवढीच गाणी? मेरे पिया
हेलनची एवढीच गाणी?
मेरे पिया गए रंगून साठी पडद्यावर निगार सुलताना आनि आवाज शमशाद बेगमचा.
उमादेवीने गायलेले गाणे अफसाना लिख रही हूं दिले बेकरार का
आंखों में रंग भरके तेरे इंतजार का
हेलनचा १ फोटो खुपच सुरेख आहे.
हेलनचा १ फोटो खुपच सुरेख आहे.
मस्त लेख ! उल्हासकाका, तुमचा
मस्त लेख !

उल्हासकाका, तुमचा आख्खा प्रतिसादच भन्नाट आहे
दक्षिणा, खुप छान लिहिलयस.
दक्षिणा, खुप छान लिहिलयस.
दक्षे, हेलन माझ्या आवडत्या
दक्षे, हेलन माझ्या आवडत्या नट्यांपैकी एक (नटी अशासाठी की नृत्याबरोबर ती मुद्राभिनयात पण निपुण होती). मला ती प्रचंड आवडायची/आवडते. बर्याच ज्ञात नसलेल्या गोष्टी तुझ्या लेखाच्या निमित्ताने कळल्या.
आताच्या सो-कॉल्ड हिरॉईन्स तिच्याकडुन एक टक्का जरी घेवु शकल्या तरी नशीब त्यांच.
अवांतर -
माझ्या वि.पू. मध्ये ’इथे रिक्षा ना बंदी आहे’ अशी (पुणेरी) पाटी लावलेली नाही - काका ही पाटी पुणेरी असली तरी लावणारे लोक पुणेरी असतातच अस नाही. माझ्या पाहण्यात तरी पुण्याबाहेरचे लोकच जास्त ह्या पाटीचा उपयोग करतात.
हेलनचा १ फोटो खुपच सुरेख आहे.
हेलनचा १ फोटो खुपच सुरेख आहे. >> दक्षे तू सुद्धा असा फोटो काढून घ्यायला हरकत नाही.
लेख सुंदरच झालाय.. पुर्वी घरी दुरदर्शन असायचे तेव्हा रविवारी रंगोली हा प्रोग्राम असायचा अन त्यात हेलनचं एखादं गाणं हमखास हसायचं.
पिया तू अब तो आजा... ! ... अप्रतिम गाणं.
दक्षे.. छान लिहिलं आहेस. सुरीली सुरैय्या , हेलन .. आता कोण ?
दक्षिणा, कुप छान लेख आहे
दक्षिणा,
कुप छान लेख आहे तुमचा. आता सुरय्या पण वाचायला हवा.
दक्षे मस्तच लेख
दक्षे मस्तच लेख
छान लिहिलयस!!!
छान लिहिलयस!!!
दक्षे एकदम झक्कास लिहिल्येस..
दक्षे एकदम झक्कास लिहिल्येस..
हेलन मलाही भारी आवडायची. तेव्हा चित्रपटात तिचे एकतरी गाणे असायचेच. रविवारी संध्याकाळी चित्रपट पाहिला की दुस-या दिवशी माझ्या आईच्या शेजारणीशी दुपारी ज्या गप्पा चालत त्यात हेलनने घातलेले कपडे हा विषय असायचाच असायचा. कसली कसली पिसे खोवलेले आणि अजुन काय काय त-हेने रंगवलेले तिचे कपडे आणि नंतरच्या चित्रपटातला तिचा मेकप हा खास चर्चेचा विषय असायचा. आणि वर हे सगळे त्या बयेलाच शोभते, दुस-याने केले तर आचरटपणा वाटेल ही टिप्पणी
हेलनने सुरवातीला सोज्वळ भुमिकाही केल्यात. दो बदन प्यार की आग मे जल गये, एक चमेलीके मंडवे तले' सोडुन 'हम हिंदुस्तानी' या चित्रपटातही तिची सोज्वळ भुमिका आहे. तिला अशा भुमिकेत बघुन मला तेव्हा धक्काच बसला होता...
धरम-हेमाच्या तुम हसिन मै जवान मध्येही तिचा थोडासा अनग्लॅमरस असा रोल आहे. ती एका मुलाची आईही दाखवलीय त्यात
बाकी सगळीकडे मात्र मी तिला डान्सर म्हणुनच पाहिलीय. किचकवध या मराठी सिनेमात गोपीकृष्णाबरोबर नाचलीय.
दक्षे, झकास लेख!! लई म्हंजे
दक्षे, झकास लेख!! लई म्हंजे लईच आवड्या
आपल्या चित्रित होणारे गाणे असेल तर आवर्जून येऊन सांगणारी एकमेव कलाकार असा तिचा उल्लेख आशाबाईंनी केला आहे.
नव्या डॉनमधले करिनाचे 'ये मेरा दिल' हेलनच्या ओरिजिनल कामाच्या जवळही जात नाही, त्याहूनही भकास प्रकार म्हंजे, उर्मिलाचे नवे 'मेहबूबा-मेहबूबा'.
Pages