अक्षर अंगण

Submitted by ट्यागो on 19 November, 2010 - 23:15

अक्षर अंगण

८४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढल्या महिन्यात ठाणे येथे भरत आहे. उणापुरा एकच महिना बाकी आहे. जोरदार तयारी चालू आहे. आणि बहरते आहे एक सुंदर अक्षर अंगण. या अंगणात तुमचे हार्दिक म्हणतात तसं स्वागत आहे.

काय आहे हे अक्षर अंगण?

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ठाणे परिसरातली तरुणाई एकत्र येते आहे. रोज संध्याकाळी ही मंडळी ठाण्याच्या ग्रंथसंग्रहालयात जमा होतात. नवनवीन मनसुबे आखतात. त्यातूनच ही एक अनोखी कल्पना पुढे आली. भव्य मासुंदा तलावाच्या काठी, ग्रंथसंग्रहालयाच्या गच्चीत, मोकळ्या आकाशाखाली, एक अंगण बनले. चक्क सारवलेले एक अंगण. खाटा, सतरंज्या वगरे पसरून लोक इन्फ़ॉर्मली जमतात. बाजूला एक तुळशी वृंदावन. त्याला लागूनच छानशी मोठ्ठी रांगोळी वगैरे एकदम प्रॉप्पर अंगण साकारलंय. आणि संध्याकाळी एक मैफ़ल भरते. रोज एक साहित्यिक ठरतो. म्हणजे समजा पु लं...! तर येणारे लोक जमेल तसं पु लं चं वाचून बिचून येतात. आणि मग गप्पा टप्पा. त्यांची पुस्तकं. त्यांच्या लिखाणाचा बाज. त्यांचे किस्से. असं कोणाचं भाषण बिषण नाही. एकदम इन्फ़ॉर्मल गप्पा. संध्याकाळ रंगते. आणि मग त्या गप्पांची नशा चढलेले लोक आपाआपल्या घरी जातात ते दुसर्‍या दिवशीच्या कवीची तयारी करायलाच.

कधी केव्हा आणि कुठे असणार हा कार्यक्रम ?

अहो असा रोज चालणार आहे हा कार्यक्रम. तुम्ही पण यायचंय. निदान ठाण्याच्या जवळपासच्या लोकांनी. ठाणे स्टेशनच्या अगदी जव्वळ, पाच मिंटांवर , रम्य अशी तलावपाळी आहे. तिच्या काठावरच ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाची भव्य पाच मजली (! मराठी पुस्तकांचा खजिना !) इमारत आहे. (विश्वप्रसिद्ध झणझणीत मामलेदार मिसळ मिळते ना त्याच्या शेजारी) तिच्या गच्चीत हा कार्यक्रम चालणार. रोज संध्याकाळी ६.३० ते ८.००. रविवारी मात्र संध्याकाळी ५.०० ते ७.०० .

अहो पण गच्चीत कार्यक्रम ? पाऊस आला तर ? हल्ली येतो संध्याकाळचा म्हणुन विचारतो. पाऊस आला तर ?

भिजाच्चं ! पाऊस आला तर भिजाच्चं !कार्यक्रम न थांबवता भिजायचं . काही लगेच आजारी बिजारी पडत नाही. कवितांच्या कार्यक्रमाला येऊन पावसाला घाबरता ? अशांनी नकाच येऊ ! येणार्‍यांनी फ़क्त पुस्तकांना प्लास्टिक पिशवी बघा. कारण ती मात्र आजारी पडतात. नाजुक असतात ती. आणि हो! दुसरी नाजुक गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल. त्याला कार्यक्रम सुरू होण्यापुर्वीच बंद करून प्लास्टीकच्या पिशवीत पर्समध्ये डांबून टाका. कृपया जमेलेले सर्व लोक आपले रिंगटोन ऐकायला जमलेले आहेत असा गोड गैरसमज करून घेऊ नये.

ठाण्यात डासांचं कसं काय ? उघड्यावर कार्यक्रम करता म्हणून विचारलं हो !

अज्याबात डास नाहीत (असं कोण म्हणेल ?). तसा धूप बीप असणारच. पण डास फ़ारसे नाहीत. आणि आलेच तर टाळ्या वाजवायच्या. तेवढंच कविता वाचणार्‍याला प्रोत्साहनही होईल.

बरोबर कुणी मित्र मैत्रीण आलं तर चालेल ना ?

चालेल विचारता ? धावेल ! अहो आनंदच आहे की. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जास्तीत जास्त जेन्युईन रसिक मंडळी जमा व्हावीत अशी इच्छा आहे. तेव्हा बिनधास घेऊन या . अगदी मोठ्ठं लटांबर असलं तरी चालेल. मात्र त्यांना सर्वांना साहित्यात इंटरेस्ट असावा. बस्स ! खरं तर या कार्यक्रमाचा मूळ उद्देशच समव्यसनी लोकांना एकत्रित करणं हा आहे. त्यांच्या आपापसात ओळखी व्हाव्या. तेव्हा अगदी शोधून शोधून, आग्रह करकरून आणा.

याचं काही तिकिट बिकिट ? पैसे ? वर्गणी ?

फ़ुक्कट. एकदम विनामूल्य. नो मनी. फ़क्त मन. मनापासून सहभाग हाच आमचा आनंद.

मात्र एक विनंती आहे. तुम्ही ८४ व्या अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलनाला जास्तीत जास्त देणगी देऊन संमेलन यशस्वी करायला हातभार लावावा ही अपेक्षा आहे. त्यासाठी याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या कार्यालयात संपर्क साधावा. अगदी १० रुपयांपासून ते २५ लाखांपर्यंत कितीही देणगी देऊ शकता.

ठाण्यापासून लांब रहाणार्‍यांनी काय करावं भौ ?

तसं तर ऊरण, पनवेल, बदलापूर, वसई, व्हिटी असे लांबलांबचे लोक साहित्य प्रेमाखातर येतातच.

पण जर का तुम्ही खुपच लांब रहाता, दुसर्‍या गांवात रहाता आणि तरी असा कार्यक्रम हवाय तुम्हाला तर सांगा. आपण पुणे , नागपूर, नाशिक असं प्रत्येक गांवोगांवी कार्यक्रम करायचं ठरवतोय. आपला नंबर आणि गांव कळवा. पुण्यात दर रविवारी कार्यक्रम होणार आहे. आणि १९ डिसेंबरला भव्य ई वर्ले अक्षर कार्यक्रम होत आहे. १८ डिसेंबर ला नाशिकला भव्य कार्यक्रम ठरतो आहे. नागपूर, औरंगाबाद असेही कार्यक्रम ठरताहेत. तुमच्याही गांवात करुया की. अगदी महाराष्ट्राबाहेर, देशाबाहेरही करू.

फ़क्त सांगा. Happy

esahity@gmail.com वर.

आणि जर ठाण्याच्या कार्यक्रमाला यायचंय तर ... तरीही कळवा...

esahity@gmail.com वर.

८४ वं अखिल भारतीय साहित्य संमेलन गाजणार आहे. आपण गाजवायचंय. एकदम तरूण चेहरा. धमाल. फ़ुल्ल टाईमपास. अख्खं स्टेडियम तरूणांच्या ताब्यात असणार आहे.

मुख्य साहित्य संमेलनात भाग घेऊ इच्छिणार्‍या तरूण मंडळींनी आधी आपली झलक या अंगणांत दाखवावी अशी अपेक्षा आहे. म्हणजे मुख्य व्यासपिठावर निवडीसाठी थोडं सोपं जाईल.

तर भेटुया.

संपर्क

सुमन परब(09820112526)

किंवा

मकरंद सावंत( 08082044004)

किंवा

नामकाका ( 9869674820)

किंवा

मयूरेश चव्हाण (९९८७४३३६८७)
--
ई साहित्य प्रतिष्ठान


दिनांक साहित्यिक

21.11.10 ज्ञानेश्वर
22.11.10 पु. ल. देशपांडे
23.11.10 व. पु. काळे
24.11.10 बहिणाबाई
25.11.10 बा. सी. मर्ढेकर
26.11.10 आरती प्रभू
27.11.10 बी कवी
28.11.10 श्री. ना. पेंडसे
29.11.10 कुसुमाग्रज
30.11.10 वि. स. खांडेकर
01.12.10 शांता शेळके
02.12.10 अशोक नायगांवकर
03.12.10 ग्रेस
04.12.10 सुरेश भट
05.12.10 भालचंद्र नेमाडे
06.12.10 ग. दि. माडगुळकर
07.12.10 विंदा (गोविंद विनायक करंदिकर)
08.12.10 चंद्रशेखर गोखले
09.12.10 अरुण कोलटकर
10.12.10 नामदेव ढसाळ
11.12.10 प्रविण दवणे
12.12.10 ना. धॊं. महानोर
13.12.10 वसंत बापट
14.12.10 बालकवी
15.12.10 मंगेश पाडगांवकर
16.12.10 जी. ए. कुलकर्णी
17.12.10 स्वा. सावरकर
18.12.10 नारायण सुर्वे
19.12.10 उत्तम कांबळे

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नी, नक्की या! वाट पाहतोय! मोस्ट्ली दर गुरूवारी आलात तर बरेच;
माझ्याकडे आहे त्यादिवशीचे नियोजन, सोबत माझ्या आवडत्या साहित्यिकांवर चर्चाही.
25.11.10 बा सी मर्ढेकर, 02.12.10 अशोक नायगांवकर, 09.12.10 अरुण कोलटकर, 16.12.10 जी ए कुलकर्णी!

तसे, आज पोर्णिमेच्या मुहुर्तावर अक्षर-अंगण सुरू होतेय, ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवावर भाष्य करीत!

वा वा मस्त उपक्रम, मन:पूर्वक शुभेच्छा Happy
तिथे असते तर नक्कीच आले असते...जमेल तेव्हा येऊच. इथे ही माहिती कळवल्याबद्दल धन्यवाद.

शुभेच्छांबद्दल मनापासून आभार.
आज पुलंप्रेमींसाठी विशेष गप्पा!
मग येता गप्पांमधे सहभागी व्हायला?

अक्षर अंगण कार्यक्रम
दिवस पहीला २१.११.१०
ज्ञानेश्वर

२९ दिवसीय अक्षर अंगण कार्यक्रमाचे पहिले पुष्प आज संत ज्ञानेश्वरांचे ओवले गेले. (सुनिल सामंत) नामकाकांच्या (सुनिल सामंत) ’घनू वाजे घुणघुणा, वारा वाजे रुणझुणा’ या गाण्यावरील सुरेल बासरीवादनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यांच्या सुरेल वादनानेच म्हणून की काय, काही वेळातच चक्क मुसळधार पाऊस पडला!
सभागृहात कार्यक्रमाला परत एकदा सुरूवात करताना बासरीवर परत एकदा मोगरा फुलला. सर्व उपस्थितांच्या ओळखीनंतर संत ज्ञानेश्वर लिखीत पैल तो गे काऊ कोकताहे, अवचिता परमळू, पांडुरंग कांती, अरे अरे ज्ञाना झालासी पावन या गीतांची, अभंगांची आठवण निघाली. सर्व जगाच्या आनंदाचा सुखसमृद्धीचा विचार करणार्या पसायदानाला जगाचं गीत म्हणता येऊ शकेल असाही विचार पुढे आला. भूता परस्परे जडों मैत्र जीवाचे... इतका उदात्त विचार पुन्हा होणे नाही. ज्ञानेश्वर, त्यांचं छोटंसंच पण खडतर आयुष्य, निव्वळ माणसांतच नव्हे तर अवघ्या प्राणीमात्रांत मैत्र असावं अशी अनोखी त्यांची विश्वबंधुत्वाची भावना अशा विविध पैलूंवर गप्पा झाल्या.
ह्या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष श्री. पां. के. दातार यांच्या विशेष उपस्थितीसह तरूण वर्गाचीही उत्साही उपस्थिती लाभली. या तरूणांमधे कविता लिहीणारे, आवडणारे, काहीही न कळणारे, साहित्याबद्दल फक्त कुतूहल असलेले होतेच. आणि यात फिजिक्स, शेतकी, आयटी, फायनान्स, असे विविध विषय शिकणारे व करीअर करणारे तरूण उपस्थित होते.

अक्षर अंगण कार्यक्रम
दिवस दुसरा २२.११.१०
पु ल देशपांडे

२९ दिवसीय अक्षर अंगण कार्यक्रमाचे दुसरे पुष्प ओवले गेले, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे. पुलंची विनोदी लेखक म्हणून असलेली प्रतिमा सर्वप्रसिद्ध आहेच. पुलंच्या हसर्‍या अक्षरांतलं अंगण आज बहरलं. पुलंच्या विनोदी लेखनापासून सुरू झालेल्या गप्पा, त्यांची बहुश्रुतता, त्यांची अफाट व्यक्तिचित्रणं, प्रवासवर्णनं या त्यांच्या खासियतींची स्टेशनं घेत पूर्णत्वास पोचल्या. पुलंच्या स्तुतीवरच या गप्पा मर्यादित न रहाता, पुलंच्या साहित्यिक मर्यादा, त्यांच्यावर इतर लेखकांनी केलेलं विरोधी मतप्रदर्शन यांनाही स्पर्श करणारी अशी चौफेर झाल्या. पुलंची सामाजिक जाणीव, त्यांचं लेखनाशिवायचं संगीत, सिनेमा, दूरदर्शन अशा विविध कार्यक्षेत्रातलं भरीव काम याचीही आठवणही प्रत्येकानी काढली.
श्री. मकरंद सावंत ही त्यांच्या पुस्तकांमधील विविध उतार्‍यांचं वाचन केलं. यांनी पुलंवर झालेल्या साहित्यिक टिकेचा समाचार घेतला. टिव्हीला दूरदर्शन हे नाव पुलंनीच दिल्याची नवीन माहिती यानिमित्ताने समोर आली. सुमन, भारती,सुजाता, किरण यांनी सजवलेलं तुळशी वृंदावन व रांगोळीने वातावरण मंगलमय झालं होतं. सुजय परांजपे यांच्या पेटीवादनाने थेट पुलंची व त्यांच्या नाटकांची आठवण करून दिली. नंतर पुलंच्या नाच रे मोरा या प्रसिद्ध बालगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

आज अक्षर अंगण कार्यक्रम
दिवस तिसरा २३.११.१०
व.पु.काळे, वेळ- सायं. ०६.३० ते ८.३०.
आज वपुप्रेमींसाठी गप्पांची मेजवानी. मग येताय ना? Happy

अरेच्चा मी पाहीलाच नव्हता हा धागा.
व्वा! छान उपक्रम आहे. शुभेच्छा.

रक्च्याकने, तरुणांसाठी आहे ना हे अक्षर अंगण? मग आम्हाला नो एंट्री का? Proud

अक्षर अंगण : व पु काळे

व पु काळेंच्या कथांनी ज्ञान मिळतं पण ते जे मिळालं ते इतक्या सहजपणे की ज्ञान हे इतक्या सहजासहजी मिळू शकेल यावर विश्वासच बसत नाही. मी फ़क्त मनोरंजनासाठी कथा कादंबर्‍या वाचत असे. पण व पु वाचता वाचता मी कधी गंभीर वाचनाकडे वळलो ते माझं मलाच कळलं नाही. असे उद्गार होते तरूण मंडळींचे. अत्यंत सोपे मराठी वापरून, छोट्या छोट्या वाक्यांतून अत्यंत गहन अशा तत्त्वज्ञानाकडे पोहोचवण्याची हातोटी असणारे व पु हे एकमेवच यावर सर्वांचे एकमत झाले.
दिवस २३ नोव्हेंबर २०१०, स्थळ ठाण्याचं मराठी ग्रंथसंग्रहालय. निमित्त ८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाअंतर्गत आयोजित केल्या गेलेल्या अक्षर अंगणचे. अक्षर अंगणातले ज्ञानेश्वर आणि पुलं यांनतरचे तिसरे पुष्प होते व पु काळे. उपस्थितांत बहुतांश तरूण हे वपुंचे भक्त होते. फ़ॅनच्याही पुढची अवस्था म्हणता येईल असे भक्त. पण त्यांची भक्ती आंधळी नव्हती. वपुंच्या लिखाणातल्या मध्यमवर्गीय मर्यादांचं डोळस भान असूनही ते वपुंचे भक्त होते. वपुंच्या कथांचं वाचन, त्यांच्या कादंबर्यांचं सार आणि वपुर्झातली त्यांची मौलिक वचनं यांचं वाचन, मनन आणि स्मरण लोकांनी केलं. वपुंना प्रत्यक्ष पहाणारे एक दोघेच होते. त्यांनी आपले अनुभव कथन केले.
वपुंवरून विषय आपोआप वळला तो भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरीकडे. आणि भाऊसाहेबांच्या शायरीत नितिन केळकर यांनि सर्वांना नशेचा प्रत्ययच दिला. भाऊसाहेबांच्या शायरीला वन्स मोर देता देता तीन तास कसे गेले कळलेच नाही.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु सुमन परब हिने केले. सर्वच उपस्थित तरूणांनी गप्पांत मनसोक्त भाग घेतला.


अक्षर अंगण : बहिणाबाई

दिनांक २५ नोव्हेंबर रोजी ठाण्याच्या ग्रंथसंग्रहालयात बहिणाबाईच्या रसाळ ओव्यांचे सूर घुमले. एक महिना चालणार्‍या अक्षर अंगणात विषय होता बहिणाबाईंच्या कविता. अहिराणीवर प्रेम करणारे अनेक तरूण तरुणी जमले होते. बहिणाबाईंच्या अतिशय सहज साध्या उदाहरणांतून जीवनातल्या महत्त्वाच्या समस्यांवरचे भाष्य अनेकांना अचंबित करून गेले. सासू, सून, नणंद अशा नात्यांवरची त्यांची एक कविता सर्वांचे मन हेलावून गेली. त्यांनी बहिणाबाईंच्या तर कविता सादर केल्याच पण अहिराणी भाषेतील अनेक अप्रसिद्ध कवींच्याही जुन्या कविता वाचल्या किंवा गायल्या. कविता आणि ओव्या या खानदेशांतील घराघरांतल्या चुलींपाशी कायम रेंगाळत आल्याचा प्रत्यय या गप्पांतून आला.
याच तरूणांपैकी एक सुजय परांजपे यांच्या आजीने बहिणाबाईंच्या ओव्यांचा आस्वाद घॆणारे पुस्तक लिहीले होते. त्यातील काही परिच्छेदांचे वाचन करण्यात आले. सुमन परब यांनी गायलेल्या मन वढाय वढाय, गाण्याने सुरू झालेला कार्यक्रम शाहीर कुंदन कांबळे यांनी गायलेल्या अरे संसार संसार या गीताने समाप्त झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष नार्वेकर यांनी केले.

@हंसा, सगळ्यांसाठी खुले व्यासपीठ आहे हे.. वाचक घडवणे हा मूळ हेतू. Happy
हंसा, अखी शुभेच्छांबद्दल आभार!

आजच्या गप्पा अर्बन्/आधुनिक कवी बा.सी. मर्ढेकरांवर. गेला हप्ताभर मर्ढेकरांच्या सव्वाशेभर कविता तीन-चारदा वाचून झाल्यात पण या ओळी काही केल्या डोक्यातुन सुटत नाहीत. Happy


आलो क्षणिचा विसावा म्हणून;
टेकले पायः
तो तुच हटकलेस 'कोण?' म्हणून.
आणि मनातले शिणलेले हेतू
शेण झाले.

- बा. सी. मर्ढेकर!

असो, आपल्या सहभागाची वाट पाहतोय. Happy

अरे, हा धागा पाहिला नव्हता! मस्त आहे उपक्रम! Happy
शुभेच्छा आणि सांग्रसंगीत माहिती येऊदेत, वाचायला आवडेल.

गड्या, मार्केटिंगवाला शोभलास. तुझ्या ट्रेनिंग नीड्स मध्ये objections handling आल असेल तर तुझ्या बॉस ला सांगतो की याला ट्रेनी म्हणुन नको तर ट्रेनर म्हणुन बोलवु.

बिअर च लक्षात आहे.

अक्षर अंगण- बा सी मर्ढेकर

अक्षर अंगणमधले पाचवे पुष्प आज ओवले गेले बाळ सीताराम मर्ढेकरांचे. ८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना अंतर्गत गेले ४ दिवस होत असलेल्या या कार्यक्रमात आज मराठीत काव्यात मॉडर्निझम आणणारे कवी मर्ढेकर चर्चिले गेले. दिड दोन तास उत्तरोत्तर रंगत गेलेल्या चर्चेत वेळ कसा गेला ते कळलेच नाही.
श्री. राजा रावळ यांनी त्यांच्या कॉलेजमधे रमेश तेंडुलकरांकडून मर्ढेकर शिकत असतानाच्या आठवणी जागवल्या. मर्ढेकरांच्या कवितेतली शब्दकळा नवी होती, त्यांची जाणीव नवी होती, ती नुसतीच न वाचता अनुभवायला हवी; असं मत त्यांनी मांडलं. त्यांच्या कवितेत जुन्या आणि नव्याचा ताळमेळ दिसतो. मर्ढेकरांनी मराठी कवितेत मॉडर्निझम आणताना, पूर्णपणे नवी सुरूवात न करता जुन्या प्रवाहालाच पुढे नेले. आणि दोन्हीतील उत्तम ते घेऊन मराठी कविता समृद्ध केली. याचं उत्तम उदाहरण म्हणजे “ सर्वे जन्तु रुटिनाः, सर्वे जन्तु निरामयाः. सर्वे छिद्राणि पंचन्तु, या कश्चित दुःख लॉग भवेत्.” या ओळी होत. तेव्हा परभाषेतले शब्द मराठीत घेताना ते आपलेसे केले पाहिजेत आणि मग ते मराठीच्याच व्याकरणात चालवले पाहिजेत; हा बोध घेण्यासारखा असल्याचं मत श्री. नितीन केळकर यांनी मांडलं. श्री. आशिष पवारने त्याच्या स्वच्छ आणि खुल्या आवाजात मर्ढेकरांची फलाटदादा फलाटदादा ही कविता सादर केली. मग त्यावर चर्चेच्या फैरीच झडल्या. या कवितेत फलाटदादा हे कसले रुपक? फलाटाची तटस्थता हतबलतेतून की सर्वज्ञतेतून? इथे कवींच्या व्यक्तित्वात अडकून त्याला थेट देवाच्या जागी न ठेवता कवितेचं डोळस वाचन व विचार करावा, असा महत्वाचा विचार आशिष ने मांडला. “आशयाचा तूच स्वामी शब्दवाही मी भिकारी” ह्या शब्दांत प्रत्येक कवीचं मनोगत लिहून जाणार्या मर्ढेकरांनी खूप मोठं आणि कालातीत लिहून ठेवल्याचा प्रत्यय सर्वांनाच आला.
मर्ढेकरांच्या पिपात मेले ओल्या उंदिरवर सर्वंकष चर्चा यानिमित्ताने होऊ शकली हे ही या कार्यक्रमाचे फलितच. मर्ढेकरांसारख्या महत्वाच्या लेखकाच्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या उपलब्ध नसण्याबाबत सखेद आश्चर्यही व्यक्त करण्यात आले.

शैलजा, भरत, अंजु, नितीन आपले आभार!
आज आरती प्रभू (चिंतामणी त्रंब्यक खानोलकर) यांच्या साहित्यावर गप्पा!
मग येताय ना?

चांगला धागा. कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा.
वर लिहीलेले वृत्तांत वाचले त्यावरून सादर होणारे कार्यक्रम पण खूप छान होत असणार हे जाणवले.

२९.११.१०
अक्षरांच्या माध्यमातून अवघ्या जगाला गवसणी घालणारे नाशिककर कवी श्री. विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हा आजचा अक्षर अंगण उपक्रमाचा हा नववा दिवस. ८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतर्गत होत असलेला अक्षर अंगण उपक्रम उत्तरोत्तर वाढणार्या प्रतिसादात सादर होत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात आल्हाद ने “कणा” ही कविता वाचून केली. खरंतर कविता असलेल्या आणि नंतर गीत झालेल्या “वेडात मराठे वीर दौडले सात” चं सादरीकरण कवितेच्या अंगाने अतिशय उत्तमरीत्या केलं. “पन्नाशीची उमर” या कवितेचं सादरीकरण योगेश सांगळे यांनी रोखठोकपणे केलं. मुंबईच्या बेफाट गर्दीत पिचून जाणर्या समस्त कर्त्या पुरूषांना सारथी असं विशेषण लावणारी “कलोजस” ही कविता, सरकारच्या निर्लज्ज नाकर्तेपणावर विनोदातून कोरडे ओढणारी “राजा आणि मंत्री”, रंगमंचीय उल्लेखांने भारलेल्या “नाटक”, “खुर्च्या” या कविता आणि “नाटक” ही चारोळीही सादर झाली.
राजा रावळ यांनी कुसुमाग्रजांचं माणूस म्हणून जगणं किती साधं आणि हृद्य होतं हे विशद केलं. नाटककार आणि कवी ह्या दोन्ही आघाड्या तयारीनं सांभाळणार्या कुसुमाग्रजांच्या कवितेतील नाटक आणि नाटकातील काव्य ह्यांतील आंतरसंबंधांचं आल्हादने विवेचन केलं. याशिवाय “सातवा”, “अनामवीरा”, “आगगाडी आणि जमीन”, “ स्मृती” याही कविता उपस्थितांनी सादर केल्या.
संजीव सामंत यांनी सर्वात्मका हे नाट्यगीत सादर केलं. फडक्यांनी संगीतबद्ध केलेली “काही बोलायचे आहे” ही कविता गाऊन कार्यक्रमाचा समारोप केला.

३०.११.१०
८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाअंतर्गत होत असलेल्या अक्षर अंगण या उपक्रमाचे आजचे दहावे पुष्प होतं, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णु सखाराम खांडेकरांना वाहिलेले. १९४१ सालच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार्या वि. स. खांडेकरांप्रती हा दिवस साजरा झाला. खांडेकरांच्या लेखनात जागोजागी आढळून येणार्या आदर्शवादापासून चर्चेस आणि त्यांच्या लेखनातील निवडक उतार्यांच्या वाचनास सुरूवात झाली. खांडेकरांचं जन्मनाव गणेश आत्माराम खांडेकर असे होते. ते पुढे दत्तक गेल्यानंतर त्यांचं नाव विष्णु सखाराम खांडेकर झाले. खांडेकरांची भाषा जशी अभिजात होती तशीच त्यांनी योजिलेल्या उपमा आणि रुपकं सुद्धा. साहित्य हे करमणुकीसह मनुष्यास प्रेरणादायी व जगणं समृद्ध करेल असंच हवं या मताचे ते खंदे पुरस्कर्ते होते. ते जीवनवादी होतेच पण सौंदर्यवादास विरोधी ही नव्हते.
गप्पा चालू असतानाच श्री. नितीन केळकर यांनी भ्रमणध्वनीवरून कोल्हापूरच्या श्री. राम देशपांडे यांच्याशी संपर्क साधला. श्री. राम देशपांडे हे काही काळ खांडेकरांचे लेखनिक होते. त्यांनी फोनवरून खांडेकरांच्या आठवणी जाग्या केल्या. ययाति कादंबरीची संकल्पना पार १९२७ सालापासून खांडेकरांच्या मनात घोळत होती. पण व्यवस्थित अभ्यास, मनन, चिंतन केल्याशिवाय लेखनास हात न घालणे हा खांडेकरांचा विशेष असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पुढे शेवटच्या काळात दृष्टि गेल्यावर खांडेकरांची अभ्यासाची व कामाची पद्धत कशी बदलली ते ही सांगितलं. खांडेकर निवर्तले तेव्हा सोनेरी स्वप्न भंगलेली या कादंबरीचे काम शेवटच्या टप्प्यात आले होते. ही कादंबरी खांडेकरांपश्चात अपूर्ण स्वरूपातच प्रसिद्ध झाली. तेव्हा या कादंबरीचा शेवट वाचक त्यांच्या मतीप्रमाणे करायला मोकळे आहेत.
कार्यक्रमाच्या शेवटास खांडेकरांचे आयुष्य, त्यांचा दैववाद, साहित्य त्यांचं कवितालेखन यावरही चर्चा झाली. नेटकर लेखक, कवी, साहित्यातील जाणकार यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्तमरित्या संपन्न झाला.

मी काही दिवस कामानिमित्त बाहेर असल्याने, कार्यक्रमास उपस्थीत नसल्याने वृत्तांकन बंदच होते, माफी.

आज शांताबाईंच्या कविता व साहित्यावर चर्चा! कालच उल्हास भिडे व भरत मयेकरांनी फोन करून कार्यक्रमास उपस्थीत राहण्याची बातमी दिली. आपल्याही सहभागाच्या प्रतिक्षेत! Happy

अक्षर अंगण- शांताबाई शेळके

८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाअंतर्गत ठाण्यात संपन्न होत असलेल्या अक्षर अंगण कार्यक्रमाचं आजचं अकरावं पुष्प शांताबाई शेळक्यांना अर्पण. “मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश” हे सुप्रसिद्ध गाणे सौ. निकीता भागवत यांनी आपल्या सुरेल आवाजात गाऊन कार्यक्रमाची सुरूवात केली.

शांताबाईंनी आपले नाव नेहमी शान्ता असेच, अनुस्वाराऐवजी अर्धा न वापरुन, लिहीले यामागे त्यांच्यावर असलेला रवीकिरण मंडळाचा प्रभाव होता. किंवा त्यांनी डॉ. वसंत अवसरे असे पुरूषी टोपणनावानेसुद्धा गीतलेखन केलं आहे अशी विस्मयजनक माहिती यानिमित्ताने श्री. भरत मयेकर यांनी आज सर्वांना दिली. इंग्रजी रहस्यकथांपासून जपानी हायकू आणि चिनी कवितांपर्यंत विविध साहित्यप्रकारांचे विपुल अनुवाद केले. शांताबाई अवघ्या महाराष्ट्राला जरी चित्रपट गीतलेखिका आणि कवयित्री म्हणूनच जरी फक्त माहिती असल्या तरी त्यांनी कादंबरी, कथा, ललित व बालसाहित्य असं विविधरंगी लेखनही केलेलं आहे. याशिवाय त्यांनी पत्रकार आणि प्राध्यापक म्हणूनही काम केलेलं आहे. रात्रीच्या दाट अंधारात अचानक पसरलेल्या चंद्रप्रकाशानं चिमण्यांनी दिवस झाला असं समजून चिवचिवावं असं चांदणं म्हणजे “चिमण चेटकं चांदणं”. ह्या व अशा अनेक जुन्या व अर्थवाही शब्दांचा प्रचंड संग्रह त्यांच्यापाशी होता.

सुमन परब हिने ब्रज आणि मराठी अशा दोन्ही भाषांतल्या ओळी असलेलं ना मानो तो हे गाणं गायलं. अमोल शिंदे यांनी “गिचमीड” या कवितेचं सुंदररित्या वाचन केलं. श्री. संजीव सामंत, श्री. अनंत, श्री. मुकुंद करकरे, श्री. योगेश सांगळे, मयुरेश चव्हाण, आनंद, प्रसाद, आल्हाद यांनी गप्पांमधे सक्रिय भाग घेतला. मराठीचं भविष्य, इंग्रजीचं अतिक्रमण या विषयांवरही चर्चेला आज वाट मिळाली.

वसंत अवसरे हे टोपणनाव होते ? नक्की?
स्मरणयात्रा या कार्यक्रमाच्या निवेदनातील माहिती अशी की त्यावेळी कुठल्यातरी परिषदेच्या काहीतरी शासकीय निर्बंधामुळे शांताबाईंना गीते लिहून देण्याची परवानगी नव्हती, म्हणुन त्यांनी फॅमिली डॉक्टरांच्या नावाने रुपास भाळलो मी आणि जे वेड मजला लागले ही गाणी पाठवली आणि त्यांना पुरस्कार मिळाला.
(चु.भू.द्या.घ्या)

मयूरेश रोज वाचते आहे हाँ वृत्तांत. धन्यवाद टाकत राहिल्याबद्दल.

अरेच्चा! ही नवीनच माहीती.. थँक्स!
वाचताय.. बरे वाटले ऐकून, सक्रिय सहभाग ठेवाल एखाद कार्यक्रमास अशी अपेक्षा!
आभार!

मयुरेश,
आज हा धागा पाहिला. चांगला उपक्रम आहे. पु. लं. वरचा बाफ वाचला. त्यात एक चुकीची माहिती आहे. दूरदर्शन हे नाव पु. लं. नी दिलेलं नाही. वास्तविक त्यांचा या नावाला विरोध होता. पुढे त्याचं 'दुर्दर्शन' होइल,असाही टोमणा त्यांनी मारला होता. मात्र दूरदर्शन वरील पहीला कार्यक्रम त्यांनी सादर केला. त्यांनी सुचवलेलं नाव 'प्रकाशवाणी' असं होतं. आकाशवाणीशी जुळणारं.
त्यांनीच हे कुठेतरी लिहीलं आहे. संदर्भ मिळाल्यावर लगेच पोस्टीन.

मयुरेश कालच्या गप्पांमध्ये असेच सांगितले होते. की शांताबाईंनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीचे नाव तिथे दिले. वृत्तांत लेखकांना शब्दमर्यादा कमी पडली असावी.

Pages