घोषणा झाली...

Submitted by अ. अ. जोशी on 6 November, 2010 - 08:33

घोषणा झाली मला फेटाळलेली...
'हुश्श' झाली आसवें कंटाळलेली

माणसे झाली पहा आता शहाणी
फार पूर्वी भोवती घोटाळलेली

पालवी कोठे नसू द्या फार मोठी
आणि ती नक्की नको नाठाळलेली

एकही अश्रू दिसेना आज कोठे
गोष्ट होती आजही रक्ताळलेली

नेहमी असते खर्‍याची गोष्ट मागे
जातसे जत्रा पुढे वाचाळलेली

मद्य कसले घेत बसता धुंद होण्या....?
जीवने बनवा नशा फेसाळलेली..!

खोल आहे मी समुद्रासारखा; पण...
आजही देतो उन्हें गंधाळलेली

फायदा नसतो उधारी फेडण्याचा
माणसे गेल्यावरी सांभाळलेली

आजही गावाकडे लज्जा दिसावी...
जीवनाची लक्तरे गुंडाळलेली..!

टेकला माथा जिथे, तेथेच फुटला...
जीवनें इतकी कशी खडकाळलेली..?

एकदा ना एकदा होतील विजयी...
आजही दु:खे उरी कवटाळलेली

गुलमोहर: 

अजयराव,

घोषणा झाली मला फेटाळलेली...
'हुश्श' झाली आसवें कंटाळलेली

गडबडयुक्त गझल कशी काय रचलीत? पुढेही गडबड आहे. ठा, क्ता, चा वगैरे!

हे दोन शेर आवडले. (स्वतंत्ररीत्या)

आजही गावाकडे लज्जा दिसावी...
जीवनाची लक्तरे गुंडाळलेली..!

टेकला माथा जिथे, तेथेच फुटला...
जीवनें इतकी कशी खडकाळलेली..

-'बेफिकीर'!

मतल्यातील शेवटचे अक्षरसमूह '' टाळलेली'' पुढे पाळले नाही त्यामुळे गझल गडबडलीय पण ते दुरुस्त होईलच.

घोषणा झाली मला फेटाळलेली...
'हुश्श' झाली आसवें कंटाळलेली

एकही अश्रू दिसेना आज कोठे
गोष्ट होती आजही रक्ताळलेली

मद्य कसले घेत बसता धुंद होण्या....?
जीवने बनवा नशा फेसाळलेली..!

आजही गावाकडे लज्जा दिसावी...
जीवनाची लक्तरे गुंडाळलेली..!

हे शेर फार आवडले.... अभिनंदन. Happy

बेफिकीर, डॉक्टर कैलास,
मतल्यात "टाळलेली" हा अक्षरसमूह सामायिक असला तरी मागे "फे" आणि "कं" असल्यामुळे अलामत भंग असल्याचा भास होतो. मात्र, उलट पद्धतीने पाहिल्यास - "फे" आणि "कं" ही अक्षरे असल्याने ते अलामतीचे अक्षर होवू शकत नाही म्हणून पुढे असलेले "टा" (योगायोगाने दोन्ही ठिकाणी आलेले आहे.) त्यातील अलामत "आ" घ्यावी लागेल. ....आणि "आळलेली" हा काफिया म्हणून वापरता येईल.

(अपवाद म्हणून अशा गोष्टी स्वीकारायला कोणाचीही हरकत नसावी असे वाटते.)

धन्यवाद!

१. अलामत भंग असल्याचा भास होतो.- भास वगैरे होत नाही आहे. अलामत भंग आहेच की तो? उलटसुलट पद्धतीने कसे पाहता येईल?

२. अपवाद - यावर पुर्वी चर्चा झालेली आहेच! 'अपवाद' या प्रकाराची व्याख्या वैयक्तीक असू शकेल. मात्र माझ्यापुरते, जे आजवर झाल्याचे दिसत आहे त्यातच मी गझल रचणार!

३. त्यातील अलामत "आ" घ्यावी लागेल. ....आणि "आळलेली" हा काफिया म्हणून वापरता येईल
- असे 'लागेल' व 'येईल' प्रमाणे गझल रचणे मला व्यक्तीशः अयोग्य वाटते. आपल्या स्वातंत्र्याचा आदर आहेच!

-'बेफिकीर'!

गजल आणि बेफिकीरची पहिली प्रतिक्रिया वाचल्यानंतर मला जे वाटले तेच अजयने लिहिलेय.

ही रचना गजलच्या फॉरमॅट्मध्ये आहे काय? तर त्याचे उत्तर होय म्हणावे लागेल.

फेटाळलेली आणि कंटाळलेली या शब्दांतील फे आणि कं ही अक्षरे अलामतीसाठी घेता येत नसतील तर त्यासाठी अजयने वापरलेला पर्याय हा उत्तम पर्याय आहे. मला फार पूर्वी हा प्रश्न पडला होता; त्याचे उत्तर या गजलेद्वारे मिळालेय असे वाटते.

"प्रत्येक द्वीपदी वेगळी काढून म्हणता येते" ही प्राथमिक चाचणी पूर्ण होत असेल तर काफिया आणि अलामत ही दुसरी चाचणी गौण असली पाहिजे आणि त्यात असे (उपरोक्त गजलेप्रमाणे) अपवाद बसवले पाहिजेत.

रचना खूप आवडली..

माझ्या मते काफिया पाळला गेलेला नाहीये.. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या गझल वाटत नाही..
अर्थात, गझलकार अजयजी हे अतिशय अनुभवी असल्यामुळे मी यात अजून काहीच बोलत नाही. त्यामुळे अपवाद करावा की नाही, करायचा असल्यास कोणत्या कसोटीवर करावा इ इ चर्चा न केलेली बरी. Happy

ही रचना गजलच्या फॉरमॅट्मध्ये आहे काय? तर त्याचे उत्तर होय म्हणावे लागेल.>>>>

याचे उत्तर नाही असे आहे. गझल हे मतला व पुढील किमान चार शेर यांचे मिळून एकाच वृत्तात असलेल्या दोन दोन ओळिंचे अर्थपुर्ण युनिट असते ही व्याख्या मान्य असल्यास सदर रचना मतला बिघडल्यामुळे गझल ठरू शकत नाही. मात्र, ती व्याख्याच मान्य नसल्यास ते ज्याचे त्याचे स्वातंत्र्य!

फेटाळलेली आणि कंटाळलेली या शब्दांतील फे आणि कं ही अक्षरे अलामतीसाठी घेता येत नसतील तर त्यासाठी अजयले वापरलेला पर्याय हा उत्तम पर्याय आहे. मला फार पूर्वी हा प्रश्न पडला होता; त्याचे उत्तर या गजलेद्वारे मिळालेय असे वाटते.>>>>

आपल्याला फार पुर्वी काय प्रश्न पडला होता ते मला माहीत नाही. (कारण त्याचे उदाहरण आपण दिलेले नाहीत.) मात्र या गझलेतून एकाच प्रश्नाचे उत्तर मिळते, ते म्हणजे 'तंत्रात बसली नाही तर अपवाद माना असा आग्रह धरता येतो का? तर हो'! आणि मला ते उत्तर (पुन्हा व्यक्तीशःच ) मान्य नाही.

"प्रत्येक द्वीपदी वेगळी काढून म्हणता येते" ही प्राथमिक चाचणी पूर्ण होत असेल तर काफिया आणि अलामत ही दुसरी चाचणी गौण असले पाहिजे आणि त्यात असे (उपरोक्त गजलेप्रमाणे) अपवाद बसवले पाहिजेत>>>

हे मत तर फारच चकीत करणारे आहे! असे झाले तर उदाहरणार्थ 'आहे' ही रदीफ असलेले किंवा कोणत्याही गैरमुरद्दफ गझलेतील कोणतेही शेर एखाद्या मतल्याखाली घेऊन चालेल! मग वृत्ताचीही भानगड नको!

आनंदयात्रींशी सहमत - अजय जोशी अनुभवी गझलकार आहेत. वर झालेली बाब किरकोळ आहे व ती ते लीलया सुधारू शकतात. मात्र 'हा अपवाद मानला जावा' या विधानाला आक्षेप घेण्यासाठी मी परत प्रतिसाद दिला व ते विधान उचीत वाटल्याचे शरद यांनी लिहिल्यामुळे आणखीन पुन्हा दिला!

-'बेफिकीर'!

<<हे मत तर फारच चकीत करणारे आहे! असे झाले तर उदाहरणार्थ 'आहे' ही रदीफ असलेले किंवा कोणत्याही गैरमुरद्दफ गझलेतील कोणतेही शेर एखाद्या मतल्याखाली घेऊन चालेल! मग वृत्ताचीही भानगड नको! >>

माझ्या म्हणण्याचा विपर्यास होतोय. मी 'उपरोक्त गजलेप्रमाणे' म्हटले म्हणजे त्यात फक्त वर दिलेली किंवा तत्सम (अलामत अशा प्रकारे भंग होणारी) गजल सामील आहे. कुठलीही नव्हे.

आवडलेले शेर.......

मद्य कसले घेत बसता धुंद होण्या....?
जीवने बनवा नशा फेसाळलेली..!

आजही गावाकडे लज्जा दिसावी...
जीवनाची लक्तरे गुंडाळलेली..!

टेकला माथा जिथे, तेथेच फुटला...
जीवनें इतकी कशी खडकाळलेली..?

एकदा ना एकदा होतील विजयी...
आजही दु:खे उरी कवटाळलेली

माझ्याही मते तांत्रिकदॄष्ट्या गझल वाटत नाही... अजय ह्यांचे स्पष्टीकरण पटले नाही... गझल किंवा मतलाही इतका out of the world नाही की त्यासाठी सूट घेण्याची गरज भासावी...
'घोषणा झाली मला झिडकारलेली/नाकारलेली' असे काहिसे करून सूट टाळता येणे अजय सारख्या कसलेल्या गझलकाराला सहज शक्य आहे असे वाटते... Happy

अर्थात, गझलकार अजयजी हे अतिशय अनुभवी असल्यामुळे मी यात अजून काहीच बोलत नाही. त्यामुळे अपवाद करावा की नाही, करायचा असल्यास कोणत्या कसोटीवर करावा इ इ चर्चा न केलेली बरी >>> माझ्यामते अजय हे अनुभवी असल्याने त्यांच्यावरची जबाबदारी अधिक वाढते असे मला वाटते...

घोषणा झाली मला फेटाळलेली...>>> हे वाक्य व्याकरणदॄष्ट्या बरोबर असेलही पण सहज वाटत नाही...

'घोषणा झाली मला फेटाळण्याची' जास्ती बरोबर वाटते...

चू.भू.द्या.घ्या.

खडकाळलेली, गुंडाळलेली शेर आवडले...

मिलिंदराव व अजयराव!

आपण एक मुद्दा लिहीलात त्यावर मला पुन्हा लिहावेसे वाटले. अजयराव, आपण चर्चेत सहभागी व्हावेत.

हे वाक्य व्याकरणदॄष्ट्या बरोबर असेलही पण सहज वाटत नाही...>>>>> हे मिलिंदरावांचे मत! त्याबाबत!

माझा ही गझल वाचताना किंचितसा गोंधळ झाला.

घोषणा झाली मला फेटाळलेली... - यात 'फेटाळणारी' असे नको का?
'हुश्श' झाली आसवें कंटाळलेली - हुश्श करणे हे योग्य नाही का? हुश्श होणे असा शब्दप्रयोग असल्यास याची मला कल्पना नाही.

माणसे झाली पहा आता शहाणी
फार पूर्वी भोवती घोटाळलेली - यात घोटाळणे व शहाणे होणे यांचा परस्पर संबंध लक्षात आला नाही. साधारणतः लाचार माणसे घोटाळतात, ती शहाणी नसतात म्हणून घोटाळतात असे पटकन वाटत नाही.

पालवी कोठे नसू द्या फार मोठी
आणि ती नक्की नको नाठाळलेली - यातही 'नाठाळलेली पालवी' असा उल्लेख आहे. असे विशेषण प्रचलीत असल्यास मला खरच कल्पना नाही.

नेहमी असते खर्‍याची गोष्ट मागे - खर्‍याचे स्थान! खर्‍याची 'गोष्ट' आणि वाचाळणे हे लक्षात आले नाही.
जातसे जत्रा पुढे वाचाळलेली - 'वाचाळणारी' नको का?

खोल आहे मी समुद्रासारखा; पण...
आजही देतो उन्हें गंधाळलेली - समुद्रासारखा खोल असणे याचा विरोधाभास 'ऊन देणे' हे लक्षात आले नाही. कारण आपण 'पण' वापरला आहेत म्हणून मला तो विरोधाभास असावा असे वाटते. समुद्रासारखा खोल असूनही मी वरवर उथळ समजला जातो असा माझा अंदाज होता या द्विपदीबद्दल! गंधाळलेली उन्हे हेही लक्षात आले नाही. असे शब्दप्रयोग भटसाहेबांच्या काव्यात खूप प्रमाणात दिसतात. (म्हणून आपण योजलात असे मुळीच म्हणायचे नाही.) पण मला स्वतःला ते नीटसे समजत नाहीत.

फायदा नसतो उधारी फेडण्याचा
माणसे गेल्यावरी सांभाळलेली - गेल्यावरी या शब्दानंतर अर्धविराम हवा आहे का? सुरुवातीला मला ते 'माणसांना गेल्यावर सांभाळले' असे जाणवले.

हे सर्व प्रामाणिकपणे लिहीत आहे. आपल्याला चर्चा नको असल्यास हा शेवटचा प्रतिसाद!

कृपया गैरसमज नसावेत.

-'बेफिकीर'!

बेफिकीर,
प्रामाणिकपणे चर्चा करायला माझीही हरकत नाही. मात्र, एका साच्यातच अडकून पडणे मला जमणार नाही.
माझ्या मते गझलेचे तंत्र पहिले आले की गझल? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच गझल. हळूहळू त्यातील तंत्र पक्के झाले.
दुसरे म्हणजे, 'मतला म्हणजे गझल' असे कोणाला असे वाटत असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही. मी गझल प्रकाशित केल्यानंतर काय प्रतिक्रिया असू शकतील याची मला पूर्ण कल्पना होती. मतला पाहिल्यावर तो चुकलेला आहे असे लक्षात घेण्यापेक्षा त्यात कोणता काफिया असू शकेल त्यानुसार मते प्रदर्शित झाली असती तर ठीक होते.

>>>घोषणा झाली मला फेटाळलेली... - यात 'फेटाळणारी' असे नको का?
'हुश्श' झाली आसवें कंटाळलेली - हुश्श करणे हे योग्य नाही का? हुश्श होणे असा शब्दप्रयोग असल्यास याची मला कल्पना नाही.<<<
फेटाळलेली या शब्दातच सर्व काही आहे. मला आधीच फेटाळले होते मात्र घोषणा आत्ता झाली. आणि त्यामुळे या घोषणेची वाट बघणारी आसवे हुश्श झाली.

>>>माणसे झाली पहा आता शहाणी
फार पूर्वी भोवती घोटाळलेली - यात घोटाळणे व शहाणे होणे यांचा परस्पर संबंध लक्षात आला नाही. साधारणतः लाचार माणसे घोटाळतात, ती शहाणी नसतात म्हणून घोटाळतात असे पटकन वाटत नाही.<<<
आवश्यकता असते म्हणून काही माणसे आजुबाजुला घोटाळत असतात. आवश्यकता संपली की आठवणही करीत नाहीत (म्हणजे इतकी शहाणी होतात) असे आहे.

>>>पालवी कोठे नसू द्या फार मोठी
आणि ती नक्की नको नाठाळलेली - यातही 'नाठाळलेली पालवी' असा उल्लेख आहे. असे विशेषण प्रचलीत असल्यास मला खरच कल्पना नाही.<<<
प्रचलित असलेलीच विशेषणे वापरावीत असे मला वाटत नाही. पालवी याचा शब्दशः अर्थ न घेता नुकतेच सुरू झालेली कोणतीही गोष्ट असे घ्या. ती फार मोठी नाही झाली तरी चालेल, पण त्यात नाठाळपणा नको.

>>>नेहमी असते खर्‍याची गोष्ट मागे - खर्‍याचे स्थान! खर्‍याची 'गोष्ट' आणि वाचाळणे हे लक्षात आले नाही.
जातसे जत्रा पुढे वाचाळलेली - 'वाचाळणारी' नको का?<<<
खरेतर हे लगेचच लक्षात येण्यासारखे आहे. समाजात खर्‍यापेक्षा वाचाळ लोकांचे स्थानच जास्त मानाचे आहे सध्या.

>>>खोल आहे मी समुद्रासारखा; पण...
आजही देतो उन्हें गंधाळलेली - समुद्रासारखा खोल असणे याचा विरोधाभास 'ऊन देणे' हे लक्षात आले नाही. कारण आपण 'पण' वापरला आहेत म्हणून मला तो विरोधाभास असावा असे वाटते. समुद्रासारखा खोल असूनही मी वरवर उथळ समजला जातो असा माझा अंदाज होता या द्विपदीबद्दल! गंधाळलेली उन्हे हेही लक्षात आले नाही. असे शब्दप्रयोग भटसाहेबांच्या काव्यात खूप प्रमाणात दिसतात. (म्हणून आपण योजलात असे मुळीच म्हणायचे नाही.) पण मला स्वतःला ते नीटसे समजत नाहीत.<<<
याचा अर्थ उघड आहे. समुद्र आणि सूर्य.

>>>फायदा नसतो उधारी फेडण्याचा
माणसे गेल्यावरी सांभाळलेली - गेल्यावरी या शब्दानंतर अर्धविराम हवा आहे का? सुरुवातीला मला ते 'माणसांना गेल्यावर सांभाळले' असे जाणवले. <<<
हं... अर्धविराम असता तरी चालले असते. खरे आहे.

विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मिल्या,
झिडकारलेली वगैरे जे आपण सुचवलेले आहेत ते चुकीचे आहे. आपण गझल नीट वाचली नसावीत. तसेच माझा प्रतिसादही. मी "आळलेली" असा काफिया घेतल्याचे लिहिले आहे. त्यामुळे झिडकारलेली, नाकारलेली कसे चालेल? असो.

'मतला म्हणजे गझल' असे कोणाला असे वाटत असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही. मी गझल प्रकाशित केल्यानंतर काय प्रतिक्रिया असू शकतील याची मला पूर्ण कल्पना होती. मतला पाहिल्यावर तो चुकलेला आहे असे लक्षात घेण्यापेक्षा त्यात कोणता काफिया असू शकेल त्यानुसार मते प्रदर्शित झाली असती तर ठीक होते>>>

ही विधाने गंमतशीर आहेत.

१. प्रतिक्रियांची तुम्हाला कल्पना असेल तर त़ळटीप लिहू शकला असतात.

२. मतला म्हणजे गझल असे समजणारे वरील चर्चेत मला तरी कुणी दिसले नाही. हा आडाखा आपण कसा काय बांधलात माहीत नाही.

३. 'कोणता काफिया असू शकेल' ही अंदाज वर्तवण्याची बाबच नसते. जो काफिया असतो तो असतो! आपण त्या तंत्रापासून जाणीवपुर्वक फारकत घेण्याच्या हेतूने गझल अशी रचली असलीत तर तशी तळटीप देता येतेच!

एका साच्यातच अडकून पडणे मला जमणार नाही.
माझ्या मते गझलेचे तंत्र पहिले आले की गझल? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच गझल. हळूहळू त्यातील तंत्र पक्के झाले.>>>>

१. अडकून पडले पाहिजे असा आग्रहच नाही करू शकत कुणी! ओव्या लिहा, लावण्या लिहा, मुक्तछंद लिहा! पण गझल लिहीलीत की मराठीमध्ये ती बाराखडीसमोरच तपासली जाणार!

२. गझल पहिली की तंत्र - गजल पहिली हे आपण नेमके कशावरून म्हणत आहात? तो काव्यप्रकार तंत्रासहीतच जन्माला आलेला आहे. हे इसवीसन ६९२ पासून असेच आहे व त्याआधीही होते, फक्त ते केवळ अरबस्तानापुरते होते. आता तुम्ही अगदी पाळेमुळेच खणून काढणार असाल तर मग ते दाखले देऊन नोंदवलेत तर बरे होईल! नाहीतर ती मते विचारात घेणार कशी?

३. हळूहळू त्यातील तंत्र पक्के झाले - निदान आपण ज्या काळात गझल लिहीतो आहोत तो काळ 'याच तंत्राने गझल लिहीली जाते' हे सांगणार्‍या अकराशे वर्षांच्या इतिहासावर उभा आहे. हळूहळू म्हणजे किती हळूहळू असे अभिप्रेत आहे आपल्याला?

त्यामुळे या घोषणेची वाट बघणारी आसवे हुश्श झाली>>> म्हणजे काय ते लक्षात आले नाही. असो!