दु:ख सुद्धा माणसे पाहून येते

Submitted by मिल्या on 9 November, 2010 - 08:24

का असे माझ्याकडे हटकून येते?
दु:ख सुद्धा माणसे पाहून येते

मी दिवसभर कोरडा असतो तसा पण
सांज ढळली की मळभ दाटून येते

रोज अश्रूंचा सडा परसात माझ्या
रात्र विरहाच्या कळ्या घेऊन येते

सज्ज ठेवूया चला पंचारतींना
वेदना सांगा कधी सांगून येते?

बोलणे माझे कसे कोणा रुचावे?
बोलतो मी तेच जे आतून येते

शोधतो मी चांदणे केवळ तिच्यातच
ती जरी कायम उन्हे नेसून येते

चंद्र तार्‍यांची नको देऊ हमी... तू
पापण्या मिटताच अंधारून येते

ह्याचसाठी काढतो खपल्या जुन्या मी
रोज ती फुंकर नवी होऊन येते

चाल करुनी... तो पहा... आलाच मृत्यू
रोज का संधी अशी चालून येते?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बोलणे माझे कसे कोणा रुचावे?
बोलतो मी तेच जे आतून येते>>>

वा मिल्या!!! फिर दिल जीत लिया!! सही!

व्वा !
<<सज्ज ठेवूया चला पंचारतींना
वेदना सांगा कधी सांगून येते?>>
विशेष आवडलेला शेर.

परत एकदा धन्यवाद सर्वांना...

भूषण : विचारांमध्ये नाविन्य आणायचा जरूर प्रयत्न करेन पुढच्यावेळेस

का असे माझ्याकडे हटकून येते?
दु:ख सुद्धा माणसे पाहून येते
मी दिवसभर कोरडा असतो तसा पण
सांज ढळली की मळभ दाटून येते

वाह उस्ताद !!! मस्त लिहिलय.

सज्ज ठेवूया चला पंचारतींना
वेदना सांगा कधी सांगून येते?

बोलणे माझे कसे कोणा रुचावे?
बोलतो मी तेच जे आतून येते

चाल करुनी... तो पहा... आलाच मृत्यू
रोज का संधी अशी चालून येते?

हे व्याघ्र आवडले...

शोधतो मी चांदणे केवळ तिच्यातच
ती जरी कायम उन्हे नेसून येते

उन्हे नेसण्याची कल्पना आवडली..

चंद्र तार्‍यांची नको देऊ हमी... तू
पापण्या मिटताच अंधारून येते

या व्याघ्रातली दुसरी ओळ प्रभावी आहे, त्या मानाने पहिली ओळ मिळमिळीत आहे. विरोधाभासासाठी किंवा कल्पनाविस्तारासाठी वेगळा विचार व्हावा..

व्वा!

Pages