अक्षर अंगण
८४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढल्या महिन्यात ठाणे येथे भरत आहे. उणापुरा एकच महिना बाकी आहे. जोरदार तयारी चालू आहे. आणि बहरते आहे एक सुंदर अक्षर अंगण. या अंगणात तुमचे हार्दिक म्हणतात तसं स्वागत आहे.
काय आहे हे अक्षर अंगण?
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ठाणे परिसरातली तरुणाई एकत्र येते आहे. रोज संध्याकाळी ही मंडळी ठाण्याच्या ग्रंथसंग्रहालयात जमा होतात. नवनवीन मनसुबे आखतात. त्यातूनच ही एक अनोखी कल्पना पुढे आली. भव्य मासुंदा तलावाच्या काठी, ग्रंथसंग्रहालयाच्या गच्चीत, मोकळ्या आकाशाखाली, एक अंगण बनले. चक्क सारवलेले एक अंगण. खाटा, सतरंज्या वगरे पसरून लोक इन्फ़ॉर्मली जमतात. बाजूला एक तुळशी वृंदावन. त्याला लागूनच छानशी मोठ्ठी रांगोळी वगैरे एकदम प्रॉप्पर अंगण साकारलंय. आणि संध्याकाळी एक मैफ़ल भरते. रोज एक साहित्यिक ठरतो. म्हणजे समजा पु लं...! तर येणारे लोक जमेल तसं पु लं चं वाचून बिचून येतात. आणि मग गप्पा टप्पा. त्यांची पुस्तकं. त्यांच्या लिखाणाचा बाज. त्यांचे किस्से. असं कोणाचं भाषण बिषण नाही. एकदम इन्फ़ॉर्मल गप्पा. संध्याकाळ रंगते. आणि मग त्या गप्पांची नशा चढलेले लोक आपाआपल्या घरी जातात ते दुसर्या दिवशीच्या कवीची तयारी करायलाच.
कधी केव्हा आणि कुठे असणार हा कार्यक्रम ?
अहो असा रोज चालणार आहे हा कार्यक्रम. तुम्ही पण यायचंय. निदान ठाण्याच्या जवळपासच्या लोकांनी. ठाणे स्टेशनच्या अगदी जव्वळ, पाच मिंटांवर , रम्य अशी तलावपाळी आहे. तिच्या काठावरच ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाची भव्य पाच मजली (! मराठी पुस्तकांचा खजिना !) इमारत आहे. (विश्वप्रसिद्ध झणझणीत मामलेदार मिसळ मिळते ना त्याच्या शेजारी) तिच्या गच्चीत हा कार्यक्रम चालणार. रोज संध्याकाळी ६.३० ते ८.००. रविवारी मात्र संध्याकाळी ५.०० ते ७.०० .
अहो पण गच्चीत कार्यक्रम ? पाऊस आला तर ? हल्ली येतो संध्याकाळचा म्हणुन विचारतो. पाऊस आला तर ?
भिजाच्चं ! पाऊस आला तर भिजाच्चं !कार्यक्रम न थांबवता भिजायचं . काही लगेच आजारी बिजारी पडत नाही. कवितांच्या कार्यक्रमाला येऊन पावसाला घाबरता ? अशांनी नकाच येऊ ! येणार्यांनी फ़क्त पुस्तकांना प्लास्टिक पिशवी बघा. कारण ती मात्र आजारी पडतात. नाजुक असतात ती. आणि हो! दुसरी नाजुक गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल. त्याला कार्यक्रम सुरू होण्यापुर्वीच बंद करून प्लास्टीकच्या पिशवीत पर्समध्ये डांबून टाका. कृपया जमेलेले सर्व लोक आपले रिंगटोन ऐकायला जमलेले आहेत असा गोड गैरसमज करून घेऊ नये.
ठाण्यात डासांचं कसं काय ? उघड्यावर कार्यक्रम करता म्हणून विचारलं हो !
अज्याबात डास नाहीत (असं कोण म्हणेल ?). तसा धूप बीप असणारच. पण डास फ़ारसे नाहीत. आणि आलेच तर टाळ्या वाजवायच्या. तेवढंच कविता वाचणार्याला प्रोत्साहनही होईल.
बरोबर कुणी मित्र मैत्रीण आलं तर चालेल ना ?
चालेल विचारता ? धावेल ! अहो आनंदच आहे की. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जास्तीत जास्त जेन्युईन रसिक मंडळी जमा व्हावीत अशी इच्छा आहे. तेव्हा बिनधास घेऊन या . अगदी मोठ्ठं लटांबर असलं तरी चालेल. मात्र त्यांना सर्वांना साहित्यात इंटरेस्ट असावा. बस्स ! खरं तर या कार्यक्रमाचा मूळ उद्देशच समव्यसनी लोकांना एकत्रित करणं हा आहे. त्यांच्या आपापसात ओळखी व्हाव्या. तेव्हा अगदी शोधून शोधून, आग्रह करकरून आणा.
याचं काही तिकिट बिकिट ? पैसे ? वर्गणी ?
फ़ुक्कट. एकदम विनामूल्य. नो मनी. फ़क्त मन. मनापासून सहभाग हाच आमचा आनंद.
मात्र एक विनंती आहे. तुम्ही ८४ व्या अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलनाला जास्तीत जास्त देणगी देऊन संमेलन यशस्वी करायला हातभार लावावा ही अपेक्षा आहे. त्यासाठी याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या कार्यालयात संपर्क साधावा. अगदी १० रुपयांपासून ते २५ लाखांपर्यंत कितीही देणगी देऊ शकता.
ठाण्यापासून लांब रहाणार्यांनी काय करावं भौ ?
तसं तर ऊरण, पनवेल, बदलापूर, वसई, व्हिटी असे लांबलांबचे लोक साहित्य प्रेमाखातर येतातच.
पण जर का तुम्ही खुपच लांब रहाता, दुसर्या गांवात रहाता आणि तरी असा कार्यक्रम हवाय तुम्हाला तर सांगा. आपण पुणे , नागपूर, नाशिक असं प्रत्येक गांवोगांवी कार्यक्रम करायचं ठरवतोय. आपला नंबर आणि गांव कळवा. पुण्यात दर रविवारी कार्यक्रम होणार आहे. आणि १९ डिसेंबरला भव्य ई वर्ले अक्षर कार्यक्रम होत आहे. १८ डिसेंबर ला नाशिकला भव्य कार्यक्रम ठरतो आहे. नागपूर, औरंगाबाद असेही कार्यक्रम ठरताहेत. तुमच्याही गांवात करुया की. अगदी महाराष्ट्राबाहेर, देशाबाहेरही करू.
फ़क्त सांगा.
आणि जर ठाण्याच्या कार्यक्रमाला यायचंय तर ... तरीही कळवा...
८४ वं अखिल भारतीय साहित्य संमेलन गाजणार आहे. आपण गाजवायचंय. एकदम तरूण चेहरा. धमाल. फ़ुल्ल टाईमपास. अख्खं स्टेडियम तरूणांच्या ताब्यात असणार आहे.
मुख्य साहित्य संमेलनात भाग घेऊ इच्छिणार्या तरूण मंडळींनी आधी आपली झलक या अंगणांत दाखवावी अशी अपेक्षा आहे. म्हणजे मुख्य व्यासपिठावर निवडीसाठी थोडं सोपं जाईल.
तर भेटुया.
संपर्क
सुमन परब(09820112526)
किंवा
मकरंद सावंत( 08082044004)
किंवा
नामकाका ( 9869674820)
किंवा
मयूरेश चव्हाण (९९८७४३३६८७)
--
ई साहित्य प्रतिष्ठान
दिनांक साहित्यिक
21.11.10 ज्ञानेश्वर
22.11.10 पु. ल. देशपांडे
23.11.10 व. पु. काळे
24.11.10 बहिणाबाई
25.11.10 बा. सी. मर्ढेकर
26.11.10 आरती प्रभू
27.11.10 बी कवी
28.11.10 श्री. ना. पेंडसे
29.11.10 कुसुमाग्रज
30.11.10 वि. स. खांडेकर
01.12.10 शांता शेळके
02.12.10 अशोक नायगांवकर
03.12.10 ग्रेस
04.12.10 सुरेश भट
05.12.10 भालचंद्र नेमाडे
06.12.10 ग. दि. माडगुळकर
07.12.10 विंदा (गोविंद विनायक करंदिकर)
08.12.10 चंद्रशेखर गोखले
09.12.10 अरुण कोलटकर
10.12.10 नामदेव ढसाळ
11.12.10 प्रविण दवणे
12.12.10 ना. धॊं. महानोर
13.12.10 वसंत बापट
14.12.10 बालकवी
15.12.10 मंगेश पाडगांवकर
16.12.10 जी. ए. कुलकर्णी
17.12.10 स्वा. सावरकर
18.12.10 नारायण सुर्वे
19.12.10 उत्तम कांबळे
छान वृत्तांत!
छान वृत्तांत!
अक्षर अंगण - १ डिसेंबर -
अक्षर अंगण - १ डिसेंबर - शान्ता शेळके - वृत्तांत
कार्यक्रम स्थळी जाताना सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी उद्वाहकातच हातात पुस्तकांचा भारा सांभाळीत एक तरुण व तरुणी भ्रमणध्वनी वाचनात मग्न असा एक तरुण चढले, तेव्हा आज बर्याच वाचनवेड्यांची गाठ पडणार आणि कार्यक्रम छान होणार अशा खुणा दिसायला लागल्या. उद्वाहक पाचव्या मजल्यावर पोचताच गच्चीचे बंद दार पाहून पुस्तकधारी तरुणतरुणी आश्चर्यचकित झाले. मग कुणा कुणाला फ़ोन , ’असा काय हा’ इ. सोपस्कारानंतर तरुणीने पुन्हा उद्वाहकातून अवगाहन केले. दोघेही तरुण संवादात गुंतले (आपापल्या भ्रमणध्वनींवर). काही वेळाने तरुणी अवतीर्ण झाली, सोबत ग्रंथसंग्रहालयाचा कर्मचारी चाव्यांचा गुच्छ घेऊन. त्याच्या येण्याने क्षणात सगळीकडे दिव्य प्रकाश पसरला, सगळी बंद दारे उघडली. मी आणि माझ्यासोबतचे उल्हास भिडे यांना आमच्या वयाकडे बघून एका सभागृहात पंख्याची हवा खात बसविण्यात आले.
साडेसहाची मुहूर्तघटिका टळून जात आहे, असे पाहून आम्ही तरुणीने आमच्या सोबतीस ठेवलेली शान्ताबाईंची तसबीर घेऊन गच्चीकडे प्रयाण केले. तिथे आमच्या सुदैवाने खाटा किंवा सतरंजी नव्हती तर खुर्च्याच होत्या, तुळशी वृंदावनाभोवती वर्तुळाकार मांडलेल्या. एकीकडे सुंदर रांगोळी आणि रांगोळीनेच रेखलेली शान्ताबाईंची नामाक्षरे. मंडळी येऊ लागली होती आणि एकमेकांशी किंवा भ्रमणध्वनीशी गप्पा न मारता चक्क तिथे ठेवलेली शान्ताबाईंची पुस्तके चाळू लागली. इतक्यात तिथे मायबोली भूषण कविराज मयुरेश चव्हाण यांचे आगमन झाले , स्वत: नुकतेच खरेदी केलेले समीक्षेविषयीचे पुस्तक फ़डकावीत. मायबोलीकरांच्या जहाल गप्पा कानावर पडल्या तर, आजूबाजूचे वाचक अतिरेक्यांना पाहून दचकावेत तसे दचकत होते. बहुतांश खुर्च्या भरतील इतकी मंडळी होऊनही कार्यक्रम काही सुरू होत नव्हता. मग सातच्या नव्या मुहूर्तावर ती तरुणी आपल्या शेजारी बसलेल्या महिलेला ’आजच्या कार्यक्रमाची सुरुवात तुझ्या गाण्यानेच कर’ असा आग्रह करू लागली. ती महिलाही आग्रहाची परतफ़ेड ’नको गं , तू गा’ अशी करू लागली. शेवटी महिलेने स्वत:च्या वयाचा किंवा अन्य कशाचा मान राखून आपल्या जवळच्या (म्हणजे स्वत:च्या नव्हे हो, ठामग्रंसंच्या) पुस्तकातून गाणे शोधायला सुरुवात केली. स्वत:चे अत्यंत आवडते गाणे ’मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश’ हे गाणे पुस्तकात पाहून अत्यंत सुरेल, सादर केले. गाणे झाल्यावर त्याबद्दलचा (शान्ताबाईंना गाणे कसे सुचत नव्हते, मग हृदयनाथ व लताबाई त्यांच्या मागे पुढे उभे राहिले आणि काय लिहिले की शान्ताबाईंनी गाणे)हा पं हृदयनाथ मंगेशकरांनी सांगितलेला किस्सा सांगितला.( पंडितजी सध्या गाणी रचीत नसल्याने किस्से रचतात का?)
मग त्या पुस्तकधारी तरुणीने (आता सगळी पुस्तके जमलेल्या मंडळींच्या हातात विसावलेली) आधी स्वत:ची आणि मग शान्ताबाईंची ओळख करुन दिली. त्यांचे संपूर्ण नाव (मला ज-जनार्दन हे आजच कळले, कसला मी शान्ताबाईंचा फॅन?) जन्मतारीख, शिक्षण, त्यांनी केलेल्या नोकर्या, हाताळलेले लेखनप्रकार व पुस्तकांची नावे, त्यांची गाजलेली गीते, त्यांना मिळालेले पुरस्कार इ. बायो डेटा वाचून दाखवला. त्यांचे वाचून झाले आहे अशी शंका येताच मी त्या स्वत:चे नाव शांता नाही तर शान्ता असे लिहायच्या आणि ते का हे सांगून माझे ज्ञान पाजळले. मग आता पुढे कोण काय बोलणार याची सगळेच जण वाट पहात असताना, त्या तरुणी बरोबर मघा उद्वाहकात भेटलेल्या पुस्तकधारी तरुणाने आपल्याकडच्या कागदांच्या गुंडाळ्यातुन शान्ताबाईंचा(त्याच शान्ताबाईंचा, तोच) बायोडेटा फ़क्त स्वत:ला व शेजारच्या दोघातिघांना ऐकू येईल एवढ्या आवाजात वाचला. तो तरुण 'त्या' तरुणीपासुन थोडा लांब बसलेला असल्याने त्याला तरुणीने वाचलेले ऐकू आले नसावे अशी मी माझी समजूत करून घेतली. पुन्हा कुणाच्या चेहर्यावर हा बोलतोय का अशा खुणा दिसताहेत का ते पाहून झाल्यावर मी माझ्याकडच्या कात्रणांतून शान्ताबाईंनी लिहिलेल्या स्वत:च्या वाचनाविषयी आणि त्यांच्या एकंदरित पुस्तक व कविताप्रेमाविषयीचे परिच्छेद वाचून दाखवले. त्यावरून 'त्या' तरुणीलाही स्फ़ूर्ती आली, व त्यांनी मी त्यांना दिलेल्या(गाणे निवडण्यासाठी) माझ्या संग्रहातल्या 'तोच चंद्रमा' या पुस्तकातला मीच खुणा करुन ठेवलेला परिच्छेद वाचला. आता इथे तोंड उघडण्यात माश्या किंवा मच्छर तोंडात जाण्याचा धोका नाही अशी खात्री पटलेले काही वाचक शान्ताबाईंच्या कविता वाचून दाखवू लागले. उल्हास भिडे यांनीही पुरेसा आग्रह मिळाल्यावर एक कविता वाचून दाखवली. आता त्यांच्या शेजारी बसलेली व्यक्ती ’वाहवा, क्या बात है’ अशा उद्गारांनी (माझ्यासाठी) लक्षणीय ठरु लागली होती. माझी आणि श्री मयुरेश चव्हाण यांची कुजबूज त्यांना खटकत असल्याचेही दिसत होते. दोनदा वाचल्या गेलेल्या बायोडेटामधुन सुटलेल्या शान्ताबाईंच्या अनुवादकार्याची आणि त्यांनी हायकू मराठीत कसे आणले याची मी नोंद करविली. माझ्या स्मरणातील दोन हायकू म्हटले.
देवळातली प्रचंड घंटा नाद धजे ना करू
तिच्या कडेवर गाढ झोपले
एक फ़ुलपाखरू
हे शब्द म्हणताना श्रोतृगणाचे चेहरे पाहून मी जपानी तर बोलत नाही ना अशी मलाच शंका आली.
एका कॉर्पोरेट महाशयांनी शान्ताबाईंचा नेटवरून शोधून प्रिंट केलेला इंग्रजीतला बायोडेटा वाचला. तो ज्यांना मराठी कळत नाही अशा उपस्थितांसाठी आहे असे माझे ,मयुरेश यांचे व माझ्या दुसर्य़ा बाजुला बसलेल्या गृहस्थांचे एकमत झाले.
मग पुन्हा एक गाणे. गाणे चालू असताना मी व मयुरेश बोलत असल्याचे पाहून ते ’वाहवा क्या बात है गुरुजी’ आपल्या जागेवरुन उठले व मयुरेशना उठवून माझ्या शेजारी बसले. माझ्याकडच्या शान्ताबाईंच्या कविता उतरवलेल्या जुन्या पुराण्या कागदांबद्दल त्यांनी आपले कुतूहल दर्शविले. शान्तबाई या व्यक्ती आणि लेखिका कवयत्रीबद्दलचे आणखी दोन उतारे(सुधीर मोघे व डॉ नीलिमा गुंडी यांनी लिहिलेले )मी वाचले . कुठूनतरी एक कविता व एक लेख वाचला गेला (दोन्ही शान्ताबाईंचेच). आता वाहवा गुरुजी दाद देण्याच्या टॉप गिअर मध्ये पोचले होते. मला पुन्हा एक कविता वाचण्यास सुचविले. मी सुरु करणार तोच, गायिका महिलेने त्यांना घरी जायची घाई असल्याने आपले शेवटचे गाणे सादर करणार असल्याचे सांगितले आणि केलेही. त्यांचे पुरेसे कौतुक झाल्यावर वाहवा गुरुजींनी त्यांच्या चार वर्षांच्या कन्येचे कार्यक्रम ऐकल्याबद्दल व डबा पाडून पार्श्वसंगीत दिल्याबद्दल कौतुक केले आणि मग तिच्या (म्हणजे त्या चार वर्षांच्या कन्येच्या) कविता ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. कवयत्रीच्या आईने तत्परतेने आपल्या भ्रमणध्वनीत मुद्रित केलेले अगदी स्फ़ुरत असलेले कन्यामुखातील काव्य ऐकवले.(जे ऐकू येणे अशक्य होते) व पुरेशा कौतुकानंतर निरोप घेतला.(नवजात पालकांना सूचना : त्यांनी आपल्या घरात बिग बॉस प्रमाणे जागोजागी कॅमेरे लावून रेकॉर्डींग करीत रहावे. कधी आपला कुलदीपक/दीपिका कोणत्य कलेचा अविष्कार करील, सांगता येत नाही.)
मग उल्हास भिडे यांनी जमलेल्यांमध्ये किती जण इंग्रजी माध्यमात शिकले आहेत अशी विचारणा केली व मराठीच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्याला कॉर्पोरेट महाशयांनी आपल्या मुलाला मराठी अंक कळत नाहीत असे सांगुन दुजोरा दिला, तर गावांतून नोकरी शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणांनी `असे’, फ़क्त ५ टक्के अभिजनांना वाटते. ९५ टक्के बहुजन मराठीत आता कुठे लिहू लागलेत असे मत मांडले.
आता ओळखसमारंभ करावा असे वाहवा गुरुजींचे फ़र्मान आणि ते माझ्या शेजारी असल्याने माझ्यापासूनच सुरुवात. नुसते नाव आणि गाव सांगून त्यांचे समाधान न झाल्याने मी माझे काव्यवाचन (म्हणजे इतरांच्या कविता आपण मनात वाचणे, आपल्या कविता इतरांना वाचून दाखवण्याचे नव्हे) आणि काव्यलेखन कसे सुरु झाले हे तिखट मीठ चाट मसाला लावून सांगितले. अशीच ओळख परेड चालू होती. जाणवले ते हे की जे लिहितात ते वाचतातच असे नाही. (अपवाद श्री मयुरेश चव्हाण). ओळख परेड मध्येच विविधगुणदर्शनाचे रुप घ्यायची, तर कधी नेटवर्किंगचे .मग कुणाचीतरी स्वरचित कविता, पुलंचे गणगोत कुणाच्या मुखातून , कुणा मान्यवरांचे पत्ते असे करत हा कार्यक्रम संपला.
वाहवा गुरुजींनी आपली ओळख काही करून दिली नाही, व आम्हीही विचारली नाही (मी व उल्हास, बाकीच्यांना असावी).
मध्ये चहापानही झाले. मी त्याचा लाभ घेतला नसल्याने वार्याने पायावर येउन आपटणारे चहाचे रिकामे पेले, एवढाच माझा त्याचा संबंध.
अशा प्रकारे हा अत्यंत सुनियोजित रित्या केलेला कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
पूर्ण कार्यक्रमात वाहवा गुरुजींनी केव्हातरी शान्ताबाईंचे चारचौघी हे पुस्तक छान एवढे सांगितल्याचे स्मरते. शान्ताबाईंचे त्यांनी एवढेच लिखाण वाचले असावे, आणि माझ्याकडच्या हस्तलिखित कविता, या कार्यक्रमात वाचल्या, त्या. रसिक म्हणुन कसे नाव कमवावे या शिक्षणाचा लाभ मज पामरास झाला.
स्वगृही पोचल्यावर, श्री मयुरेश यांच्याकडून, आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी दुसर्यांदा शान्ताबाईंचा बायोडेटा फ़क्त स्वत:ला ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजात वाचणार्या तरुणाकडे होती ही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
तीन वेळा शान्ताबाईंचा bio data वाचला जाऊनही त्यात त्यानी साहित्य संमेलनाचे अध्य्क्षपद भूषविले होते हे न आल्याने व मलाही ते न आठवल्याच्या पापाचे जेवण न जेवता झोपी जाऊन माझ्या परीने मी परिमार्जन केले.
श्री मयुरेश यांचा आवाहनाला मान देऊन आणखी मायबोलीकर या कार्यक्रमास आले तर वाहवा गुरुजींना कार्यक्रम गच्चीवर ठेवल्याचा पश्चात्ताप होऊ शकेल याची त्यांनी (मयुरेश यांनी) नोंद घ्यावी.
----------------------------------------------------
या कार्यक्रमाचा उद्देश तरुणांना मराठी साहित्यिकांची ओळख/माहिती व्हावी असा आहे, हे अलीकडे वर्तमानपत्रांत वाचलेल्या वृत्तांतांवरून कळले. त्या वृत्तांतात आणि कार्यक्रमाच्या इमेलद्वारे आलेल्या आमंत्रणात 'विं.दा. करंदीकर' हा आणि तत्सम उल्लेख वाचून त्याची खरेच गरज आहे हे पटले. पुस्तकांची ओळख पुढे होत राहील अशी आशा करूया.
हे राम !
हे राम !
गुर्जी
गुर्जी
हायला! मज्जाय की!!
हायला!
मज्जाय की!!
भरत मयेकर, भयानक हसले!
भरत मयेकर,
भयानक हसले!
Pages