मी आणि नवा पाऊस

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

२००७ च्या साप्ताहिक सकाळ कथास्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकात असलेली कथा. जुन्या मायबोलीवरून इथे परत.
---------------------------------------------------------------------------------
‘‘कधी येणार तुझा मित्र?’’ प्रश्न आला आणि माझी तंद्री मोडली. पावसाळा सुरू व्हायच्या आधीची वेळ. उन्हाची तलखी, मळभ, मधूनच सुटणारा वारा.... सगळं एकाकी, एकटं वाटायला लावणारं. अश्यात मी विद्यापीठात दुपारच्या वेळेला बसस्टॉपवर उभी होते आणि येणारी प्रत्येक बस सोडत होते. प्रश्नकर्त्या आवाजाचा मालक बहुतेक विद्यार्थी असावा डॉक्टरेटचा. त्याशिवाय का मे महिन्याच्या शेवटी शेवटी विद्यापीठात आलाय हा.
"मित्र?" माझा प्रश्न
"येणारी प्रत्येक बस सोडत, उन्हाची इथे उभी दिसलीस गेला तास दिड तास.. तेव्हा मित्रच असणार !"
मी हो-नाहीच्या मधलंच हसले.
"सांगू नकोस. हरकत नाही. पण मला बोलावसं वाटलं म्हणून आलो."
सांगावं का याला... मी इथे एका विभागात शिकवते. व्हिजिटींग फॅकल्टी आहे आणि पेपर तपासायला आले होते. होतं असं. अजूनतरी कधी कधी मी शिक्षक न वाटता विद्यार्थी वाटते. बरंय ना... कशाला फोडा फुगा!
"मी समोरच्या डिपार्टमेंटचा विद्यार्थी. डॉक्टरेट करतोय."
हंऽऽ वाटलंच!
"कंटाळा आलाय सतत काम करायचा. हळूहळू या विद्यापीठाच्या बाहेरचं जगच माहित नाहीसं होणारे डॉक्टरेट पूर्ण होईतो अशी भीति वाटायला लागलीये. गैरसमज करून घेऊ नकोस पण तू माझ्या रोजच्या माहौलच्या बाहेरची वाटलीस त्यामुळे बोलावसं वाटलं."
आमचा नाट्यविभागच विद्यापीठाच्या शैक्षणिक माहौलपेक्षा वेगळा होता.
"काही हरकत नाही. मी नाही गैरसमज करून घेणार."
"याच स्टॉपवर मी तासनतास घालवतो कधी कधी. आज तू तेच करतीयेस त्यामुळेही बोलावसं वाटलं. या स्टॉपवर एक बरंय की झाडाची सावली आहे. आपण सोडून सगळं जग उन्हात असतं. कधीतरी तेही बरं वाटतंच की. "
याचा विषय काय आहे नक्की डॉक्टरेटचा?
सगळ्या एकाकी शांततेवर ओरखाडे काढत एक बस आली. थांबली. आता आम्ही दोघंही चढलो नाही कंडक्टरने विचित्रपणे पाह्यलं आणि मग बस निघून गेली.
"ते जग उन्हातचं काय म्हणत होतास तू? "
"म्हणजे कसं की आपण उन्हात असतो तेव्हा जगावर सावली असते म्हणजे निदान आपल्याला तरी ते तसं वाटतं. राग येतो खूप. चरफडायला होतं. असं का असं का? मग अश्या जागा शोधायच्या जिथे आपण सावलीत आणि सगळी दुनिया उन्हात असेल. सेडीस्ट म्हण हवं तर. पण ते असतंच ना प्रत्येकाच्या आतमधे!"
काहीतरी घोळ झालाय का? किंवा मला भास होतायत का? उन्हामुळे, पोरांच्या पेपर्समुळे की आणिक कशाकशाने माझं डोकं हल्लक नाही ना झालं? मग हा मला जे वाटतं तेच का बोलतोय?
"हं खरंय तुझं. बरं वाटत इथे बसून! पण नुसतंच तेवढंच नाहीये यात. ह्या.... बरोब्बर ह्याच जागी बसल्यावर येणारी बस, ती येते, समोर उभी रहाते आणि मग जाणारी बस असा सीन विलक्षण जीवघेणा दिसतो."
एकदा शूट करून ठेवणारे मी हे!
"त्यासाठी थांबलीयेस तू इथे? "
मी हो म्हणाले आणि तो माझ्याकडे आधी अविश्वासाने नि मग ओलावून बघत राह्यला. समजल्यासारखं मीही बघत राह्यले. आता काही बोलायला जाणार इतक्यात मला हाक ऐकू आल्यासारखं वाटलं.
"कावेरी मॅम!" आम्ही आवाजाच्या दिशेने पाह्यलं. वीरेंद्र, माझा विद्यार्थी. हुशार पण आगाऊ. मी शिक्षक असूनही बाकीचे सगळे मला नावानेच हाक मारतात पण हा हट्टाने मॅम म्हणणार तेही काहीश्या कुत्सित धारेसकट. "तुम्ही आज येणार होतात हे आधी माहीत नव्हतं. कधी करताय मॅम भाषांतर पूर्ण? दोन महिन्यात प्रयोग करायचाय मला. थांबा दहा मिनिटं. होस्टेल ला जाऊन घेऊन येतो केलेलं काम."
आता नको वीरेंद्र.... असं म्हणेतो बाइकचा कर्कश्श आवाज करत वीरेंद्र गेला सुद्धा. माझ्या नवीन मित्राच्या चेहर्‍यावर असंख्य प्रश्न होते. थोडा गडबडलेला भावही....
"मॅम? भाषांतर? तू कोण आहेस?"
"नाट्यविभागात शिकवते मी. विद्यार्थी आहे हा माझा. त्याला एका नाटकाचे भाषांतर करून द्यायचंय."
"ओह! सॉरी! मला वाटलं तू.... तुम्ही पण विद्यार्थीनीच आहात.... "
"सॉरी काय त्यात. आय ऍम फ्लॅटर्ड! आणि तू च म्हण, तुम्ही नको." मला हसू आलं.
चेहर्‍यावरच्या हसूच्या रेषा जड झाल्यात... खूप दिवसात वापर नाही त्यांचा... थोडा काळ शांततेत गेला. त्याचा गांगरलेपणा ओसरला आणि त्याने विचारले.
"उन्हात आहेस? अगदी तळपत्या उन्हात?"
“हो पण संपेल ते लवकरंच."
सांगावा का याला माझ्या उन्हाचा पत्ता? बोलून टाकावं याच्याजवळ मनातलं? परत कधी भेटणारे हा आयुष्यात. काय म्हणेल फारफारतर.... एका वेड्या बाईशी गाठ पडली. म्हणूदेत काय फरक पडतो?
"उद्या माझ्या घटस्फोटाचा अर्ज दाखल होईल. आम्ही कायमचे वेगळे असण्याची कायदेशीर प्रक्रीया सुरू होईल उद्या."
एक क्षण शांततेत गेला...
"ओह! आय ऍम सॉरी!" तो पुटपुटला
"डोन्ट बी! ते व्हायचंच होतं"
तेवढ्यात ब्रेक्सचा आवाज करत वीरेंद्र परत हजर झाला...
"कावेरी मॅम! हे नाटकाचं मूळ स्क्रिप्ट पण माझ्याकडेच आहे अजून. आता सापडलं! म्हणजे तुम्ही सुरूवातही नाही केलीत अजून? मॅम, प्लीज मला लवकर हवंय भाषांतर.... "
माझा नवीन मित्र त्याला काही म्हणायला जाणार इतक्यात वीरेंद्रकडून स्क्रिप्ट घेऊन मीच तोंड उघडले.
"बरं झालं मला कॉपी दिलीस ते. माझ्याकडे एक होती पण ती सापडत नाहीये आता. काळजी करू नकोस. एकदोन दिवस जरा कामात आहे पण ते संपले की लगेच सुरूवात करते. "
"मॅम, नरेन सर कसे आहेत? त्यांना नमस्कार सांगा. लेखी परीक्षा तर संपलीये. पुढच्या आठवड्यात प्रॉडक्शन्स आहेत. ते झालं की संपलं इथलं मॅम! मग कामाचा शोध. नरेन सर काय करतायत नवीन? मला काम करायचंय त्यांच्याबरोबर... "
"भेट तू नरेनला. तो ओळखतो तुला. "
"ओके मॅम नक्की भेटीन. आणि ते भाषांतराचं प्लीज लवकर करा. मी फोन करतो तुम्हाला पुढच्या आठवड्यात."
"बर!"
वीरेंद्र आला तसा कर्कश्शपणे गेला आणि परत एक चिडचिड उफाळून आली. नरेन सर म्हणे! माहीतीय तुम्हाला नरेन सर आणि मी एकत्र रहात नाही गेले वर्षभर... तरी मुद्दामून तेच.
"नरेन सर म्हणजे? तुझा नवरा? "
"हं... माजी नवरा! "
"आणि कुणाला माहीत नाहीये तुमचा घटस्फोट होतोय हे?"
"माहीतीये की सगळ्यांना. अगदी तारीखवारासकट नसेल माहीत पण आम्ही एकत्र रहात नाही आणि घटस्फोट घेतोय हे माहीतीय."
"मग तरी?"
तरी काय? नरेनकडे मिळू शकणार्‍या कामावर आशा लावून बसलेत आणि नरेन त्याचा फायदा घेऊन त्यांच्यापुढे बिचारेपणाचं नाटक करतो मग येतात हे सगळे मला मुद्दामून टोचायला...
"हो तरी! सवय झाली आता!"
तो बिचारा खूपच गांगरून गेल्यासारखा वाटला. काही क्षण अवघडलेल्या शांततेत गेल्यावर मलाच शांतता सहन होईना. जरा ताण हलका करायला मी विचारलं..
"अरे तुझं नावच नाही माहीत मला! माझं तर तुला कळलंच आहे. कावेरी, कावेरी देशमुख."
आधी गोंधळला मग समजल्यासारखा त्याने मूड बदलला.
"मी किरण शहाणे! नाइस टू मीट यू कावेरी!" हसून त्याने हात पुढे केला.
मीही हसून "सेम हिअर" म्हणत हात मिळवला.
"उद्या सेलेब्रेशन तर मग? सुटण्याचं? कसं साजरं करणार?" मी क्षणभर बघत राह्यले. मग माझ्याही डोळ्यात एक मिश्कीली उतरलीच असावी...
"ठरलं नाही अजून! तू येतोस माझ्याबरोबर सेलेब्रेट करायला?"
"एनीटाईम! कावेरी मॅम!"
ऐतिहासिक नाटकात शोभावी अशी पोज मारली त्याने की मला हसायला यायला लागले. खूप पूर्वी.. दहा बारा वर्षापूर्वी... नरेन भेटला तेव्हा त्याच्या विनोदांवर मी अशीच हसायचे खूप हसायचे.. मग हळूहळू ते सगळे विनोद पांचट वाटायला लागले. हसू येईनास झालं. किंवा आलं तरी जुनी आठवण ताजी झाल्याचं हसू उमटायचं. त्याही नंतर असले विनोद हे नरेनचं सुटका करून घेण्याचं, लपण्याचं साधन आहे हे लक्षात यायला लागलं. नरेनला माझ्यापासून कधीतरी का होईना सुटका हवी असू शकते, क्षणभरापुरतं का होईना लपायला हवं असतं ह्या वास्तवाशी जुळवून घेण्यातच खूप दिवस गेले. मठ्ठ! असं म्हणून हसला होता नरेन तेव्हा... आणि मग काही दिवसांनी अश्या विनोदांवर डोक्यात वीज चमकावी तशी रागाची रेषा उसळी घेऊ लागली. नंतर मात्र असा विनोद त्याने केला की एक जोरदार भांडण ठरलेलं असायचं. असं भांडण जे रात्री बिछान्यातही मिटायचं नाही. तिथेही माझं खरं! मला जिंकायचंय! मी महान! असंच व्हायचं. पण भांडणातून का होईना संवाद तरी होता. मग तोही बंद पडला...
"हॅल्लो..! कुठे हरवलीस? ती बघ बस येतेय... तुझा आवडता सीन सुरू झालाय!"
मी भानावर आले. शस्त्रक्रीया पार पडणार उद्या पोस्ट ऑपरेटीव्ह कॉम्प्लिकेशन्स न होता. ते साजरं करायचं काहीतरी ठरत होतं ना...
"तेच! साजरंच तर करतेय मी... आत्तासुद्धा.. बघ ना हा बसचा सीन इतक्या शांतपणे बघितलाच नव्हता कित्तीतरी वर्षात... आपल्या दिशेने, आशेने येणारा तो मोठ्ठा चौकोनी आकार.. एवढा मोठ्ठा तरी आपल्या आशेने येतोय बघ. आशा कशाची तर आपल्याला गिळून टाकण्याची. पण मोठा दुर्दैवी तो.. समोर येतो.. आ वासतो.. आशाळभूत कुत्र्यासारखा... आणि आपण बस मधे चढतच नाही.. आपण सेफ. तो आकार खिन्न होऊन निघून जातो. त्याच संथ गतीनं.. आपण जिंकतो! "
मी जग्गजेत्याच्या चेहर्याने जाणार्‍या बसकडे पहायला लागले.
"इतकं वाईट असतं का लग्न कावेरी?"
" ............. "
"सांग ना इतकं वाईट असतं लग्न?"
उत्तर द्यायला मला तरी शब्द सापडले नाहीत आणि मी नुसतीच धुमसत होते. तेवढ्यात मालगुडी डेज ऐकू आली पर्समधून... ही धून म्हणजे... नरेनचा फोन? का? आत्ता कशासाठी? उद्या भेटूच ना तिथे! आता नरेनच्या नंबरसाठी वेगळी धून काढून टाकली पाहिजे! भितीच्या मुंग्यांचे डोक्यात वारूळ झाली आणि मी फोन कट केला.

परत मालगुडी डेज! मी अस्वस्थ झाले. आत्ता मला फोन घ्यायचा नव्हता कुणाचा... नरेनचा तर मुळीच नाही. "नरेन?"
या प्रश्नानंतर आता फोन कट करण्यात काहीच अर्थ नव्हता. घेतला... सगळंच विस्कटल्यासारखं वाटलं परत एकदा..
"बोल!"
फोनच्या दुसर्‍या बाजूने येणारे शब्द थंडपणे ऐकत होते मी पण समोरचं सगळं चिंध्या चिंध्या होताना का दिसत होतं?
"आई बाबा दोघंही अमेरीकेत आहेत. दादाकडे."
बरं झालं ते तिकडे गेलेत ते. नाहीतर सगळं माहीत असूनही या नेमक्या क्षणी समजावणी आणि इमोशनल ब्लॅकमेलची शस्त्र बाहेर निघाली असती.
"हं.. उद्या 11 वाजता भेटू. कोर्टात. बाय."
फोन ठेवला. किरण माझ्याकडेच बघत होता पण माझ्या चिंध्या सावरेपर्यंत माझ्याकडे लक्ष नसल्याचं दाखवलं त्यानं... गुणी बाळ! मी सावरले हे बघून तो काही बोलायला जाणार एवढ्यात मीच बोलायला लागले.
"घाणेरडं असतं लग्न! एकमेकांना गृहित धरणं, हक्क, अधिकार आणि सतत जिंकणं... बास एवढंच... "
असंच काहीबाही बोलत होते बहुतेक मी किंवा बोलले नसेन सुद्धा पण हे असं खूप काय काय येऊन गेलं डोक्यात. "लग्न करू नकोस कधी. मैत्रिणी कर, एकत्र रहा... पण लग्न करू नकोस कधी... "
"नरेनच्या फोनला घाबरलीस का तू?"
राग आला मला पण खरंच होतं ते. मी घाबरलेच नरेनचा फोन म्हणल्यावर...
"बस आ वासते पण तुला खेचू शकत नाही... तू जिंकतेस. पण बसमधे नरेन असेल तर हरशील म्हणून?"
आता मला असह्य झालं होतं त्याचं मनगट घट्ट पकडून जीवाच्या आकांतानं मी त्याला गप्प केलं. आणि तो गप्प झाल्यावर त्याचं मनगट झिडकारून दिलं.
"मला वाचायचा प्रयत्न करू नकोस."
शक्य तितक्या थंड स्वरात मी त्याला सांगितलं. क्षणभरंच त्याच्या नजरेत फिस्कारणारं मांजर चमकून गेलं. अशीच फिस्कारणारी नजर होती नरेनची जेव्हा मी त्याला खेळवत खेळवत नेऊन ऐन वेळेला नकार दिला होता.. खूप महिन्यांनंतर आमची लय जमली होती. मलाही सगळं हवसं वाटत होतं पण त्यापेक्षा मला त्याला हरवायचं होतं. त्याला चिडलेला, हतबल, ऑलमोस्ट भीक मागताना बघायला मला मजा आली होती. पण ते टिकलं नाही. शेवटी त्याच्या ताकदीने त्याने मला गृहित धरलंच आणि तो जिंकला. शी!! श्वापदं.. नुसती श्वापदं होतो आम्ही तेव्हा. पण त्या प्रसंगाने आमच्यातला संवाद संपवला, भांडण संपवलं. आपल्या कामाच्या पलिकडे माझ्याशी बोलणं त्याने तोडलं. मी भांडायचा प्रयत्न केला तर तो सरळ उठून बाहेर जात असे किंवा कोणालातरी घरी बोलवत असे. मग आल्यागेल्याचं आगतस्वागत केल्याचं नाटक मला करावंच लागे. काय करणार लोक ओळखत होते आम्हाला आणि आपली इमेज खराब करून घेणं नरेनला परवडण्यासारखं नव्हतं. सूड सूड घ्यायचा तो मी त्याच्याशी भांडल्याचा...
"जिंकणं इतकं महत्वाचं का असतं कावेरी?"
माझी तंद्री मोडली.
"माझं काम सगळ्यांपेक्षा उत्तम हवं, मी माझ्या जोडीदारापेक्षा वरचढ असायला हवं. माझा लोकांनी हेवा करायला हवा... ह्याची गरजच नाही वाटली तर?" आत्ता माझं त्याच्याकडेही लक्ष गेलं.
"तुलाही जिंकायचंय. हं? आणि तूही बसवरंच विजय मिळवतोस!"
"आता तू मला वाचतेयस!" त्याने साभार परतफेड केली.
मला काहीतरी धारदार बोलायचं होतं पण त्याच्या चेहर्‍यावरची 'कशी परतफेड केली' ची खुशी लपत नव्हती आणि मला हसायलाच यायला लागलं अचानक. नरेनशी लग्न ते घटस्फोट एवढं मोठ्ठं विनोदी आयुष्य जगल्यावरही मला कशाचंही कधीही हसू येतंच... आम्ही बोलायला लागून तासभर होऊन गेला होता. ऊन उतरायला लागलं होतं. एक घटस्फोटाच्या उंबरठ्यावरची बाई आणि एक डॉक्टरेटचा विद्यार्थी यांच्यातलं संभाषण अजूनच अ‍ॅब्सर्ड वाटायला लागलं होतं.
"हसतेयस काय कावेरी?"
"येतंय हसू?"
"कशावर!"
"सध्या तरी कशावरही!.. "
'मूर्ख आहेस' असं म्हणता म्हणता त्याने ते आतल्याआत परतवलं. माझं खोटं हसणं त्याला कळलं म्हणून की मी फॅकल्टी म्हणजे त्याला सिनीयर होते म्हणून कुणास ठाउक!
"असं अजूनही बर्‍याच ठिकाणी जातेस का तू व्हिजिटींग फॅकल्टी म्हणून?"
"हं.. अजून एक-दोन संस्था आहेत!"
"म्हणजे शिकवण्यात बिझ!"
"खूप नाही!"
"मग उरलेला वेळ?"
त्याला विचारायचं होतं उरलेल्या वेळाचं आता, यापुढे काय करणार! आणि माझ्याकडे उत्तर नव्हतंच. आयुष्य नरेनला बांधून घेतलं होतं. सगळं त्याच्या सावलीत, तो सांगेल तसं, तेवढंच होतं. जगणंही आणि करीअरही... आत्ताआत्तापर्यंत तर केवळ मी घटस्फोट का घेऊ नये याची कारणे सांगण्याची स्पर्धा चालू होती आई आणि नरेनची. नरेन हट्ट सोडायला तयार नव्हता. शेवटी महिन्याभरापूर्वी मानलं त्याने. आणि सध्या 6 महिन्यासाठी आईबाबांच्यापासून दादाने सुटका केली. आता विचार करायला हवा पुढे काय याचा. पण कसं? कुठून सुरूवात करायची? सगळे कॉन्टॅक्टस नरेनला ओळखणारे आहेत.. का दुसरंच काही करायचं?
"तुला स्वैपाक येतो? पापड, लोणची बनवता येतात?"
"हं??"
"अगं उत्तम व्यवसाय आहे तो!"
मी अजूनही समजून घ्यायच्या प्रयत्नात होते तो काय म्हणतोय ते.
“हे बघ जिथे जिथे शिकवायला जाशील ना तिथे तिथे आधी सॅम्पल्स घेऊन जात जा. प्रत्येक सबमिशनबरोबर एकेक पाकीट कम्पलसरी. त्याचे दहा मार्क जास्त! केवढा खप होईल. केवढा धंदा वाढेल!"
आता त्याला चेहरा सरळ ठेवणं मुश्कील झालं आणि आपल्याच विनोदावर तो हसत सुटला.. मग मीही!!
"मग मी युनिव्हर्सिटीच्या या विभागातून त्या विभागात जाईन आणि माल खपवीन. शिकवण्यापेक्षा यातच बरा पैसा मिळेल!" मी अजूनही त्याच विनोदांच्यात घुटमळत होते.
"आणि नरेनचा संपर्कही नाही. होना?"
थबकण्याशिवाय पर्यायच नव्हता. नरेनचा संपर्क नसणं हे गमतीत का होईना पण किती बरं वाटत होतं. काहीही बोलता आलं नाही. मी उगीचच चुळबुळत राह्यले. नरेनचा संपर्क, संदर्भ नसेल असं काय काय मला येऊ शकतं हे चाचपडत बसले. नव्हतंच असं काही. इतकं सगळं एकत्र होतं. याच क्षेत्रात राहून त्याचा संदर्भही येणार नाही असं कसं शक्य होतं? अगदी त्याच्याबरोबर काम नाही केलं तरी! आणि कशावरून नरेन समोर येणार नाही कधीच? तेव्हा काय होईल? कसा वागेल तो? कशी वागेन मी? संपूर्ण प्रोफेशनली वागता येईल?
"कधीपासून शिकवतेयस?"
"बरीच वर्ष झाली."
"एवढ्या लहान वयात फॅकल्टी?"
"लहान?"
"बर्याच वर्षांपूर्वी!"
"हो. अरे माझ्या विषयात फारसे लोक नाहीयेत. म्हणजे शिकवू शकणारे. आणि मला एक फेलोशिप होती. त्यामुळे खूप संशोधन आणि अभ्यास करायला मिळाला होता लहान वयातच. ते झालं आणि इथे शिकवायला लागले."
"गुड! आणि मग पापड, लोणची कधी शिकलीस या सगळ्यातून?"
"हं?"
"अगं व्यवसाय करायचाय ना तुला... परीत्यक्ता बायकांसारखा!"
"किरण!"
रागही आला होता त्याने परीत्यक्ता म्हणल्याचा आणि त्या पांचट विनोदांची गंमतही वाटली.
"मी सोडलं नरेनला. त्याने नाही टाकलं मला."
"का?... म्हणजे सांगायचं नसेल तर सांगू नकोस मी असंच विचारलं"
काय सांगू? सगळे तर सुख दुखलं म्हणतायत. हाही तेच म्हणणार. का सांगू? नातं उरलं नव्हतं फक्त कुरघोडी करणंच उरलं होतं ज्याचा वीट आला म्हणून सोडलं हे सांगू? नरेनची भीति वाटायला लागली. आज काय समोर येणार? आज तो कश्यापद्धतीने जिंकणार? सतत धास्ती. साध्या सोप्या गोष्टी वाकड्यात नेऊन दुसर्‍याला आणि स्वतःला टॉर्चर करून घ्यायच्या सवयी लागल्या होत्या. आपलं एका घाणेरड्या प्राण्यात रूपांतर होतंय हे सहन होईनासं झालं आणि एक दिवस नरेन घरी नसताना गुपचुप घर सोडलं. त्याच्या समोरून निघणं शक्य नसतं झालं मला. त्याचा इगो दुखावून मी निघून जातेय हे त्याने सहन केलं नसतं. काहीतरी झालं असतं. काहीतरी खूप घाण. कधीही न भरून येण्यासारखं काहीतरी तुटलं मोडलं असतं. ते मी टाळलं. स्वतःच्याच घरातून चोरासारखी पळून आले.
"मगाशी नरेनचा फोन आल्यावर घाबरलीस म्हणून विचारलं. आय ऍम सॉरी मी हे विचारणं योग्य नाही.. " "सांगण्यासारखं काहीच नाहीये रे. नातं सडलं, मेलं. मग त्या नात्याचं कलेवर घेऊन तसंच रहायचा धीर झाला नाही.... इतकंच.. इतकंच सांगू शकते मी."
"मग गिल्ट कसला आहे?"
"गिल्ट?"
"हो! त्याशिवाय का दचकलीस नरेनच्या फोनला."
उत्तरं नव्हतंच आणि ते शोधायचं टाळलं होतं मी आजवर. असंच काय काय टाळण्यासाठी मी पळ काढला होता का? नरेनला सोडणं हे पळ काढणं होतं का?
ङ्गअजूनही हरशील असं वाटतं तुला? ङ्घ
हो कदाचित असं पटकन मनात उमटून गेलं आणि मी विचारात पडले. हरणं जिंकणं हे शब्द नरेनच्या संदर्भात येत होते अजूनही. पण आता ते अ‍ॅब्सर्ड वाटायला लागले. का?
"तू नरेनशिवाय जगू शकतेस ना?"
"हो म्हणजे काय! वर्षभर काय जगले नाही?"
पटकन उत्तर दिलं मी. एक वेळ होती की नरेनशिवाय जगण्याची कल्पनाही उडवून लावली असती मी पण आता त्याच्याबरोबर जगणं सहन होत नव्हतं मला.
"मग तू का हरशील?"
तोंडावर फाडकन पाण्याचा हबकारा बसावा तसं वाटलं मला. खरंच आता ती वरचढ असण्याची धडपड निरर्थक होती. आणि हरायची भीतिही. म्हणजे कदाचित पळही असेल तो पण मी सुटले होते. मी मुक्त झाले होते. आता मी नरेनकडून हरूच शकत नव्हते. खरंतर त्याच्या संपर्काला, संदर्भाला घाबरावं असं मी काहीच केलं नव्हतं. मुळातच त्याला घाबरायची गरजच नव्हती मला. सगळंच अचानक लख्खपणे जाणवलं मला. स्वच्छपणे समोर आलं.
..................
माझं मुक्त होणं मी आतल्याआत अनुभवत होते मी काही क्षण आणि बहुतेक किरणही.
कारण भानावर आले तेव्हा त्याच्याही डोळ्यात हसू होतंच.
"बस आली बघ! याच्यानंतरची आता एकदम तासाभराने येईल. घरी कशी जाणारेस?"
"ह्याच बसने जाईन!"
सहजच उत्तर बाहेर पडलं तोंडातून. आणि मीच खूश झाले. आता येणारी बस ही बसच होती. मला एका जागेवरून दुसर्‍या ठिकाणी घेऊन जाणारी. काय ग्रेसफुल दिसत होती ती येताना.
"ब्राव्हो कावेरी!"
मी हसले. बस आले, मी बसमधे बसले. बस सुरू झाली. मी मागे वळून स्टॉपकडे पाह्यलं. बसस्टॉपने माझ्याकडे बघून हळूच डोळे मिचकावले बहुतेक. अचानक मातीपावसाचा खमंग वास आला. पावसाचा पहिला थेंव चेहर्‍यावर घेताना नव्याने शिकल्यासारखा मी खूप मोठ्ठा श्वास भरून घेतला अगदी मोकळेपणाने!!

समाप्त......

- नी

प्रकार: 

मस्त!

छान आहे...सुंदर फुलविली आहे...

फक्तं...एकच् वाटलं...तो "गिल्ट" नाही..."भिती" आहे...

-परीक्षित